स्मितांकित शोकछाया!

केरळमधील ४० जणांच्या एका एकत्र कुटुंबाने त्यांच्या ‘अम्मा’च्या शवपेटीसोबत स्मितहास्य करत एक फोटो काढला. काय कारण असावे? उत्तर अगदी सोप्पं आहे, पण या गोष्टीने मात्र समाजमाध्यमावर वातावरण तापले.
स्मितांकित शोकछाया!
Updated on
Summary

केरळमधील ४० जणांच्या एका एकत्र कुटुंबाने त्यांच्या ‘अम्मा’च्या शवपेटीसोबत स्मितहास्य करत एक फोटो काढला. काय कारण असावे? उत्तर अगदी सोप्पं आहे, पण या गोष्टीने मात्र समाजमाध्यमावर वातावरण तापले.

- विजयराज बोधनकर dhanodi1964@gmail.com

केरळमधील ४० जणांच्या एका एकत्र कुटुंबाने त्यांच्या ‘अम्मा’च्या शवपेटीसोबत स्मितहास्य करत एक फोटो काढला. काय कारण असावे? उत्तर अगदी सोप्पं आहे, पण या गोष्टीने मात्र समाजमाध्यमावर वातावरण तापले. मृत्यू झाल्यानंतर खरे तर शोक करायचा असतो, दुःखात बुडून जायचे असते; पण असे न घडता हे कुटुंबीय हसतखेळत त्या शवपेटीसोबत फोटो काढून घेतात? रुढीवादी समाजाला हे पटणार नाही; परंतु त्या कुटुंबाची यामागची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे.

समाधानाने जगणारी व्यक्ती ही समाज आणि कुटुंबप्रिय का असते, याचे उत्तर आपणच शोधले पाहिजे. कुणालाही न दुखावता ती व्यक्ती कुटुंबाला आणि समाजाला का धरून असते, हेही एक शिकण्यासारखे आहे. आयुष्य एक मोठी कटकट समजून जगणारी व्यक्ती समाजाला आणि कुटुंबाला त्रासदायक ठरत असते, याची आपण सतत उदाहरणे बघत असतो; परंतु जगणे ज्याला एक कला वाटते, अशी माणसे आपल्यासोबत एक सुंदर संस्कृती निर्माण करत असते. ती व्यक्ती नक्कीच समाजाला आणि कुटुंबाला हवीहवीशी वाटत असते.

एकत्र कुटुंब पद्धती तिथेच जगून असते, जिथे घरात ती ज्येष्ठ व्यक्ती सर्वांना प्रेमाने बांधून ठेवते. स्वतःचा आदर्श निर्माण करते आणि तिच्या पावलावर पाऊल ठेवत ते कुटुंब उत्तम जगण्याच्या मर्यादा कुठेही न ओलांडता कायम एकमेकांशी सतत जोडून राहाते. वैचारिक बळ त्यामागे नक्कीच असते, त्याचे सर्व श्रेय त्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या संस्कारालाच द्यावे लागते. अशा घरातली माणसे मृत्यूनंतरही घरात जिवंत असतात, ते केवळ त्यांच्या सकारात्मक आठवणीने.

मृत्यू झाला नाही असे घर शोधूनही सापडणार नाही; पण मृत्यूनंतरही घरात जगणाऱ्या व्यक्ती किती घरात सापडतील, हा मोठ्या शोधाचा विषय आहे. मृत्यूनंतर काही तासांतच त्या व्यक्तीचे अस्तित्व नष्ट होते. कारण कुठलेही आपुलकीचे नाते त्या व्यक्तीने घरात निर्माण केलेले नसते. उलट गेली ते बरे झाले, घराला नुसती कटकट होती, अशी आजूबाजूला किंवा घरात मनोमन प्रतिक्रिया उमटत असते. तिरसट स्वभाव, हट्टीपणाचा कहर, मीपणा मिरवणारी आणि सतत इतरांना दुखावणारी वृत्ती माणसाच्या अस्तित्वासोबत सावलीसारखी जोडून राहते; परंतु एखाद्या घरातली ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा हे जग सोडून जाते, तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रभावळीत कायम कुटुंब जगत राहते. अशीच एक गोष्ट आहे एका केरळमधल्या कुटुंबाची...

४० जणांच्या एका एकत्र कुटुंबाने त्यांच्या ‘अम्मा’च्या अंत्यविधी शवपेटीसोबत स्मितहास्य करत एक फोटो काढला. त्या अम्माचे अस्तित्व या ४० लोकांनी जिवंत ठेवले. काय कारण असावे, की अम्माच्या शवपेटीसोबत स्मितहास्य करीत फोटो काढला? तर उत्तर अगदी सोप्पं आहे, पण या गोष्टीने मात्र समाजमाध्यमावर वातावरण तापले. मृत्यू झाल्यानंतर खरे तर शोक करायचा असतो, दुःखात बुडून जायचे असते; पण असे न घडता हे कुटुंब स्मितहास्य करीत त्या शवपेटीसोबत फोटो काढून घेते? रुढीवादी समाजाला हे पटणार नाही; परंतु त्या कुटुंबाची यामागची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे.

या फोटोवर स्पष्टीकरण देताना कुटुंबाने सांगितले की, ‘आमची मरीअम्मा ९५ वर्षे अगदी हसतखेळत जगली आणि म्हणून तिला हसत, आनंदाने अनोखा निरोप द्यायचे आम्ही ठरवले. हसतखेळत जगलेली व्यक्ती कशी असेल याचा विचार केला, तर लक्षात येते की ९५ वर्षे जगलेली मरीअम्मा समृद्ध आयुष्य जगली असणार. तिने नक्कीच कुटुंबाला उत्तम संस्कार दिले असणार. त्याचमुळे तिच्याविषयी आदर असावा. प्रत्येक माणसाचा मृत्यू हा अटळच असतो; पण अकाली गेलेल्या व्यक्तीविषयी सतत दुःखाची बाब होऊन बसली असते. खूप जगणे अजून बाकी असताना असे सोडून जाणे कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी क्लेशकारक नक्कीच असते; पण समृद्ध आयुष्य जगून झाल्यानंतर शरीरयातना भोगण्यापेक्षा त्याने शरीर टाकून निघून जावे, असे प्रत्येकाला वाटत असते. कारण शरीरयातना या नरकयातनेसारख्या असतात. त्या यातनेचा शेवटी मनाला त्रास होतो, तो त्रास होऊ नये म्हणून समाज अशी भावना व्यक्त करतो. वृद्धापकाळाने देह ठेवलेल्या व्यक्तीविषयी ‘बरे झाले, सुटली एकदाची’, हीच भावना असते. ९५ वर्षीय मरिअम्मांविषयी असेच झाले असणार म्हणून तर यातनेशी जास्त लढा न देता सुखासुखी शरीराचा त्याग करून निघून गेली, ती सर्वांसाठी समाधानाची बाब होती. समाधान आणि शांतीने जग सोडून निघून गेलेल्या व्यक्तीविषयी सतत त्याच्या आत्म्याला शांती मिळो, हीच प्रार्थना आपण करीत असतो, ते केवळ याचसाठी. कारण संस्काराचे देणे हे कधीच संपणारे नसते. संस्कार करणारा जरी जग सोडून गेला असला, तरी त्याचे विचार कायम पुढच्या पिढीने जतन करून ठेवलेले असतात.

मृत्यूनंतरही कित्येक वर्षे जगलेल्या व्यक्ती या समाजात काय कमी आहेत का? सत्याचे संस्कार करणारी माणसे कायम जगत राहतात, हेच अंतिम सत्य आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर, मिरा, महात्मा फुले, शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, आगरकर, प्रबोधनकार, बाबासाहेब आंबेडकर यांसारखी अनेक मंडळी म्हणून तर आजही मृत्यूनंतर जनमानसात जिवंत राहिलीत. कारण त्यांनी बुरसटलेल्या विचारांविरुद्ध लढा दिला आणि पिचलेल्या समाजाला न्याय मिळवून दिला. जगाला प्रकाश दिला, अंधार नाहीसा केला.

मृत्यूअगोदर न संपणारे संचित देऊन जाणारी व्यक्ती समाजासाठी प्रचंड काम करत असते. बाबा आमटे, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज हे खऱ्या अर्थाने समाजाचे बाबा होते. महारोग्यांना न्याय मिळवून देणारे बाबा, कर्मकांडाच्या विळख्यातून सोडवून समाजाला शिक्षणाकडे वळवणारे गाडगेबाबा आणि गावालाच आपण समृद्ध केलं पाहिजे, असा संदेश देत ग्रामगीता लिहिणारे तुकडोजी महाराज समाजाचे पालक होते. एका मोठ्या समाजकुटुंबाचे प्रमुख होते म्हणून ते आजही जिवंत. म्हणून तर त्यांची पुण्यतिथी आठवणीत राहते. त्यांच्या कार्याचे स्मरण होते. पुण्यतिथी म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्युदिन. मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा दिवस हा त्या व्यक्तीचा आदर म्हणून साजरा केला जातो. सकारात्मक विचारांचा संकल्प पूर्ण केल्यानंतर त्यांना स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केले म्हणून तर त्यांच्या कार्याची, विचारांची दखल म्हणून पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो. म्हणजेच मृत्यू हाही सुंदर असतो, जेव्हा ती व्यक्ती समाजाला दिशा देणारी असते.

ज्यांनी गडगंज धन मिळवून फक्त स्वार्थ साधला, अशा व्यक्तीची पुण्यतिथी समाज आठवणीत ठेवत नाही. त्याचे स्मरण करत नाही. कारण लौकिकाचा उदोउदो हा क्षणिक असतो; पण अलौकिक गोष्टीला कधीही मृत्यू येत नसतो. त्या सतत चिरंजीव असतात. अमर असतात; पण ज्यांनी कधीही कुठल्याच अपेक्षा केल्या नाहीत, निरपेक्षपणे समाजासाठी जगले म्हणून आज ते जिवंत आहेत. अम्मा किंवा आई निरपेक्ष जगत मुलांना देत राहते, त्याची जाणीव ठेवणारे कुटुंबच त्या व्यक्तीची आठवण म्हणून अशी प्रतिमा काढून ठेवतात, याला विरोध करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मरिअम्मा आनंददायी जगण्याची प्रेरणा देणारे एका कुटुंबाचे प्रातिनिधिक रूप आहे.

मृत्यूसुद्धा एक सुंदर प्रवास आहे, फक्त त्या व्यक्तीचा मृत्यूपूर्वीचा काळ अलौकिक असावा. उत्तम माणूस म्हणून जगलेले असावेत, माणुसकी जगवलेली असावी, जगण्याचे तत्त्वज्ञान त्यांनी जगवलेले असावे. अशा महात्म्यांनी मृत्यूनंतर माणसाच्या मनात देवत्व प्राप्त केलेले असते. हाडामासाच्या देहाला मृत्यू येऊन घेऊन जातो; पण त्याचा आत्मा शेवटी अमर असतो. म्हणून म्हणतात, आत्मा शस्त्राने कापला जात नाही. अग्नीने जळत नाही. पाण्याने नष्ट होत नाही. म्हणून आत्मियतेच्या जगण्याला मृत्यू येत नसतो, त्याचाही उत्सव समाजाने साजरा केला पाहिजे. तो व्यक्तीचा नव्हे, तर त्याच्या विचारांचा तो उत्सव असतो. त्याच्या जाणिवेचा तो उत्सव असतो.

(लेखक प्रसिद्ध चित्रकार आणि लेखक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.