पाकिस्तानच्या राजकारणातील अपयशी कर्णधार!

इम्रान खान हे एक लोकप्रिय नेत्याप्रमाणे सत्तेवर आले. उत्तरदायित्व आणि न्याय या त्यांच्या लोकप्रिय घोषणा होत्या. इम्रान यांच्यामुळे पाकिस्तानात एक सकारात्मक बदल येईल, असा आशावाद त्यांनी लोकांमध्ये जागवला.
Imran Khan
Imran KhanSakal
Updated on
Summary

इम्रान खान हे एक लोकप्रिय नेत्याप्रमाणे सत्तेवर आले. उत्तरदायित्व आणि न्याय या त्यांच्या लोकप्रिय घोषणा होत्या. इम्रान यांच्यामुळे पाकिस्तानात एक सकारात्मक बदल येईल, असा आशावाद त्यांनी लोकांमध्ये जागवला.

पाकिस्तानला पहिला क्रिकेट विश्वकरंडक जिंकून देणारा कर्णधार ते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या राजकीय संकटात सापडले आहेत. लष्कराची चांगली साथ आणि समोर कमकुवत विरोधक असतानाही इम्रान खान राजकीय पीचवर जम बसवू शकले नाहीत. सोबतचे मित्रपक्ष फुटल्याने त्यांचे पंतप्रधानपद संकटात आले आहे. इम्रान यांचे नेमके काय चुकले, सरकारची धोरणे फसलीत का, यांसह अनेक मुद्द्यांवर पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार हमजा आमीर यांनी प्रकाश टाकला...

इम्रान खान हे एक लोकप्रिय नेत्याप्रमाणे सत्तेवर आले. उत्तरदायित्व आणि न्याय या त्यांच्या लोकप्रिय घोषणा होत्या. इम्रान यांच्यामुळे पाकिस्तानात एक सकारात्मक बदल येईल, असा आशावाद त्यांनी लोकांमध्ये जागवला. ते सत्तेत येण्यात लष्कराची मोठी भूमिका होती; मात्र सत्तेवर आल्यावर इम्रान यांनी सर्वांना सोबत घेऊन चालण्यास नकार दिला. उलट त्यांनी विरोधकांना कायम कमी लेखलं. त्यांना चोर, भ्रष्टाचारी म्हणून हिणवलं. संसदीय कामकाजात अनेकदा त्यांनी विरोधकांशी साधा संवादही साधला नाही. मुळात इम्रान यांच्या सरकारपुढे विरोधकांचं फारसं आव्हान नव्हतं. जमेची बाजू म्हणजे लष्कर त्यांच्या बाजूने उभे होते, शिवाय छोट्या-मोठ्या पक्षांची मोटही त्यांनी चांगली बांधली; मात्र या सकारात्मक परिस्थितीचा ते फायदा उचलू शकले नाहीत. इम्रान खान सध्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाबद्दल बोलत आहेत; मात्र जगात एकाही देशाचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र नाही. त्यात पाकिस्तानचे असूच शकत नाही. कारण पाकिस्तान हा धार्मिक देश आहे. या भागात कुणाला काहीही करायचे असेल, तर पाकिस्तानची मदत घेतल्याशिवाय पर्याय नसतो; मात्र या परिस्थितीत इतर देशांना अंगावर घेण्यात काहीच अर्थ नाही. कारण पाकिस्तान हा आर्थिक मदतीसाठी, सुरक्षेसाठी अनेक राष्ट्रांवर अवलंबून आहे. स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची कल्पना तशी वास्तववादी नाही; पण इम्रान परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यावर अडून बसलेत. सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानचे दिवस बदलतील, असे ते वारंवार सांगत आले; पण ते कसे बदलतील, याचे उत्तर त्यांच्याकडे कधीच नव्हते. त्यांच्या सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांचे जीवन सोपे नाही, तर अधिक खडतर केले. त्यांनी जनतेत बदलाची आशा जागवली, मात्र ती पूर्ण करू शकले नाहीत.

घोषणा उंदड; अंमलबजावणी शून्य

इम्रान खान यांनी निवडणूक प्रचारादरम्यान देशात बदल घडवण्याची घोषणा केली. इतर नेत्यांनी पाकिस्तानची लूट करून आपले खिसे भरले; परंतु मी त्यांच्यापेक्षा वेगळे काम करून दाखवतो, असा इम्रान यांचा दावा होता. परदेशातून काळा पैसा मायदेशी आणेन, असे आश्वासनही खान यांनी जनतेला दिले; मात्र प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर त्यांना खऱ्या परिस्थितीची जाणीव झाली आणि त्यांची विधाने वेगाने बदलायला लागली. पाकिस्तानची अर्थव्यवस्था नाजूक आहे, हे त्यांना कळाले; तरीदेखील त्यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर तर आली नाहीच, उलट ती अधिकच रसातळाला गेली. भ्रष्टाचार कमी करण्याचे आश्वासनही ते पाळू शकले नाहीत. उलट अनेक भ्रष्टाचारी नेत्यांची मनधरणी करून त्यांना सरकार बनवावे लागले. त्यामुळे त्यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला लगाम काही घालता आला नाही.

खुर्ची वाचवण्यातच शक्ती पणाला

देश वाचवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेल्या इम्रान खान यांची सर्व शक्ती स्‍वतःची खुर्ची वाचवण्यात गेली. मोहम्मद अली जिना यांच्यानंतर दुसरा नेता मीच, अशी प्रतिमा बनवण्याचा इम्रान यांचा मानस होता; मात्र त्यांच्या स्वकेंद्रित धोरणामुळे त्यांच्या आजूबाजूच्या नेत्यांना त्यांचे राजकीय भविष्य अंधूक दिसायला लागले होते. इम्रान यांचा चेहरा बघून पाकिस्तानच्या जनतेने त्यांना मते दिली; मात्र दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी धोरणे आखावी लागतात, त्याची नीट अंमलबजावणी करावी लागतात. या सर्व गोष्टींमध्ये इम्रान खान सपशेल अपयशी ठरले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पाश्चिमात्य देशात पाकिस्तानची प्रतिमा उजळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती; मात्र इम्रान यांनी ही प्रतिमा उजळ करण्याऐवजी अधिकच वाईट केली, असे म्हणावे लागेल.

अहंकारी सरकार

इम्रान खान यांचे सरकार अत्यंत अंहकारी आहे, यात तीळमात्र शंका नाही. त्यांचा स्वभावही अहंकारी असल्याचे त्यांच्या प्रत्येक शब्दातून स्पष्ट होते. ते म्हणतील तेच बरोबर, जो विरोध करेल तो चोर, त्यांच्यासोबत आहे तो एकदम पवित्र, विरोधक तो भ्रष्टाचारी, अशीच त्यांची भूमिका तयार झाली आहे. त्यांनी राजकारणात विरोधकांना तर सोडाच, पण स्वपक्षीय नेत्यांनाही काम करण्यास फार संधी दिली नाही.

लष्कराच्या अपेक्षा पायदळी

इम्रान खान हे लष्कराचे खूप आवडते होते, म्हणून त्यांना सत्तेवर आणले, असे चित्र कधीच नव्हते. त्यांची लोकप्रियता, जनतेचा पाठिंबा आणि त्यांची सेलिब्रिटीप्रमाणे असलेली प्रतिमा या बाबींमुळे लष्कराने त्यांना सत्तेवर आणले. पाश्चिमात्य देशांमध्ये पाकिस्तान ही दहशतवाद्यांचा कारखाना, अशीच ओळख आहे. ही ओळख इम्रान खान आपल्या सेलिब्रिटी प्रतिमेच्या जोरावर बदलवून टाकतील, अशी आशा लष्कराला होती. पंतप्रधान म्हणून ते चांगले काम करतील, अशी अपेक्षा त्यांना अजिबात नव्हती; मात्र एकही अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकली नाही. कोणत्याही आश्वासनाची ते पूर्तता करू शकले नाहीत. आश्वासनांप्रमाणे ते काळा पैसा पाकिस्तानात परत आणू शकले नाहीत. इम्रान खान हे प्रत्यक्षात कमजोर पंतप्रधान होते; मात्र ते स्वतःला शक्तिशाली समजत होते. लष्कराच्या अपेक्षा पूर्ण न केल्यास बिनकामाच्या लोकांना लष्कर बाजूला सारते, हा आतापर्यंतचा पाकिस्तानचा इतिहास आहे. नेमके तेच आज इम्रान यांच्या बाबतीत झाले आहे. विशेष म्हणजे इम्रान खान सेलिब्रिटी आहेत; मात्र ते व्यावसायिक राजकारणी नाहीत, हे त्यांनी चांगल्या प्रकारे सिद्ध केले. पाकिस्तानच्या इतिहासात अनेकदा मार्शल लॉ लावण्यात आला. पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराची भूमिका फार महत्त्वाची असते. लष्कराने अजूनही आपली उपयुक्तता टिकवून ठेवली आहे; मात्र इम्रान खान हे समजू शकले नाही. आपला देश विकसनशील राष्ट्र आहे. त्याला जगाच्या मदतीची गरज भासणार आहे, हे साधे गणितही त्यांना कळाले नाही.

सत्तेचे राजकारण समजले नाही

राजकारणात सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते; मात्र इम्रान खान यांचे राजकारण ‘सबका साथ, सबका विकास’ असे कधीच नव्हते. ते स्वतःला चांगले राजकारणी सिद्ध करू शकले नाहीत. इम्रान स्वतःला हिरो समजतात, ते खऱ्या अर्थाने हिरो आहेत; परंतु सेलिब्रिटी आणि सत्ताकारणात खूप फरक असतो, हे साधे तत्त्व त्यांना समजले नाही. सत्तेचे राजकारण करत असताना मतदारसंघ, मतपेढी सांभाळावी लागले. राजकारण हे ‘टीम वर्क’चे काम आहे, एकट्याचे नव्हे, ही साधी गोष्ट त्यांना कळलेली दिसत नाही. इम्रान यांच्या पक्षाने १५५ जागा स्वतःच्या एकट्याच्या भरवश्यावर निवडून आणल्या नव्हत्या. निवडून आलेल्यांचे राजकारण सांभाळणे गरजेचे होते; मात्र त्यांचे राजकारण शाबूत ठेवण्यात इम्रान खान अपयशी ठरले. ग्रामीण भागात नगरपालिका, पोलिस ठाणे तसेच कचेरीत अडलेलं काम करून देणारा माणूस लोकांसाठी फार महत्त्वाचा असतो, याची समज त्यांना शेवटपर्यंत आली नाही. त्यामुळे त्यांना आपली माणसे, मित्रपक्ष टिकवता आले नाहीत. परिणामी हे सर्व जण त्यांच्यापासून दूर गेले.

परकीय कटकारस्थानाचा दावा अंगलट?

आपले सरकार पाडण्यात परकीय कटकारस्थान असल्याचा इम्रान खान यांचा दावा होता. तो त्यांना वाचवू शकणार नाही. या दाव्यावर ज्या प्रकारे त्यांनी आपली शक्ती खर्ची केली, ते बघता त्यांची खुर्ची वाचण्याची थोडी-फार शक्यता होती, तीही त्यांनी स्वतःच्या हाताने घालवली. उद्या विरोधक सत्तेवर आल्यास त्यांनी चौकशी सुरू केल्यास इम्रान खान यांच्यापुढील संकट अधिकच गडद होणार आहे. परदेशी कटकारस्थानाच्या थेअरीला इम्रान खान आपले ट्रम्प कार्ड समजतात; मात्र ते इम्रान यांना अविश्वास प्रस्तावापासून वाचवू शकले नाही. परदेशी कटकारस्थान हा असा एक दावा आहे, जे सिद्ध करणे इम्रान यांच्यासाठी फार कठीण आहे. त्यामुळे इम्रान खान यांचा हा स्टंट त्यांच्याच अंगलट येण्याची दाट शक्यता आहे.

निरोपाचे भाषण

इम्रान यांचे गुरुवारी झालेले भाषण हे निरोपाच्या भाषणासारखे वाटत होते. त्यांनी सरकारने केलेली चांगली कामगिरी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांची भाषा ही निवडणूक प्रचारासारखी भासत होती. २७ मार्चला त्यांनी केलेल्या जाहीर सभेतील भाषणाप्रमाणे त्यांचे भाषण होते. नेहमीप्रमाणे त्यांनी थेट पाकिस्तानच्या जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि विरोधकांना लक्ष्य केले. स्पष्ट शब्दात सांगायचे झाल्यास इम्रान खान यांचे हे निरोपाचे भाषण होते.

विरोधी पक्षांपुढेही असंख्य आव्हाने

विरोधी पक्ष सत्तेवर आल्यावरही त्यांच्यापुढे देशाची आर्थिक घडी नीट बसविण्याचे आव्हान असणार आहे. आर्थिकदृष्ट्या पाकिस्तानची झालेली अधोगती त्यांना थोपवावी लागणार आहे. कर्ज घेण्यासाठी पुन्हा जागतिक बँकेकडे जावे लागेल, ते एवढे सोपे नाही. सत्तांतरानंतर इम्रान खान म्हणतील, ‘तुम्ही मला सत्तेवरून हटवले, आता हे करून दाखवा.’ त्यामुळे नव्या सरकारपुढे आव्हानांची जंत्री आहे. सरकार बदलले, तरी आर्थिक प्रश्न तसेच आहेत. महत्त्वाचे म्हणजे विरोधकांकडे विकासाचा आराखडा नाही. कारण त्यांचा आतापर्यंतचा एकमेव अजेंडा होता, तो म्हणजे इम्रान खान यांना सत्तेबाहेर करणे.

बिलावल भुट्टो ठरणार मध्यवर्ती चेहरा

पाकिस्तानच्या सत्ताबदलात बिलावल भुट्टो यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. बिलावल यांना त्यांच्या उर्दूच्या उच्चारावरून, बोलण्यावरून, घराणेशाहीवरून कायम टार्गेट केले जात होते; मात्र सध्या पाकिस्तानी पीपल्स पार्टीचे ते मध्यवर्ती नेते म्हणून पुढे आले आहेत. बिलावल भुट्टो यांच्यासोबत आसिफ अली झरदारी यांची ताकद आहेत. चौफेर टीका होत असताना भुट्टो यांनी स्वतःमध्ये अनेक बदल घडवत राजकारणाचे डावपेच ते शिकले, ही बाब उल्लेखनीय आहे. येत्या काळात पाकिस्तानच्या राजकारणात ते मध्यवर्ती भूमिकेत असणार, यात शंका नाही आणि राजकारणात त्यांची किंमत वाढेल. केवळ एक चांगला चेहरा म्हणून नाही, तर एक परिपक्व राजकारणी असल्याचे बिलावल यांनी स्वतःला सिद्ध केले आहे.

vinod.raut@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()