पाकिस्तानी तरुणाच्या ‘जॉयलँड’ चित्रपटाला प्रतिष्ठित ‘कान’ महोत्सवात मानाचे स्थान मिळाले. पाकिस्तानमध्ये मात्र बहुतांश ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित करायला नकार दिला.
- वैभव वाळुंज, vaiwalunj@gmail.com
पाकिस्तानी तरुणाच्या ‘जॉयलँड’ चित्रपटाला प्रतिष्ठित ‘कान’ महोत्सवात मानाचे स्थान मिळाले. पाकिस्तानमध्ये मात्र बहुतांश ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित करायला नकार दिला. पाकिस्तानी कला क्षेत्रातील व्यक्तींनी हा चित्रपट ऑस्कर स्पर्धेसाठी उतरवला आहे; पण धार्मिक वर्तुळातून यावर टीका करण्यात येतेय. या चित्रपटाविषयी ‘जॉयलँड’चे लेखक आणि दिग्दर्शक सईम सादिक यांच्याशी ब्रिस्टॉल, इंग्लंड येथे वैभव वाळुंज यांनी केलेली बातचीत...
ट्रान्सजेंडर आणि एकूण इतर नात्यांमधली शोषण करणारी पितृसत्ताक समाजातील फक्त स्त्रियांच नव्हे तर पुरुषांचे आणि स्वतः शोषकांचे कारुण्य मांडणारी कथा असताना फिल्ममध्ये एकदाही रेनबो फ्लॅग किंवा तत्सम समलैंगिक/ट्रान्सजेंडर चळवळीची संबोधने दिसत नाहीत, यासंबंधी काय सांगाल?
सईम सादिक : भारतीय उपखंड आणि पाश्चिमात्य देशांत झालेली LGBTQ+ समुदायाची चळवळ ही फार अर्थांनी वेगळी आहे. तत्कालीन भारतात अनेक राजे-रजवाडे यांच्याकडे दरबारात समलैंगिक-पारलिंगी व्यक्तींना मानाचे स्थान होते. अनेक संस्थानांमध्ये त्यांना शिक्षण देण्यासाठी पगारी कामावर ठेवले जात असे. महाराष्ट्रामध्येही अनेक सुलतानशाही राजवटींमध्ये यासंबंधी विशेष तरतूद होती. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या अंजली अरोंडेकर यांनी आपल्या पुस्तकात याची सांगोपांग चर्चा केली आहे. त्यामुळे हे भेद येणारच. उपखंडातील जनतेला समलैंगिक चळवळीचा फार वेगळा आणि अतिशय समृद्ध असा इतिहास आहे.
ब्रिटिशांच्या भारतात येण्याने बऱ्याच गोष्टी बदलल्या. भारतात काही वर्षांपूर्वी लागू असणारे आणि अजूनही बांगलादेश-पाकिस्तानात वापरले जाणारे कलम ३७७ हे इंग्रजांनी पारलिंगी व्यक्तींना भारतीय राजकारणातून दूर काढण्यासाठी वापरलेले शस्त्र होते. आपण सध्या आहोत त्या इंग्लंडमध्ये अशा पारलिंगी व्यक्तींचा उपचार करण्याचे अघोरी प्रकार तत्कालीन भारतात कधीच झाले नाहीत. म्हणून इथल्या अनेक चळवळी या उपखंडाच्या मोठ्या समुदायाला आपल्यात सामील करू शकत नाहीत. त्यांचे वर्णपट हे पाश्चात्य संस्कृतीहून फार पसरट आणि समृद्ध आहेत. त्यामुळे या चळवळी नेहमीच अलिप्त राहतील, असे मला वाटते. इथली चळवळ आहे तशी चालू राहावी आणि उपखंडात ती आपापल्या पद्धतीने स्वतंत्र चालू राहावी, कारण त्यांचे अस्तित्वच वेगळे आहे. त्यांच्यात तुलना होणे स्वाभाविक आहे, पण त्याकडे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे.
कायद्याच्या पातळीवर भारतीय उपखंडात अनेक गोष्टी बदलत आहेत. हे बदल तुम्हाला सकारात्मक वाटतात का?
भारतात २०१९ मध्ये आणि पाकिस्तानात नुकताच संमत झालेला पारलिंगी व्यक्ती कायदा आपल्याला फार आशादायक चित्र देतो. हे कायदे त्यांच्या युरोपीय भूमीवरील अनेक कायद्यांपेक्षा कितीतरी पुरोगामी आहेत. भारत आणि पाकिस्तान हे पारलिंगी व्यक्तींना आपल्या राष्ट्रीय ओळखपत्रावरून तिसऱ्या लिंगभावाला ओळख देणारे जगातील पहिल्या १३ देशांपैकी एक ठरले आहेत. त्यांच्यातील कायदे हे इथल्या इंग्रजी कायद्यांपेक्षा फार भविष्यगामी आहेत. हे अर्थातच उपखंडामध्ये शक्य होऊ शकले, कारण तिथले समाज या बाबतीत एका ऐतिहासिक आणि सामाजिक पातळीवर नेहमीच जोडले गेले आहेत. भारतात अनेक अभिनेते अशा भूमिका उत्साहाने साकारत आहेत, हे फार दिलासादायक चित्र आहे. अर्थात आपल्याला अजूनही फार लांबचा पल्ला गाठायचा आहे.
तुमच्या चित्रपटात बाप असणारे असंवेदनशील पात्र एका टप्प्यावर अचानक फार हळवे, करुण बनते. अन्याय करणाऱ्या पात्राला एवढे हळूवार दाखवून तुम्ही काय सांगू पाहत आहात?
ते पात्र आपल्या समाजातील वडीलधाऱ्या, जुनाट रूढी पाळणाऱ्या, गेल्या जगाच्या कल्पनांचे प्रतीक आहे. ते करुण दिसते, कारण त्याला एकविसाव्या शतकात आजूबाजूला चाललेल्या अनेक गोष्टी समजत नाहीत. मला थेट त्या पात्राला राक्षसी, चुकीचा, दुश्मन दाखवून व्हीलन बनवता आले असते; पण त्याला माहीत असणारे एकमेव जग त्याच्यासमोर कोसळत आहे आणि हा एकमेव आधार नाहीसा होताना तुम्ही त्याला ‘चल चल, लवकर सगळे जेंडर पॉलिटिक्स शिक आणि लोकांसाठीची सर्वनामे शिक आणि आमच्यासारखा हो’ असं नाही म्हणू शकत. ते घडायला हवे; पण घडणार नाही. मीही वयाच्या एका टप्प्यावर याच स्क्रिप्टमध्ये त्याला व्हीलन केला होता; पण हळूहळू कळत गेले, जग किती नाजूक ओवलेले असते, त्याचे धागेदोरे कसे असतात. त्यामुळे त्याच्या ७० वर्षांच्या आयुष्यातील गोष्टी एका दिवसात बदलू शकत नाहीत, पण या प्रक्रियेत तो स्वतः काहीसा स्वतंत्र होईल, हे मला दाखवायचे होते. पुरुषीसत्ता ही सर्वात जास्त प्रमाणात पुरुषांनाच कैद करत असते. ते याचे पहिले बळी ठरतात. याची चांगली बाजू ही, की पुरुषी वर्चस्व हाणून पाडण्यात पुरुषांना स्वतःलाही मुक्त करता येईल.
हा तुमचा पहिलाच चित्रपट असताना जगभरातल्या दर्शकांना आपलासा वाटतो, याचे कारण काय असावे?
मी ही फिल्म फारच वैयक्तिक कारणासाठी, स्वतःच्या भावनांचे वर्णन-विरेचन करण्यासाठी केली होती. त्यात पितृसत्ता, पुरुषत्व आणि स्वातंत्र्य या सर्वांचा मेळ लावायचा प्रयत्न केला. फिल्ममुळे जगात काही फरक पडेल, असा विचार केला नव्हता किंवा त्याच्या परिणामांविषयी मी अजाण होतो, पण मी शिक्षण घेत होतो तेव्हापासून मी ही फिल्म लिहायला सुरुवात केली होती. गेली सहा वर्षे मी सतत या फिल्मच्या पात्रांसोबत वेळ घालवला आहे. इतर कोणत्याही विचारांपेक्षा मी ही पात्रे एकमेकांशी कसे बोलतील, काय संवाद साधतील असा विचार करत गेलो. एका पितृशाही समाजात राहत असताना त्यातून अनेक गोष्टी तुम्हाला पडद्यावर दाखवता येतात, हेच त्याचे इंगित असावे.
पितृशाही व्यवस्थेचे असे वर्णन येण्याचे कारण काय असावे?
कदाचित उपखंडातील किंवा जगातील सर्वच वडिलांची आपल्या मुलाकडून असणारी अपेक्षा हे त्याचे कारण असावे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो असल्याने मला त्याचा पुरेपूर अनुभव आला. वडिलांना आपल्या मुलांना कठोर आणि निर्मम बनवायचे असते. बरेचदा हे बाप स्वतः फार संवेदनशील व्यक्ती असतात, मात्र आपल्यात पूर्वापार त्यांच्या बापांपासून चालत आलेली पुरुषी वर्चस्वाची अढी ते मोडू शकत नाहीत. स्वतःची कोणतीच जागा नसावी आणि सतत सहनशील-यातना सहन करणारे असावे, या पुरुषी अपेक्षा पूर्ण करण्याचा आपल्या देशातील स्त्रिया निष्फळ प्रयत्न करतात हेही आहेच. ते सर्व चितारताना आपल्याला मुलाला जगाच्या लढाईसाठी कठोर बनवणारा बाप अजाणतेपणी- एखाद्या प्रसंगातून, टोमण्यातून स्वतः त्याचे किती नुकसान करू शकतो हे दाखवायचा तो एक प्रयत्न होता.
पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, याविषयी काय सांगाल?
पुरोगामी विचारांच्या अनेक गोष्टी रोखून धरणे पाकिस्तानात नवे नाही. प्रत्येक फिल्म तीन वेगवेगळ्या सेन्सॉर बोर्डाकडून संमत केल्यानंतरच प्रदर्शित होऊ शकते. आधी त्यांनी मला काही काटछाट करून प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिली होती; पण एक निनावी- बिनाचेहऱ्याची, दुसऱ्याचे जानवे तपासणारी व्यवस्था या फिल्मवर नाराज होती. भारतात हिजडा आणि पाकिस्तानात ख्वाजा-सिरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींचे चित्रण पडद्यावर न होणे हे तिथल्या व्यवस्थांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मग शक्य असेल त्या लोकांना, नेत्यांना आणि शेवटी ट्विटरवर लोकांना खूपदा सांगून याविषयी एक वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यातही ती सामान्य व्यक्तींविषयी बोलते. स्वयंपाकघरात सोबत काम करणाऱ्या जावांमध्ये असणारे नाते किती तरल असते हे आपण विसरतो. मग ते कधीच समोर येऊ नये यासाठी खटाटोप केला जातो. त्यामुळेच हा चित्रपट जास्त लोकांना आपलासा वाटला; मात्र अजूनही पंजाबमध्ये त्यावर बंदी घालण्यात आलीय.
भारतामध्ये या चित्रपटाचं प्रदर्शन कधी होतेय?
पाकिस्तानात ही फिल्म देशाच्या ‘नैतिक आणि सामाजिक मूल्यांच्या विरोधात’ असल्याचे सरकारी संस्था आणि काही लोकांनी म्हटलंय. त्याउलट मला भेटलेल्या भारतीय लोकांकडून फार सकारात्मक प्रतिसाद मिळाला. भारतात येत्या १० मार्च रोजी ही फिल्म चित्रपटगृहांत दाखवण्यात येणार आहे. भारतातील लोक नक्कीच त्याचे स्वागत करतील, अशी मला आशा वाटते. अपूर्वा चरण यांनी निर्मात्या म्हणून, तसेच कायदेशीर लढाईत अनेक भारतीय कलाकारांनी मला साथ दिली म्हणून ही फिल्म शक्य होऊ शकली. त्यामुळे भारतीय प्रेक्षक याला उत्तम प्रतिसाद देतील, असे वाटते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.