माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा
‘गोष्टी गाण्यांच्या’ हे मुख्यत्वे सन २००० नंतरच्या चित्रपट गीतलेखनाबद्दलचं सदर. ज्येष्ठ कवी सुरेश भट यांनी अनेक दशकांपूर्वी लिहिलेल्या या अजरामर गझलेलाही एक पुष्प या सदरातून वाहता येईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र, ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटासाठी सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी ही रचना संगीतबद्ध केली आणि माझा मार्ग सुकर केला. मी आधीच कबूल करतो की थोरामोठ्यांच्या लेखनाबद्दल काही लिहिणं ही माझी प्राज्ञा नव्हे.
यानिमित्तानं मी ही रचना फार तर पुन्हा एकदा मन लावून अभ्यासण्याचा प्रयत्न करतो आहे.
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते
गझलेमध्ये प्रत्येक शेर दोन ओळींचा असतो आणि प्रत्येक शेरात एक परिपूर्ण गोष्ट सामावलेली असणं आवश्यक मानलं जातं. एकाअर्थी आपण गझलला अनेक गोष्टींचं मिळून तयार झालेलं एक गाणं म्हणू शकतो. वर दिलेल्या पहिल्या शेरातला विरोधाभास विलक्षण आहे; पण मला अनेक वर्षांपासून आजपर्यंत छळणारं एक कुतूहल म्हणजे ‘इतकेच’ या शब्दाचं प्रयोजन. काय काय म्हणायचं असेल त्यांना इतक्याशा जागेत? की आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही मला इतकंच कळलं होतं? की संपूर्ण आयुष्याचं सार इतकंच होतं? की इतकंसं कळायला पूर्ण जीवन वेचावं लागलं? अनेकानेक शक्यतांचं दालन उघडणारा हाच, अगदी हाच शब्द कसा काय सुचला असेल? नुसती मात्रापूर्तीच करायची झाली तर
ते ‘हे सत्य मला जाताना’ किंवा ‘हे आज मला जाताना’ किंवा ‘हे काय मला जाताना’ असं काहीही लिहू शकले असते; पण ‘इतकेच’ या पहिल्याच शब्दाला वैयर्थाचा, वेदनेचा जो तानपुरा लागतो तो गझलभर झंकारत राहतो.
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते
शेराच्या पहिल्या ओळीत फक्त प्रत्यंचा ताणायला सुरुवात करायची असते; दुसऱ्या ओळीच्या अगदी शेवटापर्यंत, म्हणजे यमकापर्यंत, हा ताण वाढवत नेऊन तीर सोडायचा असतो. अर्थात्, हे सगळं बोलायला सोपं आणि साधायला महाकठीण!
भटांच्या लेखनात मात्र ठायी ठायी हे जाणवतंच. त्यांचे अनेक शेर शेवटाकडे येईपर्यंत वाचकाचा श्वास अक्षरश: घुसमटतो, मोकळं होण्यासाठी धडपडतो. एकाअर्थी हेही ‘मरणाने केली सुटका’सारखंच.
‘ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही, मी बहर इथे शब्दांचे नुसतेच...’पर्यंत आपण मान डोलावत असतो आणि अचानक ‘उधळले होते’ येतं. क्षणार्धात ‘अरे, मी या पाषाणांतदेखील देव शोधत होतो’ हा अर्थ समोर येतो आणि थक्क व्हायला होतं.
भटांचे सगळेच शेर म्हणजे गोळीबंद लेखनाचा आविष्कार. त्यातले शब्द तर सोडाच, त्यातल्या विरामचिन्हांनाही हात लावता येत नाही.
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
यातील ‘तेव्हाही’ आणि ‘हीच’ सारखे वरकरणी साधे शब्द टोकाचा परिणाम साधतात. या दोन शब्दांमुळे त्या निराशेला वारंवारितेची गडद किनार लाभते. हे जे काही घडतंय ते फक्त आजचंच नाहीये, हे माझ्याबाबतीत पुनःपुन्हा घडत आलेलं आहे, माझं संपूर्ण जीवन तुला ही कहाणी सांगण्यात गेलेलं आहे आणि प्रत्येक वेळी मी त्या कहाणीला ‘आपली’ कहाणी म्हणू शकलेलो नाही हे खरं वैफल्य! म्हणूनच ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते...’
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते
रडू येणं आणि खरोखर रडणं यांतदेखील एका जन्माचं अंतर असतं हे मला, हा शेर वाचला नसता तर, कधीच कळलं नसतं. एवढं अवकाश एका ओळीत पकडणं ही खरी दैवी प्रतिभा. तुझ्या स्वप्नांचे रंग वाहून जाऊ नयेत म्हणून मला रडताही आलं नाही, शेवटी याचंच मला रडू आलं हा विचार अफाट आहे. एखाद्याला आयुष्यभर आपल्या दु:खावर रडणं‘ही’ जमू नये? हे कसं जगणं? त्यापेक्षा ‘मरणाने केली सुटका’ ते बरं झालं.
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते
आपण सर्वसामान्य माणसं रस्त्यांवर, वाटांवर वणवण करतो आणि भटसाहेब वाऱ्यावर वणवण लिहितात. पुन्हा एकदा स्तिमित करणारी शब्दांची निवड! केवळ ‘वाऱ्यावर’ लिहिल्यानं ती वणवण आणखी स्वैर, आणखी दिशाहीन, आणखी करुण होते. मग दुसऱ्या ओळीतल्या अर्ध्या भागात दार खुले दिसण्याचा एक आशेचा तारा क्षणभर लुकलुकतो आणि निमिषात निखळून लुप्त होतो.
ही संपूर्ण गझल sureshbhat.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तुम्ही ती जरूर पुनःपुन्हा वाचा. तुम्हाला प्रत्येक वाचनात नवनवीन कंगोरे सापडतील याबद्दल शंका नाही. मी निवडक शेरांचा माझ्या परीनं मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. चूक-भूल देणे घेणे. आतापर्यंत या गझलेच्या कितीतरी चाली ऐकल्या आहेत. परिपूर्ण मीटर, प्रत्येक शेरात भावनांचे विस्मयकारक चढ-उतार, एक अन् एक ओळ आशयघन असलेली ही रचना संगीतबद्ध करण्याचा मोह कुठला संगीतकार टाळू शकेल!
अखेर, ही गझल चित्रपटात आली आणि तीसुद्धा सुरेश भटांच्या आणि एकूणच मराठी गझलेवर जिवापाड प्रेम करणाऱ्या सिंधुताईंच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटात आली हाही एक काव्यात्म न्यायच! आणि या गझलेमधला शेवटचा शेर तर खास त्यांच्यासाठी असावा असा!
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते
आपण जितकं आतलं, जितकं आपलं लिहू तितकं ते वैश्विक होत जातं या उक्तीला साजेसा हा शेर. स्वीकृतीच्या आणि समर्पणाच्या या समेवर वैयर्थाच्या तारांमधून सार्थतेचे सूर ऐकू येऊ लागतात. पत्कीकाकांच्या सुमधुर चालीला प्रतिसाद देत चराचर उजळू लागतं, देवकीताईंच्या, म्हणजेच देवकी पंडित यांच्या निरामय आवाजात आवाज मिसळत दिशा दिशा गुणगुणू लागते, गझल एका अनन्यसाधारण उंचीवर पोहोचते आणि शब्दांमधून लख्ख झळझळत राहतो आकाशाइतका मोठा कवी.
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा
साष्टांग दंडवत!
(सदराचे लेखक हे कवी आणि सिनेगीतकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.