- विशाखा बाग
आपल्याकडे ज्याप्रमाणे बारीक पांढऱ्या वाळूचे बीच असतात, त्याच्या अगदी उलट डोवरचा बीच हा पांढऱ्या छोट्या छोट्या गोल दगडांचा आहे. सुरुवातीला क्लिफ्स म्हणजे चुनखडीच्या डोंगरावर भटकंती केली. या डोंगरावर चालायलासुद्धा व्यवस्थित पायवाटा होत्या. त्याचबरोबर दर पाच मिनिटांनी बसायला बेंचेससुद्धा होते. तिथून खाली आल्यावर बीचवरून पुन्हा व्हाईट क्लिफ्स बघण्याचा आनंद अविस्मरणीयच...
रांगणे, चालणे, हुंदडणे, घरभर पळणे आणि त्यानंतर जी चालू होते ती भटकंती. अशा प्रकारे लहानपणापासूनच आपल्याला सगळ्यांना फिरायला आवडतं. मग अगदी लहान बाळाला रांगता आल्यानंतर जे घरभर फिरायचं असतं, तिथपासून ते अगदी ८०-८५ वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत प्रत्येकालाच ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे, संधीप्रमाणे फिरायला आवडतं, भटकंती करायला आवडतं.
तसंच माझंही फिरणं अगदी लहानपणापासूनच सुरू झालेलं आहे; पण साधारण जबाबदाऱ्या थोड्या कमी झाल्यावर आणि मुलं मोठी झाल्यावर आपण स्वतंत्रपणे आणि मनमोकळेपणे फिरू शकतो. अर्थात, स्वतंत्रपणे आणि स्वच्छंदीपणे फिरायला त्या व्यक्तीचा स्वभावच सर्वस्वी कारणीभूत असतो. इच्छा असेल तिथे मार्ग असतो, त्याप्रमाणेच वेगवेगळ्या वाटा खुणावत होत्याच.
मी स्वतः इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्सच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे कामानिमित्ताने देशाच्या बाहेर फिरण्याची वेळ आली. मुळात चौकस स्वभाव, भटकंती करण्याची आवड आणि आपण जिथे राहतो त्या देशाशिवाय दुसरे देश कसे आहेत, तिथली माणसं कशी आहेत, तिथे घरं कशी आहेत, निसर्ग कसा आहे त्या गोष्टींसह अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजीपर्यंत असे सर्व जाणून घ्यायची इच्छा होती. कामानिमित्ताने आणि माझी मुले शिकत असल्याच्या कारणाने वेगवेगळ्या ठिकाणी आणि देशांमध्ये फिरण्याचा योग आला.
युनायटेड किंग्डम आणि मुख्यत्वे इंग्लंडमध्ये माझं काम असल्यामुळे आणि त्याचबरोबर मुलेही तिथेच शिकत असल्यामुळे या देशात फिरण्याची माझी हौस पूर्ण झाली. अशीच फिरता फिरता मी इंग्लंडमधील केंट परगण्यातील डोवर या समुद्राजवळच्या गावात येऊन पोहोचले. गाव छान छोटंसं आहे.
टिपिकल इंग्लिश टाऊन, आपण ज्याला गाव म्हणू शकतो तसं गाव होतं. पाश्चिमात्य देशांमधलं गाव असल्यामुळे गावात पोहोचताच आपल्याला जाणवतो तो नीटनेटकेपणा, स्वच्छता अगदी ओळीत मांडून ठेवलेली एकसारखी, एका रंगातली, एका ठेवणीतली घरं. याचा प्रत्यय अगदी स्टेशनवर तुम्ही उतरल्यापासूनच तुम्हाला यायला लागतो.
कँटेरबरी (Canterbury) या मोठ्या गावापासून मी ट्रेन घेतली होती. साधारण वीस मिनिटांत आपण डोवरला पोहोचतो. लंडनहूनसुद्धा डायरेक्ट डोवरला ट्रेन येते. डोवरला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आम्ही मस्त इंग्लिश ब्रेकफास्ट केला. यामध्ये स्मोक साल्मन, फिश अँड चिप्स, हिरवे उकडलेले मटार, मॅश्ड पोटॅटो, जॅकेट पोटॅटो आणि मस्त गरमागरम कॉफी असे हरतऱ्हेचे वेगवेगळे रंगीत पदार्थ ब्रेकफास्टमध्ये खाऊन आम्ही डोवर क्लिफ्स म्हणजेच व्हाईट क्लिफ्सला जायला निघालो.
गावातून समुद्राकडे जाताना लक्षात येण्याजोगी गोष्ट होती ती म्हणजे नियमबद्ध ट्रॅफिक. आम्ही गेलो त्या दिवशी हवा आणि वातावरण दोन्ही छान होतं. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्ही डोवरला गेलो होतो. आपण ज्याला आनंददायी वातावरण म्हणतो अशा प्रकारे जास्त थंडीही नव्हती आणि वारंही जास्त सुटलं नव्हतं.
पाश्चिमात्य देशांमध्ये वाऱ्याचा वेग हा फार जास्त महत्त्वाचा असतो. बोचरे वारे असतील तर थंडीही जास्त जाणवते. डोवर हे मुख्यतः इंग्लिश चॅनललगत असलेलं आणि व्हाईट क्लिफ्ससाठी म्हणून प्रसिद्ध असलेलं असं गाव आहे. फ्रान्स आणि इंग्लंडमधली इंग्लिश खाडीही तुम्हाला इथून बघायला मिळते. याच खाडीच्या आजूबाजूला आणि गावाच्या दोन्ही बाजूंना साधारण १३ किलोमीटर लांब पसरलेले हे क्लिफ्स आहेत.
बघता बघता पंधरा मिनिटांत आम्ही क्लिफवर येऊनसुद्धा पोचलो. पार्किंग करायला छान जागा मिळाली आणि समोरच निळाशार आणि मध्येच हिरव्या रंगाच्या छटा असणारा स्वच्छ पाण्याचा समुद्र बघायला मिळाला. अथांग पसरलेला समुद्र आणि आजूबाजूचं शांत वातावरण... मन खूपच प्रफुल्लित झालं.
पार्किंगच्या अपोझिट साईडला समुद्राकडे तोंड करून एक छान कॅफे आहे. आत आणि बाहेर बसायलासुद्धा लाकडी बेंचेस आहेत. हातात कॉफी आणि पुस्तक घेऊन समुद्राकडे बघत इथेच बसून राहावं असं आल्या क्षणापासून वाटत होतं. आमच्यासारखे बरेच जण व्हाईट क्लिफ्स बघायला आले होते.
पाश्चिमात्य देशांमध्ये एक लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे इथल्या लोकांना प्रचंड प्रमाणात पायी फिरायला आवडतं, म्हणजे आपल्याकडे फक्त ट्रेकिंगला जाणारी लोकं सोडली तर कुणालाही पायी फिरायला आवडत नाही; पण इकडे मात्र गाव, डोंगर, जंगल असो किंवा नदी... बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माणसं तुम्हाला पायी चालताना दिसतील. क्लिफवरसुद्धा आपापल्या कुत्र्यांना घेऊन फिरायला येणारी प्रत्येक वयोगटातली माणसं मला दिसत होती.
इंग्लंडमध्ये जवळपास प्रत्येक घरी एक पाळीव कुत्रा असतो म्हणजे असतोच. डोवर हे एक महत्त्वाचे बंदरसुद्धा आहे. इथूनच फ्रान्स आणि युरोपला जायला कमर्शियल आणि टुरिस्ट बोटीसुद्धा निघतात. समुद्र मार्गाने इथून फ्रान्स फक्त ३२ किलोमीटरवर आहे आणि याचीच दुसरी बाजू म्हणजे याच ठिकाणी सर्वांत जास्त युरोपमधून बेकायदा स्थलांतरित येत असतात.
क्लिफ्स म्हणजे थोडक्यात चुनखडीचे डोंगर; पण इथे या डोंगरावर चालायलासुद्धा व्यवस्थित पायवाटा केलेल्या होत्या. त्याचबरोबर दर पाच मिनिटांनी बसायला बेंचेससुद्धा होते. हलकं वारं सुटलं होतं. समुद्राकडे बघत बघत पठारावर वरती केव्हा येऊन पोहोचलो कळलंसुद्धा नाही. या देशांमध्ये ऊन कमी प्रमाणात असल्यामुळे आपल्याला चालताना थकायला होत नाही.
इंग्लंडच्या बॉर्डरवरचं शेवटचं गाव असल्यामुळे इथे एक रडार सिस्टीमसुद्धा आहे आणि त्यामुळे आकाशात सतत हेलिकॉप्टरसुद्धा घिरट्या घालत होते. वर आल्यानंतर इथून समुद्र अजूनच खूप छान शांत दिसत होता. आपल्याकडे भारतात खूपच कमी ठिकाणी समुद्राचं पाणी असं हिरवं, निळ्या छटा असणारं आणि स्वच्छ दिसतं.
इथून विरुद्ध बाजूला बघितलं की डोवरच्या राजाचा राजवाडा दिसतो. चुनखडीच्या डोंगराचा नजारा, एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला पसरलेलं गाव आणि वरच्या बाजूला असलेला राजवाडा, सगळंच कसं अप्रतिम दिसत होतं.
इथून निघावंसं अजिबात वाटत नव्हतं; मात्र खाली बीचला जायचं होतं आणि गावात फिरून एक चक्कर मारायची होती. त्यामुळे निघावं लागलं. डोवरचा बीचसुद्धा छान आहे. आपल्याकडे ज्याप्रमाणे बारीक पांढऱ्या वाळूचे बीच असतात, त्याच्या अगदी उलट पांढऱ्या छोट्या-छोट्या गोल दगडांचे किंवा गोट्यांचे बीच इंग्लंडमध्ये आहेत.
तसाच डोवरचा बीच हा पांढऱ्या छोट्या छोट्या गोल दगडांचा आहे. खाली आल्यावर तुम्हाला बीचवरून व्हाईट क्लिफ्स पुन्हा एकदा छान दिसतात. बीचवरच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॅफे, बार, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आहेत. बीच स्वच्छ तर होताच; पण इथले लोकसुद्धा न सांगता समुद्र बीच आणि आजूबाजूचा परिसर इथे स्वच्छता ठेवत होते. आपल्याकडे सर्रास बीचवर ज्या प्रकारे कचरा बघायला मिळतो, त्या प्रकारे तसा कचरा मात्र मला इथे कुठेच दिसला नाही.
अगदी लंडनवरून येऊन एका दिवसात तुम्ही ही डोवरची ट्रिप करू शकता. चुनखडीचे डोंगर इतक्या जवळून मी पहिल्यांदाच बघितले होते आणि हे निसर्गाचं एक वेगळं रूप बघून आम्ही कँटेरबरीला परत जायला निघालो.
खरं तर भटकंती करायला कोणतंच कारण लागत नाही, पाहिजे असते ती इच्छा; स्वच्छंद जगण्याची आणि त्याचबरोबर आजूबाजूचे प्रदेश बघत स्वतःला प्रगल्भ करून स्वतःच्या विचारांच्या कक्षा रुंदावण्याची.
(लेखिका या वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.