जागतिक पर्यावरणदिन काल (ता. पाच जून) साजरा करण्यात आला. पर्यावरणसंवर्धन व त्याबाबत जनजागृती ही काळाची गरज आहे. त्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पातळ्यांवर कसोशीनं प्रयत्न करत आहेत. डोंगर-पर्वतरांगांमध्ये रमणारा गिर्यारोहकदेखील पर्यावरणसंवर्धनाचं काम करतो आहे. मी जेव्हा हिमालयात गिर्यारोहणाच्या निमित्तानं जातो तेव्हा तिथल्या जैवविविधतेनं हरखून जातो. हिमालयाचं पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतासाठी तर हिमालय ही निसर्गाची देणगी आहे असं म्हटल्यास वावगं नाही. जर हिमालय नसता तर कदाचित भारताचं भौगोलिक व सांस्कृतिक ‘भारतीयपण’ अस्तित्वातच आलं नसतं. हिमालय नसता तर संपूर्ण उत्तर भारत हा वाळवंटीय प्रदेश असता. कारण, मंगोलियाच्या बाजूनं येणारी वाळवंटीय वादळं, वारे थांबवण्याची कोणतीही भौगोलिक रचनाच अस्तित्वात नसती, त्यात गंगा-यमुना-सिंधू-ब्रह्मपुत्रा यांच्यासारख्या जीवनवाहिनी नद्या - ज्यांच्या उगम हिमालयात होतो - त्यादेखील अस्तित्वात नसत्या. त्यात उत्तरेकडून येणाऱ्या ध्रुवीय अतिथंड वाऱ्यांना भारतीय प्रदेशात शिरकाव करण्यासाठी कोणताही अडथळा नसता, पर्यायानं या प्रदेशात हिवाळ्यात तापमान नीचांकी पातळीवर गेलं असतं. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या व पाऊस घेऊन येणाऱ्या मोसमी वाऱ्यांनादेखील अडवणारा हिमालय नसल्यानं भारतात पर्जन्यप्रमाण कमालीचं कमी असतं. थोडक्यात, हिमालय नसता तर भारत-पाकिस्तान-बांगलादेश इत्यादी देशांत वसलेल्या तब्बल दीडशे कोटी लोकसंख्येचं अस्तित्व टिकवून ठेवण्यात अडचणी आल्या असत्या. त्यातून निर्माण होणाऱ्या सांस्कृतिक प्रश्नांवर तर बोलायलाच नको. असा हा हिमालय भारतीय उपखंडातच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीच्या पर्यावरणीय शाश्वत विकासात महत्त्वाचा घटक आहे.
हिमालयाशी गिर्यारोहकांचा अतिशय दृढ ऋणानुबंध आहे. आपल्या अंगा-खांद्यावर चढाई करू देणाऱ्या, शिखरचढाई करू देणाऱ्या हिमालयाविषयी गिर्यारोहकांना अतीव आदर आहे. हिमालयाला कोणत्याही प्रकारे होणारी हानी ही गिर्यारोहकांसाठी दुःखदायक असते असं मी स्वानुभवातून नक्कीच सांगू शकतो. आम्ही गिर्यारोहक जेव्हा कोणत्याही शिखरचढाईसाठी हिमालयात जातो तेव्हा कोणत्याही प्रकारचा कचरा पाठीमागं ठेवत नाही. अनेक वेळा हिमालयात अती उंचीवरच्या शिखरांवर चढाई करणाऱ्या, मुख्यत्वे एव्हरेस्ट शिखरमोहिमेवर जाणाऱ्या गिर्यारोहकांवर अती उंचीवर कचरा केल्याचा आरोप होतो. मात्र, या आरोपांत काहीही तथ्य नाही हे मी आवर्जून सांगू इच्छितो.
एकतर, एव्हरेस्टमोहिमेत बेस कॅम्पहून पुढील चढाईला जाण्याआधी, कचरा करू शकणाऱ्या किती वस्तू गिर्यारोहकाबरोबर आहेत व परत येताना त्या खाली आणल्या गेल्या आहेत की नाही, यासाठी नेपाळ सरकारचा विशेष संघ कार्यरत असतो. त्यात गिर्यारोहक खाद्यपदार्थांचे टिन्स, रिकामे ऑक्सिजन सिलिंडर्स, इतकंच नव्हे तर, मानवी विष्ठा-मलमूत्रदेखील अती उंचीवर तसंच टाकून न देता खाली घेऊन येतात. पुढं या सगळ्याचं ४० किलोमीटर खाली असलेल्या गावात विघटन केलं जातं.
हे नियम सर्वच गिर्यारोहक अतिशय काटेकोरपणे पाळतात, तरीदेखील खबरदारी म्हणून एव्हरेस्टसारख्या मोहिमांमध्ये एका गिर्यारोहकमागे पाच हजार अमेरिकी डॉलर्स एवढं ‘गार्बेज डिपॉझिट’ नेपाळ सरकारकडे जमा करावंं लागतं. हिमालय, तिथली हिमशिखरं ही नेपाळसाठी जीवनवाहिनी आहेत, त्यामुळे तिथं कचरा होऊ नये, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी हिमालयात स्वच्छतामोहीम नित्यनेमानं हाती घेतली जाते. यात अती उंचीवरील सर्व प्रकारच्या कचऱ्याबरोबरच मृतदेहदेखील खाली घेऊन येण्यावर भर दिला जातो. याच वर्षी एव्हरेस्ट शिखरपरिसरात नेपाळ सरकारनं पुन्हा एकदा स्वच्छतामोहीम राबवली.
हिमालय हा पर्यावरणीयदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. तिथं असणाऱ्या दगड-धोंड्यांपासून ते उंचावर घिरट्या घालणाऱ्या पक्ष्यांपर्यंत सगळ्यांचं विशेष असं महत्त्व आहे. त्यांचं संवर्धन करण्यात, जतन करण्यात, अभ्यास करण्यात गिर्यारोहकांचा मोठा वाटा आहे. अगदी ब्रिटिशकालीन मोहिमांपासून गिर्यारोहक विविध पर्यावरणीय नोंदी ठेवत आले आहेत. यातून निर्माण होणाऱ्या माहितीचा उपयोग अनेक संशोधकांना, शास्त्रज्ञांना झाला आहे. अशीच एक ‘गिर्यारोहणाबरोबर-पर्यावरण’ अशी जोडमोहीम आम्ही आयोजित केली होती.
सन २०१९ मध्ये ‘गिरिप्रेमी’ची कांचनजुंगा शिखरावर आयोजित ही मोहीम केवळ शिखरचढाईची मोहीम नव्हती, तर ती एक ‘इको एक्स्पिडिशन’ही होती. कांचनजुंगा जैवविविधता परिसराचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना सर्वार्थानं मदत करणं हा या मोहिमेचा उद्देश होता. तीत ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’, पुण्यातील ‘आघारकर संशोधन संस्था,’ डेहराडून येथील ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी’ इत्यादी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही शाश्वत पर्यावरणीय विकासासाठी काम केलं.
या मोहिमेंतर्गत दोन हजार मीटर उंचीपासून ते थेट आठ हजार मीटर उंचीपर्यंतच्या जैववैविध्याच्या अभ्यासासाठी दगड-माती, पाणी-बर्फ इत्यादींचे विविध नमुने गोळा केले गेले व ते शास्त्रज्ञांना सुपूर्द करण्यात आले. याच ‘इको एक्स्पिडिशन’दरम्यान आम्हाला कळलेली एक रंजक माहिती अशी : कांचनजुंगा जैवविविधता परिसरात फक्त त्याच ठिकाणी अस्तित्वात असणारी असंख्य प्रकारची शेवाळे आढळतात. यातील काही शेवाळे तर चक्क खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात. काही प्रकारच्या शेवाळ्यांसह झाडं-फळं-फुलं यांचा वापर करून तिथले स्थानिक लोक रंग तयार करतात. याचा स्थानिक अर्थव्यवस्थेला चांगला हातभार लागतो. आमच्या ‘इको एक्स्पिडिशन’च्या संघात सहभागी झालेल्या गोपाळ भलावी या ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तील विद्यार्थ्यानं कांचनजुंगा परिसरातील ‘डायटोमस’चा (एक प्रकारचं शैवाल) अभ्यास करून शोधप्रबंध सादर केला. याशिवाय, विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागानं याच मोहिमेदरम्यान १७३६ ते ४६०२ मीटर उंचीवर स्थित विविध हिमनद्यांच्या सरोवरातील (ग्लेशिअर/ टार्न लेक्स) मातीचे नमुने हे जमिनीवरील व जमिनीखालील (दोन मीटर खोलीपर्यंत) गोळा केले. त्यातील एकूण ७२ नमुन्यांचं परीक्षण करून हिमनद्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आला.
याचा उपयोग येणाऱ्या काळात हिमनद्यांच्या संवर्धनासाठी करण्यात येईल. हिमालय आहे म्हणून आपण आहोत. हिमालयालादेखील संवेदना आहेत असं मी मानतो. त्यावर प्रेम करणाऱ्या, निसर्गाला देव मानणाऱ्या, कचरा न करता पर्यावरणाचा विचार करून वावरणाऱ्या सर्वांना हिमालय आपलंसं करतो. यातूनच जागतिक तापमानवाढ, सतत वितळणारं बर्फ, हवामानात होणारे बदल या भौतिक समस्यांना तोंड देण्याचं मानसिक बळ हिमालयाला व त्याच्या लाडक्या गिर्यारोहकांना मिळेल असं मला वाटतं.
(सदराचे लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.