देशात स्वातंत्र्यलढा ऐन रंगात असताना इंग्रजांच्या पारतंत्र्याला न जुमानता देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी स्थापन झाली. ज्यांनी हे स्वप्न पाहिले, ते उद्योजक होते जेआरडी टाटा.
- विनीत वर्तक sakal.avtaran@gmail.com
देशात स्वातंत्र्यलढा ऐन रंगात असताना इंग्रजांच्या पारतंत्र्याला न जुमानता देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी स्थापन झाली. ज्यांनी हे स्वप्न पाहिले, ते उद्योजक होते जेआरडी टाटा. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी जेआरडी यांनी टाटा एअरलाईन्सची स्थापना केली. देशात हवाई वाहतुकीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. कालांतराने सरकारच्या अखत्यारीत गेल्यानंतर एअर इंडिया म्हणून या कंपनीला अनेक संकटांचा सामना करावा लागला; मात्र पुन्हा एअर इंडिया टाटाकडे आल्याने मोडल्या गेलेल्या स्वप्नांना पुन्हा पंख देण्यात आले, हे मात्र निश्चित!
जेव्हा भारतात ९० वर्षांपूर्वी स्वातंत्र्याचे वारे वाहत होते, तेव्हा भारताच्या उद्योजक जगतात एक नाव असं होतं, ज्यांनी इंग्रजांच्या पारतंत्र्याला न जुमानता भारताला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं स्वप्न बघितलं. ते उद्योजक होते, जेआरडी टाटा. १५ ऑक्टोबर १९३२ चा दिवस होता, जेव्हा जेआरडी यांनी भारतात टाटा एअरलाईन्सची स्थापना केली. जेआरडी टाटा पहिले भारतीय होते, ज्यांना व्यावसायिक उड्डाण करण्याचा परवाना मिळाला होता. टाटांनी स्वतः हवाई मार्गाने पत्र घेऊन कराची ते मुंबई आणि तिकडून चेन्नई असे पहिले उड्डाण केले. तिथूनच भारताच्या हवाई क्षेत्राचा श्रीगणेशा झाला. आधी टाटांची एअरलाईन्स ही हवाई मार्गाने पत्रांची ने-आण करण्यापुरती मर्यादित होती. आपल्या सहाआसनी असलेल्या विमानातून टाटा एअरलाईन्सने मुंबई ते त्रिवेंद्रम असा प्रवास करून व्यावसायिक हवाई प्रवासाला सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांच्या रॉयल एअर फोर्सला युद्धातही टाटा एअरलाईन्सने अनेक प्रकारे मदत केली.
पुढे २९ जुलै १९४६ रोजी टाटा एअरलाईन्सचे पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतर झाले आणि टाटा एअरलाईन्स आता एअर इंडिया म्हणून ओळखली जाऊ लागली. स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये भारत सरकारने एअर इंडियामधील ४९ टक्के हिस्सा विकत घेतला. पुढे १९५३ मध्ये भारत सरकारने एअर इंडियाचा १०० टक्के हिस्सा जेआरडी टाटांकडून विकत घेतला आणि एअर इंडिया भारत सरकारचा भाग झाली. १९७७ पर्यंत जेआरडी जरी त्याचे चेअरमन राहिले, तरी जेआरडींच्या स्वप्नांना भारत सरकारने आपल्याकडे घेऊन एक प्रकारे कात्री लावली होती. भारत सरकारच्या अधिपत्याखाली आल्यानंतर आकाशावर विजय मिळवण्याच्या समृद्ध इतिहासासह, एअर इंडियाचे विमान वाहतूक विश्वात नेहमीच एक प्रतिष्ठित नाव राहिले आहे. एअर इंडियाने युरोप, अमेरिका, मध्य-पूर्व आणि आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया आदी ठिकाणी नेटवर्क तयार करून आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढवली आहेत. एअर इंडिया नेहमीच गरजेच्या वेळी देश आणि तेथील लोकांच्या पाठीशी उभी राहिली आहे. आखाती युद्ध, साथीचा रोग आणि रशिया-युक्रेन युद्ध, आदी संकटांच्या वेळी एअर इंडियाने अनेक बचाव आणि निर्वासन मोहिमेवर काम केले आणि देशातील लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी ती महत्त्वपूर्ण ठरली आहे.
सरकारच्या अखत्यारीतील विमान वाहतूक कंपनी म्हणून सरकारी भ्रष्टाचार आणि निर्णय घेण्यात दिरंगाई आणि इतर गोष्टींचा फटका एअर इंडियाला बसला नसेल, तर नवलच. १९९४-९५ च्या काळात भारताने देशातील हवाई क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केल्यानंतर देशात अनेक खासगी एअरलाईन्स कंपन्या दाखल झाल्या. त्यांच्या स्पर्धेत एअर इंडिया मात्र मागे पडत गेली. तिकिटाचे दर, सेवा आणि इतर गोष्टींमुळे एअर इंडिया तोट्यात जाण्यास सुरुवात झाली. सरकारसाठी एअर इंडिया ही पांढरा हत्ती बनली होती. एअर इंडियाला वाचवायचे असेल, तर सरकारने त्यातून बाहेर पडण्याची गरज होती.
अखेर २८ जून २०१७ रोजी एअर इंडिया खासगी करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१८ मध्ये सरकारने एअर इंडियातील ७६ टक्के हिस्सा विकण्यासाठी प्रयत्न सुरू केले; पण डबघाईला आलेल्या एअर इंडियात कोणताही उद्योजक पैसे लावायला तयार नव्हता. सप्टेंबर २०२१ मध्ये एअर इंडिया विकण्याच्या निविदा काढल्या. स्पाईस जेट आणि टाटा सन्स यांनी त्यासाठी बोली लावली. ८ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ हजार कोटी रुपयांच्या मोबदल्यात टाटांनी एअर इंडिया विकत घेण्याची बोली जिंकल्याचे सरकारने जाहीर केले. ६८ वर्षांनंतर, २७ जानेवारी २०२२ रोजी एअर इंडियाचे सरकारच्या मालकीतून टाटा कंपनीमध्ये परत स्वागत करण्यात आले. एक संपूर्ण वर्तुळ पूर्ण करून एअर इंडिया तिच्या मूळ मालकाकडे परत आली आहे.
एअर इंडियाचा टाटांकडून टाटांकडे झालेला हा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. भारतात हवाई क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणारी एअर इंडिया आज आपल्या अस्तित्वासाठी धडपड करत आहे. खासगी स्पर्धेला तोंड देत भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या हवाई क्षेत्राकरिता एक चांगला पर्याय देण्याचे शिवधनुष्य टाटांच्या एअर इंडियाला पेलायचे आहे. टाटांचा इतिहास बघता हे शिवधनुष्य नक्की पेलतील, असा विश्वास आहे. एअर इंडिया ही टाटांसाठी केवळ बिझनेस डील नव्हती, तर आपल्याकडून तोडल्या गेलेल्या स्वप्नांना पुन्हा पंख देण्याचा करार होता. त्यामुळेच टाटांचा एअर इंडियाला लाभलेला तो स्पर्श नक्कीच एका नव्या युगाची सुरुवात आहे, असे मला मनापासून वाटते.
(लेखक मेकॅनिकल इंजिनियर असून, ऑईल अॅण्ड गॅस क्षेत्रातील एका मल्टिनॅशनल कंपनीत कार्यरत आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.