माऊंट मकालूची गोष्ट

वर्ष २०१४ मधली गोष्ट. गिरिप्रेमीची माऊंट मकालू या शिखरावर आयोजित सलग तिसरी अष्टहजारी शिखर मोहीम मध्यात होती.
Mount Makalu
Mount MakaluSakal
Updated on

वर्ष २०१४ मधली गोष्ट. गिरिप्रेमीची माऊंट मकालू या शिखरावर आयोजित सलग तिसरी अष्टहजारी शिखर मोहीम मध्यात होती. २०१२ मध्ये जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर भारतातील सर्वांत मोठी नागरी मोहीम यशस्वी झाली होती, २०१३ मध्ये जगातील चौथे उंच शिखर माऊंट ल्होत्से व सोबतीला माऊंट एव्हरेस्ट अशी दुहेरी यशस्वी करण्यात गिरिप्रेमीला यश आले होते. आता वेळ होती हॅटट्रिकची. या तिन्ही मोहिमांचं नेतृत्व माझ्याकडेच होतं.

माऊंट मकालू हे जगातील पाचवे उंच शिखर. मकालू हे मुळात आव्हानांचे शिखर म्हणून ओळखले जाते. येथील चढाई ही अत्यंत आव्हानात्मक गणली जाते. एकतर मकालू हे अत्यंत दुर्गम भागात वसलेले आहे. येथील बेस कॅम्पवर चढाई करून जाणे, हीच एक मोहीम होऊ शकेल इतकी खडतर येथील चढाई आहे. या सर्व आव्हानांना पेलत गिरिप्रेमीचा आशिष माने आणि आनंद माळी हे शिखराकडे कूच करत होते. बेस कॅम्पपासूनच दोघांना व त्यांच्यासोबत असलेल्या शेर्पांना बेभरवशी हवामानाने चांगलेच झुंजवले होते. तरीही चित्त विचलित होऊ न देता दोघेही शिखर चढाईच्या ध्यासाने पुढे जात होते. मात्र, शिखरमाथा टप्प्यात आला असतानाच संघासोबत असलेले दोर संपले. विना दोरखंड लावता चढाई करणे म्हणजे मृत्युला आमंत्रणच. त्यात श्वासागणिक हवामान बदलत होते. सोसाट्याचा वारा, सोबतीला सतत सुरू असलेला हिमवर्षाव व रात्रीच्या अंधारात नेमके शिखर किती दूर आहे याचा अंदाज येत नसल्याने संपूर्ण संघाने शिखर चढाई थांबवून उतराई करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी मी नेमका बेस कॅम्पला नव्हतो. दुर्गमतेमुळे काहीही संपर्क होत नव्हता. संघांनी आपल्या सुरक्षिततेचा विचार करून उतराईला सुरुवात केली. मात्र, एकेक कॅम्प खाली येताना संपूर्ण गाशा गुंडाळूनच संघ खाली येत होता. कॅम्प १ ला आल्यावर माझा संघाशी संपर्क झाला तेव्हा मी त्यांनी तोंड दिलेल्या परिस्थितीचा विचार करून त्यांच्या खाली परत येण्याच्या निर्णयावर समाधानी होतो. हवामान निवळले की पुन्हा एकदा प्रयत्न करू, असा माझा कयास होता. मात्र, ‘‘आम्ही सगळे कॅम्प्स वाइंड अप करून खाली आलो आहोत,’’ असे आशिष व आनंदने मला सांगितले. मी उडालोच! या दोघांनीही मोहीम संपली अशा आविर्भावातच उतराई करण्यास सुरुवात केली होती. दोघांनीही पुन्हा एकदा शिखर चढाईचा प्रयत्न करावा असे मला वाटत होते. कधी नव्हे तर आमचे फोनवरच कडाक्याचे वाद झाले. मला दोघांच्याही क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. त्यांच्यात अजून एकदा शिखर चढाईचा प्रयत्न करण्याची शारीरिक क्षमता आहे, हे त्यांच्या बोलण्यातून देखील मी ओळखू शकत होतो.

दरम्यान आशिषची गाठ पडली ती शिखर चढाई यशस्वी करून आलेल्या संघाशी. त्यांचे फोटो पाहताना त्याच्या लक्षात आले की अवघ्या काही मीटरवरून आपले शिखर हुकले. माझे टोचून बोलणे व शिखर चढाई काही मीटरवरून हुकल्याचे शल्य त्याला बोचत होते. दोन्ही मात्रा लागू पडल्या व आशिष पुन्हा एकदा शिखर चढाईसाठी तयार झाला. मात्र इकडे वेगळे प्रश्न आ वासून माझ्या समोर उभे होते. आशिष- आनंद जरी तयार असले तरी शेर्पा मात्र तयार नव्हते. काही आठवड्यांपूर्वी एव्हरेस्ट चढाई मार्गावर असलेल्या खुंबू आईसफॉल परिसरात झालेल्या अपघातात १६ शेर्पांचा अपघात झाला होता, अनेक शेर्पा जखमी झाले होते. त्यामुळे पैसे नको, मोहीम नको, काहीही नको. आम्हाला सुरक्षित घरी जाऊ द्या, अशीच शेर्पांची भावना होती. शेर्पांच्या घरचे लोक त्यांची वाट पहात होते. मी शेर्पांची भावना समजू शकत होतो. मात्र, त्यांची देखील मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती दांडगी होती. ते ही शिखर मोहीम यशस्वी करतील, असा मला ठाम विश्वास होता. शेर्पांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी बेस कॅम्पवरून थेट काठमांडू गाठले. दिवसागणिक केवळ एक छोटेखानी विमान बेस कॅम्प जवळच्या गावातून काठमांडूला जात असे. ते देखील संपूर्ण भरलेले होते. त्यातील एकाला अक्षरशः विनवणी करून खाली उतरवले व त्याच्या जागी मी काठमांडूला गेलो. तिथे आमच्या शेर्पा एजन्सीचा प्रमुख वांगचू शेर्पा कर्करोगाचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात केमोथेरेपी घेत होता. त्याला मी तडक भेटण्यास गेलो व माझी अडचण सांगितली. वांगचूने रुग्णालयातून सूत्रे फिरवली, शेर्पांशी फोनवर बोलला आणि काय जादू केली माहीत नाही. अवघ्या काही मिनिटात मोहीम पुन्हा सर करण्यास शेर्पा राजी झाले. एक अडथळा दूर झाला. आता प्रश्न होता मोहिमेसाठी आवश्यक सामानाचा!

मोहिमेतील शिधासामग्री, ऑक्सिजन सिलेंडर पुरेसे उपलब्ध नव्हते. हातात वेळ कमी होता. येथे देखील वांगचू मदतीस धावून आला. त्याने सर्व आवश्यक सामान बेसकॅम्पवर काही तासांत हेलिकॉप्टरने पोहोचवण्याची व्यवस्था केली. मात्र, पुन्हा प्रश्न उभा राहिला तो खर्चाचा. नव्याने मोहीम उभी करण्यास वाढीव १० लाख खर्च होणार होता. मी पुण्यातील आमच्या सर्व प्रायोजकांशी बोललो. एका फोनवर त्यांनी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, फक्त अट घातली ती सुरक्षित मोहीम पूर्ण करण्याची.

इकडे आशिष व आनंद पुनः एकदा चढाई करण्यासाठी सज्ज होते. हवामानाचे, खडतर चढाईचे आव्हान होतेच मात्र यावेळी शिखर चढाईची जिद्द अधिक होती. तरीदेखील आनंदला मोहीम अर्धवट सोडावी लागली. सुरक्षिततेला प्राधान्य देत तो खाली आला, आशिषने मात्र अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत २५ मे २०१४ रोजी माऊंट मकालूवर भारतीय तिरंगा फडकविला व अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला. ही मोहीम नेता म्हणून माझ्यासाठी शिकवण देणारी ठरली. सर्व बाजूने संकटे आल्यावर, आपल्या योजनेच्या विपरीत गोष्टी घडल्यावर देखील आलेल्या परिस्थितीचा नम्रपणे स्वीकार करून समस्यांचा तोडगा कसा काढायचा, हे मी शिकलो. या मोहिमेने, हिमालयाने मला आहे ती परिस्थिती ‘स्वीकारून’ त्यातून मार्ग काढण्याचे बळ दिले. तुम्ही कितीही बिकट परिस्थितीत असा, निश्चय केला की मार्ग निघतोच.. फक्त आहे ते स्वीकारण्याचे बळ हवे.

(सदराचे लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.