- विशाखा विश्वनाथ
रिल्स बनवणारी सगळीच माणसं तज्ज्ञ असतातच असं नाही. ऐकीव माहिती किंवा तर्कांच्या आधारे कॅमेऱ्याची भीती नसलेली माणसं रिल बनवतात. काही जण ती पाहताना भारावून जातात आणि स्वतःच्याही नकळत कंझ्यूम केलेला कंटेन्ट खऱ्या आयुष्यात लागू करून पाहतात.
लहान-मोठे, गावातले-शहरातले अशा जवळजवळ सगळ्यांनीच एव्हाना ‘गुलाबी साडी’ गाणं ऐकलं असेल. शे-दीडशे रिल्स स्क्रोल केल्या असतील. ते मूळ गाणं एकदा जाऊन पाहा. त्यातल्या नायिकेला इन्स्टाग्रामवर इन्फ्ल्युएन्सर बनायचं आहे किंवा नायकाला तिने तसं बनावं असं वाटतंय. अशी काहीशी त्या गाण्याची थीम आहे.
एक काळ असा होता, की वडीलधारी मंडळी जवळच्या माणसांना कुणाच्या इन्फ्ल्युअन्सखाली अर्थात प्रभावाखाली येऊ नकोस म्हणून बजावून सांगायचे. आज इन्स्टाग्रामच्या रिल फिचरमुळे मात्र इन्फ्ल्युएन्सर्स आणि इन्स्टंट फेमस होण्याचं वेड बहुतेकांच्या डोक्यात आहे. लाईफस्टाईल टिप्स, फॅशन हॅक, राशी-भविष्य, उपाय-तोडगे, नातेसंबंधांच्या बाबतीतले सल्ले, करियर टिप्स, शेअर मार्केट इत्यादी सगळ्याच विषयांवर रिल्स असतात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी रिल्स बनवणारी सगळीच माणसं तज्ज्ञ असतातच असं नाही. ऐकीव माहिती किंवा तर्कांच्या आधारे स्वतःची क्षमता आणि हुशारीनुसार कॅमेऱ्याची भीती नसलेली किंवा इन फ्रेम स्वतःला पाहण्याची हौस असणारी माणसं रिल बनवतात आणि ज्यांना असं सगळं करावंसं वाटतं; पण करता येत नाही किंवा हे सगळं शांत आपल्या सोफ्यावर, घरात वा डेस्कवर बसून स्क्रोल करायला, मित्र-मंडळींसोबत शेअर करायला आवडतं ते असे रिल पाहतात. पाहताना भारावून जातात, म्हणजेच ‘इन्फ्ल्युअन्स’ होतात. स्वतःच्याही नकळत कंझ्यूम केलेला कंटेन्ट खऱ्या आयुष्यात लागू करून पाहतात.
यू-ट्युबवर पैसे कमावता येतात, असं लक्षात आल्यावर गल्लीबोळातून यू-ट्युबर व्हायचं म्हणणारी माणसं आता ‘आम्हाला इन्फ्ल्युएन्सर व्हायचंय’ असं सांगू लागली आहेत. इतकंच काय, इन्फ्ल्युएन्सर मार्केटिंग ही पैशाची उलाढाल असलेली स्वतंत्र उपशाखाच उदयाला आली आहे. कुठल्याही ठराविक शिक्षणाची अट नाही. हसण्या-दिसण्याची कुठलीही नियमावली नाही.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, स्वतःच्या अकाऊंटवरून काय सांगावं, काय सांगू नये हे ठरवण्याचा मालकी हक्क फक्त स्वतःकडे... कंटेन्ट कुणाचकडून सेन्सॉर करून घेण्याची कटकटच नाही. या आणि अशा अनेक मुद्द्यांमुळे रिल बनवणाऱ्या माणसाची स्वायत्तता अबाधित राहते आणि मग अर्थातच सल्ले देण्याची अन् मला हवं ते-हवं तेव्हा बोलण्याची मुभा माणसाला मिळते. मग रिल बनवणं फार सोयीचं वाटू लागतं.
त्यात हावभाव, शब्द, गाणं आणि लोकेशनसारख्या अनेक गोष्टी त्या एका रिलला अधिक परिपूर्ण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. जी माणसं हा कंटेन्ट कंझ्यूम करतात, म्हणजेच पाहतात त्यांना पाहिलेलं रिल आपल्या जवळच्या माणसांना शेअर करून भावनांना वाट मोकळी करून दिल्यासारखं वाटतं.
एकूण काय, वागण्या-बोलण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहणं. पाहिलेल्या रिलमध्ये जे ते म्हटलं होतं तेच मला सांगायचंय, मानवी मनाला समाधान देणारं, खुणावणारं, अगदी स्पष्टच करायचं तर अहमगंड सुखावणारं सगळं काही पुरवण्याची ताकद ‘रिल’ या फिचरमध्ये आहे. त्यात आता इंफ्ल्युएन्सर मार्केटिंग या शाखेमुळे यात पैशांचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
त्यामुळे आधी यू-ट्युबर होण्याचं असलेलं वेड आता इंफ्ल्युएन्सर होण्यात बदललेलं आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर तापाची, डोळे येण्याची जशी साथ येते तशी ही रिलमधून व्हायरल होण्याची साथ सगळीकडेच वेगाने पसरते आहे. या व्हायरल रिल्समधून सांगितलेलं तत्त्वज्ञान कुठेही कुणीही लिहून ठेवलेलं नाही, त्यामागे कुठलीच थिअरी नाही.
असलंच तर काही सेन्सिबल माणसांना आणि त्याच पद्धतीने व्हायरल होण्याची, माझं म्हणणं दुसऱ्यांना प्रभावित करू शकतं, इतरांनी ते ऐकावं, मुझे छा जाना हैं असं वाटणाऱ्या सगळ्यांना उमगलेलं त्या स्वतःचं असं वेगळं ‘सत्य’ आहे. ते सांगून इतरांना प्रभावित करावं, इतरांनी प्रभावित व्हावं असं यातल्या प्रत्येकालाच वाटतं, असं नाही.
मला वाटलं, मी सांगितलं, अमुक इतक्या लोकांनी ते शेअर केलं, एवढ्या लोकांपर्यंत ते पोहोचलं या सगळ्याचा एकत्रित फीलगुड इफेक्ट अनुभवणं हा त्यातला फार मोठा भाग आहे. या फिलगुड इफेक्टला पुढे जर पैशांची जोड मिळत असेल तर तो कुणाला नको असणार आहे? ज्यांचे रिल व्हायरल होतात त्यांना हा पैसा समोरून ऑफर केला जातो हे खरं असलं तरी, या इन्फ्ल्युएन्सर्स फ्ल्यू / व्हायरल साथीचा रिल पाहणाऱ्यांवर काय परिणाम होतो हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे. कारण यात तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
आपण जेव्हा एखादं रिल पाहू लागतो तेव्हा तशाच प्रकारचं किंवा सारखंच म्हणणं मांडणाऱ्या रिल्स लागोपाठ पाहण्यात येतात. हा अनुभव प्रत्येकाला येतो. याला अल्गोरिदम असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही जे पाहता तेच इन्स्टाग्राम अधिकाधिक तुमच्यापर्यंत पोहोचवतं. याचा वाईट परिणाम असा होतो, की जर तुम्हाला वाटत असेल की मी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे तर पॉझिटिव्ह थिंकिंग कसं महत्त्वाचं आहे हे सतत तुमच्यासमोर येत राहतं आणि स्वतःमध्ये करायचा एक लहानसा बदल किती जास्त महत्त्वाचा आहे, तो मी केला नाही तर... वगैरे वगैरेसारख्या अनेक भावना हळूहळू तुमच्या मनात घर करू लागतात.
मग एकाच कुठल्या तरी भावनेला आपण अवाजवी महत्त्व देऊन बसतो. त्यामुळे टाईमपास किंवा व्हॅल्यू ॲडिशन यातलं काहीही करण्यासाठी रिल पाहत असाल, बनवत असाल तर त्याचे बरे-वाईट परिणाम काय असू शकतात, याचं भान राखणं गरजेचं आहे. आपल्या वागण्या-बोलण्याचे पॅटर्न तंत्रज्ञानाने डिकोड करण्याच्या आत स्वतः डिकोड करून, एकाच भावनेच्या आहारी न जाता अल्गोरिदमला चकवा देत समाजमाध्यमं वापरणंही गरजेचं आहे.
vishakhavishwanath11@gmail.com
(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.