भारतीय मंदिर रचनेच्या संस्कृतीचा उलगडा

भारतीय मंदिरांचे सौंदर्य आणि रहस्य यांचा अभ्यासपूर्ण उलगडा ‘टेम्पल्स ऑफ भारत’ शोधग्रंथातून अधोरेखित करण्यात आला आहे.
Temples of Bharat
Temples of Bharatsakal
Updated on

भारतीय मंदिरांचे सौंदर्य आणि रहस्य यांचा अभ्यासपूर्ण उलगडा ‘टेम्पल्स ऑफ भारत’ शोधग्रंथातून अधोरेखित करण्यात आला आहे. विविध गोष्टींचा उलगडा शोधग्रंथात करण्यात आला आहे.

प्राचीन भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात शेकडो वर्षांपासून उभारण्यात आलेली मंदिरे प्रभावी माध्यम आहेत. त्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे अनेक पैलू, त्यातील सौदर्य आणि रहस्य यांचा उलगडा करण्यासाठी आपल्याला मदत मिळते.

भारताच्या कानाकोपऱ्यात, नदीकिनाऱ्यावर, विविध शहरांत आणि डोंगरदऱ्यांत उभारण्यात आलेली मंदिरे, त्यांच्यातील विविध प्रकारच्या वास्तुरचना, त्यांच्यातील शिल्पकला, मंदिरासाठी उभारण्यात आलेल्या खांबाखांबामध्ये अनेक रहस्ये, त्यातील सौंदर्य, त्यामागील आपली भारतीय संस्कृती अन् तिचे महत्त्व आपल्या लक्षात येते. हे सौंदर्य संशोधकांनाच नव्हे; तर जगभरातील प्रत्येक अभ्यासकांना कायमच खुणावत असते.

त्याचा शोध वर्षानुवर्षे सुरू असून तो असाच पुढेही राहील. त्यातून अनेक नवनवीन पैलूही समोर येत राहतील. हा शोध आणि त्याचे रहस्य आपल्याला आकर्षित करत असते. भारतीय मंदिरांच्या सौंदर्याचा, रहस्याचा अभ्यासपूर्ण उलगडा ‘टेम्पल्स ऑफ भारत’ या शोधग्रंथातून अधोरेखित करण्यात आला आहे. एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी हा उलगडा केला आहे. हा इंग्रजीतील शोधग्रंथ असून तो दिल्लीच्या ‘आयू पब्लिकेशन’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे.

भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी भारतातील मंदिरे, त्यांची रचना, त्यातील अभियांत्रिकी, निसर्ग, विविध ऋतूंशी साधलेले साधर्म्य याचा अनोखा उलगडा करून त्याचे महत्त्व या ग्रंथातून अधोरेखित होते. भारतातील मंदिरांची रचना आणि त्यांच्या शिल्पकला, रचनांवर असंख्य पुस्तकांतून माहिती मिळते.

प्रत्येकाने आपल्या संशोधक नजरेतून त्याकडे अनुभवले आणि त्याची मांडणी केली, त्याचे महत्त्व विशद केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर वास्तुविशारद विषयातील उच्चशिक्षित आणि तज्ज्ञ असलेल्या डॉ. चक्रदेव यांचा हा ग्रंथ मंदिरांच्या प्राचीन रचना, कला, वास्तुरचना आणि संस्कृती समजून घेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

डॉ. चक्रदेव यांचा ग्रंथ भारतात मंदिरे ज्या काळात बांधली गेली त्या कालखंडाबद्दल भारतीय जीवनपद्धती, त्या काळातील समाजमन आदींची माहिती देतो. या मंदिरांची भारतीय प्राचीन परंपरा तिचा आत्मा शोधून त्यातील असंख्य बारकावे आणि त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतो.

‘टेम्पल्स ऑफ भारत’ ग्रंथाची रचना अत्यंत सुबक आणि रंगीत पृष्ठांची असल्याने त्यातील मंदिर-शिल्पांची चित्रे सुंदर दिसतात. एकूण १२ प्रकरणांतून मंदिराच्या विविध विषयांची रचना करण्यात आली आहे. देशात तीर्थराज म्हणून ओळख असलेल्या ‘अमरकंटक’ येथील मंदिराचे सुंदर मुखपृष्ठ या ग्रंथाला असून एकूण रचना वाचकांना भावेल, अशी करण्यात आली आहे.

त्यात मंदिरातील पूजा, मंदिराच्या अंतराळातील मानवी संवेदना, तीर्थक्षेत्र म्हणून असलेली मंदिरे, शहरातील, नदीकिनाऱ्यावरील मंदिरे यांची अत्यंत विलोभनीय माहिती आहे. शास्त्रधर प्रकरणात मंदिर रचनेतील शास्त्र, वास्तुपुरुष, मंदिर उभारण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या मातीच्या परीक्षणाची माहिती दिल्याने त्यावर नव्याने अनेक संशोधनाच्या वाटा या ग्रंथातून सुचविण्यात आल्या आहेत.

देवी मंदिरांपैकी कोल्हापूरची अंबाबाई, सरस्वती शारदा, चौसष्ट योगिनी, कामाख्या आदी मंदिर रचनेचा वेगळा उलगडा या ग्रंथात करण्यात आला आहे. अकराव्या प्रकरणात मंदिर संवर्धन आणि जीर्णोद्धार या विषयावर बटेश्वर, मार्तंडा, केदारनाथ आदी मंदिरांची अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

ग्रंथांचा समारोप हा कोकणातील मल्लिकार्जुन, लक्ष्मी-नरसिंहा, परशुराम, रूपनारायण आणि सुंदरनारायण, हरिहरेश्वर अन् बोंबाडेश्वर आदी मंदिरांवर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा ग्रंथ कोकणातील कुर्धे येथील ‘सर्वेश्वरा’ मंदिराला समर्पित करण्यात आला आहे.

भारतातील मंदिरे ही संशोधकांसाठी कायमच उत्सुकतेचा विषय ठरली आहेत. ऊन, पावसाळा, अनेक भूकंप आणि हजारो वर्षांपासून ती भारताच्या कानाकोपऱ्यात शेकडो वर्षांपासून आपले सौंदर्य अबाधित ठेवून मोठ्या दिमाखात आजही उभी आहेत. मंदिरांची वास्तुरचना, त्यातील अभियांत्रिकी, कला, संस्कृती त्या काळातील समाज समजून घेण्यासाठी हा ग्रंथ मोठी मदत करतो. दगड, माती, लाकूड आदींपासून तयार करण्यात आलेल्या मंदिरांचे वेगळेपण आणि त्यांची वैशिष्ट्ये याची अत्यंत सुंदर माहिती हा ग्रंथ देतो.

प्राचीन काळापासून शैव, वैष्णव, शाक्त आदी विचारांच्या प्रभावाने उभारण्यात आलेली मंदिरे ही त्या त्या काळातील हिंदू धर्म, संस्कृती आणि समाज यावर प्रकाश टाकण्यासाठी, परंपरा समजून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यमे आहेत. प्राचीन भारतातील मंदिरे ही केवळ उपासनेची ठिकाणे नव्हती; तर सामाजिक कार्यक्रम, एकात्मता आणि प्रबोधन अन् कला-शिक्षणाच्या प्रसारासाठी बहुउद्देशीय क्षेत्रे होती. भारतीय समाजाचे पुनरुज्जीवन, उभारणी आणि देखभाल करण्यासाठी मंदिरे महत्त्वाची भूमिका बजावत होती, यासाठीची मांडणी हा ग्रंथ करतो.

कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या चाकाने वेळ इतक्या अचूकपणे कशी मोजली? छाया सोमेश्वर मंदिरातील सावलीमागील रहस्य काय असू शकते? महाबलीपुरममध्ये एकाच दगडात भित्तिचित्रांचे मोठे फलक कसे कोरले गेले? खजुराहोतील आणि इतर अनेक मंदिरांच्या सुंदर अन् कामुक मूर्तींचे शिल्पकार कोण होते? याचा विचार करायला हा ग्रंथ भाग पाडतो.

नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतचा काळ हा भारतातील मंदिर उभारणीचा सुवर्णकाळ होता. या काळात उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे असंख्य मंदिरांची स्थापना झाली. त्या काळातील भारतीय समाजाचे आर्थिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक वैभव मंदिरांचे बांधकाम, उभारणी आणि संरचनेत दिसून येते. मंदिराच्या स्थापत्यशास्त्रावर प्राचीन ग्रंथात माहिती मिळते.

प्राचीन हिंदू तत्त्वज्ञानानुसार, संपूर्ण विश्व एक आहे आणि सर्व सजीव-निर्जीव त्या परम ब्रह्माचे अंश आहेत. घर किंवा वास्तू नेहमीच विश्वाचा एक भाग असते आणि त्यांना कधीच एकटेपणाने वागवले जाऊ शकत नाही. मंदिरे त्याला अपवाद कशी असतील? वास्तुशास्त्राची माहिती अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळते.

त्यात राजा भोजच्या काळात लिहिलेली सामंगण सूत्रधारा, मायाने लिहिलेली मयंतम्, तसेच अग्निपुराण, मनसार, भृगु संहिता, शिल्पशास्त्र आणि इतर अनेक ग्रंथ वास्तुशास्त्र आणि मंदिर बांधणीची माहिती देतात. प्राचीन हिंदू तत्त्वज्ञानानुसार, संपूर्ण विश्व एक आहे आणि सर्व सजीव-निर्जीव त्या परम ब्रह्माचे अंश आहेत. या कल्पनेतून वास्तूची संकल्पना उदयास येते.

पौराणिक संकल्पनेनुसार, मंदिर हे अदृश्य ब्रम्हाची एक दृश्य अभिव्यक्ती आहे, ज्यामध्ये मूर्ती स्थापित केली गेली आहे, जी त्या अदृश्य ब्रम्हाला पाचही इंद्रियांसह जाणण्याची संधी देते, असे लेखिकेने म्हटले आहे. भारतीय मंदिरांची रचना आणि त्यातील सुंदर शिल्पे ही कायमच उत्सुकता निर्माण करतात. ‍मंदिरांचे कोरीव काम, बांधकाम आणि इतर अनेक तपशील आपल्या पूर्वजांकडे त्यावेळी असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचे प्रमाण देतात.

‘एलोरा’चे भव्य कैलास मंदिर हे खडकाचा डोंगर पोखरून कसे तयार केले याचे कोडे अजूनही उलगडू शकले नाही. अशा असंख्य मंदिरातील अनेक कोडी तंत्रज्ञानाच्या काळातही उलगडत नाहीत. तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीला अनेकदा आव्हान देतात, ती समजून घेण्यासाठी ‘टेम्पल्स ऑफ भारत’ हा ग्रंथ खूप उपयोगी ठरणार आहे.

sanjeev.bhagwat@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.