आता अस्तित्वच पणास...

विराटच्या या अवस्थेवर अनेकदा अनेकांचं बोलून आणि लिहून झालं आहे
Virat Kohli
Virat Kohli ESAKAL
Updated on

प्रत्येक दिवस एकसारखा नसतो...प्रत्येकाचे सर्वच दिवस एकसारखे नसतात... त्याचप्रमाणे प्रत्येक खेळाडू; मग ते सुनील गावसकर असोत वा सचिन तेंडुलकर; या प्रत्येकाच्या कारकीर्दीत चढ-उतार असतातच. कुणालाही हा फेरा चुकलेला नाही. महान क्रिकेटपटू म्हणून दरारा निर्माण करणारा विराट कोहली गेली दोन वर्षं याच फेऱ्यात अडकलेला आहे. महान या श्रेणीतील सर्वच खेळाडूंना - केवळ क्रिकेटपटूच नव्हे - अगदी लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यासह अनेकांना - अधूनमधून ‘ग्रहण’ लागत असतं. मात्र, अशा ग्रहणाचा कालावधी किती कमी आणि किती जास्त यावर त्या त्या खेळाडूचं भवितव्य ठरतं. सर्वसाधारण खेळाडू एकदा या फेऱ्यात अडकले की त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना बराच काळ झगडावं लागतं आणि एकदा पडद्याआड गेल्यानंतर ते कधी विस्मृतीत जातात हे समजतही नाही; पण काही खेळाडू लवकरात लवकर अडचणींचा हा डोंगर पार करतात आणि त्यांना पुन्हा सूर्योदय दिसतो म्हणून ते महान असतात...

गेल्या दोन वर्षांतील ‘तळ्यात-मळ्यात’ असलेली परिस्थिती पाहता, विराटच्या भोवती असलेलं महानतेचं वलय क्षीण होऊ लागलं आहे. विराटच्या या अवस्थेवर अनेकदा अनेकांचं बोलून आणि लिहून झालं आहे; पण आता ‘आता नाही तर कधीच नाही’ अशी वेळ विराटसाठी आली आहे...

...तर परिस्थिती अवघड

...या ‘मोहिमे’ची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून व्हावी यासारखी दुसरी संधी नसावी. आशिया करंडक स्पर्धा शनिवारपासून सुरू झाली आणि आज, रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यातला मुकाबला होतोय. स्पर्धेच्या कार्यक्रमानुसार, पुढच्या रविवारीही भारत-पाकिस्तान यांची लढत पुन्हा होणार आहे. सर्वस्व पणाला लावून विराट फॉर्मात आला तर ठीक, नाहीतर पुढची परिस्थिती त्याच्यासाठी अवघड असणार यात शंका नाही.

आकडेवारीत बोलायचं तर, विराटनं कोणत्याही प्रकारात शतक काढल्याला एक हजार दिवस झाले आहेत. त्याच्यासारख्या खेळाडूंसाठी हा कालावधी फारच मोठा आहे. कारण, एक वेळ अशी होती की त्यानं २०-२५ धावा केल्यावर चुटकीसरशी तो शतकापर्यंत झेप घ्यायचा. ‘निवृत्त होण्याअगोदर तो सचिनच्या १०० शतकांचा विक्रम मोडणार,’ असं वाटण्याइतकी त्याची ‘एक्स्प्रेस-वेगा’नं वाटचाल सुरू होती; पण आता त्याच्या गाडीची अपयशाच्या चिखलात रुतलेली चाकं निघता निघत नाहीयेत. यातून मार्ग त्याचा त्यानंच काढायचाय.

संयमात सातत्याचा अभाव

आता थोडं सविस्तरपणे विराटच्या या ‘टायटॅनिक’कडे पाहू या! विराटची शैली भक्कम होती, म्हणून त्यानं अगोदरचा काळ गाजवला; पण काळाच्या ओघात शैलीमध्ये दोष निर्माण होत जातात. विराटच्या शैलीबाबतही तसंच झालं. उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडूबरोबर पकडापकडी खेळण्याचा मोह त्याला अनेकदा संकटात नेऊ लागला. हा दोष आपल्याला दिसून येतो; मग त्याला तो उमगला असणारच, त्यावर त्यानं प्रयत्नही केले असणार; पण तंत्रात सुधारणा केली तरी जम बसण्याअगोदरच तो संयम गमावतो. यासाठी सचिनचं उदाहरण त्यानं कायमचं लक्षात ठेवायला हवं. सचिन कव्हर ड्राईव्हचा फटका मारताना स्लिप किंवा गली या क्षेत्रात झेल देऊन बाद होत असे. सन २००४ च्या ऑस्ट्रेलियादौऱ्यात सचिनसाठी हा ‘सापळा’ लावण्यात आला; परंतु त्यानं सर्वात आवडता आणि धावा देणारा कव्हर ड्राईव्हचा एकही फटका न मारता द्विशतक केलं होतं. पराकोटीचा संयम कसा असावा याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे.

आशिया करंडक स्पर्धा अमिरातीत सुरू आहे. याच ठिकाणी विराटचं कर्णधार आणि खेळाडू म्हणूनही अपयश अधोरेखित झालं होतं. साधारणतः नऊ महिन्यांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ साखळीतच गारद झाला होता. कर्णधार म्हणून कधीही कोणत्याही प्रकारचा विश्वकरंडक न जिंकणाऱ्या विराटची कर्णधार म्हणून ती अखेरची स्पर्धा होती. आता त्याच अमिरातीत त्याला खेळाडू म्हणून नवी भरारी घेऊन येत्या काही महिन्यांत होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी आपलं अस्तित्व कायम ठेवायचं आहे.

कुणाला वगळणार?

संघासाठी योगदान देणाऱ्या खेळाडूंची जागा आपण अडवत तर नाही ना, असाही विचार करण्याची वेळ विराटवर आली आहे. आता हेच पाहा...आशिया करंडक स्पर्धेसाठी विराटला स्थान देताना श्रेयस अय्यरला राखीव खेळाडूंत ठेवण्यात आलं आहे. आता अंतिम ११ खेळाडूंची रचना कशी असेल हे पाहू या. यष्टिरक्षक धरून सहा फलंदाज आणि पाच गोलंदाज अशी रचना असते. रोहित शर्मा-केएल राहुल सलामीवीर...फॉर्मात असलेला सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, फिनिशर दिनेश कार्तिक...आणि, आता सहाव्या जागेसाठी विराट असेल तर, दीपक हूडा याला बाहेर राहावं लागेल, ज्याचा उपयोग अमिरातीतील संथ खेळपट्ट्यांवर ऑफस्पिनर म्हणून होऊ शकतो.

धोक्याची घंटा

मुळात आता भारतीय संघाला विराटशिवाय खेळण्याची सवय झाली आहे. इंग्लंडदौऱ्यानंतर तो खेळलेला नाही. अशी सवय होणं हे त्या त्या खेळाडूसाठी धोक्याची घंटा वाजण्यासारखं असतं. मात्र, काही काळ क्रिकेटपासून दूर होणं हे विराटला आवश्यकच होतं. शारीरिकदृष्ट्या तो सर्वात तंदुरुस्त असलेला खेळाडू आहे; प्रश्न तंत्रात सुधारणा करण्याचा आणि मानसिकतेचा आहे.

‘टीम इंडिया’चे माजी फलंदाजी-प्रशिक्षक आणि आयपीएलमधील त्याच्या बंगळूर संघाचेही फलंदाजी-प्रशिक्षक संजय बांगर यांच्याबरोबर विराटनं सराव करत मुंबईत तंत्रात सुधारणा केली आहे. आता सकारात्मक मानसिकता कशी सुदृढ केली आहे हे आजपासून समजेलच.

हिशेब चुकते होणार?

ही आशिया करंडक स्पर्धा केवळ विराटसाठीच महत्त्वाची नाही. विराट आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण अशी चर्चा क्रिकेटविश्वात सदैव सुरू असते. विश्वकरंडक स्पर्धांच्या इतिहासात पाकिस्ताननं भारताला कधीही हरवलं नव्हतं. भारताची ही परंपरा नऊ महिन्यांपूर्वी अमिरातीतील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत मोडली गेली. त्या पराभवाचे हिशेब चुकते करून पुढच्या टी-२० वर्ल्ड कपची बेगमी करण्यासाठी भारतीय संघालाही आपली ताकद दाखवावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.