माउंट एव्हरेस्ट... जगातील सर्वोच्च शिखर, पृथ्वीचा तिसरा ध्रुवच. माउंट एव्हरेस्टचं वलय हे सर्वश्रुत आहे. जगातील असंख्य लोकांना एकदा तरी या माउंट एव्हरेस्टचं ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घ्यायचं असतं.
माउंट एव्हरेस्ट... जगातील सर्वोच्च शिखर, पृथ्वीचा तिसरा ध्रुवच. माउंट एव्हरेस्टचं वलय हे सर्वश्रुत आहे. जगातील असंख्य लोकांना एकदा तरी या माउंट एव्हरेस्टचं ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घ्यायचं असतं. अनेकांना माउंट एव्हरेस्टच्या शिखरमाथ्याचं, जगातील सर्वोच्च शिखरावरून दिसणाऱ्या दृश्याबद्दल कुतूहल असतं, तर अनेक ध्येयवेड्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखर चढाई करण्याचा ध्यास असतो. हा ध्यास गेल्या शंभर वर्षांत अनेकांनी घेतला, त्यातील काही हजार लोकांचं स्वप्न पूर्णदेखील झालं, काहींना अर्ध्यातून परतावं लागलं, तर काही जणांनी एव्हरेस्टच्या कुशीतच चिरनिद्रा घेतली. गेल्या सात दशकांत एव्हरेस्टने अनेक स्थित्यंतरं पाहिली. एका मोसमात बोटांवर मोजण्याइतक्या गिर्यारोहकांनी शिखरमाथा गाठला, तर २०१९ मध्ये शिखरमाथ्याच्या खाली चक्क गिर्यारोहकांची लांबच लांब रांग पाहायला मिळाली. आजपर्यंत अंदाजे ७ ते ८ हजार गिर्यारोहकांनी किमान एकदा तरी एव्हरेस्ट शिखरमाथा गाठला आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा अतिशय कमी आहे. मात्र, यात दरवर्षी १० टक्क्यांनी भर पडतेय.
एव्हरेस्ट चढाईचादेखील मोसम अथवा हंगाम असतो. मे महिन्याच्या सुमारास हिमालयाच्या वरून वाहणाऱ्या जेट स्ट्रीमचा वेग तुलनेने कमी होतो आणि शिखरमाथ्यावर पोहोचण्याची संधी प्राप्त होते. हिमालयातील मोहिमांमध्ये विशेषतः एव्हरेस्टसारख्या अष्टहजारी शिखर मोहिमांमध्ये जेट स्ट्रीम हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जेट स्ट्रीम म्हणजे पश्चिमी वाऱ्याच्या पट्ट्यात साधारणपणे समुद्र सपाटीपासून ८ ते १५ किलोमीटर उंचीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे अतिवेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा पट्टा आहे, ज्यात वाऱ्याचा वेग प्रामुख्याने ताशी ३०० ते जास्तीत जास्त ४०० किलोमीटर इतका असतो.
याची लांबी एक हजार ते चार हजार किलोमीटर इतकी असून, रुंदी साधारणपणे शंभर किलोमीटर, तर जाडी पाच किलोमीटर एवढी असते. इतक्या वेगाने व विस्तीर्ण अशा हवेच्या या पट्ट्यात मॉन्सूनच्या आगमनाने काहीसा बदल झाल्याने त्याचा फायदा हिमालयातील शिखर मोहिमांमध्ये होतो. मुख्यतः उप-उष्णकटिबंधीय जेटचा प्रवाह हिवाळ्यात हिमालयाच्या दक्षिण बाजूने वाहतो, तर मे-जूनच्या सुमारास जसा मॉन्सून बंगालच्या उपसागरात प्रवेश करतो, तसं जेटचे प्रवाह हिमालयाच्या उत्तरेकडे सरकतात. हे ज्या वेळेस उत्तरेकडे सरकतात, त्या वेळेस त्यांचा वेग ताशी ५० किलोमीटरपेक्षा कमी होतो व याच काही दिवसांना गिर्यारोहणाच्या भाषेत हवामानाची उघडीप किंवा ‘वेदर विंडो’ असं म्हणतात.
सर्वच अष्टहजारी शिखर मोहिमांमध्ये ही वेदर विंडो तपासूनच कमीत कमी हवेचा वेग असलेले दिवस प्रत्यक्ष शिखर चढाईसाठी सुनिश्चित करणे, यासाठी हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या संस्थांच्या साहाय्याने तीन दिवसांपासून ते १०-११ दिवसांपर्यंत वाऱ्याचा, बर्फवृष्टीचा, वाऱ्याच्या दिशेचा, तसंच ढगाळ हवामानाचा अंदाज गिर्यारोहकाला होऊ शकतो. जेटच्या प्रवाहासोबतच समुद्राकडून येणारे पश्चिमी विक्षोभ, बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात येणारी चक्रीवादळं, वायुराशी, प्रतिरोध पर्जन्य या सर्वांचाही अभ्यास करावा लागतो. या सगळ्या दिव्यांतून गेल्यावर एव्हरेस्ट चढाई दृष्टिक्षेपात येते.
आम्ही सर्वच जण गिर्यारोहण व साहस शालेय मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत रुजावं, यासाठी प्रयत्नशील असतो. आम्ही गिर्यारोहक साहसाचं, त्यातून मिळणाऱ्या आनंदाचा प्रचारक म्हणून काम करत असतो. ‘गिर्यारोहणातून, साहसातून आनंद’ या ज्येष्ठ-श्रेष्ठांनी घालून दिलेल्या संकल्पनेवर आम्ही काम करत आहोत. मात्र, या संकल्पनेला गेल्या काही काळात तडे जाताना दिसत आहेत व ही गिर्यारोहण जगतासाठी धोक्याची घंटा आहे, असं मला वाटतं. त्यात या वर्षी ‘निर्बंधमुक्त एव्हरेस्ट’ अशी अघोषित परिस्थिती असल्यामुळे शिखर चढाईच्या वेळी पुन्हा एकदा ट्राफिक जाम होतो की काय, अशी भीती आहे.
२०२० मध्ये आलेल्या कोरोनामुळे त्या वर्षी एकही एव्हरेस्ट मोहीम होऊ शकली नाही. २०२१ लादेखील कोरोनाच्या सावटाने एव्हरेस्टचा बेसकॅम्प ग्रस्त होता. २०२२ मध्ये कोरोनाची उघडीप होती; मात्र लोकांचा पवित्रा सावध होता. या वर्षी मात्र गेल्या तीन वर्षांची कसर भरून काढण्याची योजनाच सर्व ठिकाणी आखली गेली आहे, असं वाटतं. यात एव्हरेस्ट अपवाद असणं शक्यच नाही. या वर्षी भारतातून, महाराष्ट्रातून रेकॉर्ड ब्रेक गिर्यारोहक एव्हरेस्ट चढाईसाठी बेस कॅम्पवर जगभरातील गिर्यारोहकांमध्ये सामील होतील.
नेपाळ सरकारच्या अर्थव्यवस्थेची ‘कॅश काऊ’ ही एव्हरेस्ट आहे. प्रत्येक चढाईमागे नेपाळ सरकार ११ हजार अमेरिकन डॉलर्स परवाना शुल्क घेतं. या वर्षी अधिकाधिक गिर्यारोहकांना एव्हरेस्ट चढाईची संधी उपलब्ध व्हावी म्हणून मे महिन्याच्या सुरुवातीलाच मिळालेल्या वेदर विंडोच्या आधारे शेर्पांकरवी लवकरात लवकर रूट ओपन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जेणेकरून पुढील वेदर विंडोमध्ये अधिकाधिक गिर्यारोहक चढाई करू शकतील. मात्र, नेमक्या कोणत्या वेदर विंडोला कोणता संघ, गिर्यारोहक चढाई करणार याचं बंधन नसल्याने एकाच वेळी अनेक गिर्यारोहक एव्हरेस्ट माथ्याजवळ गर्दी करतील, त्यातून अनेकांवर जीवघेणी परिस्थती उद्भवू शकते, अशी भीती आहे.
एव्हरेस्ट किंवा इतर अष्टहजारी शिखरांवर चढाई करण्यासाठी शेर्पा एजन्सीज हवा तो ‘सपोर्ट’ देतात, फक्त चांगले पैसे मोजण्याची तुमची तयारी हवी. गरम पाणी, ऑक्सिजन सिलिंडर्सची वाहतूक अशी सर्व काही सेवा तुम्हाला उपलब्ध असते. त्यामुळे एव्हरेस्ट चढाई ही काही अंशी पर्यटन स्वरूपाची झाली आहे, असा सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच काही गिर्यारोहकांना हा चढाईचा आनंद, स्वतःच्या क्षमतांना आव्हान देऊन स्वतःला स्वतःशी सिद्ध करणं अशा गिर्यारोहणातील तत्त्वांशी काही घेणं-देणं उरलं नाही. काहीही करून एव्हरेस्ट चढाई करायची, त्यात कमी वेळेत चढाई, अमक्या देशातील, राज्यातील, शहरातील, समाजातील पहिला चढाई करणारा, अशी बिरुदं मिळवून मानमरातब हवा आहे, त्यातून प्रसिद्धी हवी आहे, त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत.
आपल्या कामाचं कौतुक होणं, पाठीवर थाप मिळविणं यात काही गैर नाही; मात्र फक्त काहीतरी लाभासाठी अट्टहास करून एव्हरेस्ट चढाई करणं, हे सर्वस्वी चुकीचं आहे. आज जगभरात काही चढाईवीर असे आहेत, ज्यांनी एव्हरेस्ट चढाई केली व त्याच्या पुण्याईवर अक्षरशः दुकान थाटलं. भारतीय हिमालयात अनेक तुलनेने कमी उंचीची, पण चढाईच्या दृष्टीने अतिशय खडतर व एव्हरेस्टच्या पलीकडची शिखरं आहेत, त्या शिखरांकडे हे लोक ढुंकूनही पाहत नाहीत, याबद्दल एक गिर्यारोहक म्हणून खेद वाटतो.
शिखर कोणतंही असो, त्याची आव्हानं ही कधीच कमी होत नाहीत. कोणत्याही शिखरावर चढाई करणं, हे अवघडच आहे. मात्र, आज शिखर चढाई का करावी, याचा आयाम बदलत चालला आहे. ‘आनंदासाठी गिर्यारोहण’ यापासून ‘अट्टहासासाठी गिर्यारोहण’ याकडे आपला प्रवास होतोय अन् यात एव्हरेस्ट शिखर आघाडीवर आहे, याची खंत माझ्या मनामध्ये आहे. हे सगळं एकीकडे घडत असलं तरी एक गोष्ट जी अगदी ध्रुव ताऱ्यासारखी अढळ आहे, ती म्हणजे एव्हरेस्टचं ‘एव्हरेस्टपण.’ त्याच्या उंचीमुळे, भव्यतेमुळे एव्हरेस्ट हा एकमेवच असणार आहे. तो नगाधिराज आहे अन् शिखरमाथा गाठून जगन्मातेचा आशीर्वाद घेण्याचं स्वप्न अनेक गिर्यारोहक बघतील व ते सत्यात उतरविण्यासाठी खूप मेहनत घेतील.
गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवर जाऊच नये असा अट्टहास नाही; मात्र सर्व तयारीनिशी व एका पाईक वृत्तीने शिखर चढाई करावी, असं मला वाटतं. यासाठी युली स्टेक, कामी रिता शेर्पासारख्या गिर्यारोहकांचा आदर्श असावा. येणाऱ्या मोसमामध्ये अनेक गिर्यारोहक एव्हरेस्टचं स्वप्न घेऊन नेपाळमध्ये दाखल होतील, त्यांना एकच सांगणं आहे, एव्हरेस्ट चढाई हे केवळ यश नाही, एव्हरेस्ट चढाई करून सुखरूप घरी परतणं, म्हणजे खरं यश. हा कानमंत्र मनाशी घट्ट करून या मोसमामध्ये एव्हरेस्टला कवेत घेण्यासाठी माझ्या सर्व गिर्यारोहक मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा.
(लेखक श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गिर्यारोहक असून, ‘माउंट एव्हरेस्ट’ शिखरावर यशस्वी झालेल्या भारतातील सर्वांत मोठ्या नागरी गिर्यारोहण मोहिमेचं त्यांनी नेतृत्व केलं आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.