विदेह आणि मिथिला

रामानं राजा जनकाकडील धनुष्य मोडलं, ही कथा आपण मागील लेखामध्ये पाहिली. यानंतर राम -सीता विवाह झाला, हे सर्वांनाच माहिती आहे. विवाहसंबंध दोन तुल्यबळ कुळांमध्येच होणं आवश्‍यक असतं. दशरथ ज्या वेळी राजा जनकाच्या दरबारात दाखल झाला, त्या वेळी वसिष्ठांनी दशरथाच्या गौरवशाली कुळाचं वर्णन केले.
विदेह आणि मिथिला
विदेह आणि मिथिलाsakal
Updated on

अंतरंग पुराणांचं

विवेक देबरॉय ,saptrang@esakal.com

रामानं राजा जनकाकडील धनुष्य मोडलं, ही कथा आपण मागील लेखामध्ये पाहिली. यानंतर राम -सीता विवाह झाला, हे सर्वांनाच माहिती आहे. विवाहसंबंध दोन तुल्यबळ कुळांमध्येच होणं आवश्‍यक असतं. दशरथ ज्या वेळी राजा जनकाच्या दरबारात दाखल झाला, त्या वेळी वसिष्ठांनी दशरथाच्या गौरवशाली कुळाचं वर्णन केले.

जनकानं आधी स्वत:च्या कुळाची ओळख सांगितली. वाल्मीकी रामायणात सांगितल्यानुसार, जनक म्हणाला, ‘‘आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध पावलेला निमी नावाचा राजा होऊन गेला. अत्यंत धार्मिक वृत्तीचा हा राजा सर्वशक्तिमान होता. त्याच्या पुत्राचं नाव मिथी होतं आणि मिथीच्या पुत्राचं नाव जनक होतं. जनक हे नाव असलेला हा पहिला राजा होता. उदावसू हा जनकाचा पुत्र होता. जनकापासूनच नंदिवर्धनाचा जन्म झाला आणि तो देखील धर्मशील होता.

नंदिवर्धनाचा पुत्र सुकेतू आणि सुकेतूचा पुत्र देवरत. हा देवरत अत्यंत शक्तिशाली आणि धार्मिक वृत्तीचा होता. राजर्षी बृहद्रथ यांचा जन्म देवरतापासून झाल्याचे म्हटलं जातं. महावीर हा बृहद्रथाचा पुत्र अत्यंत पराक्रमी, बुद्धिमान आणि सामर्थ्यशाली होता. सत्य हेच ज्याचे सामर्थ्य आहे असा सुधरिती हा महावीर राजाचा पुत्र होता. अत्यंत निष्ठेने धर्माचरण करणारा आणि धर्मशील असणारा दृष्टकेतू हा सुधरितीचा पुत्र होता. दृष्टकेतूचा पुत्र म्हणजे प्रसिद्ध राजर्षी हर्स्याश्‍व. हर्स्याश्‍व राजाचा पुत्र मारू आणि मारूचा पुत्र प्रतिवंधक. राजा कीर्तिरथ हा प्रतिवंधकाचा पुत्र होता आणि तोही अत्यंत धार्मिक होता. कीर्तिरथाच्या पुत्राचे नाव देवमिधा होते. देवमिधाचा पुत्र विबुध आणि विबुधाच्या पुत्राचे नाव माहीध्रक असे होते. माहीध्रकाचा पुत्र कीर्तिरत हा अत्यंत शक्तिशाली राजा होता. राजर्षी कीर्तिरताने महारोमाला जन्म दिला. महारोमाचा पुत्र स्वर्णरोमा हा धार्मिक वृत्तीचा राजा होता. राजर्षी स्वर्णरोमाचा पुत्र ऱ्हस्वरोमा हा अत्यंत विशाल मनाचा आणि धर्मज्ञानी राजा होता. त्याला दोन पुत्र आहेत. त्यातला मी ज्येष्ठ असून माझा कनिष्ठ बंधू कुशध्वज हा अत्यंत शूर आहे.

मी ज्येष्ठ असल्यानं राजा असलेल्या माझ्या वडिलांनी राज्याची जबाबदारी माझ्याकडे सोपविली आहे. कुशध्वजाची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवून त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला. वयापरत्वे माझे वडील स्वर्गस्थ झाल्यानंतर मी धर्माचे पालन करत राज्याचा भार उचलला आणि देवासम असलेल्या कुशध्वजाचे अत्यंत प्रेमाने पालनपोषण केले.

मी राज्यपदावर आल्यानंतर काही काळानंतर सांकाश्‍य नगरीचा शूर राजा सुधन्वा याने मिथिलेला वेढा घातला. त्याने माझ्याकडे दिव्य शिवधनुष्याची मागणी केली. ‘तुझी कमलाक्षी कन्या सीता मला दे,’ असेही तो मला म्हणाला. त्याच्या या मागण्या मी अमान्य केल्यावर त्याने युद्ध केले. या युद्धात माझ्याविरोधात असलेल्या सुधन्वाला मी ठार मारले. सुधन्वाला वीरमरण आल्यानंतर मी माझा शूर बंधू कुशध्वजाला सांकाश्‍य राज्याच्या गादीवर बसविले.’’

यावरून आपल्या असे लक्षात येते, की या कुळात जनक हे नाव धारण केलेले अनेक राजे होते. सीतेचा पिता हा काही पहिला आणि एकमेव जनक नव्हता. उदाहरणार्थ, अष्टावक्र गीतेमध्ये राजा जनक आणि ऋषी अष्टावक्र यांचा संवाद आहे. हा राजा जनक म्हणजे सीतेचा पिता नाही. सीतेचा पिता असलेल्या राजा जनकाचे नाव सिरध्वज असे होते.

राजा जनकाच्या राज्याचे नाव विदेह असे होते आणि राजधानी मिथिला होती. मिथी राजाच्या नावावरूनच मिथिला हे नाव पडल्याचे स्पष्टच आहे. हे राज्य निमी राजाने स्थापन केले हे देखील उघडच आहे. तर मग ‘विदेह’ हे नाव कोठून आले? विदेह या शब्दाचा अर्थ शरीररहित.

ही कथा भागवत पुराणात सांगितलेली आहे. निमी हा इक्ष्वाकुचा पुत्र होता. त्याने एक यज्ञ सुरू केला. या यज्ञाचे पौरोहित्य करण्यासाठी त्याने वसिष्ठांना निमंत्रित केले. (वसिष्ठ हे इक्ष्वाकु वंशाचे गुरु होते.) पण, वसिष्ठांनी आधीच इंद्राच्या यज्ञात सहभागी होण्याचे ठरविले होते. त्यामुळे त्यांनी निमीला प्रतीक्षा करण्यास सांगितले. इंद्राचा यज्ञ संपन्न झाल्यावर निमीचा यज्ञ पूर्ण करू, असे वसिष्ठांनी सांगितले. निमीने काही काळ वाट पाहिली. पण दीर्घ कालावधी उलटून गेला तरी वसिष्ठ ऋषी न परतल्याने निमी राजाने इतर ऋषींच्या मदतीने यज्ञ सुरू केला. इंद्राचा यज्ञ पूर्ण झाल्यावर कुलपुरोहित परतले आणि आपल्या शिष्याने आपले म्हणणे टाळल्याचे त्यांना दिसून आले. वसिष्ठांनी त्याला शाप दिला - ‘‘आपण सर्वज्ञानी असल्याचा निमीला अहंकार झाला आहे. त्याचा देह पडून जावो.’’ मात्र, आपल्या कुलपुरोहितानेही धर्माचे पालन न केल्याचा आरोप करत निमीनेही त्यांना शाप दिला. ‘‘तुम्हाला धर्माचे काहीही ज्ञान नाही, तुम्हाला लालसेने ग्रासले आहे. त्यामुळे तुमचाही देह पडून जावो.’’

निमीनं त्याचा देह सोडून दिला. ऋषींनी विविध सुगंधी द्रव्यांचा वापर करत त्याचा देह जतन करून ठेवला. यज्ञ संपन्न झाल्यावर उपस्थित झालेल्या देवांना ऋषी म्हणाले, ‘‘तुमच्यामध्ये सामर्थ्य असेल आणि तुम्ही संतुष्ट झाला असाल, तर राजाचा देह पुन्हा सजीव होऊ दे.’’ देवांनी ही विनंती मान्य केली. पण निमी म्हणाला, ‘‘असे करू नका. मला हे शरीराचे बंधन नको. शरीरापासून दूर होण्याची भीती मनुष्याच्या मनात कायम असते. त्यामुळेच, ऋषीमुनी कधीही स्वत:ला शरीरामध्ये अडकवून ठेवण्याची इच्छा बाळगत नाहीत. त्याऐवजी, ते आपली बुद्धी श्रीहरीच्या पदकमलांची पूजा करण्यासाठी वापरतात. मला माझे शरीर स्वीकारण्याची इच्छा नाही. यातून दु:ख, वेदना आणि भय निर्माण होते. पाण्याच्या चहूबाजूंनी जसे पाणी असते, तसे या शरीराला सर्व बाजूंनी मृत्यूने वेढलेले आहे.’’ त्याच्या या इच्छेला ‘तथास्तु’ म्हणताना देव म्हणाले, ‘‘तुझ्या इच्छेनुसार, यापुढे तुझे वास्तव्य हे शरीर धारण केलेले जीव जेव्हा पापण्यांची उघडझाप करतील, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत असेल.’’ (निमिष म्हणजे डोळ्यांची उघड-झाप होणे. निमीचे वास्तव्य तेथेच असते.)

महर्षींनी विचार केला, की राजाशिवाय प्रजा भयभीत होईल. त्यामुळे त्यांनी निमीचे शरीर घुसळले आणि त्यातून एका पुत्राचा जन्म झाला. त्याचा जन्म अशा पद्धतीने झाल्याने त्याला जनक असे म्हटले जाऊ लागले. शरीरविरहित असलेल्या व्यक्तीचा तो पुत्र असल्याने तो विदेह म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचा जन्म घुसळणीतून, म्हणजे मंथनातून झाला असल्याने तो मिथिला नावाने ओळखला जाऊ लागला. अशा त्याने मिथिला नगरी निर्माण केली. (जनक हा शब्द ‘जन्म’ या शब्दापासून तयार झाला आहे. शरीरविरहित असणे म्हणजे वि-देह. यापासूनच विदेह शब्द तयार झाला आहे. मिथिला शब्द मंथन या शब्दापासून तयार झाला आहे. जनक म्हणजेच मिथिल, म्हणून नगरीचे नाव मिथिला.)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

(लेखकांचा पुराणे आणि वेद तसेच भारतीय संस्कृतीचा अभ्यास आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.