- वैभव वाळुंज
थेम्स नदीच्या किनाऱ्यावरील संसदेला मोठा इतिहास आहे. या इमारतीबाहेरील महाकाय उंचीच्या घड्याळाचे टोले लंडनमध्ये ऐकू येतात, तसेच जगाच्या राजकारणातही त्याचे पडसाद कायम घुमत राहतात, असं म्हटलं जातं...
इंग्लंडच्या इतिहासात इथल्या संसदेला फार महत्त्वाचे स्थान आहे, पण त्याचा भारताशीही थेट संबंध जोडलेला आहे. इंग्लंडमधली राजेशाही उलथून टाकण्यासाठी तसेच कालांतराने तिच्यावर अनेक बंधने बसवून राजेशाहीपासून सत्ता हस्तगत करत आपला हुकूम राबवण्यासाठी इंग्लंडमध्ये यादवी युद्धे झाली होती.
या युद्धांमधून अनेक नव्या संकल्पना आणि गोष्टी संसदेच्या समोर आल्या, ज्याचा कित्ता जगातील अनेक नव्याने प्रजासत्ताक होणाऱ्या राष्ट्रांनी गिरवला. म्हणूनच लंडन शहरांमध्ये उभारलेल्या संसदेला मोठं महत्त्व आहे व त्याचा उल्लेख जगभरातील संसदांची जननी म्हणून केला जातो. भारताच्या दृष्टीने १८५७च्या उठावानंतर भारताचा राज्यकारभार इंग्लंडच्या संसदेच्या हाती आला होता.
ईस्ट इंडिया कंपनीकडून सत्ता हाती घेताना इंग्लंडच्या संसदेने भारतावर राज्य करण्यासाठी विविध मंत्र्यांची व मंडळांची नेमणूक केली. म्हणूनच १८५८ ते १९४७ यादरम्यान भारताच्या सर्व राज्यकारभाराची सूत्रे याच इमारतीतून हलवली जात असत. या इमारतीबाहेरील बिग बेन या महाकाय उंचीच्या घड्याळाचे टोले लंडनमध्ये ऐकू येतात, तसेच जगाच्या राजकारणातही त्याचे पडसाद कायम घुमत राहतात, असं म्हटलं जातं.
लंडनमधील अनेक ठिकाणांप्रमाणे आता येथील राजकीय व प्रशासकीय जागाही पर्यटनस्थळ बनले आहेत. त्यामुळे लंडनमधील अनेक प्रशासकीय जागांमध्ये व संसदेमध्ये महिन्याच्या ठराविक वेळी तिकीट काढूनही जाता येते. अनेकदा या ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते तसेच जनतेला आपली मत मांडण्यासाठी विविध कायद्यांवरील चर्चेमध्ये खासदारांच्या सोबत बोलवले जाते. यासोबतच संसदेमध्ये अनेक उपक्रमही आयोजित केले जातात.
इंग्लंडमधील अनेक शाळांमध्ये राबवला जाणारा एक उपक्रम म्हणजे संसद आठवडा अर्थात पार्लिमेंट विक. शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्लंडच्या राजकारणाची तसेच समाजकारणाची व त्या अनुषंगाने येथील इतिहासाची आणि सद्यस्थितीतील नागरिकशास्त्राच्या काही धड्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, हे दाखवण्यासाठी संसदेकडून हा उपक्रम राबविण्यात आला.
त्याचा वापर करून लंडनमधील तसेच बाहेरील अनेक शहरांतील शाळांमध्ये संसदेचे काम कसे चालते, याची माहिती देण्याकरिता विद्यार्थ्यांना बोलावले जाते. याचाच एक भाग म्हणजे या उपक्रमासाठी संसदेकडून शाळेतील विद्यार्थ्यांच्या माहितीकरिता विविध संसाधने माहितीपत्रके आणि त्याच सोबत अनेक दृकश्राव्य माध्यमातून संसदेची माहिती दिली जाते.
या सोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना व शाळेसाठी काम करणाऱ्या विविध गटांना संसदेमध्ये बोलवले जाते. संसदेत लंडनमध्ये राहणाऱ्या विविध देशांतून आलेल्या समुदायांसाठी अनेक उपक्रमही राबवले जातात. विविध धर्मांच्या व देशांच्या वेगवेगळ्या सणांच्या दिवशी येथे अनेकविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
ज्याप्रमाणे संसदेत मोठ्या प्रमाणात ख्रिसमस साजरा केला जातो त्याचप्रमाणे ईद आणि दिवाळीनिमित्तदेखील मोठमोठे कार्यक्रम ठेवले जातात. संसदेच्या आवारातच महात्मा गांधींचा पुतळा असल्याने २ ऑक्टोबर तसेच गांधीजींच्या स्मृतिदिनी या ठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलचेल असते, ज्यात सामान्य जनतेला सहज सहभाग नोंदवता येतो.
अशा विविध निमित्तांनी माझे संसदेत जाणे झाले. इंग्लंडची संसद अनेकदा आतून पाहता आली. येथील काही बैठकांमध्ये सहभागही नोंदविता आला; तरीही या संसदेची सर्वात आकर्षक बाजू म्हणजे या संसदेचे बांधकाम, त्याचे मिनार आणि त्यात असणारा इंग्लंड आणि पर्यायाने भारत देशाचाही मोठा इतिहास होय. भारतातील संसदेप्रमाणे इंग्लंडच्या संसदेतही दोन सभागृहे आहेत.
यातील एका सभागृहाला हाऊस ऑफ कॉमन्स आणि दुसऱ्या सभागृहाला हाऊस ऑफ लॉर्ड असे म्हटले जाते. याची तुलना आपल्या लोकसभा आणि राज्यसभेशी करता येईल. अनेकदा हाऊस ऑफ लॉर्ड या सभागृहातील सदस्य अंतर्गत प्रक्रियेतूनही निवडलेले असतात. त्यासोबतच या दोन्ही इमारतींना असणारा अनुक्रमे हिरवा आणि लाल रंग हा इंग्लंडच्या संसदेतच प्रथम वापरला गेला होता, ज्याचे नंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह भारताने अनुकरण केले. या दोन्ही सभागृहांसाठी गरजेचे असणारे मीटिंग हॉल या इमारतीत आहेतच, पण त्यासोबत ११ व्या शतकातील प्रसिद्ध वेस्टमिनस्टर हॉल याच्या जवळच आहे.
ही इमारत अकराव्या शतकामध्ये एक राजवाडा म्हणून बांधण्यात आली होती. तो इतिहास मनोरंजक असला तरी तितकाच रक्तरंजितही आहे. राजासाठी बांधण्यात आलेल्या या राजवाड्यामध्ये सुरुवातीच्या काळात राजाची संसद म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या खासदारांच्या बैठका होत असत. नंतर या इमारतीचा व राजाच्या अनेक दालनांचे आगीमध्ये मोठे नुकसान झाले म्हणून या इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली.
प्राचीन ग्रीक शैलीच्या गॉथिक पद्धतीने बांधल्या गेलेल्या या इमारतीमध्ये एलिझाबेथ टॉवर अर्थात बिग बेन ही सर्वात प्रसिद्ध आणि कुठूनही ओळखता येणारी इमारत आहे. याच्याच आसपास इंग्लंडमधील प्रसिद्ध रक्तरंजित घटना, उठाव, पंतप्रधानांची हत्या आणि अलीकडच्या काळातील काही दहशतवादी हल्लेही झाले. थेम्स नदीच्या किनाऱ्यावरच असल्याने तसेच लंडनमध्ये एकेकाळी असणाऱ्या मोठ्या प्रदूषणाने या इमारतीच्या अनेक भागांचे मोठे नुकसान झाले.
त्यातच लंडनला लागणाऱ्या आगीमुळे बरेचदा या इमारतीत अनेक लोकांचे प्राणही गेले. मात्र इमारतीच्या सजावटीसाठी कुठल्याही खर्चाची कमी इंग्लंडमधील जनतेचा कराच्या पैशातून इथल्या सरकारांनी होऊ दिली नाही. या सर्व घटनाक्रमामध्ये या इमारतीचे महत्त्व टिकून राहिले. म्हणूनच याला युनेस्कोने जागतिक वारसा यादीच्या स्थळांमध्ये सामील केले आहे.
इतिहासाच्या ओघात या ठिकाणी अनेक उलथापालथी घडल्या. राजेशाहीकडून पूर्णपणे लोकशाहीकडे येऊन इंग्लंडमध्ये राजा फक्त नामधारी उरल्यानंतर या इमारतीत संसदेच्या सर्व बैठका होऊ लागल्या. हळूहळू राजाच्या राजवाड्याची मुख्य जागा संसदेतील सदस्यांसाठी वापरली जाऊ लागली. नव्याने बांधकाम झाल्यानंतर या इमारतीमध्ये जवळपास ११०० नव्या खोल्या बनवण्यात आल्या. यातील अनेक खोल्यांमध्ये लोकांसोबत थेट बैठका घेण्यासाठी खासदारांना आपापली वेळ आणि जागा निवडता येते.
यादरम्यान अनेक भारतीयांनीही या इमारतीत वास्तव्य केले व भारत तसेच इंग्लंडच्या एकूण राजकारणावर आपली छाप सोडली. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले दादाभाई नवरोजी हे १८९०च्या दशकामध्ये लंडनमधील एका मतदारसंघातून मजूर पक्षाच्या तिकिटावर खासदार झाले. यापूर्वीच्या एका निवडणुकीतही त्यांनी सहभाग घेतला होता, मात्र त्यात पराभव झाल्यानंतर त्यांची इंग्लंडमधील अनेक नेत्यांकडून थट्टा उडवण्यात आली होती.
‘इथल्या संसदेत जाण्यासाठी एखाद्या काळ्या माणसाला इंग्लंडचे नागरिक निवडून देतील, असं मला वाटत नाही’ असा शेरा तत्कालीन सरकारमधील अनेक श्वेतवर्णीय नागरिकांनी लगावला होता. थोड्याच दिवसात लंडनमधील नागरिकांनी आपला खासदार म्हणून निवडून दिलेला पहिला भारतीय अशी नवरोजी यांची नोंद झाली.
एक प्रखर राष्ट्रवादी नेते असल्याने नवरोजी यांनी ब्रिटिश सरकारच्या अनेक धोरणांवर या इमारतीत झालेल्या अनेक चर्चेत कडाडून टीका केली, याचे उल्लेख आढळतात. अर्थात त्यांच्यासोबत ब्रिटिश साम्राज्याचे समर्थक असणारे सर मर्चंरजी भोवनागरी यांनीही या संसदेतून लंडनच्या एका प्रभागातील खासदार म्हणून काम केले. मात्र त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.
आजच्या घडीला इंग्लंडच्या एकूण मंत्रिमंडळातील पंधरा टक्के मंत्री हे भारतीय वंशाचे आहेत तसेच दोन्ही सभागृहातील एकूण खासदारांपैकी ५२ खासदार हे वेगवेगळ्या वंशाचे आहेत. या इमारतीत सध्याच्या घडीला असणारा जगाचा कारभार चालवण्यात अश्वेत व्यक्तींची मोठ्या प्रमाणात निवड होत आहे, याचा पाया एका भारतीयानेच घातला होता.
नंतरच्या काळात भारतामध्ये विधिमंडळाची स्थापना केल्यानंतर त्यात भारतीयांचा सहभाग वाढत राहिला. १९३७च्या निवडणुकांमध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात सत्ता स्थापनेसाठी मते मिळाली तेव्हा अनेक भारतीयांचे या इमारतीत जाणे-येणे वाढले; पण भारतीयांची या इमारतीत राहिलेली सर्वात मोठी आठवण म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला अधिकारी जेव्हा भारतात मुघल बादशहा जहांगीर याच्याकडे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारासाठी परवानगी मागायला आला त्या वेळेचे एक रंगीत चित्र. हे चित्र ब्रिटिश संसदेच्या मुख्य भागात टांगण्यात आले आहे.
१९२७ मध्ये संसदेत अनावरण करण्यात आलेल्या या चित्रामध्ये ब्रिटिश अधिकारी सिंहासनावर विराजमान असलेल्या जहांगीर बादशहाकडे परवानगी मागण्यासाठी आला आहे असे दिसते. चित्रात दाखवलेला हा अधिकारी म्हणजे याच संसदेत खासदार म्हणून निवडून आलेला सर थॉमस रो हा व्यक्ती होय. म्हणून या चित्राला खासदारांच्या कार्यालयीन जागेच्या जवळ लावण्यात आले.
भारतीय वंशाचे अनेक नागरिक तसेच खासदार या चित्राच्या भोवती काही काळ थांबूनच पुढे जात असल्याचे लक्षात आले. संसदेच्या आवारात जगाच्या इतर भागांत गेलेल्या ब्रिटिश नागरिकांच्या तसेच विविध ब्रिटिश शास्त्रज्ञांच्याही चित्रांचे अनावरण इमारतीत करण्यात आले. २०२०च्या आसपास ब्लॅक लाईव्ह मॅटर चळवळ सुरू झाल्यानंतर संसदेच्या एकूण इतिहासात गुलामगिरी आणि साम्राज्यवादाचा असलेले स्थान यासंबंधी अनेक चर्चा सुरू झाल्या.
तेव्हा या चित्रसोबत ब्रिटिश संसदेच्या बाहेर उभ्या असलेल्या व्हीन्स्टन चर्चिल आणि साम्राज्यवादी जगाच्या इतर खानाखुणांना सुरक्षित राखण्यासाठी पोलिसांची मोठी दमछाक उडाली. आजही या इमारतीत मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो व या इमारतीच्या आसपास कुणालाही तंबू उभारणे तसेच नदीच्या भागात होडी घेऊन जाणे याच्यासाठी परवानगी दिली जात नाही.
या इमारतीत आजच्या घडीला भारतीयांनी किती मोठा प्रभाव टाकत आहेत याचा अनुभव पुढील लेखात.
vaiwalunj@gmail.com
(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.