- वैभव वाळुंज
इंग्लंडमधील अनेक शहरे पर्यटनासाठी प्रसिद्द्ध आहेत; मात्र तेथील काही सर्वात जुनी गावे या शहरांच्या भाऊगर्दीत झाकोळली जातात. अशाच इंग्लंडमधील सर्वात जुन्या गावांपैकी एक म्हणजे लुईस हे गाव. ऊस नदीच्या किनारी छोट्याशा खोऱ्यात वसलेल्या या गावामध्ये मला फिरता आलं. यातूनच इथल्या इतिहासाविषयीच्या अनेक गोष्टी समजल्या. एका लहानशा गावात समजण्यासाठी किती गोष्टी असू शकतात, याचं लुईस मूर्तिमंत उदाहरण आहे.
इंग्लंडमध्ये लुईस हे गाव प्रसिद्ध आहे ते त्याच्या बोनफायर अर्थात होळीच्या इंग्रजी अवतारासाठी. हल्लीच्या काळात इंग्लंडमध्ये धर्माचं पालन करणारे फार कमी लोक आढळतात. अनेक ठिकाणी चर्चेस रिकामी पडलेली असतात, अगदी रविवारीही लोक चर्चमध्ये जात नाहीत.
बऱ्याच ठिकाणी त्यांची देखभाल करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही म्हणून चर्चेस डागडुजी करून छोटेखानी हॉटेल, कॅफे, लग्नासाठीचे मॅरेज हॉल, सिनेमागृहे तसेच भाडेतत्त्वावर खोल्या देण्यासाठी म्हणून वापरली जातात. इथं नास्तिकतेकडे वाढता ओढा आहे आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनेक धार्मिक स्थळे अपयशी ठरत आहेत; पण लुईस हे गाव याला अपवाद आहे, असं म्हणता येईल.
किमान वर्षातून एका दिवशी का होईना, या गावामध्ये धर्माचा मोठा बोलबाला असतो आणि धार्मिक व्यक्तींना गावांमध्ये मानाचे स्थान मिळतं. एरवी विसरून चाललेला धर्म या गावी पुन्हा जागा होतो आणि लोक धर्मासाठी रस्त्यावर येतात; पण त्यातही थोडाफार मनोरंजनाचा व करमणुकीचा भाग असतोच. म्हणूनच या गावाचा भूगोल आणि इतिहास तितकाच रंजक आहे.
खरं म्हणजे लुईस गावाचा उल्लेख मध्ययुगीन इतिहासात आढळतो तो एकेकाळी इथे पसरलेल्या विस्तीर्ण आणि युरोपातील सर्वात मोठ्या विहारांच्या यादीमध्ये. ख्रिश्चन परंपरेत नवीन धर्मगुरूंना व धार्मिक क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुणांना पोपच्या देखरेखीखाली चालणाऱ्या मोठमोठ्या विहारांमध्ये काही वर्षे राहावे लागे.
या काळात त्यांना विहाराच्या प्रमुख व्यक्तींनी दिलेल्या आदेशानुसार काम करावे लागेल व सोबत धर्माचे शिक्षण चालत असे. आपल्याकडील गुरुकुल पद्धतीनुसार असे अनेक विहार तत्कालीन ख्रिश्चन जगतात कार्यरत होते.
अकराव्या शतकात जवळपास सर्व दक्षिण इंग्लंड व जवळपास पूर्ण ससेक्स कौंटीचा ताबा असणाऱ्या विल्यम द वॉरन या सॅक्सन जमातीच्या सरदाराने युरोपला भेट दिली होती. या काळात त्याने तेथील विस्तीर्ण विहार व धर्मशाळांची पाहणी केली. अशीच एखादी मोठी वास्तू इंग्लंडमध्ये असावी, असा विचार करून त्याने फ्रान्समधील मोठ्या विहाराच्या धर्तीवर एका नव्या वास्तूचं निर्माण लुईस गावांमध्ये सुरू केलं.
यातूनच १०८१ मध्ये या गावी सेंट पॅनक्रास विहाराची निर्मिती करण्यात आली, तो युरोपामध्ये प्रचंड प्रसिद्ध झाला. या वास्तूमुळे लुईसचे नाव तत्कालीन ख्रिश्चन जगतात दूरवर पसरलं. १५४० च्या सुमारास राज्याच्या घटत्या आर्थिक गंगाजळीची उणीव भरून काढण्यासाठी राजा सातवा हेन्रीने इंग्लंडमधील अनेक धार्मिक इमारती उद्ध्वस्त करून टाकल्या, त्यापैकी ही एक!
मात्र असं असूनही या वास्तूची स्मृती दीर्घकाळ लोकांच्या मनात राहिली. कॅथलिक पंथातून बहुतांश लोकांचं प्रोटेस्टंट पंथामध्ये धर्मांतर झालं. पोपला डावलून राजाने स्वतःला धर्मगुरू म्हणून प्रस्थापित केलं आणि रोमच्या कॅथलिक चर्चमधील पोप इंग्लिश जनतेच्या धार्मिक नाड्या बकिंगहम पॅलेसमध्ये राहणाऱ्या राजाच्या हाती आल्या; पण अर्थातच धर्माशी असणार लुईस गावाचं नातं लोकांच्या विस्मरणात गेलं.
हे नातं पुन्हा तयार होण्यासाठी जवळपास साठ वर्षे लागली. ५ नोव्हेंबर १६०५ या दिवशी इंग्लंडच्या संसदेवर हल्ला करण्याचा इंग्रजी कॅथलिक लोकांचा कट उधळून लावण्यात आला होता. इतिहासात त्याला गनपावडर प्लॉट म्हणून ओळखलं जातं. ‘व्ही फॉर वेंडाटा’ चित्रपटात यातली काही दृश्यं दिसतात. त्यानंतर लुईस गावामध्ये कॅथलिक नागरिकांविरुद्ध दंगलसदृश परिस्थिती तयार झाली होती.
इथे राहणाऱ्या बहुसंख्य प्रोटेस्टंट लोकांनी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करायला सुरुवात केली. इंग्लंडच्या राजघराण्याने त्याला एका उत्सवाचे रूप दिले व लोकांना आपला आनंद साजरा करण्यासाठी आग पेटवण्याची होळी करण्याची अनुमती दिली. १७व्या शतकापासून ते आजतागायत येथे दरवर्षी ५ नोव्हेंबरला मोठी होळी पेटवण्यात येते. याच दिवशी (कु)प्रसिद्ध व्यक्तींचे मोठमोठे पुतळे बनवून जाळण्यात येतात.
गतवर्षी डोनाल्ड ट्रम्प, ऋषी सूनक, लिझ ट्रस यांचे मोठाले कुरूप पुतळे बनवण्यात आले होते. इंग्लंडमधील सर्व मोठ्या शहरांमधून अनेक मोठमोठी पथके रात्री मिरवणुकीत सहभाग घेण्यासाठी आपापले पुतळे, बँड आणि बहुरंगी गणवेश घेऊन लुईस गावात दाखल होतात. एरव्ही तर या गावाची लोकसंख्या फक्त १७ हजार आहे; पण ५ नोव्हेंबर रोजी गावाच्या सर्व हद्दी, रस्ते व रेल्वे बंद केल्यानंतरही लाखोंची गर्दी या दिवशी लुईस गावामध्ये होते.
वेगवेगळ्या रंगाचे, आकारांचे कपडे व पुतळे घालून व अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या होळी पेटवून हा दिवस साजरा केला जातो. इंग्लंडची कॅथलीक राणी पहिली मेरी हिने या गावांमध्ये १७ प्रोटेस्टंट नागरिकांना फक्त वेगळ्या पंथाचे असल्यामुळे सुळावर चढवलं होतं, त्या घटनेची आठवण या दिवशी केली जाते. अनेक लोक हातामध्ये जळते क्रॉस घेऊन रस्त्यावरून चालत जातात.
‘रिमेंबर रिमेंबर, फिफ्थ ऑफ नोव्हेंबर’ अशा घोषणा देत उग्रपणे चालणाऱ्या मिरवणुका वाघा बॉर्डरवरच्या बिटिंग रिट्रीटची आठवण करून देतात. वेगवेगळ्या धर्तीवर बनवलेल्या बोनफायर सोसायट्या यासाठी वर्षभर तयारी करत असतात. त्यांची एकूण संख्या वर्षानुवर्षे वाढत चालली आहे. यासाठी फटाके आणि बॉम्ब फोडणाऱ्या विशेष व्यक्तींची नेमणूक केली जाते.
या फटाकेबाज गोलंदाजांना रॉकर्स म्हटलं जातं. मिरवणुकीत हा सन्मान मिळणं अनेक मुलांचं स्वप्न असतं. अर्थात जळणारे क्रूस ही जगभरातील बहुतांश लोकांच्या मनात धडकी बनवणारी घटना आहे कारण तिचा संबंध उग्रवादी ख्रिश्चन धार्मिक संघटनांशी जोडला जातो.
अमेरिकेत जळता क्रूस म्हणजे क्रू क्रुक्स क्लॅन या दहशतवादी संघटनेची ओळख आहे. यावरून या गावावर अनेकदा टीकाही होत असते. ही पद्धत बंद व्हायला हवी, असं अनेक नागरिकांचं मत आहे. एखाद्या गोष्टीत वादविवाद नसतील, तर ती इंग्रजी परंपरा काय म्हणायची!
पण लुईस गावाचा इतिहास आणि वर्तमान याहून फार मोठा, रंजक आणि आनंददायी आहे. त्याच्या बहुढंगी संस्कृतीने या परक्या देशात राहताना माझ्या मनाला फार दिलासा मिळाला. त्याविषयीची हकिकत पुढच्या भागात.(पूर्वार्ध)
vaiwalunj@gmail.com
(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत नीती व धोरण या विषयावर संशोधन करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.