मानसिक रोगांचा दुस्तर घाट

आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, अभ्यास, कुटुंबांमधील सर्व घरकामाबद्दलची माहिती, याबाबतीत स्त्री आघाडीवर आहेच, शिवाय शिक्षणासारख्या औपचारिक क्षेत्रातही तिने खूप मोठी आघाडी घेतली आहे.
two levels of mental illness women empowerment
two levels of mental illness women empowerment Sakal
Updated on

- डॉ. नीलम गोऱ्हे

समुपदेशनादरम्यान काही विचित्र प्रकरणे आमच्यासमोर आली. आजही मानसिक आजारावरून अनेक विनोद होतात; पण मानसिक स्वास्थ्याबद्दल खूप मोठ्या जागृतीची गरज आहे. स्त्रियांचे शरीर आणि त्यांची मानसिकता यात खूप जवळचे नाते असते.

आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, अभ्यास, कुटुंबांमधील सर्व घरकामाबद्दलची माहिती, याबाबतीत स्त्री आघाडीवर आहेच, शिवाय शिक्षणासारख्या औपचारिक क्षेत्रातही तिने खूप मोठी आघाडी घेतली आहे. अनेक परीक्षांचे निकाल पाहिल्यानंतर हे सहज लक्षात येते. ‘एमपीएससी’ किंवा ‘नीट’ या सर्व परीक्षांत स्त्रियांचा शिक्षणाचा दर्जा हा वाढलेला आहे;

तरीही स्त्रीला बावळट ठरवणे, तिला गतिमंद म्हणणे, एखादी गोष्ट समजली नाही तर तिची अक्कल काढणे, यांसारख्या गोष्टींचे महिलांवर खूप खोलवर परिणाम झालेले दिसून येतात. इतकेच नव्हे; तर स्त्रियांना काही मानसिक रोग असेल, तर त्यामुळेसुद्धा तिला कुटुंबातून बाहेर काढणे, तिची जबाबदारी झटकणे अशा स्वरूपाच्या गोष्टीसुद्धा झालेल्या दिसतात.

ज्या वेळी आम्ही समुपदेशनाचे काम करायला सुरुवात केली, तेव्हा काही विचित्र प्रकरणे आमच्यासमोर आली. स्वयंपाकात वेंधळी आहे, तिला काही येत नाही. तू मीठ खूप जास्त टाकते. तिला मनोरुग्ण ठरवून सोडून देण्यापर्यंतची प्रकरणे आम्ही पाहिली आहेत.

मुलीला काही कळत नाही, हे दाखविण्यासाठी सासरची मंडळी तिला चपाती येत नाही, भाकरीही येत नाही, अशी बोलणी लावत असत. माहेरच्या लोकांचे म्हणणे असे की, माहेरी तर ती चांगली चपाती आणि भाकरी करत होती. ती भाकरी करत असताना घरातले कुणी तिला चहा करायला सांगायचे किंवा सासू वेगळे काम सांगायची.

यात मग तिची भाकरी करपली की, तिला ती करता येतच नाही, असे ठरवून मोकळे व्‍हायचे. या दोन्ही बाजूंची पडताळणी करण्यासाठी अखेर सासर आणि माहेरच्यांसमोर स्त्री आधार केंद्राच्या कार्यालयात गॅस आणि तवा वगैरे सामान आणून एकदा संबंधित मुलीकडून भाकरीचे प्रात्यक्षिकही करवून घेतले. तेव्‍हा मुलीने उत्तम अशा भाकऱ्या केल्या.

त्यानंतर ती मुलगी रडायला लागली. त्यानंतर ती सांगू लागली की, मी चांगलीच भाकरी करते; पण या लोकांनी एकदा बांगडी फोडून त्याच्या काचा कणकेत मिसळल्या. तेव्‍हापासून भानामती करते, आपल्या घरी अलक्ष्मी यावी म्हणून भाकरीत चुकीचे करून ठेवते, असे आरोप केले. अशा प्रकारे मुलीमध्ये काही तरी खुसपट काढण्याचा प्रयत्न होत असे.

असे अनेक आरोप आम्ही चुकीचे असल्याचे अनेकदा सिद्ध केले... अशी शेकडो प्रकरणे ठिकठिकाणी दिसून येतात. त्यात काही घटनांमध्ये विस्मरणाचा रोग असतो. काही वेळेला एखाद्या स्त्रीला काही विचित्र अशा सवयी असतात.

उदा. सारखे हात धुणे. तिला सतत वाटते, की हाताला घाण लागलेली आहे. त्यामुळे ती तासन्‌ तास हात धूत राहते. काही वेळेला इतके हात धुण्याचे प्रमाण वाढते की हाताच्या त्वचेला चिरा पडायला लागतात. काही वेळेला त्या मुली सारख्या बाथरूमध्येच असतात. सारख्या हात-पाय धुवत असतात. खरे म्हणजे हा एक अस्वस्थतेचा आजार आहे; परंतु ते बऱ्याच जणांना माहिती नसते. मग त्यासुद्धा तक्रारी आमच्या केंद्रावर यायच्या.

ज्या मुली केंद्रात राहत होत्या, त्यांचे जसजसे आम्ही निरीक्षण करत गेलो तसतसे हे लक्षात येत गेले. याखेरीज मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की मानसिक रुग्णाचे कितीतरी प्रकार असू शकतात. एक महत्त्वाचा प्रश्‍न असतो तो म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे उत्साही नसणे, स्वतःबाबत आत्मविश्वास नसणे, कमी ऐकू येणे.

कमी ऐकू आल्यामुळे परत परत विचारावे लागते किंवा लक्षातच राहत नाही म्हणून बऱ्याच मुली इतक्या घाबरून जातात की काही करण्याच्या आधीच त्यांचे हातपाय लटपटू लागतात. असे आसपासच्या ताणामुळे होते.

काही वेळेला फीट येण्यासारखा आजार, गतिमंद किंवा मतिमंद असणे यांसारखेसुद्धा आजार असू शकतात. त्यावरही औषधे आहेत; परंतु त्यांची माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळेला अशा मुलींना घरातले लोक कुठेतरी आश्रमात सोडून देतात.

नंतर माहेरी तिला घेऊन गेले तर माहेरचे लोक परत तिला सासरी पाठवतात. अशा परिस्थितीत माहेरहून पुन्हा सासरी परतेल म्हणून तिला मनोरुग्णांच्या दवाखान्यात दाखल केले जाते. काही वेळा तिला न कळेल अशा दूरच्या आश्रमात ठेवले जाते. त्यामुळे सासर आणि माहेरमध्ये मोठे अंतर असेल तर खोटे बोलून तिची मनोरुग्णालयात रवानगी करतात.

खरे तर मानसिक आजार हा शब्दच समाजात प्रचंड बदनाम आहे. त्यावर अनेक विनोद होतात. त्याकडे लोक वेगळ्या प्रकारे बघतात. कुणालाही मानसिक आजारावर उपचार सुरू आहेत, असे म्हटले तर लोक ठार वेडा आहे, असे सांगून मोकळे होतात. म्हणून मानसिक स्वास्थ्याबद्दल खूप मोठ्या जागृतीची गरज समाजात सर्व स्तरावर आहे, असे आपल्याला दिसते.

मानसिक स्वास्थ्याबाबत स्त्रीवादी मानसिक चिकित्सा असेही मुद्दे मला दिसून येतात. स्त्रियांच्या मानसिक आजारांवर उपचार करत असताना सामाजिक आणि वैयक्तिक जीवनामधील परिस्थिती बदलली नाही, तर परत त्या त्याच आजाराच्या बळी ठरू शकतात. काही वेळेला औषधामुळे माणसाला झोप जास्त येते, थोडे जडत्व आल्याने चेहरा वेगळा दिसतो. अशा लोकांनाही समाजामध्ये सारखे टोचून बोलले जाते.

आम्ही विधान परिषदेचे आमदार म्हणून काम करत असताना काही मनोरुग्णालयांना भेटी दिल्या. तेव्‍हा काही स्त्रिया आम्ही येणार म्हणून छान चांगल्या साड्या नेसून उभ्या होत्या. त्यांना जेव्हा विचारले तेव्हा त्या म्हणाल्या की, आम्ही रुग्ण नाही. इथल्या सिस्टर्स आहोत. तिथल्या आरोग्यसेविकेने नंतर सांगितले की, या पेशंटच आहेत.

त्या इतक्या बऱ्या झाल्या आहेत, की त्यांना घरी जाणे गरजेचे आहे. त्यांना घरी न्यायलाच कोणी येत नाही. त्यातल्या एका महिलेने सांगितले, की मी २७ वर्षे नवऱ्याची वाट बघत आहे. नवरा सोडून गेला. थोड्या वेळात भाजी घेऊन येतो, असे सांगून तिला येथे आणून सोडले आणि पुन्हा घ्यायलाच आला नाही. हा एक फार मोठा प्रश्‍न आरोग्यव्यवस्थेसमोर असतो.

त्यांना माहेरच्या किंवा सासरच्या कोणीच व्यक्ती न्यायला तयार नसतात. खरे तर या विषयावर अधिक काम होणे आवश्यक आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या क्षेत्रात समुपदेशकांना मानसिक रोगांची माहिती अजून व्यवस्थित होणे खूप आवश्यक आहे, असे मला वाटते. ज्या वर्तनाला आपण विचित्र असे म्हणतो ते एखाद्या मानसिक अवस्थेचे लक्षण असू शकते.

मला एक प्रकरण आठवते, की ज्यामध्ये त्या मुलीला असे वाटत होते की तिला कोणीतरी सारखे मारत आहे. तिला मारून टाकणार आहेत आणि जेव्हा पुणे रेल्वे स्थानकावरून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हा ती त्यांच्याशी प्रचंड संघर्ष करत होती. तिला अशी भीती वाटत होती, की हे मला मारून टाकतील. ती सर्व तमिळ भाषेत बोलत होती.

कोणालाच काही कळत नव्हते. शेवटी आम्ही एक तमिळ बोलणारी बाई आणली आणि ती तिच्याशी बोलायला लागली. तेव्हा लक्षात आले, की तिला तिच्या नवऱ्याने एका लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बसवून दिले होते. घरातल्या लोकांनी तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय होता. एक मोठी भयकथाच होती तिची, असे म्हणायला हरकत नाही.

मग शेवटी कसेतरी आम्ही तिच्या भाषेतून बोलून चेन्नईतील तिच्या गावाकडच्या लोकांचे नाव मिळवले. त्यांचे नंबर पोलिसांनी शोधून काढले. दोन-तीन दिवस तिला एका निवारागृहात ठेवण्यात आले आणि तिच्या भावाला जेव्हा फोन लागला, तेव्हा त्याने अक्षरश: माझे आभार मानले. तो भाऊ रडत होता.

तो स्वतः डॉक्टर आहे आणि ती सर्वांवर संशय घेते. तिच्या आजाराचाच तो भाग आहे. ती माहेरीच राहते. पतीच्या घरी जो काही तिला मानसिक धक्का बसला आहे, त्यातून ती बाहेर आलेली नाही, असे त्याने सांगितले.

त्यानंतर आम्ही तिच्यावर योग्य उपचार करू, असे सांगून तिला माहेरचे लोक घरी घेऊन गेले; पण यातून एक लक्षात आले की स्किझोफ्रेनियामध्ये अशा प्रकारची काही वेगळी लक्षणे असू शकतात. मानसोपचारतज्ज्ञांपैकी डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. आनंद नाडकर्णी तसेच डॉ. विद्याधर वाटवे यांनीही आमच्या संस्थेमध्ये येऊन बऱ्याच महिलांना या संदर्भामध्ये प्रशिक्षण दिले आणि त्याबद्दलची माहिती दिली. त्याचे वाचनसुद्धा नियमितपणे कार्यकर्त्या करत असतात.

म्हणून ‘मनी वसे, ते स्वप्नी दिसे, तसे वेगवेगळ्या पद्धतीने भासे’ असेसुद्धा म्हणू शकतो. म्हणूनच मानसिक आजाराचा घाट खूप अवघड आहे; परंतु तो काही वेळेला समाजात सर्वांच्या मदतीने पार करावाच लागतो.

neeilamgorhe@gmail.com (लेखिका विधान परिषद उपसभापती आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.