प्रचंड वादळी घटनांचं दशक.... (२००१ ते २०१०)

या शतकाच्या पहिल्याच दशकात देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर धक्कादायक अशा गोष्टी घडल्या. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ या जुळ्या इमारतींवर अतिरेक्यांनी विमान हल्ला करून हे दोन्ही टॉवर जमीनदोस्त केले.
Mumbai Terror Attack
Mumbai Terror AttackSakal
Updated on
Summary

या शतकाच्या पहिल्याच दशकात देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर धक्कादायक अशा गोष्टी घडल्या. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ या जुळ्या इमारतींवर अतिरेक्यांनी विमान हल्ला करून हे दोन्ही टॉवर जमीनदोस्त केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि देशाच्या पातळीवर २००१ या वर्षात इतक्या धक्कादायक घटना घडल्या, की त्याचा परिणाम पुढची दहा वर्षे राहिला. अमेरिकेने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले. २००१ नंतर अमेरिकेमध्ये पुन्हा असा कुठलाही हल्ला घडू शकला नाही इतकी अभेद्य सुरक्षा व्यवस्था अमेरिकेने उभारली. भारताच्या दृष्टीने २००२ हे वर्ष अत्यंत कलाटणी देणारे ठरले. गोध्रा हत्याकांड गुजरातमध्ये घडले. कारसेवक घेऊन येणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यात आली. गोध्रा हत्याकांडाचे परिणाम म्हणून राज्यभर अनेक ठिकाणी दंगली झाल्या.

या शतकाच्या पहिल्याच दशकात देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर धक्कादायक अशा गोष्टी घडल्या. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ या जुळ्या इमारतींवर अतिरेक्यांनी विमान हल्ला करून हे दोन्ही टॉवर जमीनदोस्त केले. अमेरिकेला अशा हल्ल्याची सवयच नव्हती, मात्र या हल्ल्यामुळे अमेरिका हादरली आणि अमेरिकेत असे घडू शकते तर अन्यत्र काय घडेल या विचाराने जगही हादरले. न्यूयॉर्कमध्ये अनेक भारतीय माणसे असल्याने २६/११ या दिवशी भारतातील अनेक नागरिकांना चिंता लागली होती. अमेरिकेची ही घटना विस्मृतीत जायच्या आधी डिसेंबर महिन्यात भारतीय संसदेवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला. या वेळी झालेल्या चकमकीत सर्व अतिरेकी ठार झाले; पण सुरक्षा अधिकाऱ्यांसह देशाचे नऊ जण हुतात्मा झाले. या वेळी पाकिस्तानवर हल्ला करायचा काय, अशी सरकारचीही भावना होती. जनतेतून इतका मोठा प्रक्षोभ होता, की देशाने तातडीने पाकिस्तानवर हल्ला करून त्यांना धडा शिकवावा, अशी अनेक भारतीयांची इच्छा होती. मात्र तसे घडले नाही. भारताने संयम राखून मोठे युद्ध टाळले.

सुरक्षा आणि हल्ले

आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि देशाच्या पातळीवर २००१ या वर्षात इतक्या धक्कादायक घटना घडल्या, की त्याचा परिणाम पुढची दहा वर्षे राहिला. अमेरिकेने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले. २००१नंतर अमेरिकेमध्ये पुन्हा असा कुठलाही हल्ला घडू शकला नाही इतकी अभेद्य सुरक्षा व्यवस्था अमेरिकेने उभारली. खरे तर देशाच्या दृष्टीने त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे २००० मध्ये देशाचा भूगोल बदलल्याने आणि देशाच्या वाटचालीवर मोठा परिणाम घडविणारा निर्णय झाला होता तो म्हणजे २००० नोव्हेंबरमध्ये तीन राज्यांची निर्मिती झाली. छत्तीसगड, उत्तरांचल आणि झारखंड या तीन राज्यांची निर्मिती करून देशात छोट्या राज्यांच्या दिशेने निर्णय घेतले जायला लागले. २००२ आणि २००१ ही वर्षे जशी वादळी होती, तसेच २००२ हे वर्ष देशाच्या दृष्टीने अत्यंत कलाटणी देणारे ठरले. गोध्रा हत्याकांड गुजरातमध्ये घडले. कारसेवक घेऊन येणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यात आली. धर्मांध प्रवृत्तीने लावलेल्या या आगीत ५७ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेचे गुजरातमध्ये खूप मोठे पडसाद उमटले. संपूर्ण राज्य अस्वस्थ झाले. गोध्रा हत्याकांडाचे परिणाम म्हणून राज्यभर अनेक ठिकाणी दंगली झाल्या. या दंगलीत ७०० लोकांचा मृत्यू झाला, असे सांगितले जाते.

त्यानंतरच्या पुढच्या वर्षात समस्त भारतीयांना एक मानसिक धक्का असा बसला, मूळ भारतीय वंशाची अवकाशयात्री कल्पना चावला हिचा अपघाती मृत्यू झाला. भारतामध्ये तिच्याबद्दल खूप मोठा आदर होता. अनेक विद्यार्थ्यांची ती आयडॉल होती. कल्पना चावलाचा मृत्यू झाला ती विचित्र घटना होती. अमेरिकन अंतराळ यान कोलंबियात उतरत असताना त्याचा स्फोट होऊन कल्पना चावलासह सात यात्री त्यात मृत्यूमुखी पडले. खरे तर अमेरिकेत सर्व पातळीवर काळजी घेतली जाते; पण हे कसे घडले हे अजूनही कोणाला कळलेले नाही.

२००४ मध्ये भारतीय राजकारणात उलथापालथ घडविणारी घटना घडली ती म्हणजे भारतीय जनता पक्षाची सत्ता संपुष्टात आली. १९९९ ते २००४ भारतीय जनता पक्ष सत्तेवर होता. या पक्षाचा पराभव होणार नाही, असे अनेकांना वाटत होते. भारतीय जनता पक्षाची ‘फिल गुड फॅक्टर’ ही प्रचाराची संकल्पना अगदीच मोडीत निघाली. प्रमोद महाजन यांनी या प्रचार मोहिमेची जबाबदारी स्वीकारून पक्षाचा पराभव आमच्या चुकीच्या धोरणामुळे झाला, अशी थेट कबुली दिली. २००४ मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता गेली ती दहा वर्षे या पक्षाला सत्तेपासून दूर राहावे लागले. गोध्रा हत्याकांडात राज्यातील परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप मोदी यांच्यावर अनेक वेळा झाला. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना या घटनेनंतर राज्यात उसळलेल्या दंगलीबद्दल दोषी धरण्यात आले.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला हादरवणारी घटना २५ जानेवारी २००५ या दिवशी घडली. शाकंभरी पौर्णिमेस मांढरदेव (ता. वाई, जि. सातारा) येथे काळूबाईच्या यात्रेत चेंगराचेंगरीत अवघ्या काही वेळातच २९३ भाविकांचा मृत्यू. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेच्या दृश्‍यांनी अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. त्यानंतर सर्वच देवस्थानांची ठिकाणी असलेल्या अरुंद जागा व होणारी गर्दी याबद्दल जागरूकता निर्माण झाली व सरकारनेही काही पावले उचलली. त्यानंतर २००५ मध्ये मुंबईत जो पाऊस झाला त्याने आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांना पहिल्यांदा असुरक्षित वाटले. ढगफुटी झाल्यासारखा पाऊस होऊन ९४.४ सें.मी. इतका उच्चांकी पाऊस झाल्याने या जलप्रलयात सुमारे ९०० माणसे मृत्युमुखी पडली. मुंबईला अशा धक्क्याची विशिष्ट अशा स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तीची कल्पनाही नव्हती. मुंबईतला हा पाऊस इतका प्रलयकारी होता, की त्यानंतरच्या पुढच्या अनेक वर्षांत जेव्हा जेव्हा मोठा पाऊस होईल त्या त्या वेळी मुंबईकरांच्या मनात धडकी भरत असे. सगळ्या घडामोडी घडत असताना राजकीय पातळीवर विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पातळीवर अडवानी यांच्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण झाली. अडवानी यांनी कराचीत कायदे आझम जिना यांच्या कबरीला भेट दिली. त्यांनी जिना यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्याची प्रतिक्रिया भारतात मोठ्या प्रमाणात उमटली. पक्षातून अडवानी यांच्यावर प्रचंड टीका झाली. अडवानी यांना या घटनेमुळे भाजपचे अध्यक्षपद सोडावे लागले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा अस्त होण्यास सुरुवात झाली. याच वर्षात चीन आणि जपानच्या पंतप्रधानांनी भारताला भेट दिली. या भेटीत फारसे काही घडले नाहीतरी या दोन्ही देशांशी संबंध सुधारण्यासाठी या घटना उपयोगी ठरल्या.

अस्वस्थ करणाऱ्या घटना

याच वर्षात ओडिशा हायकोर्टाने अतिरेकी दारासिंग याला फाशीची शिक्षा सुनावली. ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांचे कुटुंबीय यांना जिवंत जाळण्याचे अत्यंत लाजीरवाणे कृत्य त्याने केले होते. देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा विविध घटना घडत असताना भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात दलित समाजातील भोतमांगे कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली. सवर्णांकडून झालेल्या या हत्येने महाराष्ट्रातील समाजजीवन हादरले. मानवतेला कलंक फासणाऱ्या या घटनेने अनेक जण अस्वस्थ झाले. सरकारने या प्रकरणी तातडीने कारवाई केली.

२००८ मध्ये भारताच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आंतराळयान ‘चांदयान-१’चे यशस्वी प्रक्षेपण झाले. अवकाश विज्ञानातील भारताचा हा अत्यंत मानाचा असा टप्पा होता. सगळ्या देशाला विचार करायला लावला यात शंका नाही. पाकिस्तानमधून आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवादी मुंबईवर बेछूट हल्ला केला. ६० तास भारतीय पोलिस, लष्कराच्या काही तुकड्या यांचा या दहशतवाद्यांशी संघर्ष सुरू होता. या चकमकीत नऊ दहशतवादी ठार झाले. मात्र या दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब याला तुकाराम ओंबाळे या पोलिस अधिकाऱ्याने पकडण्यासाठी हौतात्म्य पत्करले. अजमल कसाबला पकडल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला पाकिस्तानची कोंडी करता आली. हा हल्ला पाकिस्तानी अतिरेक्यांनी केला आहे आणि त्या मागे पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. राजनैतिक पातळीवर मिळविलेला हा मोठा विजय आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा धक्कादायक होता. १९९२ मध्ये जे बाँबस्फोट झाले त्यानंतर ही सर्वांत मोठी घटना होती. दशकाच्या शेवटच्या वर्षात महिलांसाठी दोन चांगल्या घटना घडल्या. महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आणि महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना ५० हजार रुपयांची शिक्षा देणारे विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाकडून संमत करण्यात आले. दशकाच्या अखेरीला महिलांना दिलासा देणाऱ्या या दोन घटना घडल्या हे नक्की.

२००० ते २०१० हे दशक त्या अर्थाने वादळी ठरले आणि या दशकामधील ज्या घटना घडल्या त्याचे परिणाम पुढच्या ५० वर्षांवर होतील इतक्या या महत्त्वाच्या घडामोडी होत्या.

घटनाक्रम

  • २२ फेब्रुवारी २००० : फोटो असलेले ओळखपत्र मतदानाच्या वेळी सादर करणे प्रथमच सक्तीचे केले गेले.

  • १ नोव्हेंबर २००० : छत्तीसगड या नव्या सव्विसाव्या राज्याची निर्मिती.

  • ९ नोव्हेंबर २००० : उत्तरांचल या सत्ताविसाव्या राज्याची निर्मिती

  • १५ नोव्हेंबर २००० : झारखंड या अठ्ठाविसाव्या राज्याची निर्मिती

  • २३ डिसेंबर २००० : कलकत्ता शहराचे कोलकाता असे नामकरण

  • २६ मार्च २००१ : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. पी. एन भगवती यांची जागतिक मानवाधिकार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड.

  • १४ जुलै २००१ : वाजपेयी-मुशर्रफ शिखर परिषद. भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल मुशर्रफ यांच्यात १४ ते १६ जुलैदरम्यान आग्रा शिखर परिषद झाली, मात्र त्यात काश्‍मीर प्रश्‍नावर कोणताही तोडगा निघाला नाही. पाकिस्तान दुहेरी नीती वापरून भारतात दहशतवादी हल्ले करीतच राहणार हे स्पष्ट झाले.

  • १३ डिसेंबर २००१ : भारताच्या संसदेवर १३ डिसेंबर रोजी पाच बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. या वेळी अनेक पक्षांचे नेते संसदेत होते, मात्र त्यांपैकी कोणालाही इजा झाली नाही. जैशे मोहम्मदचे हे पाचही दहशतवादी नंतर मारली गेले. या हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू याला २०१३मध्ये फाशी दिली गेली.

  • २७ फेब्रुवारी २००२ : गोध्रा हत्याकांड. सुमारे २ हजार समाजकंटकांनी कारसेवक घेऊन येणाऱ्या साबरमती एक्स्प्रेस रेल्वेला आग लावली. त्यात ५९ जण मारले गेले. यातील बहुतांश प्रवासी अयोध्येतील रामजन्मभूमी येथे कारसेवा करून परतत होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये जातीय दंगलीचा भडका उडाला. या दंगलीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा जबाबदार धरले गेले, मात्र त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत.

  • एप्रिल २००२ : रस्ते क्रांती - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे उद्‍घाटन. भारताने उत्तम दर्जाचे रस्ते बांधण्याचे नियोजन केले व त्याची सुरवात वाजपेयी सरकारने सुवर्ण चतुष्कोण ही योजना १९९९मध्ये जाहीर करीत केली. त्यानंतर २०००मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची घोषणा झाली. यामधील महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे उद्‍घाटन सर्वाधिक महत्त्वाचे ठरले.

  • डिसेंबर २००२ : मेट्रो क्रांती. दिल्ली मेट्रो प्रकल्पाची सुरवात १९९८मध्ये झाली व त्याचे उद्‍घाटन २४ डिसेंबर २००२मध्ये झाले. दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी या प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तर इ. श्रीधरन हे प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक होते. दिल्ली मेट्रोचे अंतर ३११ किलोमीटर असून, त्यात २८५ स्थानकांचा समावेश आहे. सध्या भारतात १८ शहरांमध्ये मेट्रो रेल्वे धावत असून, हा आकडा दरवर्षी वाढतो आहे.

  • १६ जानेवारी २००३ : भारतीय अवकाशयात्री कल्पना चावला अमेरिकन अंतराळ यान कोलंबियात उतरत असताना स्फोट होऊन सात यात्रींसह कल्पना चावलाही मृत्युमुखी पडली.

  • जून २००४ : राजवर्धन सिंह राठोडला अथेन्स ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक. राजवर्धनने डबल ट्रॅप या नेमबाजीच्या प्रकारामध्ये रौप्यपदक मिळवत पदकांचा दुष्काळ संपवला. याआधी राठोड यांनी २००२च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.

  • २६ डिसेंबर २००४ : ही तारीख भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील सर्वांत भीषण मानली जाते. याच दिवशी इंडोनेशियाजवळ भर समुद्रात झालेल्या प्रलयकारी भूकंपामुळे आलेल्या त्सुनामीत, इंडोनेशियासह आसपासच्या देशांमध्ये हाहाःकार उडाला होता. भारताच्या अंदमान निकोबार, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशात हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

  • २५ जानेवारी २००५ : शाकंभरी पौर्णिमेस मांढरदेव (ता. वाई, जि. सातारा) येथे काळूबाईच्या यात्रेत चेंगराचेंगरीत अवघ्या काही वेळातच २९३ भाविकांचा मृत्यू.

  • २६ जुलै २००५ : मुंबईत ९४४ मिलिमीटर इतका उच्चांकी पाऊस. या जलप्रलयात सुमारे ९०० मृत.

  • २९ ऑगस्ट २००५ : वारसाहक्काने प्राप्त झालेल्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क बहाल. हा कायदा ९ सप्टेंबरपासून अमलात.

  • १९ मे २००५ : ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवंत जाळल्याबद्दल आरोपी दारासिंग यास ओडिशा उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

  • ४ जून २००५ : लालकृष्ण अडवानी यांची कराचीत मोहमंद अली जिना यांच्या कबरीला भेट. त्यानंतरच्या त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय गदारोळ झाला.

  • २० सप्टेंबर २००६ : भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावातील भोतमांगे दलित कुटुंबातील ४ जणांची सवर्णांकडून हत्या.

  • एप्रिल २००८ : इंडियन प्रिमिअर लिगची सुरवात. भारत हा कायम क्रिकेटमधील मोठी अर्थसत्ता राहिला आहे. मात्र, टी-२० क्रिकेटच्या उदयानंतर या खेळाचे अधिकाधिक व्यापारीकरण होते गेले. यातूनच २००८मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रिमिअर लिगची (आयपीएल) सुरवात केली. या स्पर्धेमुळे देशातील अनेक तरुण क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी व आर्थिक सुबत्ताही प्राप्त झाली.

  • २२ जुलै २००८ : संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने भारत-अमेरिका अणुकरारास प्रश्‍नावर लोकसभेत विश्‍वासदर्शक प्रस्ताव जिंकली.

  • २२ ऑक्टोबर २००८ : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने विकसित केलेल्या चांद्रयान मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, चांद्रयान - १ हा स्वदेशी बनावटीचा उपग्रह २२ ऑक्टोबर २००८ रोजी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पीएसएलव्ही सी -११) प्रक्षेपित करण्यात आला. या प्रक्षेपणामुळे जागतिक अवकाश क्षेत्रामध्ये भारताचे स्थान उंचावले.भारताचा अवकाश कार्यक्रम अधिक गतिमान करण्यासाठी व भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) बळ देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००३मधील स्वातंत्र्यदिनी चांद्रयान १ मोहिमेची घोषणा केली. या प्रकल्पासाठी इस्रोने ३८६ कोटी रुपये खर्च केले. १२ नोव्हेंबर २००८ या दिवशी चांद्रयानाने चंद्राच्या गुरूत्व कक्षेत प्रवेश केला व यानाचा प्रोब ३१२ दिवस कार्यरत राहिला व त्याने ७० हजार थ्री डी प्रतिमा पृथ्वीवर पाठवल्या. या मोहिमेमुळे चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यास गती मिळाली.

  • २६ नोव्हेंबर २००८ : मुंबईतील ताज व ओबेरॉय हॉटेल, सीएसटी रेल्वे स्टेशनसह अनेक ठिकाणी १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला यात ३००हून अधिक मृत. सुमारे ६० तास भारतीय पोलिस व लष्कराचा दहशतवाद्यांशी संघर्ष, चकमकीत ९ दहशतवादी ठार. अजमल कसाब याला जिवंत पकडले.

  • १९ डिसेंबर २००८ : हरियानाचे पोलिस महासंचालक राठोड यांना अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा.

  • १२ जानेवारी २०१० : हैती (कॅरेबियन बेटे) येथील महाभयंकर अशा ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपात २ लाख मृत व २.५ लाख जखमी, ३ लाख नागरिक बेघर.

  • ९ मार्च २०१० : महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक (१०८वी घटना दुरुस्ती) राज्यसभेत मंजूर.

  • २० जुलै २०१० : माहितीच्या अधिकारातील गुजरातेतील बेकायदेशीर खाणीच्या उत्खननाची माहिती मिळवणाऱ्या अमित जेठवा यांची गोळ्या घालून हत्या.

  • ४ नोव्हेंबर २०१० : महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ करणाऱ्यास संरक्षण देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यास ५० हजार रुपये दंडाची शिक्षा देणारे विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाकडून संमत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.