इस्राईल युद्ध सामान्य पॅलेस्टाईन नागरिकांसाठी एक मोठे संकट घेऊन आले आहे. सध्या पॅरिस, लंडन, बर्लिन ते रोमपासून सर्वत्र निदर्शने सुरू आहेत. जागतिक अर्थकारणाचे एक प्रमुख केंद्र असलेले मुंबई शहरदेखील याला अपवाद नाही. येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अनेक संघटना एकत्र आल्या आहेत.
ज्युईश धर्मीय आपल्या परीने इस्राईलची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईच्या रस्त्यावर हा संघर्ष दिसत नसला, तरी दोन भिन्न विचारांची ही लढाई शांतपणे सुरू आहे.
इस्राईल-हमासमधील संघर्षाला तोंड फुटल्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी या युद्धाविरोधात बैठका, चर्चासत्राच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. हे उघडपणे दिसत नाही कारण इस्राईलविरोधी किंवा समर्थनार्थ आंदोलन किंवा सार्वजनिक सभा घेण्यावर मुंबई पोलिसांनी बंदी घातली.
त्यामुळे मुंबईतील मुस्लिम, डाव्या, ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी संघटना सभागृह सभा व मोहल्ला बैठकांच्या माध्यमातून पॅलेस्टाईन युद्धविरोधी जनमत तयार करण्याचे काम करत आहेत. ऑल इंडिया पीस अँड सॉलिडारिटी ऑर्गनायजेशन तसेच पॅलेस्टाईन-इंडिया सॉलिडारिटी संघटना यामध्ये आघाडीवर आहे.
मानवतेसाठी लढा...
इस्राईलच्या हल्ल्यात गाझा पट्टीतील निष्पाप मुलांचा, महिलांचा बळी जात आहे. हा विषय युद्धाचा नसून मानवतेचा आहे. हा विषय जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न ऑल इंडिया पीस अँड सॉलिडारिटी या संघटनेकडून होत आहे. या अंतर्गत मुंबई मराठी पत्रकार संघ आणि शिवाजी मंदिर इथे दोन सार्वजनिक सभा झाल्या. या सभांना बऱ्यापैकी लोक उपस्थित होते.
याव्यतिरिक्त मुंबईत अनेक भागांत हे युद्ध किती घातक ठरतेय, याबद्दल जनजागृती सुरू असल्याची माहिती डॉ. विवेक माँटेरो यांनी सांगितली. गेल्या अनेक वर्षांपासून कामगार चळवळीत काम करणारे माँटेरो या संघटनेशी जुळले आहेत. ही संघटना ५० वर्षे जुनी असून जागतिक शांततेची आणि युद्धविरोधी ठाम भूमिका या संघटनेची राहिली आहे. आम्ही हमासचे समर्थन करतो असा आरोप उजव्या, हिंदुत्ववादी संघटना आमच्यावर लावतात.
मात्र सभेच्या सुरुवातीला हमासच्या दहशतवादी हल्लाच्या निषेध आम्ही करतो. सध्या गाझा पट्टीत जे काही सुरू आहे ते युद्धगुन्हे या सदरात मोडते. माणुसकीच्या नात्याने इस्राईलच्या या दादागिरीचा विरोध करणे गरजेचे वाटते.
सभा आणि बैठकांच्या माध्यमातून आम्ही पॅलेस्टाईनबद्दलची भारताची भूमिका जनतेला समजावून सांगतो, असे विवेक माँटेरो सांगतात. या संघटनेसोबत डाव्या चळवळीतील मिलिंद रानडे, प्रकाश रेड्डी, अजित पाटील जुळले आहेत. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी दोन्ही सभेला आवर्जून उपस्थित होते.
जनजागृती गरजेची...
पॅलेस्टाईन जनतेच्या हक्कासाठी इंडिया पॅलेस्टाईन सॉलिडारिटी फोरम ही दुसरी संघटना मुंबईत काम करते. गेल्या २० वर्षांपासून हा फोरम कार्यरत आहे. गांधीवादी आणि समाजवादी डॉ. सुरेश खैरनार हे अध्यक्ष आहेत; तर सामाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय विषयाचे जाणकार फिरोज मिठीबोरवाला या फोरमचे सरचिटणीस आहेत.
२०१०-११ मध्ये पॅलेस्टाईनला समर्थन देण्यासाठी या फोरमने गाझापर्यंत यात्रा काढली होती. ग्लोबल मार्च टू जेरुसलेममध्येही फोरम सहभागी झाले होते.
दोन दशकांपासून चर्चासत्र, निदर्शने आणि डाक्युमेंट्रीच्या माध्यमातून पॅलेस्टाईनची समस्या मांडण्याचे काम हे फोरम करते. ताज्या इस्राईल युद्धानंतर ऑनलाईन सेमिनार, बैठका सुरू आहेत. मिठीबोरवाला स्वतः चेन्नई, बनारसमध्ये या युद्धविरोधी बाजू मांडण्यासाठी जाऊन आले आहेत. इस्राईलच्या हल्ल्यात शेकडो निष्पापांचा बळी चालला आहे. त्यामुळे जगभरातील जनमत आता इस्राईलच्या विरुद्ध गेले आहे.
मुंबईतील अनेक शांतताप्रेमी व्यक्ती आणि पुरोगामी संघटना आमच्याशी जुळत आहेत, असे मिठीबोरवाला यांनी सांगितले. मात्र निदर्शने करण्यावर मुंबई पोलिसांनी घातलेल्या बंदीवर त्यांचा आक्षेप आहे. मुबई सोडून देशात आंदोलनावर बंदी नाही.
इस्राईलविरोधात निदर्शने करणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहे. हे गंभीर असल्याचे मिठीबोरवाला यांचे म्हणणे आहे. खुद्द इस्राईलमध्ये युद्धविरोधातील आंदोलनाला मनाई केली जात नाही. लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार संविधानाने दिला आहे. दिवाळीनंतर आम्ही या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्युईश समाज अस्वस्थ
मुंबईत ज्युईश धर्माची लोकसंख्या कधी काळी ५० हजार एवढी होती; मात्र आता समाजाची संख्या साडेतीन हजारावर आली आहे. त्यातही बहुतांश संख्या मराठी ज्यूंची आहे. हा शांतताप्रेमी समाज असून कित्येक पिढ्यांपासून मराठी मातीशी एकरूप झाला आहे. कित्येक वर्षापासून मराठी ज्यू हिंदू, मुस्लिम या दोन्ही समाजासोबत गुण्यागोविंदाने राहतो आहे.
मात्र यावेळच्या हमासच्या हल्ल्यानंतर मराठी ज्युईश धर्मीय अस्वस्थ आहे. १९७३ मध्ये इस्राईल-अरब युद्धादरम्यान डोंगरीतील मदनपुरा परिसरातल्या ज्युईश प्रार्थनास्थळाबाहेर ज्यूंना टार्गेट करणारे पोस्टर लावले होते. त्या वेळी हा विषय बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी ज्यूंना कुणी टार्गेट केले, तर मला मैदानात उतरावे लागेल, असा सज्जड इशारा दिला. ठाकरी इशाऱ्यानंतर हा वाद संपला होता.
१९९२ च्या दंगलीदरम्यान पहिल्यांदा भायखळा भागातील रोडेफ शॉलेम या ज्युईश सिनेगॉगची जाळपोळ करण्यात आली होती. मुंबईत पहिल्यांदा हा प्रकार झाला होता. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात नरिमन हाऊसला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. हे मोजके अपवाद वगळता, मुंबईत ज्युईश समाज कायम सुरक्षित राहिला आहे.
भारतीय ज्युईश संघटनेचे सचिव डेविड तळेगावकर हे सांगतात की आमची बहुतांश प्रार्थनास्थळे मुस्लिम भागात आहेत. आमची वस्तीही डोंगरी, मदनपुरा, भायखळा या भागात जास्त आहे. मात्र आजपर्यंत आम्हाला कधीच त्रास झाला नाही. युद्ध कुणालाच आवडत नाही. मात्र हमासने ज्या प्रकारे १२०० इस्राईली नागरिकांची क्रूर कत्तल केली, त्यात लहान मुले व महिलांना सोडले नाही. मुळात हे युद्ध ‘हमास’मुळे सुरू झाले आहे. हे सत्य लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे तळेगावकर यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे उदारमतवादी ज्युईश समाजाच्या सदस्य नॉर्मा इलायज यांचे याबद्दल वेगळे मत आहे. त्यांच्या मते इस्राईल-पॅलेस्टाईनमधील युद्ध हा राजकारणाचा एक भाग आहे. या राजकारणाशी, नेतान्याहू यांच्या धोरणाशी आमचा काहीएक संबंध नाही.
आम्हाला व्यक्त होऊ द्या...
इस्राईल युद्ध सुरू झाल्यावर रझा अकादमीसह अन्य मुस्लिम धार्मिक आणि सामाजिक संस्थांनी मुंबईतील मशिदीत दर शुक्रवारी पॅलेस्टाईन नागरिकांसाठी सार्वजनिक दुवा पढणे सुरू केले आहे. मुंबई पोलिसांच्या मनाई आदेशामुळे सर्व थांबले आहे. नाही तर आतापर्यंत मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर पॅलेस्टाइन समर्थनार्थ कित्येक जुलूस, रॅली निघाल्या असत्या, असे रझा अकादमीचे अध्यक्ष मोहम्मद सईद नुरी यांनी सांगितले.
निदर्शने काढण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी द्यायला हवी होती. कमीत कमी आंदोलनामुळे लोकांचा मनातील राग कमी झाला असता. मात्र या भावना त्यांच्या मनात साचल्या आहेत. इस्राईलच्या हल्ल्यातून रुग्णालये, शाळा, शरणार्थी शिबिर सुटली नाही. हा नरसंहार म्हणजे जिनोसाईड सुरू आहे. ‘हमास’च्या दहशतवादी कृत्याचा आम्ही निषेध करतो.
मात्र हमासच्या हल्ल्याच्या कारणावरून संपूर्ण गाझा पट्टीला नेस्तनाबूत करण्याचा अधिकार इस्राईलला कुणी दिला, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून अनेक संघटना आमच्याकडे येत असल्याचे मोहम्मद नुरी यांनी सांगितले. मुंबईतील शांततेचे वातावरण बिघडवण्याचा हेतू कुणाचाही नाही. मुंबईतील ज्यू समाज अत्यंत शांतताप्रिय आहे.
मुस्लिम भागातच त्यांची प्रार्थनास्थळे आहेत. त्यांना घाबरण्याची काहीएक गरज नाही. आजपर्यंत आम्ही एकोप्याने राहतो आहे. मुस्लिमांच्या मनात त्यांच्याबद्दल कसलाच द्वेष नाही, असे मोहम्मद नुरी यांनी आवर्जुन सांगितले.
रझा अकादमीसोबत ऑल इंडिया सुन्नी जमाते उलेमा ही प्रमुख संस्था पॅलेस्टाईन युद्धविरोधी जनजागृती करण्याचे काम करण्यात आघाडीवर आहे. जगातील मुस्लिम राष्ट्रांनी गाझा युद्ध थांबवण्यासाठी इस्राईलवर दबाव टाकायला पाहिजे. त्यासाठी इस्राईलचा आर्थिक, राजकीय आणि सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे, असे या संघटनेचे मत आहे.
त्यासाठी मुंबईतील सौदी अरेबिया, तुर्की, यूएई, बहरिनसह सर्व मुस्लिम देशाच्या वाणिज्य दूतावासप्रमुखांशी संपर्क साधून, त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अनेकदा या कौन्सिलेट भेटीसाठी वेळ देत नसल्याची तक्रार मोहम्मद नुरी यांची आहे.
गुरुवारी विनंती करूनही तुर्कीच्या कौन्सुलेट जनरलने भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे ईमेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून या देशांना निवेदन धाडण्याची स्ट्रॅटेजी आता या संघटनांनी आखली आहे. या मोहिमेतून मुस्लिम देशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हमासच्या उदात्तीकरणाला विरोध
दुसरीकडे मुंबईतील उजव्या संघटना या सार्वजनिक बैठका, चर्चासत्रात हमासचे समर्थन होतेय का, याकडे लक्ष्य ठेवून आहे. आयआयटीमध्ये नुकत्याच झालेल्या एका परिसंवादात हमासच्या दहशतवाद्यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप विवेक विचार मंचाने केला. या संदर्भात आयआयटी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलनही केले. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी विचार मंचाने केली.
भारताची भूमिका पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याच्या बाजूने आहे. मग विरोध का या प्रश्नावर विवेक विचार मंचाचे कोकण विभाग समन्वक असलेले अशोक तिडके यांनी सांगितले की, भारत सरकारची जी भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे.
मात्र आयआयटीसारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये या युद्धाच्या निमित्ताने दहशतवादी गटाचे समर्थन करू नये. शेवटी दहशतवादी दहशतवादीच आहेत. त्यांचे समर्थन करणे हे राष्ट्रविरोधी आहे, असे तिडके यांचे म्हणणे आहे. मुंबईत निदर्शने करायला घातलेल्या बंदीचे कारण पोलिस प्रशासन सांगू शकेल, असे ते म्हणाले.
राइट टू प्रोटेस्टचे काय?
मुंबईतील काही पोलिस अधिकाऱ्यांची बंदीबद्दल वेगळी भूमिका आहे. मुंबई हे एक जागतिक शहर आहे. जगातील अनेक देशाचे वाणिज्यिक दूतावास मुंबईत आहे. जगाच्या पाठीवर घडणाऱ्या सर्व घटनांचे पडसाद मुंबई शहरावर उमटतात. यापूर्वी असंख्य तणावाचे मोर्चे मुंबई पोलिसांनी हाताळले आहेत. इस्राईलच्या युद्धाचा जगभरात विरोध होत आहे.
अशा वेळी मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी देण्यास काही हरकत नव्हती, असे निवृत्त एसीपी धनराज वंजारी यांचे म्हणणे आहे. यापूर्वी लेखक सलमान रश्दी यांच्या ‘सॅटनिक वर्सेस’ या पुस्तकावरून मुबईत मोठा मोर्चा निघाला होता. हिंसाचाराची दाट शक्यता होती; मात्र तरीही पूर्ण तयारी करून मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली होती. याची आठवण वंजारी यांनी करून दिली.
मोर्चाला परवानगी देण्यातून एकप्रकारे पोलिसांची तयारी आणि अभ्यासही होत असतो. संघटनेत कोण सक्रिय आहे, त्याचे काम कसे चालते, कोण आक्रमक आहे, याची इत्यंभूत माहिती पोलिसांना मिळते. अनेकदा एखाद्या घटनेने लोकांचा राग, भावना अनावर होतात. या भावना व्यक्त झाल्यावर लोक शांत होतात. या मोर्चांना परवानगी दिल्यास तणाव वाढू शकतो, असे गुप्तचर यंत्रणेचे इनपूट्स आहेत का? असेल तर पोलिसांनी ते स्पष्ट करायला हवेत, असेही वंजारी यांचे म्हणणे आहे.
या सर्व गदारोळात मुंबईची शांतता बिघडू नये, ही भूमिका सर्वांचीच असायला पाहिजे, असे सामान्य मुंबईकरांना वाटते. यापूर्वी मुंबईने धार्मिक दुफळीच्या असंख्य जखमा झेलल्या आहे; मात्र यासोबत मानवतावादी भूमिका घेण्यात कायम पुढे असणारी मुंबई या फ्रंटवर मागे राहता कामा नये, असेही अनेकांना वाटते.
vinod.raut@esakal.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.