धडे बांगलादेश निर्मितीचे...

बांगलादेशच्या निर्मितीला आणि त्यासाठी झालेल्या युद्धाला, त्यातील भारताच्या निर्णायक विजयाला ५० वर्षे होत आहेत.
धडे बांगलादेश निर्मितीचे...
Updated on

बांगलादेशच्या निर्मितीनं द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला तडा दिला. मुद्दा लोकांच्या आकांक्षांचा असतो, सन्मानानं जगण्याचा असतो. केवळ एकच धर्म असण्याचा नसतो, हे बांगलादेशच्या निर्मितीनं सिद्ध झालं.

बांगलादेशच्या (Bangladesh) निर्मितीला आणि त्यासाठी झालेल्या युद्धाला, (War) त्यातील भारताच्या (India) निर्णायक विजयाला (Win) ५० वर्षे होत आहेत. भारताचा पाकिस्तानवरचा (Pakistan) तो विजय हे भारताच्या लष्करी इतिहासातील अभिमानास्पद पान आहे, यात शंकाच नाही. त्याचसोबत तो अत्यंत विपरीत स्थितीत जागतिक मत बदलण्याऱ्या मुत्सद्देगिरीचाही नमुना होता. इतक्‍या इटपट एक नवा देश जन्माला घालून जगाला त्याला मान्यता द्यायला लावणं, हे आधुनिक जगात एखाद्या चमत्काराहून कमी नाही, याचं कारण दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्याही देशाची एकात्मता हा आंतरराष्ट्रीय कायद्यात अत्यंत संवेदनशील मुद्दा बनला. अशी एकात्मता भंग करण्याचा कोणताही अन्य देशाचा प्रयत्न हा आक्रमण मानला जातो आणि भारतानं जे काही पूर्व पाकिस्तानात केलं, त्याला आक्रमण न म्हणता बांगलादेश वेगळा करता आला, हे आक्रीत होतं. बांगला युद्धातील लष्करी पराक्रमाच्या गाथांवर अनेकदा लिहून, बोलून झालं आहे. या युद्धात तिन्ही दलांच्या नेतृत्वानं आणि प्रत्यक्ष लढणाऱ्या फौजांनी जो समन्वय दाखवला, त्याबद्दलही अनेकदा चर्चा झाली आहे. या युद्धानं भारतीय लष्कराला सहज नमवू, हा पाकिस्तानी भ्रम कायमचा संपला. भारतातील लष्कर बरोबरीचंच नाही, तर प्रसगी भारी पडू शकतं याची जाणीव पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाला झाली.

बांगला युद्धातील पराभव विसरून जायचा प्रयत्न तिथलं लष्करी नेतृत्व किंवा मुलकी नेतृत्वही कायम करत आलं. पाकच्या नव्या पिढीत पूर्व पाकिस्तान नावाचा काही पाकिस्तानचा भाग होता याची जाणीवही शिल्लक राहणार नाही, याची काळजी घेतली गेली. हे सारं केलं, तरी तो प्रचंड मानहानिकारक पराभव होता, हे पाक विसरू शकत नाही आणि त्यानंतरच भारताविरोधात छुपं युद्ध करण्याच्या प्रयत्नांना तिथं बळ मिळत गेलं. दहशतवादाचा आधार घेणं हा पाकच्या परराष्ट्र नीतीचा भाग बनला, त्याचं एक कारण बांगला युद्धातील त्यांचा दारुण पराभव हेही आहे. त्या युद्धातील विजय जवानांचं शौर्य, फिल्ड मार्शल माणेकशा, जनरल जेकब आदींचं युद्धनेतृत्व, इंदिरा गांधींचं कणखर नेतृत्व, रशियाची एका मर्यादेपर्यंत का असेना साथ... यांतून साकारला. पाच दशकांच्या काळात लष्करी संघर्षांचं स्वरूप पुरतं बदलतं आहे. संरक्षण सिद्धतेतील आव्हानंही अधिक गुतागुंतीची झाली आहेत. या काळात भारत लष्करीदृष्ट्या अधिक मजबूत झाला. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सशस्त्र खरेदीदार देश बनला, आधुनिक हत्यारं, तंत्रज्ञान साथीला आलं. अणुस्फोट आणि पाठोपाठ भारताचं अण्वस्त्र धोरण प्रत्यक्षात आलं. यातून सीमवेरची आव्हानं पेलायला भारत अधिक सक्षम झाला हे खरं आहे, तसंच भवतालची स्थितीही बदलली आहे. भूराजकीय चौकट बदलते आहे. व्यूहात्मक स्थिती बदलते आहे. आपल्या संरक्षणसिद्धतेचा विचार या पार्श्‍वभूमीवर करावा लागतो.

दुसरीकडं त्या युद्धानं दिलेले दोन धडे जगासाठी आणि भारतीय उपखंडासाठी अत्यंत मोलाचे ठरावेत. एकतर, केवळ समान धर्म या आधारावर राष्ट्र बनत नाही, टिकतही नाही. दुसरा, तुम्ही कितीही शक्तीशाली असला, तरी लोकांच्या मनाविरोधात कायम राज्य करता येत नाही.

कारणं बांगलादेश निर्मितीची

बांगलादेश युद्धाला पार्श्‍वभूमी होती ती पाकिस्तानातील ७ डिसेंबर १९७०ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची. भारत फाळणीसह स्वतंत्र झाला, तेव्हा मुस्लिमबहुल भाग असलेला बंगालचा तुकडा पूर्व पाकिस्तान बनला, तर या तुकड्याशी पश्‍चिम पाकिस्तान किंवा सध्याच्या पाकचा थेट संपर्कही नव्हता. दोन्हीकडच्या सास्कृतिक धारणा वेगळ्या होत्या. पश्‍चिम पाकिस्तानच्या लष्करावर आणि मुलकी व्यवस्थेत पंजाबी मुस्लिमांचं वर्चस्व होतं. ते बंगाली मुस्लिमांना दुय्यम मानत होते. नवा देश प्रत्यक्षात येण्याची सुरवात अशा दुय्यम मानण्यातून झाली होती. या विरोधात आवाज उठवणारे शेख मुजिबूर रहमान बांगलादेशचे निर्माता ठरले. निवडणुकीत पूर्व पाकिस्तानातील बहुतांश जागा जिंकल्यानं शेख मुजिबूर यांचा अवामी लीग पक्ष पाकिस्तान संसदेत बहुमत मिळवणारा ठरला होतो, हे पंजाबी वर्चस्ववाद्यांना मान्य होणं शक्‍य नव्हतं. त्यातून निवडणुकीचा निकाल अमान्य करत बंगाली जनतेवर पाकिस्तानी लष्करानं अत्यंत भयावह अत्याचार सुरू केले. यात बंगाली बुद्धिवादी, लेखक, कलाकार, बंगाली सैनिक आणि हिंदूंना लक्ष्य केलं जात होतं. हे ‘ऑपरेशन सर्चलाइट’ पूर्व आणि पश्‍चिम पाकिस्तानला तोडण्यात महत्त्वाचं ठरलं. या सरकारी दमनशाहीची दखल घेण्यात जग कमी पडलं, त्याचं एक कारण त्या काळात सर्व गोष्टीकडं शीतयुद्धाच्या चष्म्यातून पाहिलं जात होतं. पूर्व बंगालमधील खदखद समजून घेण्यात अमेरिकादी पाश्‍चात्य देश कमी पडले. अमेरिकेला तेव्हा सोव्हिएत संघाविरोधात पाकची साथ हवी होती, दुसरीकडं चीनसोबत मैत्रीच्या अमेरिकी हालचालीतही पाक हा दुवा बनत होता. अमेरिकेला बंगाली लोकांवर पाकनं केलेल्या अत्याचारांची पूर्ण माहिती मिळत होती. ‘द ब्लड्स‌ टेलिग्राम’ या गॅरी बास यांच्या पुस्तकात याचे भरपूर तपशील उपलब्ध आहेत, मात्र त्याकडं ठरवून दुर्लक्ष केलं गेलं. याचा परिणाम म्हणून बंगालमधून मुक्ती वाहिनीच्या रूपानं उघड उठावात झाला. या उठावाकडं पाहण्याचा भारताचा दृष्टिकोन सुरवातीला तरी पाकचं अंतर्गत दुखणं असाच होता. ‘भारतानं कट करून बांगलादेश निर्माण केला,’ या पाकिस्तानात सांगितल्या जाणाऱ्या कथेत काही दम नाही. बंगालमधून निर्वासितांचे लोंढे लाखोंच्या संख्येत सुरू झाले, तेव्हा तत्कालीन इंदिरा गांधी सरकारनं या प्रश्‍नात गांभीर्यानं लक्ष घातलं. तेव्हा, बांगलादेश स्वतंत्र करणं हा उद्देश नव्हता. मुक्ती वाहिनीच्या जवानांना प्रशिक्षण देणं त्यांना साहाय्य करणं इतकाच मर्यादित सहभाग सुरवातीला होता. मात्र, एकदा युद्धाला तोंड फुटल्यानंतर भारतीय लष्करानं मिळालेल्या संधींचा पूर्ण लाभ घेत ढाक्‍यावर स्वारी केली आणि युद्धात गुंतलेल्या पाकिस्तानी लष्कराला शरणागतीखेरीज पर्याय उरला नव्हता.

यश भारतीय मुत्सद्देगिरीचं

स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीनं युद्ध संपलं. दुसऱ्या महायुद्धानंतर इस्राईल-अरब युद्धाचा अपवाद वगळता अत्यंत कमी कालावधीत निर्णायक विजय मिळणारं हे पहिलं युद्ध होतं. त्याचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे कोणी कल्पनाही न केलेलं नवं राष्ट्र त्यातून जन्माला आलं. जे सर्वशक्तिमान मानल्या जाणाऱ्या महाशक्तींना जमलं नाही, ते भारतानं करून दाखवलं होतं. त्यावेळी झालेल्या सिमला करारात भारतानं एक गोष्ट साधली, भारत पाकमधले मतभेदाचे मुद्दे हे दोन देशच सोडवतील; तिसऱ्याचा त्यात सहभाग मान्य नाही, हे सूत्र पाकला स्वीकारायला लावलं गेलं. या काळात एकाचवेळी अमेरिकेचा दबाव, अगदी सातवं आरमार दारात आणलं, तरी भारतानं झुगाराला. पाकशी युद्ध सुरू असताना चीन आगळीक करणार नाही, इतपत व्यवस्था रशिमार्फत केली. मात्र वाटाघाटींवेळी रशियालाही सहभागी करून घेतलं नाही. तत्कालीन स्थितीत हे मुत्सद्देगिरीतलं मोठंच यश होतं. दुसरीकडं, नव्या देशाला जगानं मान्य करावं याचेही प्रयत्न यशस्वी केले. याच युद्धावेळी पाकव्याप्त काश्‍मीर का मुक्त केलं नाही, असा एक सूर असतो, दुसरा सूर असतो तो वाटाघाटी करतानाच आताची नियंत्रण रेषा कायमची सीमा का बनवली नाही. यात वास्तवाचं भान कमी आणि भाबडेपणा अधिक असतो. एकतर युद्ध आणखी विस्तारणं जवळपास अशक्‍य होतं. रशियाचाही त्याला विरोध होता. पूर्व पाकिस्तानात तिथलेच लोक सरकारविरोधात उठाव करत असल्यानं त्यांची उघड साथ होती. पाकव्याप्त काश्मिरात पाक लष्कराचं नियंत्रण पक्कं होतं. नियंत्रण रेषा कायमची करण्यातून युद्ध जिकलं, तरी भारतानं एक तृतीयांश काश्‍मीर गमावला, असा आरोप झाला असता. तो व्यासपीठावरच्या आदर्शवादात ठीक असला, तरी मताचं राजकारण करणाऱ्या कोणत्याही नेत्यासाठी परवडणारा नव्हता.

अन्वयार्थ राष्ट्र उदयाचा...

बांगलादेश निर्मितीचा धडा होता, की लोकांच्या विरोधात त्यांच्यावर कायम राज्य करता येत नाही. कोणत्याही समूहाला, प्रदेशाला दुय्यम ठरवून वर्चस्ववाद लादणं फुटिरतेकडं घेऊन जातं. स्वातंत्र्यानंतर पाक सरकारला- त्यात पूर्व बंगालमधील मुस्लिम बहुलता आणि सध्याच्या पाकमधील मुस्लिम लोकसंख्या या बळावर हे नवं राष्ट्र एकसंध राहील, असं वाटत होतं. समान धर्म हा राष्ट्रबांधणीसाठी उपयुक्त असल्याचा सिद्धांत बांगलादेशच्या निर्मितीनं फोल ठरवला. द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतालाही त्यानं तडा दिला. मुद्दा लोकांच्या आकांक्षांचा असतो, सन्मानानं जगण्याचा असतो. केवळ एकच धर्म असण्याचा नसतो, हे बांगलादेशच्या निर्मितीनं सिद्ध झालं. पूर्व पाकिस्तानातील लोक वेगळा विचार करतात, तर त्याच्या आकांक्षा समजून घेणं आणि त्यांना राजकीय प्रक्रियेत सामावून घेण्याएवजी त्यांना दूर ढकलण्याची चूक पाकिस्तानी धुरिणांनी केली. केवळ बळावर कोणत्याही लोकसमूहाला कायम चिरडता येत नाही, हे बांगलादेशच्या निर्मितीनं दाखवलं. आधुनिक राष्ट्र-राज्यात तिथल्या लोकांमध्ये धार्मिक, वांशिक, भाषक किंवा अन्य कसलंही वैविध्य असू शकतं. मात्र, अशा वैविध्य असलेल्या समूहांना राष्ट्राच्या रचनेत, निर्णयप्रक्रियेत स्थान आहे, हे जाणवलं पाहिजे, हा महत्त्वाचा घटक बनला आहे. या विरोधातील एकारलेली वाटचाल होते, तिथं प्रश्‍न गंभीर व्हायला लागतात. भारतानं सर्वसमावेशकता स्वीकारली. त्यानंतरही ताण आले, तरी त्याचं व्यवस्थापनही करता आलं. पाकनं स्वीकारलेला मार्ग फुटीकडं घेऊन गेला. हा बांगला युद्धाचा आणि नव्या राष्ट्राच्या उदयाचा अन्वयार्थ आजही लागू आहे.

बदललेले मैत्री संबंध!

दुसरीकडं ५० वर्षांच्या काळात जगात प्रचंड बदल झाले आहेत. बांगला युद्धावेळी अमेरिका भारताच्या विरोधात पाकच्या बाजूनं झुकलेली होती. रशियानं थेट युद्धात साथ दिली नाही, तरी भारताच्या बाजूनं रशिया झुकलेला होता. चीन तटस्थ होता. युद्धासाठी पाकनं वापरलेली बहुतेक लष्करी सामग्री अमेरिकेनं दिलेली होती. शेवटच्या टप्प्यात अमेरिकेनं आपलं आरमार भारतालगत आणलं. तेव्हा पाक अमेरिकेचा दक्षिण आशियातील सर्वात विश्‍वासार्ह दोस्त होता. भारत रशियाचा. तर, अमेरिकेला शीतयुद्धाचं पारडं फिरवताना चीनशी जवळीक साधायची होती. एक ‘ग्रेट गेम’ त्यातून साकारत होता. ५० वर्षांनी जागतिक नेपथ्य बदललं आहे. भारताला धाक घालू पाहणारी अमेरिका मुक्तहस्ते भारताला मदत करायला उत्सुक आहे. चीनशी जवळीक साधू पाहणारी अमेरिका चीनला सर्व क्षेत्रात रोखण्याची रणनीती आखते आहे, त्यात भारत भागीदार असला पाहिजे यासाठी प्रयत्न करते आहे. पाकशी अमेरिकेचे संबंध संपले नसले, तरी तो गोडवा आटला आहे. पाकनं अफगाणिस्तानात केलेल्या खेळातून अमेरिकेला पाकचं स्वरूप ध्यानात आलं आहे. अमेरिकेला आव्हान द्यायला चीन जागतिक क्षितीजावर उभा असताना पाक चीनच्या कह्यात निघाला आहे, तर भारत-रशिया मैत्री कायम असली, तरी अमेरिकेसोबतची भारताची जवळीक आणि रशियाचा चीनकडचा झुकाव यातून ताण तर आलेच आहेत. बांगलादेश युद्ध झालं, तेव्हा शीतयुद्ध भरात होतं. शीतयुद्ध संपलं, तेव्हा अमेरिका हीच महाशक्‍ती उरली. ती रचनाही आता बदलते आहे. दोन महासत्तांमधील संघर्ष, एकमेव महासत्तेचं वर्चस्व अनुभवलेलं जग बहुकेंद्री रचनेकडं निघालं आहे. जागतिक पातळीवरच्या राजकारणात १९७१मध्ये भारताला काही खास स्थान नव्हतं, आता भारत एक महत्त्वाचा घटक बनतो आहे. जन्मतः भुकेकंगाल असलेला, दुष्काळानं ग्रासलेला म्हणून गरिबीच्या खाईत सापडलेला बांगलादेश आर्थिक आघाडीवर भारतानंही दखल घ्यावी अशी लक्षणीय प्रगती करतो आहे.

भारतासमोरील बदलती आव्हाने

बांगलादेश युद्धातील भारताच्या विजयानंतर ५०वर्षांत संरक्षणाच्या आघाडीवरची आव्हानं पुरती बदलली आहेत. तंत्रज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा घटक बनतो आहे. पाक, चीन आणि अंतर्गत आव्हानं अशा अडीच आघाड्यांवरची ही लढाई आहे. आणि त्यात पारंपरिक सिद्धतेसबोतच सायबर वॉरसारखे नवे आयाम जोडले जाताहेत. ज्याचा मागमूसही १९७१ मध्ये नव्हता. दहशतवाद आणि त्याला गोंधळात टाकणारा जागतिक प्रतिसाद, हेही त्या युद्धानंतर तायर झालेलं आव्हान आहे. प्रत्यक्ष जमिनीवर लढणारे हात किती, यासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ते वापरणारे, विकसित करत जाणारे तंत्रकुशल हात किती हाही महत्त्वाचा घटक बनतो आहे. आणि या आघाडीवर फार मोठा टप्पा भारताला गाठावा लागेल.

पाच दशकांनंतर जगाची रचनाही बदलते आहे, दक्षिण आशियातील सत्ता संतुलन परिवर्तन होतं आहे. एकाच ब्रिटिशकालीन हिंदुस्तानातून भारत, पाक आणि नंतर बांगलादेश साकारले. तिन्हीची वाटचाल निराळी आहे. पाकनं भारतविरोध हेच जणू अस्तित्वाचं कारण बनवलं. जो बांगलादेश टिकेल याची शाश्‍वती वाटत नव्हती, किंबहुना सुरवातीचा आझादीचा बहर ओसरला, की हा देश पुन्हा पाकिस्तानात सामील होईल, असाही आशावाद तिथं होता. बांगलादेशनं मानवी विकासावर भर देत विकासाच्या बहुतांश निर्देशांकात पाकिस्तानला मागं सोडलं. याचं कारण देश उभारणीत देशातील नागरिकांचा विकास महत्त्वाचा मानला गेला. भारताला पाकच्या आणि चीनच्या आव्हानाला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि नाही. तरीही ९०च्या दशकानंतर भारतानं केलेली प्रगती लक्षणीय राहिली. बंगाली घुसखोर हे नेहमीच भारत बांगलादेश संबंधांत तणावाचं कारण बनत आलं. त्यावर मात करून आणि दोन्ही देशातील अंतर्गत ताणांचा उभयपक्षी सहकार्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली, तर सहकाऱ्याच्या आणि दोन्ही देशांसाठी लाभाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.

पाकिस्तानवरचा खणखणीत विजय म्हणून १६ डिसेंबर साजरा करतानाच या संधी साधण्यावर भर द्यायला हवा. बांगलादेश प्रगतीच्या एका टप्प्यावर आला आहे. या प्रगतीत त्या देशाला पाश्चात्त्य अविकसित देशांना मदत करणाऱ्या करारांचा लाभ झाला. बांगलादेश आर्थिक आघाडीवर प्रगती साधताना हे लाभ हळूहळू संपत जातील. तिथं नवं आव्हान उभं राहील. भारतानं या काळात मोठीच आर्थिक प्रगती साधली आहे. मात्र, दोन्ही देशांत ज्या प्रकारचं सहकार्य शक्‍य आहे, ते पूर्ण क्षमतेनं होत नाही. त्रिपुरा, मेघालय, मणिपूरसाठी बांगलादेशातून मार्ग बनवणं शक्‍य आहे, तो प्रस्ताव दीर्घकाळ पडून आहे. हे घडल्यास बांगलादेशाच्या पायभूत सुविधांत मोलाची भर पडेल, तसंच भारताला ‘चिकन नेक’ परिसरातील कोंडीतून सुटका मिळू शकेल. ढाका आणि भूतान, नेपाळ जोडणारे मार्ग भारत पुरवू शकतो. चीन ‘रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्हमधून आर्थिक आणि व्यूहात्मक उद्दिष्ट साधणारं महाप्रचंड जाळं विणायचा प्रयत्न करतो, तर निदान दक्षिण आशियात भारत हेच घडवू शकतो. ज्यातून किमान या भागात चीनच्या प्रभावाला अटकाव आणि भारताचं स्थान निर्विवादपणे अधोरेखित होईल. आपापल्या देशातील कडव्यांना त्यातून येणाऱ्या कडवटपणाला बाजूला ठेऊन हे प्रयत्न झाले, तर दक्षिण आशियाचं चित्र बदलण्याच्या शक्‍यता यात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.