लढ्याविरोधात स्थानिकांचा आवाज

सध्या सुरू असलेल्या युद्धाविरोधात इंग्लंडच्या ब्रायटन शहरात अनेक ठिकाणी विविध पद्धतीने आंदोलने करण्यात येत आहेत.
England Agitation
England AgitationSakal
Updated on

- वैभव वाळुंज

सध्या सुरू असलेल्या युद्धाविरोधात इंग्लंडच्या ब्रायटन शहरात अनेक ठिकाणी विविध पद्धतीने आंदोलने करण्यात येत आहेत. कित्येक वर्षांपासून दर शनिवारी शहराच्या मुख्य चौकात शेकडो नागरिक जमतात आणि आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतात. युवावर्ग विविध कलांच्या माध्यमातून युद्धाविषयी आपला आवाज उठवत आहे.

इंग्लंडमधील ब्रायटन म्हणजे परस्परविरोधी सूर बाळगणारं एक मोक्याचं शहर समजलं जातं. या शहराला विविध देशांमधून येणाऱ्या अनेक प्रवाहांचा मोठा इतिहास आहे. समुद्रकिनाऱ्यावर असल्याने एकेकाळी प्रचंड मोठ्या संख्येने युरोपातील अनेक देशांमधून लोक इथे येऊन इंग्लंडमध्ये वसले होते. युद्धपूर्व आणि युद्धेतर काळात देशात आलेल्या ज्यू नागरिकांचाही त्यात समावेश होता.

नंतरच्या काळात अरब देशांमध्ये क्रांती सुरू झाल्यानंतर कित्येक अरब भाषिक आणि काही प्रमाणात जॉर्डन वगैरे देशांमधील पॅलेस्टिनियन नागरिक इंग्लंडमध्ये आले. अलीकडच्या काळात युक्रेनमधील अनेक नागरिकांना इंग्लंडने विनाअट आसरा व नागरिकत्वही दिलं आहे.

दुसरीकडे सध्या इंग्लंडमध्ये सत्तेत असणाऱ्या हुजूर पक्षाच्या अनेक नेत्यांमध्ये आणि पक्षाला मदत करणाऱ्या व्यक्तींमध्ये रशियन नागरिकांचा समावेश आहे. म्हणूनच इस्राईल-पॅलेस्टाईन किंवा रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर शहरांमध्ये अनेक ठिकाणी विविध पद्धतीने आंदोलने करण्यात येत आहेत.

एव्हाना लिंगभावाच्या अधिकारांसाठी तसेच अतिरेकी वंशवाद बाळगणाऱ्या विविध गटांच्या विरोधात शहरात ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून दर शनिवारी शहराच्या मुख्य चौकात पॅलेस्टाईन देशाला स्वातंत्र्य मिळावं या मागणीसाठी काही शेकडो नागरिक जमतात आणि आपल्या मागण्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे यामध्ये प्रामुख्याने अनेक ज्यू नागरिकांचा समावेश असतो.

या चळवळीला गती येऊ लागल्यानंतर इस्राईलला पाठिंबा देणाऱ्या अनेक नागरिकांनी याच दिवशी शहरातील मुख्य चौकाच्या दुसऱ्या बाजूला उभे राहून त्यांच्यासाठी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. युद्धादरम्यान शहरातील चौकाच्या तिसऱ्या बाजूला युक्रेनला पाठिंबा दर्शवणाऱ्या नागरिकांनी त्या देशाचे झेंडे घेऊन आंदोलन करायला सुरुवात केली. अशा प्रकारे गेल्या वर्षभर दर शनिवारी शहरांमध्ये आंदोलनाचा दिवस मानला जाई.

मात्र एवढे असूनही या ठिकाणी कधीही घोषणाबाजी होत नसे अथवा या लढ्याला कधीही हिंसक स्वरूप आले नाही. लोक आपापल्या पद्धतीने येणाऱ्या - जाणाऱ्यांसमोर आपल्या चळवळीची बाजू मांडत व त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत. अनेकदा एकमेकांच्या समोर येऊनही या नागरिकांनी एकमेकांना आदराने वागवल्याचं पाहिल्यानंतर राजकीय ध्रुवीकरण सुरू असताना परस्परविरोधी गट एकमेकांशी स्थानिक पातळीवर सद्‍भावनेने वागू शकतात, याचं दर्शन मला झालं.

अर्थातच या शहराला पुरोगामी चळवळीचा वारसा लाभल्याने डावीकडे झुकणाऱ्या व पॅलेस्टाईनच्या बाजूने आंदोलन करणाऱ्या लोकांची संख्या इथे जास्त आहे. त्यामुळे गाझामधील नागरिकांच्या समर्थनार्थ हजारोंचे मोर्चे शहरात निघाले. मात्र, या शहरात जवळपास चार हजारांहून अधिक ज्यू नागरिक राहत असल्याने त्यांनी शहराच्या सर्व महत्त्वाच्या जागी जमून हमासने पकडलेल्या नागरिकांची चित्रे भिंतीवर लावण्यास सुरुवात केली.

त्यानंतर इस्राईल देशाच्या समर्थनार्थ मोठा मोर्चाही निघाला. ठिकठिकाणी नागरिकांनी खासदारांना पत्र लिहून तसेच त्यांच्या कार्यालयाबाहेर उभे राहून संसदेमध्ये आपली बाजू पॅलेस्टाईन नागरिकांच्या हक्कांच्या अधिकारासाठी मांडण्याची मागणी केली. अशी मागणी न करणाऱ्या खासदारांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली गेली.

पण सर्वात लक्षवेधी आंदोलन ठरलं ते म्हणजे या आठवड्यात संपलेलं ‘एल ३ हॅरिस’ या ऑर्डिनान्स फॅक्टरी संस्थेभोवती झालेल्या प्रदर्शनाचे. ही संस्था इस्राईलकडून वापरल्या जाणाऱ्या आयुधांच्या व शस्त्रांच्या निर्मितीसाठी काम करत आहे, अशी सूचना नागरिकांना मिळाली. त्यानंतर ताबडतोब एक कंपनी बंद करण्यात यावी, यासाठी नागरिकांच्या सह्यानिशी पत्रके पाठवली गेली.

कायदेशीर मार्गाने ही प्रक्रिया करता यावी, यासाठी काही गटांनी स्वतः पुढाकार घेतला व लोकांना मेल आणि इतर माध्यमातून सरकारला ही फॅक्टरी बंद करण्यासाठी विनंती केली गेली. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून अनेक नागरिकांनी स्वतः कंपनीच्या गेटवर जाऊन लोकांना आत जाण्यास मज्जाव केला. यामुळे देशभरात नव्या चर्चेला सुरुवात झाली. आता जवळपास देशातील चार युद्धसाहित्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर नागरिक असाच दबाव टाकत आहेत.

अशा पद्धतीने ब्रायटन शहराला आधीपासूनच आंदोलनांचा इतिहास होता. युद्ध सुरू झाल्यानंतर एका लहानशा शहरानेही त्यात आपला वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच, त्यात तरुण पिढीचा मोठा सहभाग आहे. अनेक शाळांमधील व कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः या कामी आंदोलने व गट उभारायला सुरुवात केली आहे.

दोन्हीकडील बाजू मांडणाऱ्या युवकांनी आपापले तात्पुरते गट स्थापन करत विविध कलांच्या माध्यमातून या युद्धाविषयी आपला आवाज उठवला आहे. अर्थातच यातल्या कोणत्या गटाच्या आवाजाला यश येते आणि सरकारवर दबाव टाकण्यात कोण यशस्वी होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.