- विशाखा विश्वनाथ
भारतात स्वातंत्र्याची व्याप्ती ही देशस्वातंत्र्य ते व्यक्तिस्वातंत्र्य एवढी व्यापक आहे, तरीही आपल्याकडे माणसांची कलेच्या माध्यमातून व्यक्त होण्याची भूक मात्र तशीच अर्धीमुर्धीच राहून जाते. गावंसं वाटणं, नाचावं वाटणं या खूप आदिम प्रेरणा आहेत. सफाईदारपणा नसल्याने या माध्यमातून व्यक्त होऊ न शकणारी किती तरी माणसं आपल्या बाजूला आहेत. या स्वातंत्र्यदिनी अशा जवळच्या एका माणसाला मोकळेपणाने अभिव्यक्त होण्यासाठी प्रोत्साहन देऊया. शेरेबाजी न करणारा नवा भवताल घडवायला घेऊया.
आमच्या शाळेचं ग्राऊंड तसं फार मोठं नव्हतं; पण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ते आपोआप स्वतःला मोठं करून घ्यायचं, असं मला आपलं उगाच वाटायचं. प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पाच-दहा प्रमुख पाहुणे, संस्थाचालक आणि प्रत्येक इयत्तेतले चार-सहा विद्यार्थी, परेड करणारी वेगळी वीस-पंचवीस मुलं, बॅण्डवाले चार अजून वेगळे, कवायतीचे वेगळे विद्यार्थी, मानवी मनोरा करणारे वेगळे, हा एवढा गोतावळा मस्तपैकी ग्राऊंड आपल्यात सामावून घ्यायचं. त्यात १५ ऑगस्टला असायचा पाऊस.
त्यामुळे या सगळ्या देशभक्तीच्या उत्सवी वातावरणात झेंडा वंदन व्हायला आणि भारताच्या राष्ट्रध्वजातून फुलं आणि ढगातून पाऊस पडायला बरोबर एक वेळ व्हायची. त्यानंतर मग विद्यार्थ्यांच्या रांगा पांगायच्या, एकमेकांतलं एक-एक हातचं अंतर कमी व्हायचं. मला तर वाटतं हे राष्ट्रध्वजातून विखुरल्या गेलेल्या फुलांच्या पाकळ्या आणि लाल किंवा पांढऱ्या रिबीनची फुलं असलेली डोकी यांच्यात बरंच साधर्म्य आहे. हे सगळं माझ्या वेळचं.
आई सांगते, की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ती शाळेत असताना मुली मेंदी काढायच्या. आपला स्वातंत्र्य दिन आहे ही बाबच मुळी स्वतःत एक वेगळा उत्साह घेऊन येते. आता ७५ वर्षांनीही या गोष्टीचं अनन्यसाधारण महत्त्व आहेच; पण आई-वडील शाळेत असताना आपलं स्वातंत्र्य ताजं होतं तेव्हाचा तो काळ किती उत्साही असेल! वातावरण किती उत्फुल्ल असेल!! देशभक्तीपर गीतात हे सगळं किती सहज येत असेल या साऱ्याची कल्पना करतानाही काळाच्या त्या अवकाशात हळूच मनोमन डोकवावं वाटतं.
याच स्वातंत्र्यदिनाच्या आसपासच्या परिघात माझ्याच शाळेच्या काळात अजून जरा डोकावलं, तर मला आता भारी गंमत वाटते ती बेसूर गाणं गायलं तरीही कौतुकाने लहान असताना इतरांनी ऐकलेल्या माझ्या आवाजातल्या देशभक्तीपर गीतांची.
ऑगस्टच्या दोनतीन तारखेला हे गाणं बसवण्याचं फर्मान आमच्या शाळेत निघायचं, जोवर ग्रुप साँग होतं तोवर ठीक, मला आपलं माईकच्या आजूबाजूचीच जागा असायची. त्यामुळे मला ही १५ ऑगस्ट- २६ जानेवारीची गाणी आवडायची. काही तास बुडायचे, आपल्या वर्गातल्या सोडून इतर वर्गातल्या मुला-मुलींशी ओळख व्हायची म्हणून मला हे सगळं छान वाटायचं.
आपल्याला गाणं येत नाही, तरी गाण्यात घेतात यामागचं कारण शोधल्यावर समजलं, या गाण्यांमध्ये उत्तम पाठांतर आणि गैरहजर न राहणारे विद्यार्थी यांना अधिक प्राधान्य होतं. या मेरिटवर मी एकदम टॉपला म्हणून मी गाण्यात असायचो. या ग्रुपचा भाग असण्याआधी एक-दोनदा मी चक्क एकटीने देशभक्तीपर गीतं गायली होती.
पप्पांच्या हिरव्या डायरीत ‘हा देश माझा’, ‘माझा देश हा’, ‘दीप-दीप जोडकर एक सूर्य बन’ ही गाणी होती. पप्पांची ही अतिशय आवडती आणि सतत ओठांवर असणारी गाणी. लाईट गेल्यावर त्यांच्या मागोमाग ते ही गाणी आमच्याकडून म्हणून घ्यायचे. म्हणून ती पाठ झाली होती.
एकूणच पाठांतराचा नसलेला ताण हे मी गाणं गाण्याचं महत्त्वाचं कारण, हे पुन्हा इथे अधोरेखित होऊन जातं. मी अशी एकटीने गायलेली गाणी, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात अचानक आलेला पाऊस, त्याने झालेला थोडासा पचका, ताटकळलेले सगळेच आणि तरी एकटीला माईक हवाच म्हणून नेटाने त्या-त्या दिनाचं औचित्य साधून केलेलं भाषण, हे सगळं पार आमच्या चाळीच्या बाहेरपर्यंत ऐकू यायचं.
मग वाण-सामानाचं दुकान असलेला अनिल, त्याची आई माझ्या आईला सांगायची, आपकी लडकी माईक पर अच्छा बोलती हैं आणि मग हळूहळू माझं मला आणि इतरांना कळू लागलं, की मला गाता येत नाही, पण सभाधीटपणे बोलता येतं, म्हणून बोलण्यासाठीच माईक हातात येऊ लागला. स्टेशनं मागे पडत जावीत तसं गाणं वाढत्या वयाबरोबर मागे पडलं आणि गाता न येण्याची खंत कायमची मनात रुतून बसली.
मला कायम वाटत आलंय माणसाला जी गोष्ट जमत नाही, येत नाही, झेपत नाही, कळत नाही तिचा रियाज तो मानसिक पातळीवर अव्याहतपणे करत राहतो. गाता, नाचता न येणारी माणसं अशीच असतात. कुठल्याशा एका क्षणी त्यांना त्यांच्या आवडत्या गाण्यातली हरकत जमून जाईल, मुखडा गुणगुणता येईल या आशेने मनात गाणं म्हणणारी.
आनंदाच्या क्षणी बेभान होऊन अचूक गिरकी घेता येईल या आशेने कल्पनेत आपण नृत्य करतोय, गिरकी घेतोय असं चित्र रंगवणारी. वरवर दिसत नसलं तरी ही अशी कला अवगत नसलेली माणसं स्वतःपुरती फार खंतड असतात. अमुक एक गोष्ट येत नाही म्हणून स्वआनंदासाठीही ती करू न देणे, सफाईदारपणे जमत नाही म्हणून त्या माध्यमातून व्यक्त होऊ न देणे हे चूक आहे.
अशाने माणसांची कुचंबणा होते. कमीपणाची भावना मनात घर करून राहते. सुदैवाने भारतात स्वातंत्र्याची व्याप्ती ही देशस्वातंत्र्य ते व्यक्तिस्वातंत्र्य एवढी व्यापक आहे. तरीही आपल्याकडे माणसांची कलेच्या माध्यमातून व्यक्त होण्याची भूक मात्र तशीच अर्धीमुर्धीच राहून जाते. गावंसं वाटणं, नाचावं वाटणं या खूप आदिम प्रेरणा आहेत.
सफाईदारपणा नसल्याने या माध्यमातून व्यक्त न होऊ शकणारी किती तरी माणसं आपल्या बाजूला आहेत. या स्वातंत्र्यदिनी अशा जवळच्या एका माणसाला मोकळेपणाने अभिव्यक्त होण्यासाठी प्रोत्साहन देऊ या. शेरेबाजी न करणारा नवा भवताल घडवायला घेऊ या.
आपल्या अशा वागण्याने गाणं बेसूर असलं तरी जगण्याचा सूर एखाद्याला सापडूच शकतो; हालचालीत डौलदारपणा नसला, तरी एखाद्याच्या ग्रेसफुल होण्याच्या प्रवासाला सुरुवात होऊ शकते आणि खऱ्या अर्थाने सूर तेच छेडीता नवं गीतही नक्कीच उमटू शकतं.
vishakhavishwanath11@gmail.com
(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या साहित्यिक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.