विक्रमासाठी गिर्यारोहणामध्ये स्पर्धा नको...

गिर्यारोहणाच्या एका कार्यक्रमासाठी नुकताच कोलकाता येथे प्रवास करीत असताना एक अत्यंत धक्कादायक बातमी धडकली आणि मन सुन्न झाले.
sherpa tenjen lama
sherpa tenjen lamasakal
Updated on

गिर्यारोहणाच्या एका कार्यक्रमासाठी नुकताच कोलकाता येथे प्रवास करीत असताना एक अत्यंत धक्कादायक बातमी धडकली आणि मन सुन्न झाले. ८०२७ मीटर उंचीचे जगातील १४ वे उंच शिखर असलेल्या शिशापंग्मा येथे भीषण दुर्घटना घडली. शिखरमाथ्यावर चढाई करत असताना एका मोठ्या हिमप्रपातामध्ये (ऍव्हलांच) सापडून दोन महिला गिर्यारोहकांसह त्यांचे सहकारी शेर्पा गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पर्वतांमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडून दुर्दैवी मृत्यू होणे, यांवर कोणाचे नियंत्रण असू शकत नाही. मात्र, जेव्हा या दुर्घटनेच्या कारणाबद्दल मी जाणून घेतले, तेव्हा धक्का बसला आणि वाईट वाटले, ही दुर्घटना टळू शकली असती, मात्र ‘डेथ झोन’मध्ये झालेली जीवघेणी स्पर्धा खरंच चार जणांचा जीव घेऊन गेली. यात हकनाक बळी गेले ते मात्र आपले काम इमानेइतबारे करणाऱ्या शेर्पांचे.

एव्हरेस्टपासून शिशापंग्मापर्यंत जगात एकूण १४ अष्टहजारी शिखरे आहेत, ज्यांची उंची ही ८ हजार मीटरपेक्षा जास्त आहे. ही सर्व शिखरे हिमालयातच वसलेली आहेत. यातील पाच शिखरे पाकव्याप्त काश्मीरमध्ये, दोन तिबेटमध्ये तर उर्वरित सात नेपाळमध्ये आहेत. या सर्व शिखरांवर चढाई करणारे तसे जगात मोजकेच गिर्यारोहक आहेत.

पूर्वी १४ शिखरांवर चढाई करायला गिर्यारोहकांना १० वर्षांहून अधिक काळ लागायचा. एका मोसमात एक किंवा जास्तीत जास्त दोन शिखरं गिर्यारोहक चढाई करायचे. गेल्या काही वर्षांत मात्र हे गणित कमालीचे बदलले. कमीत कमी वेळेत हे शिखर चढाई करण्याचे ध्येय गिर्यारोहकांनी ठेवले, ते पूर्ण देखील केले.

क्षमता असेल, संसाधने असतील अन् निसर्गाची साथ असेल, तर असे ध्येय पूर्ण करणे, काहीच वावगे नाही. मात्र, या ध्येयांचे रूपांतर स्पर्धेत होते, तेव्हा मात्र याला वेगळेच वळण लागते, अन् याचीच प्रचिती या अपघाताच्या वेळी आली.

अमेरिकेतील दोन महिला गिर्यारोहक - जिना र्हूशीडलो व ऍना गुटु यांनी १४ अष्टहजारी शिखरांपैकी १३ शिखरांवर चढाई केली होती. शिशापंग्मा हे त्यांचे चौदावे शिखर होते. ऑक्टोबरच्या सुरवातीलाच दोघींनीही तिबेटमध्ये स्थित च्यो ओयू शिखरावर चढाई पूर्ण केली होती. दोघींचे ध्येय हे चौदावे शिखर - शिशापंग्मा.

या आधी कोणत्याही अमेरिकन महिलेने जगातील चौदाही अष्टहजारी शिखरांवर चढाई केली नव्हती. त्यामुळे जिना व ऍना यांच्यात ‘१४ अष्टहजारी शिखरांवर चढाई करणारी पहिली अमेरिकन महिला’ याच्यासाठी चढाओढ लागली व त्याची परिणती अपघातामध्ये झाली. शिशापंग्माचा शिखरमाथा ४०० मीटरवर असताना ऍना गुटु व मिंगमार शेर्पा हे मोठ्या हिमप्रपाताच्या तडाख्यात सापडले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

जिना व तेजेंन लामा शेर्पा हे काहीसे खालच्या भागात होते, पहिल्या हिमप्रपातानंतर देखील त्यांनी चढाई चालूच ठेवली व दोन तासांनी आलेल्या दुसऱ्या हिमप्रपातामध्ये अडकले, या प्रपाताचा तडाखा इतका जबरदस्त होता, की त्यानंतर ते दोघेही कुठे गेले याचा थांगपत्ता लागला नाही. त्यांच्यासोबत इतर गिर्यारोहक देखील होते, त्यातील काही जण देखील यांत जखमी झाले.

या सर्वांच्या मदतीला गेलेल्या शेर्पा तुकडीतील मिन्ग्मा जी या अत्यंत अनुभवी व निष्णात गिर्यारोहकालाही गंभीर दुखापत झाली. हे सर्व घडलं कारण कोणाला तरी ‘पहिलं’ यायचं होतं. माझ्या मते या स्पर्धेची सुरवात झाली २०१९ साली... जेव्हा निर्मल पूर्जा यांनी सहा महिन्यांत सर्व अष्टहजारी शिखरांवर चढाई करून विक्रम केला. त्यानंतर निर्मलला मिळालेली प्रसिद्धी, पैसा यांमुळे अनेकांनी या जीवघेण्या स्पर्धेत उडी घेतली.

खरंतर गिर्यारोहण हा साहसी खेळ असून अत्यंत आनंद व ऊर्जादायी असा आहे. यामध्ये कोठेही, कुणाशीही कधीच स्पर्धा नसते परंतु गेल्या काही वर्षांत या सगळ्या गोष्टींना धाब्यावर बसवून स्पर्धा एके स्पर्धा सुरू झाली आहे व ही बाब धोकादायक आहे, याची प्रचिती या घटनेमुळे नक्कीच सर्वांना आली असावी. या स्पर्धेचा बळी ठरलेला तेजेंन लामा शेर्पा हा गिरिप्रेमीच्या परिवारातील होता.

तेजेंन लामाने २०१४ मध्ये अतिउंचीवरील गिर्यारोहणाची सुरवात गिरिप्रेमी संघासोबत केली होती. तेजेंन लामा व त्याचा मित्र फुर्रब दोर्जी शेर्पा अशा दोघांना २०१४ मध्ये एव्हरेस्ट मोहिमेत आम्ही संधी दिली. त्यानंतर तो अनेकदा गिरिप्रेमीच्या अष्टहजारी शिखर मोहिमांमध्ये शेर्पा सदस्य म्हणून सहभागी झाला.

गिरिप्रेमीच्या धौलागिरी, मनासलु, कांचनजुंगा या मोहिमांमध्ये त्याच्या भावांबरोबर सहभागी झाला होता. २०१९ मध्ये तेजेंन लामा व त्याचे तीन सख्खे भाऊ अशा चौघांनी एकाच वेळी कांचनजुंगा शिखरावर चढाई करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद केली होती. या सगळ्यांसोबतच आमचे चांगले ऋणानुबंध होते.

मात्र २०२० मध्ये सर्वांत मोठा भाऊ छिजी शेर्पा यांचा मृत्यू झाला, मे २०२३ मध्ये एव्हरेस्ट चढाई मोसमांत तेजेंन लामाचा वडीलबंधू फुरबा शेर्पा मृत्युमुखी पडला व आता तेजेंन लामाचा मृत्यू. सर्वच घटना मनाला चटका लावून जाणाऱ्या आहेत.

तेजेंन लामाने खूप कमी काळामध्ये मोठी झेप नक्कीच घेतली होती. आजच्या काळातील अतिशय ताकदीचा व चपळ शेर्पा म्हणून त्याने नाव मिळवले होते. ख्रिस्टीना हरीला या गिर्यारोहिकेने अवघ्या ९२ दिवसांत १४ अष्टहजारी शिखरांवर चढाई केली होती, त्यात तेजेंन लामाची मोलाची कामगिरी होती. म्हणूनच त्याचा शेर्पा म्हणून भाव वधारला होता. मात्र, या क्षेत्रात आलेल्या चुकीच्या व्यावसायिकरणामुळेच त्याला जीव देखील गमवावा लागला, हे तेवढेच खरे आहे.

हे का घडलं? तर गिर्यारोहण हा साहसी खेळ वा अनुभव म्हणून न बघता फक्त व्यावसायिक समीकरण केल्याने मृत्यू ओढवले. खरंतर गिर्यारोहण मोहिमांत ‘लीडर’ फार महत्त्वाची भूमिका बजावतो. चढाई-उतराई करताना सर्वंकष विचार करून आपल्या संघाला सल्ला देणारा नेता आवश्यक असतो. कुठे थांबलं पाहिजे, कुठे माघार घेतली पाहिजे हे सांगणं सर्वांत कठीण. मात्र एक नेता हे योग्य प्रकारे पार पाडू शकतो.

या सगळ्या व्यावसायिक मोहिमांमध्ये नेता नसतोच, असला तरी त्याचे स्थान दुय्यम असते. पैशांच्या जोरावर सगळा व्यवहार चालतो. अतिउंचीवर शेर्पांना देखील अधिक पैसे देण्याचे कबूल करून पुढे घेऊन जाण्यासाठी गळ घातली जाते. शेर्पांचे पोट यावर असल्याने ते देखील कधी नाही म्हणू शकत नाही, इच्छा असली तरी. त्यातून उद्‍भवतात या दुर्घटना!

तेजेंन लामाची गिर्यारोहण कारकीर्द चांगली बहरत होती. मात्र, अशा दुर्घटनेने त्याच्या घरच्यांवर फार मोठा आघात नक्कीच झाला आहे. एक गिर्यारोहक म्हणून, शेर्पांचा मित्र म्हणून हे सर्व बघून खूप वाईट वाटतं. हे सगळं कुठं चाललं आहे, यातून काय मिळणार आहे, हे कसं थांबवता येईल... असे अनेक विचार डोक्यात फिरत राहतात, कारण आम्हा सर्वांसाठी गिर्यारोहण, पर्वत हे खूप जिवलग आहेत.

अशा घटना घडल्यावर न भरून येणारी मानवी हानी होतेच, सोबतीला गिर्यारोहणाचे देखील नुकसान होते. गिर्यारोहणातील स्पर्धा ही नक्कीच थांबायला हवी व त्यासाठी आपणच पुढाकार घेऊन, निसर्गाला सर्वोच्च मानून, गिर्यारोहणाला एक निखळ आनंद देणारा खेळ, अनुभव असं सर्वांसमोर रुजवून पुढे जायला हवं, तरच यात काहीतरी बदल घडतील.

(लेखक गिरिप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक असून आजपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्टसह जगातील सर्वोच्च चौदा अष्टहजारी शिखरांपैकी आठ शिखरांवर यशस्वी मोहिमा करण्यात आल्या आहेत. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय गिर्यारोहण मोहीम नेते आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.