- विशाखा बाग
इंग्लंडमधील डेव्हन आणि कॉर्नवॉल भागातील भव्य अन् सुंदर चर्च, कॅथेड्रल, नीरव समुद्रकिनारे, नॅशनल पार्क, किल्ले, नद्या इत्यादी परिसर सातत्याने एक नवी ऊर्जा देत असतो. इंग्लंडला गेलात तर या स्वर्गाला अवश्य भेट द्या.
आपण मागील भागात इंग्लंडमधील डेव्हन आणि कॉर्नवॉल भागांत फिरत होतो. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या प्रदेशात आपली भटकंती आपण याही भागात सुरू ठेवणार आहोत. भव्य आणि सुंदर चर्च, कॅथेड्रल, शांत आणि नीरव समुद्रकिनारे, नॅशनल पार्क, किल्ले आणि नद्या यांचा हा परिसर.
घनदाट जंगल जरी या प्रदेशात नसलं तरीही गवताचे लांबच लांब पसरलेले छोटे छोटे डोंगर, त्यामधून वाहणाऱ्या नद्या, आल्हाददायक वातावरण, काही शतकांपूर्वी वसलेली खेडी, त्यामध्ये असलेली पिवळ्या लाईनस्टोनची घरं आणि सगळीकडे असलेल्या स्वच्छ व शांत परिसरामुळे आपल्याला या भागात फिरताना सतत उत्साह जाणवत राहतो. आम्ही या भागात ऑक्टोबरमध्ये गेलो असल्यामुळे खरोखरच वातावरण खूप छान होतं. ऊन, पाऊस आणि थंडीचा खेळ सतत सुरू होता.
डार्टमूर नॅशनल पार्कमधील वायकोंब इन मूर येथील छोटंसं चर्चसुद्धा बघण्यासारखं आहे. हे गाव फक्त शंभर घरांचं आहे, तरीही गावात तुम्हाला सर्व सोयी आढळतील. या ठिकाणीच आम्ही सुप्रसिद्ध कॉर्निश पेस्टी आणि चहा घेतला. उत्कृष्ट चव आणि स्वाद असलेला कॉर्निश चहा फाल नदीच्या काठी असलेल्या ट्रूरो गावातील उत्पादन आहे.
असं म्हणतात की, कॉर्नवॉलच्या या ठिकाणचं आणि भारतातील दार्जिलिंगचं हवामान हे जवळपास सारखंच आहे, म्हणूनच हा चहा त्याच्या विशिष्ट स्वादामुळे प्रसिद्ध आहे. याशिवाय या चहामध्ये क्लॉटेड क्रीम म्हणजेच गाईचं दूध उकळवून नंतर त्यापासून तयार झालेली घट्ट साय वापरली जाते. याशिवाय या चहाबरोबर स्कोन म्हणजेच छोटा ब्रेड मधून कापून त्यावर आधी जाम आणि नंतर हे क्लॉटेड क्रीम लावून खाल्लं जातं. कॉर्नवॉलला फिरायला आल्यानंतर एकदा तरी हा कॉर्निश चहा घ्यायलाच हवा.
इथूनच जवळ असलेला ईस्टर्न मूर या नदीवरचा दगडी क्लॅपर ब्रिज हा दीड ते दोन हजार वर्षें जुना आहे. तो बघून आम्ही पुढे व्हॅलेन्सी नदीच्या काठावर असलेलं बॉसकॅसल हे खेडेगाव बघायला आलो. एलिझाबेथियन स्टाईल फिशिंग व्हिलेज म्हणजेच एकाच वेळी समुद्रकिनारी आणि नदीकिनारी असलेलं हे गाव आहे. पूर्वी मासेमारी हा येथील मुख्य व्यवसाय होता; परंतु आता हे एक टुरिस्ट व्हिलेज म्हणून नावारूपाला आलं आहे.
सुंदर चित्रात काढलेलं टुमदार गाव बघावं असं तिथे फिरताना वाटत होतं. गोल वळणं घेत असलेली नदी, त्यावर असणारे लाकडी किंवा दगडी पूल, आजूबाजूला असलेलं फुलांनी सजवलेलं कॅफे आणि रेस्टॉरंट, लाईमस्टोनमधली पिवळी घरं हे सगळं बघता बघता आम्ही नॉर्थ कॉस्ट सी शोअरवर जायला निघालो. नदीच्या बाजूने चालत चालतच आपण नॉर्थ ॲटलांटिक महासागर बघायला निघतो. कंट्रीसाईड व्हिलेजचा अनुभव घ्यायचा असेल तर या गावाला अर्थातच खेड्याला नक्कीच भेट द्यायला हवी.
नॉर्थ कॉर्नवॉल काऊंटीमध्ये टिंटाजेल गावाजवळ टिंटाजेल कॅसल नॉर्थ अटलांटिक महासागराच्या किनारी आहे. गाडी पार्क करून आम्ही आधी समुद्रकिनारी पठारावर येऊन संपूर्ण महासागराचा आणि कॅसलचा नयनरम्य देखावा बघितला. आधी साधारण वीस मिनिटं चालत आणि त्यानंतर वीस मिनिटं चढत जाऊन कॅसलला भेट द्यावी लागते. किल्ल्याची आता बरीच पडझड झालेली आहे.
किंग आर्थरचा जन्म या किल्ल्यावर झाला होता असं मानलं जातं. म्हणूनच रोमन काळापासून असलेल्या या किल्ल्याला महत्त्व आहे आणि आता तो एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून नावारूपाला आला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन डोंगरांना जोडणारा एक मोठा पूल आहे. त्यावरून आपल्याला जावं लागतं. आजूबाजूच्या परिसराचं, समुद्राचं आणि किल्ल्याचं इथून खूप सुंदर दृश्य दिसतं. या किल्ल्याला हेवन असंही संबोधलं जातं.
कारण अतिशय सुंदर निसर्गरम्य समुद्रकिनारी या किल्ल्याची जागा आहे. त्याशिवाय किल्ल्याखाली काही गुहाही आहेत. मग तिथे वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की, इथे अठराव्या शतकापासून खाणकामसुद्धा चालत होतं आणि दगडाच्या खाणी इथे होत्या. अशा प्रकारे ऐतिहासिक आणि औद्योगिक वारसा असलेला निसर्गरम्य किल्ला न चुकवावा असाच आहे. त्यानंतर कॉर्नवॉल काऊंटीमधील पुढचं महत्त्वाचं आकर्षण होतं ते म्हणजे मिनॅक थिएटर.
निसर्गरम्य समुद्रकिनारी, डोंगर-उतारावर अतिशय सुबकरीत्या तयार केलेलं आणि सजवलेलं ओपन एअर थिएटर म्हणजे मिनॅक थिएटर. असं ओपन एअर थिएटर म्हणजे डोंगर-उतारावर थेट समुद्रकिनारी स्टेज असलेलं माझ्या पाहण्यात तरी नक्की नव्हतं. एकाच नजरेत मी या संपूर्ण परिसराच्या प्रेमात पडले.
डोंगरावरून वळण घेत गोल गोल पायऱ्यांनी उतरत छोट्या-छोट्या प्रेक्षक गॅलरीमधून चालत चालत आपण खाली थेट समुद्राच्या बाजूला असलेल्या स्टेजजवळ पोहोचतो. आम्ही गेलो तेव्हा तिथे एक नाटक सुरू होतं. लेडी रोवेना केड हिने पहिल्या महायुद्धानंतर खरं तर इथे मिनॅक पॉईंटवर स्वतःसाठी जागा घेऊन घर आणि थिएटर बांधायला सुरुवात केली.
त्यानंतर १९२९ मध्ये शेक्सपियरच्या ‘अ मिडसमर नाईट्स ड्रीम’ नाटकापासून या थिएटरची सुरुवात झाली. अजूनही दरवर्षी मे ते सप्टेंबरदरम्यान इथे साधारण वीस नाटकं होतात. युरोपमधील पहिल्या वीस प्रेक्षणीय स्थळांमध्ये मिनॅक थिएटरचं नाव घेतलं जातं.
कॉर्नवॉल ट्रीपचा शेवट आम्ही लँड्स एंड या भागात जाऊन केला. कॉर्नवॉल काऊंटीच्या पश्चिमेच्या बाजूचा शेवटचं टोक म्हणजे लँड्स एंड. या ठिकाणापासून अटलांटिक महासागर जो सुरू होतो ते त्याची दुसरी बाजू म्हणजे अमेरिका. म्हणूनच या ठिकाणाला युनायटेड किंग्डमचा लेन्स एंड हा पॉईंट म्हणून समजला जातो. इंग्लंडला गेले असताना अवश्य वेळ काढून निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि नॅशनल पार्कने सजलेल्या या कॉर्नवॉल आणि डेव्हान काऊंटीला नक्कीच भेट द्यायला हवी.
gauribag7@gmail.com
(लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.