गावं आणि शहरांचा संघर्ष

इंग्लंडमध्ये शहरांत काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला गावाकडे आपले दुसरे घर असावे, अशी इच्छा असते; पण यामुळे गावातील घरांच्या किमती वाढतात व त्याचा दूरगामी परिणाम घरांच्या किमतीवर होतो.
England People
England PeopleSakal
Updated on

- वैभव वाळुंज

इंग्लंडमध्ये शहरांत काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला गावाकडे आपले दुसरे घर असावे, अशी इच्छा असते; पण यामुळे गावातील घरांच्या किमती वाढतात व त्याचा दूरगामी परिणाम घरांच्या किमतीवर होतो. गावातील लोक अनेकदा आपल्याच गावात घर घेऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होते.

लंडनपासून जवळ असल्याने अनेक नागरिकांनी लुईस गावामध्ये घर घ्यायला पसंती दर्शवली; ऐकतील ते लुईसचे गावकरी कसले! या गावातील लोकांनी अनेक विकासकामांना विरोध करत गावची मूळ ओळख जपण्याचा प्रयत्न केला आहे.

लुईस गावची आपली स्वतःची ओळख जपण्याची एक सांस्कृतिक परंपरा आहे, तशीच ती राजकीयदेखील आहे. इसवी सनाच्या तेराव्या शतकापासून या गावांमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या कुटुंबांचा इतिहास आपल्याला थेट धुंडाळता येतो.

यामागे काहीसा नॉर्मल परंपरेच्या अतीव अभिमानाचा भाग असला तरी बऱ्याच अंशी आपलं वेगळं अस्तित्व जपण्यासाठी केलेल्या राजकीय संघर्षाची पराकाष्ठा दिसते. ही परंपरा इथल्या रहिवाशांनी अजूनही अबाधित ठेवली आहे आणि आपलं गावपण शाबूत राखलं आहे. आपल्या गावाचं अस्तित्व टिकावं म्हणून त्यांनी राजकीय प्रतिनिधी तसेच सरकारशी वेळोवेळी लढे दिले.

विद्यापीठाच्या जवळ असल्यामुळे या गावांमध्ये इंग्लंडमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या लोंढ्यासाठी जागा असावी, असा विद्यापीठाचा कयास होता. २०१८ मध्ये त्यासाठी पुरेशी जागा विद्यापीठाने घेऊन ठेवली. प्रचंड पैसा असल्याने अनेकदा इथली विद्यापीठे आसपासच्या अनेक परिसंस्था तसेच लहानसहान वसाहतींना उठवण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत.

हीच गोष्ट लुईस गावासोबतही होणार होती. कारण विद्यापीठाने या कामासाठी प्रचंड पैसा ओतला होता. यातून ३५० मोठमोठाले फ्लॅट तसेच विद्यापीठाच्या काही ऑफिसेससाठी जागा बनणार होती. अशा प्रकारचं कोणतंही सामाजिक किंवा शैक्षणिक बांधकाम करायचं असेल तर पब्लिक कन्सल्टेशन या नावाने स्थानिक लोकांचं मत विचारात घेतलं जातं.

विद्यापीठाने पब्लिक कन्सल्टेशनमध्ये बहुतांश लोकांनी ‘इथे फ्लॅट बांधले तर या परिसराचा विकास व्हायला मदत होईल’ असं मत असल्याचं सांगितलं. यामुळे अर्थातच हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार होता. मात्र गावातल्या स्थानिक नागरिकांनी याची कसून चौकशी केली आणि विद्यापीठाला मिळालेल्या नऊ प्रतिसादांपैकी फक्त एका प्रतिसादात थोडीशी सकारात्मक प्रतिक्रिया असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.

त्याही व्यक्तीनं ‘आधी त्यांनी आम्हाला फक्त ८५ फ्लॅट बनणार असं सांगितलं म्हणून आम्ही त्याला होकार दर्शवला’ अशी ग्वाही दिली. या गोष्टीमुळे लुईस गावचे नागरिक संतापले व त्यांनी याविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. ‘गावात राहणारे बहुसंख्य नागरिक वयाने वृद्ध आहेत व अचानक तरुण विद्यार्थी येथे राहायला आल्यानंतर गावच्या एकूण व्यवहाराचा चेहरामोहरा बदलेल; इथे रात्रीपर्यंत चालणाऱ्या आवाजामुळे लोकांना त्रास होईल’ असं मत बहुसंख्य लोकांनी नोंदवलं.

विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाला घरे बनवायचीच असतील, तर त्यांनी ती विद्यापीठ ज्या ठिकाणांशी बस आणि इतर सुविधांनी जोडले गेलेले आहे, अशा ठिकाणी बनवावीत, किंवा शहरात अधिकाधिक गुंतवणूक करावी; पण त्यासाठी गावाकडील लहान लहान उद्योगांची जागा घेणं चुकीचं आहे, असाच गावकऱ्यांचा होरा होता.

ही बाब विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या विरुद्ध वाटत असली तरी विद्यापीठाशेजारील अनेक गावांचा एकूण अनुभव असाच होता. गावात बहुसंख्य विद्यार्थी राहायला आल्यानंतर गावातील गोष्टी बदलत गेल्या. पार्किंगसाठी मोठी जागा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेगवेगळी दुकानं, त्यातून तयार होणारा कचरा आणि विविध प्रकारचे प्रदूषण यामुळे पर्यावरणावर अनेक परिणाम झाले होते.

यातून स्थानिक नागरिकांसाठी हळूहळू अडचणी वाढायला सुरुवात झाली, असा शेजारील अनेक गावांचा अनुभव असल्याने लुईस गावातील लोक वेळीच सजग झाले. ‘आमच्या गावामध्ये हे विकास काम नको’ असं लोकांनी बजावून सांगितलं. या कामाला महानगरपालिकेकडून मान्यता मिळाल्यानंतरही लोकांनी आपला लढा सुरूच ठेवला.

इंग्लंडमध्ये शहरांत काम करणाऱ्या नोकरदारवर्गाला गावाकडे आपले दुसरे घर असावे, अशी इच्छा असते; पण यामुळे गावातील घरांच्या किमती वाढतात व त्याचा दूरगामी परिणाम घरांच्या किमतीवर होतो. गावातील लोक अनेकदा आपल्याच गावात घर घेऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होते. लंडनपासून जवळ असल्याने अनेक नागरिकांनी लुईस गावांमध्ये घर घ्यायला पसंती दर्शवली व इथे नवीन इमारतींचं काम सुरू करण्यात आलं.

अशा अनेक इमारती गावाकडील भागांमध्ये फिरताना दिसतात; पण ऐकतील ते लुईसचे गावकरी कसले! ‘लंडनवरून आलेल्या लोकांनी आपला पैसा आपल्या खिशात ठेवावा; त्यांच्या पैशाखातर आम्ही आमच्या जागा देणार नाही,’’ अशी भूमिका येथील स्थानिक संस्थांच्या सदस्यांनी घेतली. गावात ठिकठिकाणी याविरुद्ध पोस्टरबाजी करण्यात आली व या विकासकामात अडथळे आणले गेले.

‘आजवर आम्ही आमच्या गावातल्या लोकांच्या हिमतीवर गावात विकासकामे केली आहेत व संस्था उभारल्या आहेत. लंडनवरून आलेल्या लोकांनी आमचा अतिरिक्त विकास करू नये. आमचा विकासाला विरोध नाही; मात्र महानगरपालिका नदीचे पात्र असणाऱ्या किंवा बांधकामासाठी अगदी अयोग्य असणाऱ्या जमिनीवरही फक्त घरंच घरं बांधत सुटली आहे.

यातून फक्त स्थानिक पर्यावरणाचा नाश होणार आहे,’ असं म्हणत गावकऱ्यांनी मोठमोठे मोर्चे काढले. लोकप्रतिनिधी व स्थानिक खासदारांना लोकांनी चांगलंच धारेवर धरलं. एरव्ही हुजूर पक्षाचा दबदबा असणाऱ्या मतदारसंघात देशातील एकुलता एक ग्रीन पक्षाचा खासदार निवडण्याची किमया येथील लोकांनी करून दाखवली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं. शेवटी महानगरपालिका आणि विद्यापीठाला त्यांच्या या मागणीपुढे झुकावं लागलं.

गावात होणारे अनेक प्रकल्प शहराच्या हद्दीतून दूर सारले गेले. अर्थातच यामुळे विद्यार्थ्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं. इंग्लंडमध्ये विद्यार्थ्यांना अनेकदा राहण्यासाठी जागा मिळत नाही व अडचणी येतात हा याच गोष्टींचा परिपाक आहे. मात्र स्थानिक लोकांनी आपल्या हक्कांसाठी कसं लढता येतं, विकासाची फक्त एकच दिशा नसते, तर विविध बाजूंनी, एकजुटीतून आणि समन्वयाने विकास घडवून आणता येतो, हे दाखवून दिलं.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.