इंदिरा गांधी यांच्यासारख्या प्रियांका गांधी यांच्या छबीने नंदुरबार जिल्ह्यावर जणू गारुड घातले. प्रियांका यांची नंदुरबारमधील सभा अद्वितीय, अद्भूत ठरली. एक लाखाहून अधिक जनसमुदाय या सभेला एकत्रित आला होता. इंदिरा गांधी यांनी आकाशातून पाहिले असेल, तर त्यांनाही प्रियांकांचा सार्थ गौरव वाटला असेल, अशी ही नंदुरबारची सभा ठरली. सेवा व समर्पणाचे राजकारण हवे, की फक्त सत्ताप्राप्तीचे राजकारण असा थेट प्रश्न उपस्थित केल्यावर उपस्थित आदिवासी बांधवांचा प्रतिसाद अभूतपूर्व होता... (nandurbar priyanka gandhi vadra sabha)
नंदुरबार जिल्हा आणि काँग्रेस विशेषतः गांधी घराणे यांचे नाते स्वातंत्र्यानंतर एकसंध राहिले होते. इंदिरा गांधी यांनी देशातील पहिल्या क्रमांकाचा आणि आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असलेला मतदारसंघ म्हणून नेहमीच नंदुरबारला महत्त्व दिले होते. इंदिरा गांधींसह राजीव गांधी यांच्या कार्यकाळातही केंद्राच्या कोणत्याही महत्त्वाकांक्षी योजनेची सुरवात नंदुरबारमधूनच होत असे.
प्रचाराची सुरवातही इंदिरा गांधी नंदुरबारमधूनच करीत असत, इतके हे नाते घट्ट होते. राजीव गांधींनंतर सोनिया गांधी यांनीही काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून नंदुरबारच्या जनतेशी स्नेह जपला होता. यामुळेच की काय, येथील जनतेने सतत नऊ वेळा येथून काँग्रेसचे खासदार म्हणून माणिकराव गावित यांना निवडून दिले होते. नंतरच्या काळात काँग्रेसची पडझड झाल्यावर गांधी घराण्याच्या प्रेमाची वीण काहीशी सैल झाली होती, ती शनिवार (ता. ११)च्या प्रियांका गांधी यांच्या सभेने अधिक घट्ट झाली आहे, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.
अक्षयतृतीयेच्या दिवशी शुक्रवारी (ता. १०) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंदुरबारमध्ये आले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शनिवारी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची सभा झाली. आदल्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी आम्ही रामभक्त आणि शबरीचे पुजारी असल्याचे म्हटले होते. नेमका हाच धागा पकडून प्रियांका यांनी केलेला शाब्दिक हल्ला केवळ अवर्णनीय होता.
प्रियांका थेट उपस्थित असलेल्या लाखो महिलांच्या, लोकांच्या हृदयाला जाऊन भिडल्या. आदिवासी महिलांचे जीवन किती संघर्षमय आहे, हे मांडत त्यांनी मनामनांच्या तारा छेडल्या. नरेंद्र मोदींच्या सभेहून दुप्पट प्रतिसाद हे प्रियांका यांच्या सभेचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. भारतीय जनता पक्षाने आणलेले अनेक कायदे हे अन्याय- अत्याचार करणारे असून, त्यात कायद्यान्वये संशोधन केले जाईल, हे त्यांनी सांगताच उपस्थित लाखोंच्या समुदायाने जल्लोष केला. (Latest Marathi News)
प्रियांका यांचे भाषण अतिशय मुद्देसूद झाले. गरीब, शेतकरी लोकांच्या रोजच्या आयुष्यातील जगण्यातील अडचणींचा त्यांनी ऊहापोह केला. प्रियांकांच्या छबीत नंदुरबारच्या आदिवासी महिलांना जणू इंदिरा गांधी दिसत होत्या. इंदिरांच्या दुर्गारूपाचा उल्लेख करीत पाकिस्तानचे दोन तुकडे त्यांनी केल्याचे प्रियांकांनी म्हणताच, लाखोंच्या समुदायाचा झालेला जल्लोष नंदुरबारमध्ये अनेकानेक वर्षांनी ऐकायला मिळाला.
अधेमधे थांबून त्या उपस्थितांच्या प्रतिसादाला दाद देत होत्या, त्याचीही मोठी चर्चा सोशल मीडियावर घडून आली. प्रियांका गांधी यांच्या रूपाने आदिवासी जनतेने इंदिरा गांधींचीच छबी पाहिली, ‘आमनी इंदिरा मायच सं’ असे सभेनंतरचे आदिवासी महिलांचे मनोगत म्हणूनच बोलके म्हणायला हवे.
मणिपूरमधील आदिवासींवरील अत्याचार, कुस्तीपटू महिलांचा सरकारविरुद्धचा संघर्ष, राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या संसदेचे उद्घाटन न करणे या घटनांवरही प्रियांका यांनी कठोर भाष्य केले. सोनभद्रमधील इंदिरा गांधींच्या आठवणींचा उल्लेख केल्यावर उपस्थितांनी त्याला दाद दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांत त्यांनी हात घातला.
४१ मिनिटांच्या ओघवत्या भाषणात शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची होणारी कोंडी त्यांनी मांडली. इलेक्शन बॉन्डवरही त्यांनी जोरदार प्रहार केला. एकूणच, प्रियांका यांची नंदुरबारमधील सभा ‘गेम चेंजर’ ठरू शकते, अशी शक्यता निश्चितपणाने दिसून येते. महाराष्ट्रातील सरकार केंद्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने हद्दपार करण्यात आले, याचा उल्लेख केल्यावर त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रियांकांना दाद दिली.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेस आणि नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जनता यांचे घट्ट झालेले समीकरण मध्यंतरीच्या काळात थोडे सैल झाले होते. ते आजच्या सभेने पुन्हा सांधत अधिक घट्ट झाले, असे आजच्या सभेबाबत म्हटले तर गैर ठरू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.