साप्ताहिकात उगम असलेले प्रकाशन

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी, म्हणजे १९४८ मध्ये १५ ऑगस्टला साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केलं.
Saneguruji
SanegurujiSakal
Updated on
Summary

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी, म्हणजे १९४८ मध्ये १५ ऑगस्टला साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केलं.

- विनोद शिरसाठ, saptrang@esakal.com

थोडीच पण दर्जेदार आणि पुरोगामी विचारांची मराठी पुस्तकं प्रकाशित करणारं प्रकाशन म्हणून साधना प्रकाशनाची ओळख मागील पाऊण शतकापासून आहे. मात्र, साधना प्रकाशनाचा उगम साधना साप्ताहिकात आहे आणि आजही साधना प्रकाशन सुरू आहे त्याचं मुख्य कारण साधना साप्ताहिक हेच आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी, म्हणजे १९४८ मध्ये १५ ऑगस्टला साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केलं. साप्ताहिकाच्या पहिल्या अंकातील संपादकीय निवेदनात गुरुजींनी लिहिलं आहे, ‘विषमता आणि वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे, या ध्येयाने हे साप्ताहिक जन्म घेत आहे.’ त्या निवेदनातच साधनाच्या वाटचालीची दिशा अधोरेखित केली आहे. साधनाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक चढ-उतार आले असले तरी, ती दिशा मात्र बदललेली नाही.

साने गुरुजी केवळ पावणेदोन वर्षं साधनाचे संपादक होते. ११ जून १९५० रोजी त्यांचं निधन झालं, त्याआधी वर्षभर त्यांनी ‘सुंदर पत्रे’ हे सदर साधनात लिहिलं. सभोवतालची माणसं व समाज, प्राणी व पक्षी, निसर्ग व पर्यावरण आणि इतिहास व वर्तमान यांच्याकडे सजग दृष्टीने बघायला लावणारी ती ४२ पत्रं आहेत. मुलांची सौंदर्यदृष्टी विकसित व्हावी आणि त्यांच्यात ध्येयवादी वृत्ती रुजावी, असाच त्या पत्रांचा रोख आहे. ती पत्रं जरी गुरुजींनी त्यांची प्रिय पुतणी सुधा हिला उद्देशून लिहिली असली, तरी प्रत्यक्षात ती पत्रं महाराष्ट्रातील कुमारवयीन मुला-मुलींसाठी आहेत. गुरुजींच्या निधनानंतर त्या पत्रांचं पुस्तक साधनाने प्रकाशित केलं, तेच खऱ्या अर्थाने साधना प्रकाशनाचं पहिलं पुस्तक. कारण त्याआधी काही लहान पुस्तिका तेवढ्या साधना प्रकाशनाकडून आलेल्या होत्या. म्हणजे साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन एकाच वेळी सुरू झालं. त्यामुळे आता साधना साप्ताहिकाप्रमाणेच साधना प्रकाशनाचंही ७५ वं वर्ष सुरू आहे.

मात्र, तेव्हापासून आतापर्यंत दरवर्षी साधना साप्ताहिकातून क्रमशः प्रसिद्ध झालेल्या काही लेखमाला आणि विशिष्ट विषयांवर काढलेले काही विशेषांक नंतर पुस्तकरूपात साधना प्रकाशनाकडून येत राहिले. त्याव्यतिरिक्त जी थोडी पुस्तकं साधना प्रकाशनाकडून आली तीसुद्धा आधीच्या पुस्तकांना पूरक ठरतील अशीच आहेत. परिणामी दर वर्षी केवळ दहा ते पंधरा नवी पुस्तकं साधना प्रकाशनाकडून येत राहिली. मात्र त्यातील बहुतांश पुस्तकांचे लेखक त्या त्या काळात तरी दिग्गज होते किंवा नंतरच्या काळात तरी त्यांची तशी प्रतिमा निर्माण झाली. परिणामी सर्वत्र साधना प्रकाशनाचा आदरपूर्वक उल्लेख सातत्याने होत राहिला.

साधनाने सुरुवातीच्या पाव शतकात ज्यांची पुस्तके प्रकाशित केली, त्यांमध्ये साने गुरुजी, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, आचार्य भागवत, यदुनाथ थत्ते, ग. प्र. प्रधान, वसंत बापट, राजा मंगळवेढेकर, बाबा आमटे, नरहर कुरुंदकर, हमीद दलवाई इत्यादी प्रमुख लेखक होते. हे लोक साधना परिवारातील नेते, कार्यकर्ते वा विचारवंत होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये चरित्र, आत्मचरित्र, वैचारिक लेखन यांचं प्रमाण जास्त होतं. काही प्रमाणात बालसाहित्यही होतं. शिवाय कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक या प्रकारची पुस्तकंही अल्प प्रमाणात का होईना, प्रकाशित होत राहिली.

साप्ताहिकात प्रसिद्ध झालेलं नाही असं थोडंच, पण महत्त्वाचं लेखनही साधना प्रकाशनाकडून थेट पुस्तकरूपात येत राहिलं. त्यामध्ये अरविंद गोखले, शंकरराव खरात, मालतीबाई बेडेकर, बा. भ. बोरकर इत्यादी मोठ्या साहित्यिकांची नावं सांगता येतील. अर्थातच, साधना साप्ताहिकातील काही चांगलं लेखन साधना प्रकाशनामार्फत प्रकाशित न होता, अन्य प्रकाशनांकडून आलं. याची दोन मोठी उदाहरणं द्यायची तर, दुर्गाबाई भागवत यांचा ‘ऋतुचक्र’ हा ललित लेखांचा संग्रह आणि ह. मो. मराठे यांची ‘निष्पर्ण वृक्षावर भरदुपारी’ ही कादंबरी. ‘ऋतुचक्र’ हे आधी साधना साप्ताहिकातून लेखमाला स्वरूपात आलं होतं, तर ‘निष्पर्ण वृक्षावर’ ही कादंबरी आधी साधना दिवाळी अंकातून प्रकाशित झाली होती.

साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन यांचा सुरुवातीचा पन्नास वर्षांचा प्रवास पाहिला, तर गुरुजींच्या नंतर आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, नानासाहेब गोरे, यदुनाथ थत्ते, वसंत बापट व ग. प्र. प्रधान हे साधना साप्ताहिकाचे मुख्य संपादक होते. ही सर्व इतकी उत्तुंग व्यक्तिमत्त्वं होती आणि सार्वजनिक कार्यात ती इतकी व्यग्र होती की, त्यांच्या काळात साधना प्रकाशनाचं काम त्यांचे सहकारी व अन्य साहाय्यक करून घेत असत.

अर्थातच, साधना प्रकाशनासाठी स्वतंत्र व सक्षम अशी वितरण यंत्रणा नव्हती. मात्र, तो काळच चळवळी व आंदोलनं यांचा असल्याने स्वयंसेवी व स्वयंस्फूर्त पद्धतीनेच पुस्तकांची खरेदी व विक्री केली जात होती. शिवाय, लेखकांची नावं व लेखनाचे विषय यामुळे ती पुस्तकं चांगलीच दखलपात्र ठरत होती. त्या काळात साधनाकडे प्रिंटिंग प्रेसही असल्यामुळे पुस्तकांची छपाई सहज व सुलभ होत होती, किमतीही तुलनेने कमीच ठेवल्या जात होत्या.

अर्थातच, त्या काळात साधना प्रकाशनाच्या पुस्तकांची विक्री ठराविक वर्तुळात जास्त होत होती. कारण, समाजवादी विचारांचे लोक साधना परिवारात जास्त असल्याने साप्ताहिकाची व प्रकाशनाची प्रतिमाही तशीच होती. हे खरं की, साधना प्रकाशन ट्रस्टमार्फत चालवलं जात असल्याने, अन्य व्यावसायिक प्रकाशकांना कराव्या लागतात अशा तडजोडी साधना प्रकाशनाला करण्याची वेळ आली नाही. मात्र कोणीही विशिष्ट व्यक्ती मालक वा चालक नसल्याने, वितरण व व्यवस्थापन या दोन्ही आघाड्यांवर अनेक मर्यादा येत राहिल्या. शिवाय साप्ताहिकाचे संपादकच प्रकाशनाचेही संपादक राहिल्यामुळे येणाऱ्या मर्यादा आणखी वेगळ्याच.

मात्र, या मर्यादांच्या चौकटीतही साधना प्रकाशनाने पाऊण शतकी वाटचाल केली. लहान-मोठी अशी जवळपास साडेसातशे पुस्तकं प्रकाशित केली आहेत आणि मर्यादित अवकाशातही किती चांगलं व परिणामकारक काम करता येतं, याचे वस्तुपाठ दिले आहेत. ते कसं, हे पुढे पाहूयाच.!

(लेखक साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन या दोहोंचे संपादक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.