जंगल पाहावं वाचून

एकदा असाच मी जंगल भ्रमंती करायला गोरेगावमध्ये असलेल्या चित्रनगरीमध्ये बीएनएचएसच्या संवर्धन शिक्षण केंद्रात गेलो होतो.
Forest
ForestSakal
Updated on

- उन्मेष परांजपे

जंगलाचा गंध, जंगलातली शांतता, जंगलातले निरनिराळे आवाज हे अनुभवण्यासाठी जंगलात पायी फिरावं. आपण जसं पुस्तक वाचतो तसंच जंगलही वाचता येतं. अशाच एका अनुभवाचे कथन...

एकदा असाच मी जंगल भ्रमंती करायला गोरेगावमध्ये असलेल्या चित्रनगरीमध्ये बीएनएचएसच्या संवर्धन शिक्षण केंद्रात गेलो होतो. तिथे पोचल्यावर लगेच मुख्य डांबरी रस्त्यावरून फिरायला सुरुवात केली. मोजून तीन-चार मिनिटं झाली असतील, तेवढ्यात मला मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला जमिनीलगत कोणीतरी बसलं आहे, असं वाटलं.

मी झटकन झाडाआड झालो. हळूच वाकून पाहिलं तर एक हरणाचं पाडस निपचित बसलेलं होतं. पाडस बघत असताना उजव्या बाजूच्या रानातून पाडसाची आईसुद्धा प्रकट झाली. आईला बघताच पाडसाने आपली जागा सोडली आणि चटकन आईकडे गेलं.

लगेचच दूध प्यायला लागलं. मी पहिल्यांदा हे दृश्य पाहत होतो. जंगलात प्राण्यांमध्ये आई पिल्लाचं संगोपन करतानाची एक झलक प्रत्यक्षात बघता आली, तेही अगदी १५-२० फुटांवरून. काय कमाल दृश्य होतं ते!

असे प्रसंग फार क्वचित कधीतरी आपल्याला पाहायला मिळतात. त्यात अशा गोष्टी पायी चालताना दिसणं याला खूप नशीब असावं लागतं. या प्रसंगाचा मी एकमेव साक्षीदार होतो. भेकर हरिण हे सर्वात दुर्मिळ जातीचं हरिण आहे. ते बाहेर कुठेही जाऊन पाहिलेलं नाही तर आपल्याच मुंबईमधल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दिसलं.

मुंबईसारख्या शहरात जंगलामध्ये चालताना आपण जास्तीच सतर्क असतो. चारही दिशेने आपलं बारीक लक्ष असतं. हे करत असताना आपल्याला निसर्गातल्या अनेक गोष्टी भावतात. आपल्याला किड्यांपासून मोठ्या प्राण्यांपर्यंत सर्व काही आपण पाहता येतं. यामुळे जंगल काय असतं, हे प्रकर्षाने जाणवतं.

जंगलातल्या प्राण्यांच्या आणि माणसांच्या येण्या-जाण्यामुळे तयार होणाऱ्या पाऊलवाटेवरून आपण जंगलात हिंडू शकतो. या रस्त्यांवरून चालताना आदल्या रात्री जंगलात कोणता प्राणी येऊन गेला आहे, ते समजतं. प्राण्यांच्या पाऊलखुणा, झाडांवरचे ओरखडे, हरणांनी झाडाच्या खोडावर शिंग घासलेल्याच्या खुणा अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात.

मुंबई शहरात तशी हिरवळ कमीच; पण त्यातही ज्या ठिकाणी हिरवळ टिकून आहे तिथे जैवविविधता अजूनही तग धरून आहे. अनेक प्रकारचे अधिवास मुंबईमध्ये आढळतात. भांडुप पंपिंग स्टेशन आणि नॅशनल पार्कमध्ये हिवाळ्यात भरपूर स्थलांतरित पक्षी येतात. भांडुप पंपिंग स्टेशन हे एक कांदळवन आहे.

इथली जैवविविधता इतर अधिवसांपेक्षा वेगळी असते. दरवर्षी स्थलांतरित पक्षी काही काळापुरतेच आपल्याकडे असतात; मग परत आपल्या मायदेशी परततात. त्यामुळे हिवाळा हा ऋतु हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचं निरीक्षण करण्यासाठी योग्य आहे.

बीएनएचएसचे संवर्धन शिक्षण केंद्र हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असल्यामुळे इथे बिबट्या, हरणं, वानरं यांसारखे प्राणी दिसतात. भेकर (Barking Deer) नावाचं दुर्मिळ हरीण इथे दिसण्याची शक्यता जास्ती आहे. तसेच उन्हाळ्यामध्येसुद्धा काही स्थलांतरित पक्षी येतात. पावसाळा सुरू होईपर्यंत या पक्ष्यांचे दर्शन होते.

सायनचे महाराष्ट्र निसर्ग उद्यान हे एक मानवनिर्मित जंगल आहे. ते डंपिंग ग्राऊंडवर वसवलेलं आहे. या उद्यानाच्या एका बाजूला मिठी नदी तर बाकी तिन्ही बाजूने मनुष्य वस्तीने वेढलेलं आहे. तरीसुद्धा इथे ठराविक काळात स्थलांतर करून काही पक्षी हजेरी लावतात.

या उद्यानात एक तलाव आहे. त्यामध्ये मी इथे एकदा काही दुर्मिळ पक्षीसुद्धा पाहिले आहेत. फुलपाखरं, साप, पक्षी यांचं दर्शन इथे सहजतेने होऊ शकतं. मुंबईच्या बाहेर न जातासुद्धा आपल्याला जंगलात फिरण्याचा आनंद घेता येऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.