Annapurna Himalaya : अन्नपूर्णा प्रसन्न!

गंडकी नदी ही नेपाळमधील सर्वांत जास्त खोली असणारी नदी आहे.
Nepal Himalayas Annapurna Himal
Nepal Himalayas Annapurna Himalesakal
Updated on
Summary

नेपाळ हिमालय (Nepal Himalayas) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमालयात ‘अन्नपूर्णा हिमाल’ (Annapurna Himal) नावाची विस्तीर्ण पर्वतरांग आहे.

उमेश झिरपे umzirpe@gmail.com

जेव्हा जेवण रुचकर होतं, तेव्हा ते बनविणाऱ्या व्यक्तीवर ‘अन्नपूर्णा प्रसन्न’ आहे, असं आपण म्हणतो. कारण अन्नपूर्णा म्हणजे अन्नाची, भोजनाची देवता. अन्नपूर्णेशिवाय हे जग भुकेनं नष्ट होईल, अशी हिंदू धर्मपद्धतीमध्ये समजूत आहे. या अन्नपूर्णा देवतेचा अधिवास हिमालयातील ‘अन्नपूर्णा शिखरसमूहा’मध्ये आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.

नेपाळ हिमालय (Nepal Himalayas) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमालयात ‘अन्नपूर्णा हिमाल’ (Annapurna Himal) नावाची विस्तीर्ण पर्वतरांग आहे. या रांगेत एकूण सोळा अशी शिखरं आहेत, ज्यांची उंची सहा हजार मीटरपेक्षा जास्त आहे, तर तेरा शिखर अशी आहेत, ज्यांची उंची सात हजार मीटरपेक्षा जास्त आहे, तर ‘अन्नपूर्णा-१’ हे असं एकमेव शिखर आहे ज्याची उंची आठ हजारपेक्षा अधिक म्हणजेच ८ हजार ९१ मीटर उंच आहे. उंचीनुसार ‘अन्नपूर्णा-१’चा जगामध्ये दहावा नंबर लागतो. एकूण १९ शिखरांनी वेढलेल्या या प्रदेशाला ‘अन्नपूर्णा मॅसिफ’ असं म्हणतात. हा परिसर तब्बल ५५ किलोमीटर लांब असून गंडकी व मार्श्यंगदी या नद्यांच्या मूळ हिमनद्यांनी वेढलेला आहे.

Nepal Himalayas Annapurna Himal
CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

गंडकी नदी ही नेपाळमधील सर्वांत जास्त खोली असणारी नदी असून या नदीचं पाणी मातकट रंगाचं दिसतं, तसंच या नदीचा वाहण्याचा प्रवाह हा विविध दऱ्याकपाऱ्यातून जातो. अशा विविध नैसर्गिक गुणांमुळं ‘अमोनाइट फॉसिल्स’नं बनलेले दगड या नदीत मोठ्या प्रमाणात सापडतात. हे दगड म्हणजे शाळिग्राम, ज्यामध्ये भगवान शिवाचा अंश असतो, अशी भावना हिंदू धर्मामध्ये आहे.

Nepal Himalayas Annapurna Himal
CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

गिर्यारोहण विश्वात अन्नपूर्णा शिखर, विशेषतः ‘अन्नपूर्णा-१’ हे अष्टहजारी शिखर विशेष प्रसिद्ध आहे. इथं सततचं होणारे हिमप्रपात, अतिशय तीव्र धारांचा चढाई मार्ग यांमुळे ‘अन्नपूर्णा-१’ या शिखरावर चढाई करणं, हे अत्यंत धोक्याचं आहे. आतापर्यंत २६० च्या आसपास गिर्यारोहकांनी माउंट ‘अन्नपूर्णा-१’ शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. उपलब्ध माहितीवरून समोर आलेले आकडे असं दर्शवतात, की मार्च २०१२ पर्यंत एकूण १९१ गिर्यारोहकांनी शिखरमाथ्यावर यशस्वी चढाई केली मात्र त्याचवेळेस ५२ गिर्यारोहकांना शिखर चढाई करताना तर ९ गिर्यारोहकांना शिखर चढाईनंतर उतरताना आपला जीव गमवावा लागला आहे. दर शंभर यशस्वी चढायांमागं ३४ गिर्यारोहकांवर मृत्यू ओढवले आहेत. १४ अष्टहजारी शिखरांवरील मोहिमांच्या तुलनेमध्ये हा आकडा सर्वांत जास्त आहे. असं असलं, तरी १४ अष्टहजारी शिखरांपैकी पहिली यशस्वी मोहीम माउंट ‘अन्नपूर्णा-१’ वर झालेली आहे. ३ जून १९५० मध्ये फ्रेंच गिर्यारोहक मॉरिस हेर्झोग व लुईस लॅशेनल यांनी माउंट ‘अन्नपूर्णा-१’ शिखरावर यशस्वी चढाई केली.

अन्नपूर्णा शिखराचा चढाई मार्ग हा अस्थिर मानला जातो. कारण हिमप्रपातांमुळं काही क्षणात इथली भौगोलिक परिस्थिती बदलते. आम्ही गिर्यारोहक जेव्हा शिखर चढाई करतो, तेव्हा शेर्पा गिर्यारोहकांच्या मदतीनं आधी चढाई -उतराईचा मार्ग निश्चित करतो. या मार्गावर दोरखंड बसविला जातो व त्याच्या आधारे चढाई व उतरले जाते. मात्र, जेव्हा हिमप्रपात होतो, त्यात हे दोरखंड कधीकधी हरवतात, त्यामुळे गिर्यारोहकांना मार्ग सापडत नाही. त्यात चोहोबाजूंनी असलेले हिम, अतिउंचीमुळे शरीराला कमी प्रमाणात होणारा ऑक्सिजनचा पुरवठा यांमुळे गिर्यारोहकांना मार्ग शोधण्यास अवघड जाते, यांमुळे गिर्यारोहकांवर कधी कधी मृत्यू देखील ओढावतो. सुदैवाने गिरिप्रेमीची अन्नपूर्णा शिखर मोहीम अत्यंत सुरक्षितपणे पार पडली.

२०२० मध्ये एप्रिल महिन्यात गिरिप्रेमीचा संघ ‘अन्नपूर्णा-१’ शिखर मोहिमेसाठी जाणार होता, मात्र मार्चमध्ये पुण्याहून नेपाळला जाण्यापूर्वी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाउन यांच्यामुळे मोहीम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. सुदैवाने एप्रिल २०२१ मध्ये आम्ही पुन्हा ‘अन्नपूर्णा-१’ मोहिमेकरिता येऊ शकलो. त्याही वेळी कोरोना महासाथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता, सगळीकडं सगळं नकारात्मक वातावरण होतं. या नकारात्मक वातावरणात सकारात्मकतेची हळुवार फुंकर घालण्याचा प्रयत्न आम्ही या मोहिमेच्या यशस्वीतेतून केला होता. १६ एप्रिल २०२१ रोजी गिरिप्रेमीचे गिर्यारोहक भूषण हर्षे, जितेंद्र गवारे व डॉ. सुमीत मांदळे यांनी भारताचा तिरंगा ‘अन्नपूर्णा-१’ शिखरावर फडकविला.

Nepal Himalayas Annapurna Himal
Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

या घटनेला नुकतीच तीन वर्ष झाली. जशी अन्नपूर्णा देवता ही सर्वांनाच प्रसन्न होत नाही, त्यासाठी पाककलेचे विशेष कौशल्य असावं लागतं, सराव करावा लागतो व संयम ठेवावा लागतो, तसंच काहीसं गिर्यारोहण करत अन्नपूर्णा-१ शिखर चढाई करताना सराव, संयम व कौशल्य यांचा संगम असणं गरजेचं ठरतं. अन्नपूर्णा शिखर समूह म्हणजे फक्त तांत्रिकदृष्ट्या केले जाणारे गिर्यारोहण नव्हे, इथे असणारी जैवविविधता व निसर्ग सुंदरता ट्रेकर्स व निसर्गप्रेमींना देखील आकृष्ट करते. येथे जोमसोम ट्रेक, अन्नपूर्णा अभयारण्य ट्रेक व अन्नपूर्णा सर्किट ट्रेक असे ३० किलोमीटरहून अधिक लांबीचे ट्रेक्स आहेत.

सहा ते वीसपेक्षा अधिक दिवस चालणारे हे ट्रेक्स म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणी आहेत. यातील जोमसोम ट्रेक मार्गावर समुद्र सपाटीपासून तीन हजार ८०० मीटर उंचीवर असलेले मुक्तिनाथ मंदिर आहे. जगातील सर्वांत उंच ठिकाणी असलेल्या मोजक्याच मंदिरांपैकी एक असलेल्या मुक्तिनाथ मंदिरामध्ये भगवान विष्णूंचं अधिष्ठान असून हिंदूच नव्हे तर बौद्ध धर्मींयांसाठी देखील हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे. तुम्हाला हिमालय खूप जवळून व विविधांगांनी अनुभवायचा असेल, तर अन्नपूर्णा मॅसिफच्या ट्रेक्स पैकी एक ट्रेक करायलाच हवा.

(लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघा’चे अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.