जातीअंताचा लढा संपला नाही अजून...

महाराष्ट्र ही संतांची, सुधारकांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, मुक्ताई, एकनाथ महाराज यांची खूप मोठी परंपरा आहे.
Sane Guruji
Sane GurujiSakal
Updated on
Summary

महाराष्ट्र ही संतांची, सुधारकांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, मुक्ताई, एकनाथ महाराज यांची खूप मोठी परंपरा आहे.

महाराष्ट्र ही संतांची, सुधारकांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, मुक्ताई, एकनाथ महाराज यांची खूप मोठी परंपरा आहे. त्यानंतरच्या आधुनिक काळातले संत, महात्मा म्हणजे साने गुरुजी! त्यांनी ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ यातून जगण्याचे सोपे तत्त्वज्ञान सांगितले. जातीअंताच्या लढ्यासाठी त्यांनी १९४७मध्ये पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळण्यासाठी सत्याग्रह केला, त्या घटनेला अलीकडेच ७५ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त...

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळण्यासाठी साने गुरुजींनी सत्याग्रह केला. त्या लढ्याला अलीकडेच ७५ वर्षे पूर्ण झाली. त्या काळात तो लढा समर्पक होता. मात्र जग जसजसं पुढं गेलंय, तशी या लढ्याची गरज अधिक जास्त वाढली, मला हे दररोज दिसते. मी ट्विटरवर आले तेव्हा माझ्या लक्षात आलं, महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात जागोजागी दलित, आदिवासी बांधवांवर अत्याचार सुरूच आहेत. त्यांच्यावर सर्वप्रकारचे क्रूर अत्याचार केले जातात. कधी कधी प्रश्न पडतो हा माझाच देश आहे का? हा माझाच महाराष्ट्र आहे? काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये लग्न करून आलेल्या जोडप्याला तिथल्या पुजाऱ्याने मंदिराबाहेरून हुसकावून लावलं. मंदिराच्या मागच्या बाजूने तुम्ही जा, असं सर्वांसमोर सांगितलं.

आपल्या राज्यातही अशा घटना होत आहेत. मी लहानपणी माझ्या गावात भेदाभेद बघितला आहे. मात्र ते अत्याचार आज दूर झाले, असं आपल्याला वाटतं का? खरी परिस्थिती ही आहे की, आज जातीय अत्याचार कमी न होता उलट वाढले आहेत. मंदिर आणि देवही लोकांनी वाटून घेतले आहेत. २०१९ मध्ये मी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली, त्यावेळी दिलेल्या पहिल्या मुलाखतीत जातीभेदावर बोलले होते. मी कुठल्याही राजकीय पक्षात असले, तरी माझी विचासरणी राष्ट्र सेवा दलाची आहे. सेवा दलासारख्या सेवाभावी आणि निःस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या संस्था वाढल्या पाहिजेत, असं मला मनोमन वाटतं.

दोन वर्षांपूर्वी परळच्या एका छोट्या गल्लीत राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या एका चित्रकला स्पर्धेला उपस्थित राहण्यासाठी गेले. त्या चिंचोळ्या गल्लीत गाडीने पोहोचण्यासाठी वेळ लागला. मात्र तिथलं वातावरण बघून मला छान वाटलं. मला देवाने खूप काही दिलं, त्यामुळे जर माझ्या जाण्याने, भेटल्याने कुणामध्ये विचार जागवणं शक्य होत असेल तर मी तिथे जायलाच पाहिजे, असं मला वाटतं. खरं तर कोविडपूर्व आणि कोविडनंतर परिस्थिती खूप बदलली आहे. आपण खूप वाईट अनुभवलं आहे. मात्र माणूस खूप जाड कातडीचा आहे. सर्वांचं रक्त सारखं असतं. मानवतेच्या वर कुठला दुसरा धर्म नाही, ही शिकवण कोविड काळाने आपल्याला दिली. मात्र आपण हे लवकर विसरून जातो. अशा परिस्थितीत मला साने गुरुजींनी १ मे ते १० मे १९४७ दरम्यान अर्थात ७५ वर्षांपूर्वी केलेले आंदोलन खूप महत्त्वाचे वाटते. शेवटी जाती निर्मूलनाचा रस्ताही प्रेमाच्या वाटेने जात असतो, हे आपण विसरता कामा नये.

समाजाची वाटचाल अधोगतीकडे

सध्या प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जातं, ध्रुवीकरण केलं जातं. मात्र याचा समाजावर दीर्घकालीन वाईट प्रभाव पडतो, त्याचा विचार कुणी करत नाही याचे दु:ख वाटते. राष्ट्र सेवा दलासारख्या संघटनांच्या विचारसरणीतून आलेले लोक याचा विचार करतात. अशा संघटनांचे लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. लोकांनी एकत्र येऊन माणसामाणसांतील सलोखा, प्रेम वाढवलं पाहिजे. हाच महाराष्ट्र धर्म आहे. शाहू, फुले आंबेडकर, सावित्रीबाई, प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार, लिखाण परत एकदा वाचण्याची गरज आहे. आज आपला समाज मागच्या दिशेने जात आहे. जातीपातीत गुरफटून गेलेला समाज प्रगती कसा करणार? घरात क्लेष, कलह असलेला देश प्रगती करू शकत नाही.

आजच्या वातावरणातही मला साने गुरुजींची ‘खरा तो एकचि धर्म’ ही कविता समर्पक वाटते. ती मला तोंडपाठ आहे. कविता जशी पुढे पुढे जाते, तसतसे डोळ्यांत अश्रू येतात. मला अभिमान आहे की, मी लहानपणापासून राष्ट्र सेवा दलासोबत जुळले. राजकारणात असूनही माझे सामाजिक काम मात्र सेवा दलाच्या माध्यमातून करते. सातारा आणि कोकणच्या पुरात मी राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून तिकडे गेले. मी देणगीही सेवा दलाला देते. प्रसारमाध्यमांच्या झगमगाटाच्या बाहेर राहून राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी पुरामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या, मानसिकदृष्ट्या खचलेल्या लोकांना उभं राहण्यास मदत केली. मी तिथल्या लोकांसोबत बोलले, गाणी गायले, गप्पा मारल्या, त्यांचे दु:ख समजून घेतले. तात्पुरते का होईना लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला. साने गुरुजींचे विचार अंगी असल्यामुळे मला हे करता येते. साने गुरुजींची पुस्तकं मी तिसरी-चौथीत असताना वाचून काढली आहेत. त्यांच्या विचारधारेत मी लहानाची मोठी झाली, याचा आनंद कायम असतो. याच विचारधारेमुळे माझी तळागळातल्या माणसांसोबतची नाळ घट्ट आहे. माणसाने कितीही उंची गाठली, तरी माणुसकीपासूनची आपली नाळ तुटायला नको.

आज साने गुरुजींचा लढा जास्त मोठ्या प्रमाणात आणि अधिक नेटाने लढला पाहिजे. समाजातील जे जे लोक बोलू शकतात, व्यक्त होऊ शकतात, त्यांनी द्वेषाच्या राजकारणाविरोधात बोललंच पाहिजे. नाही तर आपण अशा अंधारयुगात जाऊ की, तिथून परत येणे शक्य होणार नाही. कारण काहीजण राजकारणासाठी अनेक गोष्टी करतात. अगदी आपल्या लहान मुलांना पुढे करून व्हिडीओ काढून त्यांना राजकारणात ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. मी मराठी आहे, मला माझ्या महाराष्ट्रात असला द्वेष, घृणा नको. त्यामुळे साने गुरुजींचा लढा सर्वांनी ठाम भूमिकेने, आपापल्या परीने लढला पाहिजे. आज एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर मुलीची, आरोपीची जात बघितली जाते. आज नाव ठेवण्यावरून, मिशा ठेवल्यावरून दलितांवर भयंकर अत्याचार होतात. ते झुंडबळी ठरतात. जात निर्मूलन ही आपल्या देशापुढची हजारो वर्षांपूर्वीची समस्या आहे. त्यातून बाहेर पडण्यापेक्षा आपण अधिक गुरफटून जात आहोत. अगदी जातीवरून मंत्र्यांनाही पुजारी मंदिरात जाण्यापासून रोखत आहेत, यापेक्षा दुसरं दु:ख नाही. यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. आवाज उठवला पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. शेवटी या जातीभेदाला अंत नाही. फँड्री, सैराटसारख्या कलाकृती आपल्या महाराष्ट्रात तयार झाल्यात. त्या या सर्वांची आठवण करून देत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला, बुद्धीवादी माणसाला या द्वेषाची भीती वाटत आहे. राज्यातील जनता राजकीय, सामाजिक भान बाळगणारी आहे. काही लोकांनी कितीही गोंगाट केला, आरडाओरडा केला तरी माझ्या महाराष्ट्राची सुजाण जनता त्यांची सदसद्‌विवेकबुद्धी वापरतील. एका मर्यादेनंतर लोक अशा व्यक्तींच्या मागे फरपटत जाणार नाहीत. राहत इंदोरी म्हणतात, ‘आग लागली की सर्वांचे घर जळणार, तिथे केवळ माझे एकट्याचे घर नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.