...हाच मुर्गीचा बाप!

‘बटर चिकन आणि दाल मखनीचा शोधकर्ता’ अशा टॅगलाईनच्या वापरावरून दोन हॉटेलमालक चक्क दिल्ली उच्च न्यायालयात गेले आहेत.
Two hoteliers moved Delhi High Court over use of the tagline Inventor of Butter Chicken and Dal Makhani
Two hoteliers moved Delhi High Court over use of the tagline Inventor of Butter Chicken and Dal Makhani Sakal
Updated on

- प्रवीण टोकेकर

बटर चिकनचा शोध आम्हीच लावला, असा दावा दोघांनी केला आहे. दाल मखनीही आमचीच, असं ते ठामपणे सांगताहेत. आपल्याला काय, मुर्गी ज्याच्या पोटात जाते, तोच तिचा खरा बाप असतो...

वडलार्जित प्रॉपर्टीवरून पुढील पिढ्या कोर्टात भांडत बसतात. त्यावर वकिलांच्या पिढ्या घरे बांधतात. ‘मेरेवरचे चार माड आणि दहा सुपाऱ्या, दोन रातांबिणी आणि दोन फणशिणी, वईजवळील दोन आवळिणी धाकल्या बबनकडे जातील; तर राहाते घर थोरल्या विश्वंभराकडे राहील.

घराची दक्षिणेकडील पडवी कन्या गं. भा. सरसुती ईच्या नावे करणेत येत आहे...’ अशा चार ओळींत एखादा कर्ता कुळपुरुष पुढील पिढ्यांच्या भांडणाची सोय करून जातो. पुढे तारीख पे तारीख ठरलेली. स्थावर जंगम मालमत्तेचं भांडण हे समजून घेण्याजोगं आहे; पण पाऊणशे वर्षांपूर्वीच्या कोंबडीवरून तिसरी पिढी झुंजू लागली तर काय म्हणावं?

गोष्ट तशीच घडली आहे. कोकणात नव्हे, राजधानी दिल्लीत. पगार झाल्याच्या आठवड्यात एखाद दिवस हाटेलात जाऊन ‘बसल्या’वर अचानक जिभेला इसाळ येतो. शेजारच्या टेबलावर चिकन टिक्काची प्लेट घेऊन वेटर लपकत येतो, ते पाहून पोट खवळतं. आपणही आर्डर देऊन बसतो : ‘एक तंदुरी चिकन लाना!’

‘फुल या हाफ?’ वेटरला आपल्या पैशाच्या पाकिटाची काळजी आहे. तो सावध करतो; तरीही आपण ऐक्कत नाही.

‘फुल बनाव, आऊर मस्त बनाव हां, अच्छा शेको!’ आपली डिमांड जाते. वेटरही जातो. यथायोग्य काळानंतर तो पंजाबचा राष्ट्रीय पक्षी, आपल्या नव्या केसरिया रंगासह आणि ज्याची केवळ कस्तुरीच्या गंधाशीच स्पर्धा व्हावी, असा तो खमंग दर्वळ घेऊन आपल्या पुढ्यात येतो. रसगंधस्वादाची दिवाळी मेजावरच साजरी होते.

पं. हरिप्रसाद चौरसियांनी ‘राग बागेश्री’ वाजवण्यासाठी ज्या नजाकतीने बासरी उचलावी, तितक्या नाजूकपणे आपण ती मुर्गीची तंगडी उजव्या हातात धरून ओठांशी नेतो... वाह!

तंदुरी चिकन खावं तर चांगल्या नावाजलेल्या ठिकाणीच. तिथं कोंबडीचे मन:पूत लाड तरी होतात. तशी कोंबडी कुठंही मिळते. पंचतारांकित हाटेलात अदबीनं येते, तशी तिठ्यावर सळयांना लालेलाल रंग फासून उभीही असते.

शोर्माच्या गोल चकतीवर रचलेली असते, तशी चायनीजच्या गाड्यावरही ‘चिलीचिकन’च्या नावाखाली हजर असते. जिथं टुकडा चकली, मूगडाळ, चणाडाळ (कांदा मारके) आणि बॉइल्ड सेंगचना यांची ऊठबस अधिक असते, अशा अंधाऱ्या ठिकाणीही तंदुरी कोंबडी गरिबीत आब राखून असते; पण तंदुरी चिकन खावं ते ढाब्यावरच.

एखादा महामार्ग असावा. रात्री अकरा-साडेअकराचा सुमार असावा. पोटात भूक असावी आणि नजरेत थोडीशी ‘नाइन्टी’वाली मस्ती आणि लक्ष दिव्यांनी उजळलेला एखादा ढाबा यावा. तिथं डझनभर ट्रक अगोदरच उभे असावेत.

मागल्या बाजूला पाण्याच्या हौदावर ट्रकवाल्यांची वर्दळ असावी आणि हौदाजवळच कलकलणाऱ्या जिवंत कोंबड्यांचे पिंजरे. बाजल्यावर बसून तिथं हातात फर्मास तंदुरी कोंबडी उचलावी. ज्याची मंझिल विसरावी, असा प्रवास इथंच सार्थकी लागतो. हातातला हा अद्‍भुत पदार्थ ज्यानं कुणी पहिल्यांदा पकवला, त्या अज्ञाताला दुवा देत आपण मुर्गीला मोक्ष द्यायचा असतो. ढाबा हेच तिचं मोक्षधाम.

तंदुरी चिकन कोणी पहिल्यांदा पकवलं? हे तसं अज्ञात नाही. कुंदनलाल गुजराल नामक एका प्रतिभावंत पाकशास्त्र्याने पहिल्यांदा मुर्गी तंदुर भट्टीत टाकली, असं इतिहास सांगतो. पण त्याचाच वाद सध्या कोर्टात चालू आहे.

कधी नव्हेत, अशी अवघड केस दिल्ली उच्च न्यायालयासमोर सध्या आली आहे. तंदुरी चिकनचा जन्मदाता कोण? हे ठरवण्याची. अखिल खाद्यजगताचं लक्ष या खटल्याकडे लागलं आहे. एरवी जन्मदाता ठरवणं विज्ञानानं बरंच सोपं केलं आहे. पण इथं डीएनए चाचणीचा निकष चालणार नाही. पुराण्या नोंदींवरही विसंबून राहता येणार नाही. न्यायमूर्तींसमोर भलताच पेच उभा राहिला आहे.

कोणे एके काळी, पेशावरमध्ये तीन मित्र राहत असत. कुंदनलाल गुजराल, कुंदनलाल जग्गी आणि ठाकूरदास मोखा अशी त्यांची नावं. तिथं त्यांचा एक छोटासा ढाबा होता. १९२० साली गुजराल यांनी सुरू केलेला.

तसं चांगलं चाललं होतं; पण १९४७ साली बटवारा झाला. प्रचंड रक्तपाताच्या कहाण्या आणि फाळणीच्या जखमा अंगावर बाळगत हे तिघेही कसेबसे स्वतंत्र भारतात, दिल्लीला पोचले. अब यही होगा अपना घर... असं स्वत:ला समजावत तिघांनीही एकमेकांना आधार देत दिल्लीच्या दरियागंज भागात एक हॉटेल रुटुखुटू सुरू केलं. नाव दिलं, मोतीमहल. पेशावरमधल्या खाद्यगृहाचं नावही तेच होतं.

काळ वाहत होता. दोन्ही कुंदनलाल स्वत: भटारखान्यात राबत. ‘मोतीमहल’नं तंदूरमध्ये मसालायुक्त मुर्गी भाजून खिलवण्याचा उपक्रम सुरू केला. स्वातंत्र्याच्या झुळका अनुभवणाऱ्या दिल्लीला एक वरदानच मिळालं.

‘मोतीमहल’ला पाहता पाहता खवय्यांच्या रांगा लावल्या. खुद्द चाचा नेहरू ‘मोतीमहल’च्या पाकखान्यावर फिदा होते. त्यांच्याकडे येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना ते आवर्जून इथं आणायचे. मुर्गी खिलवायचे.

ज्या देशात तंदुरी मुर्गी बनते, त्या मुलखास आजादी देण्यास काहीच हरकत नाही, असं एकदाचं उरल्यासुरल्या ब्रिटिश साहेबांचं समाधान झालं आणि त्यांनी कायमचं तोंड काळं केलं. पण सोबत ‘इंडियन करी’ आणि ‘तंदुरी चिकन’ हे दोन दागिनेही नेले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना ‘मोतीमहल’च्या तंदुरी चिकनची स्वप्नं पडत म्हणे. रशियाचे सर्वेसर्वा निकिता ख्रुश्चेव यांना तर म्हणे इथल्या मुर्गीचं वेडच लागलं होतं. सुप्रसिद्ध जॅकलिन केनेडी इथून खास पार्सल मुर्गी मागवायची, असं सांगितलं जातं. वड्डे लोग, वड्डी वड्डी बातें!!

याच काळात उरलेल्या तंदुरी मुर्गीला पुन्हा तरोताजा करण्याच्या नादात एक दिवस कुंदनलाल गुजराल यांनी त्यावर वाडगाभर लोणी ओतलं. चरचरीत परतवलं. थोडे गरम मसाले, टमाटरची प्युरी वगैरे घातलं आणि त्यातून ‘बटर चिकन’चा जन्म झाला, अशी एक आख्यायिका आहे. ‘मोतीमहल’चं बटर चिकन, तंदुरी मुर्गी आणि दाल मखनी हे तीन पदार्थ म्हणजे पंजाबी खान्याचे जडाव आहेत, जडाव!

इथली दालही ‘मुर्गीच्या बराबर’ समजली जाते. दरम्यान ठाकूरदास यांनी भागीदारी सोडली होती. पुढे कुंदनलाल जग्गा यांनीही रीतसर वाटण्या करून घेतल्या. ‘मोतीमहल’ची मुखत्यारकी संपूर्णपणे गुजराल कुटुंबाकडे आली.

कालौघात तिन्ही मित्र स्वर्गवासी झाले. गुजराल यांच्या पुत्र-पौत्रांनी ‘मोतीमहल’ चालवलं. पाचेक वर्षांपूर्वी अचानक राकेश जग्गी आणि अमित बग्गा या दोघा मित्रांनी ‘दरियागंज - बटर चिकन आणि दाल मखनीचे जनक’ अशा ठसठशीत पाटीनिशी नवं हॉटेल जवळच उघडलं. ‘मोतीमहल’ चालवणाऱ्या गुजराल खानदानाला प्रचंड मिरच्या झोंबल्या असणार.

त्यांनी थेट तक्रारच गुदरली. गुजराल कुटुंबाच्या वारसदारांच्या मते तंदुरी चिकन, बटर चिकन आणि दाल मखनी हे तिन्ही पदार्थ कुंदनलाल गुजराल यांच्या हातातून बनले आहेत. तेच त्याचे खरे जनक. जग्गी कुटुंबाचा संबंध गल्ल्यापुरताच होता. राकेश जग्गी हे कुंदनलाल जग्गी यांचे नातू आहेत. आपल्या आजोबांचा ब्लॅक ॲण्ड व्हाइट फोटो दर्शनी भागात लावून त्यांनी ‘दरियागंज’ धडाक्यात चालवलं आहे.

स्वादात काहीही कमतरता नाही. तिथली मुर्गी खातानाही खवय्याची दिलदार दाद घेऊन जाते. पैकी ‘मोतीमहल’ची तंदुरी मुर्गी किंवा विशेषत: बटर चिकन हा खरं तर काव्यसंग्रहात जिम्मा व्हावी, असा प्रकार आहे. त्याला एक खानदानी आब आहे. गावगन्ना ढाब्यावर मिळणारं बटर चिकन हे खरं तर बटर चिकनच नव्हे. मुर्गीही खानदानी, त्यावर कोसळणारं लोणीही घरंदाज आणि या दोन्हीचा मिलाफ घडवून आणणारे ते पाककुशल बल्लवाचे हात तर... तेथे कर माझे जुळती असे!

इथलं तंदुरी चिकन अद्रकाचा स्वाद घेऊन येतं. सोबत मिळणारा रायतासुद्धा अगदी लाजबाब. एखाद्या घरंदाज शास्त्रीय संगीताच्या मैफलीत उस्तादांचा मूड लागलेला. पूरिया धनाश्रीचे सूर आसमंतात भिनलेले. उस्तादजींच्या स्वरातला ठहराव हृदयाची स्पंदनं धीमी करणारा आणि तेवढ्यात पाठीमागे तानपुऱ्यावर बसलेल्या त्यांच्या पट्टशिष्यानं हलकेच एखादा लपेटा ऐसा काही घ्यावा की मागे वळून किंचित हसून उस्तादजींनीही दाद द्यावी - तसा हा रायता. नववधूच्या मागे करवलीसारखा नटून थटून येणारा.

‘दरियागंज’ तसं नवं हॉटेल असल्यानं तिथली मुर्गी कुठलं खानदान सांगून ऱ्हायली आहे, हे कळू शकलेलं नाही. पण चांगलीच असणार! कुंदनलाल गुजरालांचे नातू विरुद्ध कुंदनलाल जग्गी यांचे नातू, असा हा खटला उभा राहिला आहे. बोला, आहे की नाही भलताच पेच? वाडी किंवा शेतजमिनीचे तंटे समजू शकतो, पण कोंबडीवरून इतकी टोकाची, तीन-तीन पिढ्यांची झुंज कोणी पाहिलीये?

तथापि, दोन्ही वादी-प्रतिवादी पक्षांनी आपापल्या प्रतिज्ञापत्रासोबत एकेक प्लेट तंदुरी मुर्गी कोर्टासमोर ठेवावी, असा काही आदेश निघाल्याचं ऐकिवात नाही; पण ‘तंदुरी मुर्गी का असली बाप’ शोधणं हे सोपं नाही, यात शंका नाही. ‘कुंदनलाल की मुर्गी’ असं या पदार्थाचं नाव बदलणं, हा एक मार्ग आहे. कायदेबाजीत बिचाऱ्या त्या तंदुरच्या चुलीला कशाला भाजून काढायचं?

बाकी खवय्याला काय, ‘मोतीमहल’ची आणि ‘दरियागंज’ची मुर्गी सारखीच. मुर्गीच्या पोटात खूप माया असते. आपल्या पोटात जाण्यासाठी ती आधी भट्टीत जाते. अतएव शहाण्या खवय्याने कोर्टकज्जात न पडता ‘दरियागंज’मध्ये जाऊन मुर्गी मागवावी आणि वाहवा म्हणावं, हे उत्तम. मग तिथून उठून ‘मोतीमहल’मध्ये जाऊन टेबल धरावं आणि तिथं दुसरी कुक्कड मागवून पुन्हा दाद द्यावी. कोंबडीचा कुलवृत्तांत कोण वाचत बसतो? मुर्गी ज्याच्या पोटात जाते, तोच तिचा खरा बाप असतो.

pravintokekar@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.