कीर्ती ‘कतार’ची!

आठ वर्षांपूर्वी दहशतवादाला खतपाणी घालत असल्याच्या कारणावरून सौदी अरेबिया, बहरिनसह मित्रराष्ट्रांनी कतारवर बहिष्कार घातला.
qatar country
qatar countrysakal
Updated on
Summary

आठ वर्षांपूर्वी दहशतवादाला खतपाणी घालत असल्याच्या कारणावरून सौदी अरेबिया, बहरिनसह मित्रराष्ट्रांनी कतारवर बहिष्कार घातला.

केवळ २७ लाख लोकसंख्या असलेला कतार हा देश सॉफ्ट पॉवर म्हणून जागतिक पटलावर वेगाने उदयास येत आहे. मुस्लिम राष्ट्रांमध्ये कतारचा प्रभाव हळूहळू वाढत चालला आहे. नूपुर शर्माच्या वादग्रस्त विधानावर पहिला आक्षेप घेणारा देश कतार होता. एवढ्याशा देशापुढे भारताने माघार का घेतली, असा सवालही भारतात विचारला जातो. १९९५ पर्यंत फारशी चर्चाही होत नसलेला कतार एवढा शक्तिशाली कसा झाला, याची ही कथा...

आठ वर्षांपूर्वी दहशतवादाला खतपाणी घालत असल्याच्या कारणावरून सौदी अरेबिया, बहरिनसह मित्रराष्ट्रांनी कतारवर बहिष्कार घातला. सौदी अरेबिया, बहरिन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त या देशांनी कतारची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सौदी अरेबियाच्या नेतृत्वात वाटचाल करणाऱ्या एका छोट्याशा देशाने आंतरराष्ट्रीयस्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण करायला सुरुवात केली होती. आपले स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग सौदी अरेबियाला होता.

मुस्लिमजगतात सामाजिक, राजकीय प्रभाव असलेल्या मुस्लिम ब्रदरहूडला मदत करण्यास सौदीचा विरोध होता. इजिप्तमधली मुस्लिम ब्रदरहूडच्या नेत्यांना थारा देऊ नका, अशा सूचना सौदीने कतारला केल्या. केवळ २० लाख लोकसंख्येच्या कतारने सौदीची विनंती धुडकावली. सौदी अरेबियाने कतारसोबतचे सर्व संबंध तोडले. हवाई, रस्ते सीमा सील केल्या. चारही बाजूने कोंडी केल्यामुळे कतार माफी मागेल, असा सौदी अरेबियाचा होरा होता; मात्र कतारने कुठलाही समझोता केला नाही. उलट हा बहिष्कार संपवण्यासाठी अमेरिकेकडून सौदीवर दबाव टाकण्याची खेळी कतारने केली. सौदी अरेबियाचा शत्रू नंबर एक इराण, शत्रू क्रमांक दोन तुर्कीसोबत संबंध वाढवले. या बहिष्काराचा कुठलाही परिणाम कतारवर झाला नाही. शेवटी २०२१ मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे हा बहिष्कार उठवला गेला. मात्र सौदीच्या प्रभावाखाली राहिलेल्या कतारने आता सौदी अरेबियाच्या पुढे विचार करायला सुरुवात केली. मुस्लिमजगतात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी कतार सज्ज झाल्याचे ते पाऊल होते.

सौदी अरेबियाला सीमा लागून असलेल्या कतारला १९७१ मध्ये ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. १९४० पर्यंत कतारची औद्यौगिक प्रगती जेमतेम होती. मोती काढण्याच्या व्यवसायात कतार पुढे होता. १९४० मध्ये कतारमध्ये तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांच्या शोध लागला आणि कतारचे अर्थकारण बदलले. आज कतारची अर्थव्यवस्था लोकसंख्येच्या मानाने अतिशय भक्कम मानली जाते. कतारचे प्रतिमाणशी उत्पन्न हे १,१२,७८९ डॉलर एवढे म्हणजे जगातील चौथे आहे. नैसर्गिक वायूचा जगातील तिसरा मोठा साठा; तर कच्च्या तेलाचा चौथा मोठा साठा कतारमध्ये आहे. एलएनजी गॅस निर्यातीत कतारचा जगात पहिला क्रमांक लागतो.

लष्कर ताकतीने सुसज्ज

सौदी अरेबियासारखे शक्तिशाली शेजारी राष्ट्राला लागून असलेल्या एवढ्याशा कतारचा घास कुणीही घेऊ शकतो, हे कतारचे शासनकर्ते हमाद बीन थानी परिवाराच्या लक्षात आले. त्यामुळे या कुटुंबाने अमेरिकेसोबत अत्यंत जवळचे मैत्रीचे, लष्करी आणि आर्थिक संबंध प्रस्थापित केले. अमेरिकेचे आखाती देशातील लष्करी कमांड कतारमध्ये आहे. दोन्ही देशांमधील संबंध एवढे घट्ट आहेत, की अमेरिकेच्या इराक, लीबियामधील लष्करी मोहिमेत कतार सहभागी होता. सध्या तिन्ही दल मिळून कतारकडे ११,८०० लष्करी जवान आहेत; मात्र ते आधुनिक शस्त्राने सज्ज आहेत. कतार अमेरिका, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन या देशांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्राची आयात करतो. एका आंतरराष्ट्रीय संघटनेच्या रिपोर्टनुसार कतार जगातील १६ सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश आहे. अमेरिकेसोबतचे लष्करी संबंधामुळे कतारकडे कुणी डोळे वटारून बघत नाही.

संपत्तीचे योग्य वाटप

नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचा प्रमुख निर्यातदार देश असलेल्या कतार स्वाभाविक यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे एक संपन्न देश म्हणून आणि मजबूत अर्थव्यवस्था म्हणून उभा राहिला आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे इतर अरब राष्ट्रांच्या तुलनेत कतारने राष्ट्रीय संपत्तीचे वाटप आपल्या नागरिकांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. अनुदान, जमीनवाटप, शासकीय नोकऱ्यांच्या माध्यमातून कतारने राष्ट्रीय संपत्तीचे समसमान वाटप केले आहे. त्यामुळे इतर आखाती देशांप्रमाणे कतार प्रशासकीय व्यवस्थेविरुद्ध लोकांमधील असंतोषाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे अरब स्प्रिंग म्हणजे अरब देशांत अनेक ठिकाणी सत्तेविरुद्ध उठाव झाले, तशी परिस्थिती कतारमध्ये निर्माण झाली नाही.

उच्च शिक्षणात गुंतवणूक

शिक्षणाचे महत्त्व ओळखत कतारने मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे कतारमध्ये साक्षरता दर ९३ टक्के एवढा आहे. कतारमधील जवळपास ९३ टक्के मुली वाचू, लिहू शकतात. आखाती देशामध्ये हे सर्वात मोठे प्रमाण आहे. कतारचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अमेरिकेच्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये शिकत आहेत. कतारने अमेरिकन विद्यापीठाच्या शाखा कतारमध्ये उघडल्या आहेत. अनेक विद्यापीठ शहरे बांधण्याचा उपक्रम कतारने हाती घेतला आहे. त्यामुळे आखाती देशात कतार हे शिक्षणासाठीचे हॉट डेस्टिनेशन ठरले आहे.

अल जजीरा

सीएनएन, बीबीसी, वॉईस ऑफ अमेरिका ज्याप्रमाणे आपल्या देशाचा अजेंडा, पर्सेप्शन, प्रभाव जगभरात पसरवत असतो. नेमके तेच काम कतारची अल जजीरा ही वृत्तवाहिनी करते. १९९६ मध्ये सुरू केलेल्या या वृत्तवाहिनीची पाळेमुळे संपूर्ण जगभरात पसरली आहेत. आजपर्यंत अरब देशात पाश्चिमात्य देशाच्या वृत्तवाहिन्यांचे पक्षपाती वार्तांकन उघडे पाडण्याचे काम अल जजीराने केले आहे. त्यामुळे अल जजीराला मुस्लिमजगताचे प्रतिनिधित्व करणारे चॅनेल, असेही संबोधले जाते.

कतारी परराष्ट्र मंत्रालयाचे हे सर्वात मोठे मुत्सद्देगिरीचे हत्यार आहे. आखाती देशातील सर्वात प्रभावी, जनभावना प्रभावित करणारी ही वृत्तवाहिनी आहे. अल जजीराच्या वार्तांकनाची लोकप्रियता, विश्वासार्हता एवढी जास्त आहे की, या माध्यमातून कतारने अनेक देशांत उठाव घडवण्याचे काम केल्याचा आरोप केला जातो. ट्युनिशिया, इजिप्त, सीरिया या देशांत सत्तेविरुद्ध जनमत भडकवण्याचे काम अल जजीराने केल्याचा आरोप आहे. अनेक देशांतील सत्ताधाऱ्यांनी अल जजीराच्या वार्ताहरांना अटक केली, शिक्षा ठोठावली; तर अनेक देशांत अल जजीराला बॅन केले गेले. अल जजीराचे कार्यक्रम एवढे लोकप्रिय आहेत, तिथे अल जजीरा पाहणाऱ्या दर्शकांची संख्या चार कोटी एवढी आहे. ती वाढत चालली आहे. २०११ मध्ये तत्कालीन परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी अमेरिकन संसदेपुढे साक्ष देताना अरबजगतात अल जजीरापुढे अमेरिका माहितीचे युद्ध हरत असून, अल जजीरा लोकांचे मत बदलवण्याचे काम प्रभावीपणे करत असल्याचे सांगितले.

परराष्ट्र धोरण

कतारने आपले वैभव, भक्कम अर्थव्यवस्थेचा वापर मुस्लिम राष्ट्रामध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी वापरला आहे. परराष्ट्र धोरणातील महत्त्वाचे हत्यार असलेल्या पे चेक्सचा वापर कतार मोठ्या प्रमाणात करतो. लेबनॉन, इजिप्त, सुदानला कोट्यवधीचे कर्ज कतार देत असते. याशिवाय पाकिस्तानलाही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत कतारने केली आहे. मुस्लिम राष्ट्रांमधील अतर्गत वादात मध्यस्थाची भूमिका कतार कायम निभावत असतो. अफगाणिस्तानमधून सत्तेबाहेर पडलेल्या तालिबानला दोहा इथे कार्यालय कतारने उघडून दिले. यापूर्वी तालिबान सत्तेत असताना त्यांना मान्यता देणाऱ्या तीन देशांत कतारचा समावेश होता. अमेरिका-तालिबानमध्ये शांतता करार करण्यासाठी कतारच्या दोहा इथेच बैठका झाल्या. अमेरिकन सैन्यमाघारीचा निर्णय दोहा इथेच झाला. अगदी मुस्लिम ब्रदरहूडच्या पदाधिकाऱ्यांनाही कतारमध्ये आश्रय मिळाला आहे. लेबनॉन, इजिप्त, सुदान, येमेनमध्ये कतार अत्यंत सक्रिय आहे. पॅलेस्टाईनमधील हमास आणि फताह या दोन प्रतिस्पर्धी पक्षामध्ये शांतता वार्ता घडवून आणण्याचे काम कतारने केले आहे. २०१२ ला सीरियाचे अध्यक्ष बशीर अल असाद यांच्याविरुद्ध आघाडी उभारण्यासाठीही कतारने पुढाकार घेतला होता. याशिवाय वातावरण बदलाची शिखर परिषद, जगभरातील आर्थिक परिषदा कतारची राजधानी दोहा इथे आयोजित केल्या जातात. जगभरातल्या आश्रय मागणाऱ्या अनेक नेत्यांना कतार आश्रय देते. दुसरे म्हणजे अल जजीराच्या माध्यमातून कतारचे परराष्ट्र धोरण चालत असते.

खेळाची राजधानी

कतार हळूहळू खेळाची जागतिक राजधानी म्हणून पुढे येत आहे. २०२२ मध्ये फिफा वर्ल्डकप कतारमध्ये खेळली जाणार आहे. जगातील सर्वात लोकप्रिय इव्हेंट आयोजित करून कतारने आपली शक्ती दाखवून दिली आहे. २००६ चे आशियाई स्पर्धा कतारमध्ये भरली होती. कतार स्वत: खेळात पुढे नसेल मात्र देशात खेळासाठीच्या अत्याधुनितक सुविधा कतारमध्ये उभारल्या आहेत.

भारत-कतारचे संबंध

भारत-कतारमधील द्विपक्षीय संबंध वेगाने वाढत चालले आहे. कतारची लोकसंख्या २७ लाखापर्यंत आहे. यात मूळ कतारी नागरिकांची संख्या केवळ तीन लाख १३ लाख एवढी आहे. उर्वरित सर्व नागरिक बाहेरच्या देशातून आले आहे. अनेक जण रोजगाराच्या, व्यापाऱ्याच्या निमित्ताने कतारमध्ये स्थायिक झाले आहेत. कतारमध्ये जवळपास सात लाख भारतीय लोक विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. यामध्ये दक्षिण भारतीयांची संख्या जास्त आहे. दोन्ही देशामध्ये व्यापारी संबंध वाढत चालले आहे. भारतीय ऊर्जा क्षेत्रात कतारने पाच अब्ज डॉलर्सच्या गुतंवणुकीसाठी होकार दर्शवला आहे. ओमानमधून कतार ते भारतापर्यंत थेट गॅस पाईपलाईन प्रकल्पाचा यात समावेश आहे. भारत कतारला १.२ अब्ज डॉलरची निर्यात करतो. यात मशिनरी, अन्नधान्य आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश आहे. कतारची निर्यात १६.८ अब्ज डॉलर एवढी आहे. यामध्ये तेल आणि गॅसच्या निर्यातीचा समावेश आहे. कतारमध्ये अनेक भारतीय शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. एकट्या कतारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन भारताला मिळते. त्यामुळे भारतासाठी एक इंधन पुरवठादार आणि नोकरीदार देश म्हणून कतारचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.