दिवस पर्वतांचा!

खरं तर पर्वत हे मानवासाठी वरदान आहेत. जगभर पसरलेल्या विस्तीर्ण पर्वतरांगा या मानवाच्या अन्न-पाणी-ऊर्जा यांच्या बहुतांश गरजा भागवतात.
Mountain
MountainSakal
Updated on

आंतरराष्ट्रीय पर्वतदिन काल (११ डिसेंबर) मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्रभरात पर्वतपूजन करून, पर्वतप्रतिज्ञा घेऊन, पर्वतांचं महत्त्व समाजाच्या विविध घटकांमध्ये रुजवण्यासाठी अभिनव उपक्रम आयोजित करून पर्वतदिनाची सांगता झाली.

खरं तर पर्वत हे मानवासाठी वरदान आहेत. जगभर पसरलेल्या विस्तीर्ण पर्वतरांगा या मानवाच्या अन्न-पाणी-ऊर्जा यांच्या बहुतांश गरजा भागवतात. पर्वतांचं मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे पर्वतांचं ऋण व्यक्त करणं हे मानवाचं कर्तव्यच आहे. तरीदेखील आपल्यातील अनेकांना पर्वतदिनाचं औचित्य, महत्त्व माहीत नाही हे खेदजनक होय.

व्हॅलेंटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे यांसारखे विविध दिवस कधी आहेत हे कुणालाही विचारलं की लगेच ती ती तारीख सांगितली जाते. मात्र, ‘पर्वतदिन’ कधी आहे असं विचारलं तर मात्र त्याविषयी बहुतेकांना माहितीच नसते. पर्वतदिन हादेखील खूप महत्त्वाचा आहे.

आपली सजीव सृष्टी प्रत्यक्षाप्रत्यक्ष पर्वतांशी निगडित आहे, त्यामुळे पर्वतांचं जतन करण्यासाठी, पर्वतांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी २००३ पासून संयुक्त राष्ट्रसंघानं ता. ११ डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय पर्वतदिन’ म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. संयुक्त राष्ट्रसंघाचा अन्न व कृषिसंघटन विभाग मोठ्या उत्साहात हा दिन जगभरात साजरा करतो. यासाठी दरवर्षी एक विषय निवडला जातो व त्या ‘थीम’वर आधारित पर्वतांचं ऋण व्यक्त केलं जातं.

आम्हा गिर्यारोहकांसाठी तर हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे असतो. मात्र, हा दिवस मर्यादित समूहापर्यंत न राहता सर्वव्यापी होणं ही काळाची गरज आहे. म्हणूनच निसर्गाविषयी ज्यांची संवेदनशीलता जिवंत आहेत अशा सर्वांनी पर्वतांविषयीची आस्था जपली पाहिजे, समृद्ध केली पाहिजे; किंबहुना तिचा योग्य तो प्रसार केला पाहिजे.

पर्वत हे सजीव सृष्टीच्या केंद्रस्थानी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दुर्मिळ वनस्पती, फुलं, फळं, प्राणी, पक्षी यांचा अधिवास हा पर्वतांच्या सान्निध्यात आढळून येतो. जीवनदायी नद्या, पाण्याचे स्रोत यांचा उगम हा पर्वतांतच असतो. अगदी पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेला वारा हा पर्वतांमुळेच अडतो. हिमालयासारखे पर्वत उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे थांबवतात, म्हणूनच भारतीय उपखंडात सजीव सृष्टी, मानवी आयुष्य बहरू शकलं.

असा हा पर्वत मानवासाठी खूप महत्त्वाचा आहे. मात्र, आपण या पर्वतांचे अक्षरशः लचके तोडले आहेत, तुकडे पाडले आहेत. आपल्या गरजा भागवण्यासाठी पर्वतच्या पर्वत आपण भुईसपाट केले आहेत, पर्वतांतून निघणाऱ्या नद्या प्रदूषित केल्या आहेत. हवेतील प्रदूषणाबद्दल तर बोलायलाच नको, इतकी प्रचंड त्याची वाढ झालेली आहे. पर्वत हे निसर्गाचा खजिना आहेत, त्यांचा वापर नक्कीच केला पाहिजे; पण तो वापर करताना नेमकं कुठं थांबलं पाहिजे याचीही जाण असणं अत्यंत गरजेचं आहे.

पर्वतांचं संवर्धन करण्याविषयी हिमालयातील माझी एक आठवण आहे. मी १९८७ मध्ये दार्जिलिंग इथल्या ‘हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग’ इथं ‘ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स’ला होतो तेव्हा आमच्या बॅचचे वरिष्ठ प्रशिक्षक रतनसिंह चौहान होते. रतनसिंह हे मूळचे गढवाल, हिमालयातले. उत्तराखंड (तेव्हाचा उत्तर प्रदेश) इथल्या गंगोत्री या भागात त्यांचं गाव. रतनसिंह यांचं पर्वतांविषयीचं प्रेम शब्दांपलीकडचं होतं. मानवानं पर्वताची, निसर्गाची प्रचंड हानी केली आहे असं ते म्हणत. ही हानी थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवं या भावनेतून गंगोत्री ते गोमुख या वाटेवर त्यांनी स्थानिक वृक्षांची लागवड केली. त्यासाठी त्यांनी भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला, भविष्याचा वेध घेतला व त्यातून जमिनीची धूप थांबावी, जंगलांमध्ये देशी झाडांची संख्या वाढावी या हेतूनं अविरत काम केलं. तीस वर्षांपूर्वीचा गंगोत्री-गोमुख परिसर व आजची परिस्थिती यात कमालीचा सकारात्मक बदल आहे. हा बदल मी स्वतः अनुभवला आहे. रतनसिंहांच्या या प्रयत्नांतून गंगोत्रीच्या परिसरातील निसर्गाचं संवर्धन तर झालंच, शिवाय पर्यटनवाढीलाही हातभार लागला. रतनसिंहांची ही संकल्पना नंतरच्या काळात केंद्र सरकारच्या पर्यावरण व वने विभागाच्या ‘हिमालयातील पर्यटनाचा व गंगोत्रीच्या परिसरातील तीर्थयात्रेचा विकास’ या उपक्रमाचा भाग झाली. याचा फायदा पर्वतांच्या परिसरातील निसर्गाचा व पर्यायानं त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यटनाचा शाश्वत विकास करण्यात झाला. केंद्र सरकारच्या या प्रकल्पाचा भाग असलेल्या डॉ. हर्षवंती बिश्त या प्रसिद्ध गिर्यारोहक ‘इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन’ या गिर्यारोहणक्षेत्रातील देशातील शिखरसंस्थेच्या पहिला महिला अध्यक्षा नुकत्याच झाल्या आहेत, हादेखील एक योगायोगच.

पर्वत हे श्रेष्ठ आहेत, अनादी काळापासून मानवी जीवन फुलवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या आधारानंच इथली चराचर सृष्टी फुललेली आहे. पर्वतांच्या असण्यामुळेच या सृष्टीचा जीवनपट व्यवस्थित सुरू आहे. आपण आहोत, कारण पर्वत आहेत. म्हणूनच काल होऊन गेलेल्या या आंतरराष्ट्रीय पर्वतदिनी आपण एक प्रण करू या... ‘पर्वत वाचवू या, पर्वत जगवू या!’

(सदराचे लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.