युवा हैं हम..!

कोलकात्याला जाण्याच्या लांबच लांब प्रवासात मला कुहू नावाची छोटी मैत्रीण भेटली. साधारण रायपूरला ती ट्रेनमध्ये चढली आणि तेव्हापासून तिने निरनिराळ्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
Young generation
Young generationSakal
Updated on

- विशाखा विश्वनाथ

जे जे रूढ आहे ते मानावं की त्यात बदल करावा हा पिढी-दर पिढी चालत आलेला झगडा आहे. समतेच्या वाटेने जाणं आणि अन्याय होईल तिथे एल्गार करणं, हे युवकांचं ध्येय आहे.

कोलकात्याला जाण्याच्या लांबच लांब प्रवासात मला कुहू नावाची छोटी मैत्रीण भेटली. साधारण रायपूरला ती ट्रेनमध्ये चढली आणि तेव्हापासून तिने निरनिराळ्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तिने मला विचारलं, क्या आपको पता हैं एक ऐसा पेड हैं जिसे काटते ही खून आता हैं? उस पेड का नाम बताईए... यातल्या खून शब्दावर तिचा विशेष भर होता.

अर्थात झाड कापल्यावर रक्त येतं या गोष्टीने तिला आकृष्ठ केलं असणार; पण तरी तिने वापरलेला खून शब्द डोक्यात घोळत राहिला. तिने तातडीने गुगल व्हॉईस सर्च करून मला ते झाडही दाखवलं आणि मग खिडकीतून दिसणारी माणसं आणि वास्तूंविषयी ती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत राहिली... तिच्या प्रश्नांमध्ये जात-धर्म यांचा प्रामुख्याने समावेश होता आणि त्या त्या धर्माचा देव आणि त्यांची धर्मस्थळं यांचाही.

तिच्या मते, ‘प्रत्येकाची धर्मस्थळं वेगळी, मग देव वेगळेच. एकाने दुसऱ्याच्या देवाचं नाव काढायचं नसतं आणि देवळातही जायला मनाई असते.’ हे सगळं तिच्या डोक्यातून कायमचं काढून टाकण्यासाठी प्रवासातला वेळ पुरेसा नव्हता. तरी तिला आम्ही सांगत राहिलो, देव एक असतो. माणूस आशेवर जगतो आणि आशावादी राहण्यासाठी, आपला एक कुणी तारणहार आहे किंवा एक अशी अदृश्य शक्ती आहे जी आपल्यावर लक्ष ठेवून असते, अशा विचाराने आपल्याला धीर मिळतो... हे सगळं समजण्याचं तिचं वय नव्हतं.

खरं तर हे आपल्याला कळायला किती वेळ गेलाय हेही तेव्हाच लक्षात आलं. बाल्यावस्थेतून, तारुण्यात येत असतानाचे अनेक गोंधळ असतात. त्यातला हा, आपुला-तुपला, आपली जात, आपला धर्म, आपला देव हे सारं कळत जाण्याचा आणि मग प्रश्न येतो जे समजलंय ते अंगीकारावं की नाकारावं, हे ठरवण्याचा. फक्त याच बाबतीत असं नाही. जे जे रूढ आहे ते मानावं की उधळून लावावं, त्यात बदल करावा हा पिढी-दर पिढी चालत आलेला झगडा आहे.

ही गोष्ट देशभरातून या वर्षी पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या २३ लेखकांच्या बोलण्यातून सातत्याने जाणवत राहिली. कारण या लेखकांना माणूस म्हणून सर्वांना मिळणारी समान वागणूक आणि प्रत्येक राबणाऱ्या हाताला किमान वेतन, सर्वच प्रकारच्या ज्ञानशाखांना समान महत्त्व या बाबी इतर अनेक गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाच्या वाटत होत्या.

युवा पुरस्कार प्राप्त लेखक म्हणून जेव्हा जेव्हा आम्हाला संबोधलं गेलं तेव्हा तेव्हा ‘युवा हैं हम’ या वाक्याने आम्हाला तारुण्यातल्या सळसळत्या उत्साहापेक्षा सध्या परिस्थिती आणि भविष्यातील आव्हाने याबाबत सावध केलं. युवा लेखक म्हणून किंवा देशाची तरुण पिढी म्हणून आमच्या लिखाणातून वास्तव, कल्पना, संशोधन, समाजस्वास्थ्य या सगळ्याच बाबींचा उल्लेख नवलेखकांनी करावा किंवा युवा पिढीला या सगळ्याचं भान असावं ही कायम मागच्या आणि समकालीन पिढीतील माणसांकडून असलेली अपेक्षा आमच्याकडूनदेखील आहेच, याचं भान आम्हा सर्वांना होतं.

तरीसुद्धा या भान आणि कर्तव्यासोबतच आम्हाला म्हणून जाणवणारे आमच्या पिढीचे प्रश्न जरा निराळे होते. अपेक्षांच्या ओझ्यासोबतच आमचं आपलं म्हणून एक भावविश्व आहे आणि त्यातले बदल, त्यावर असलेला पूर्वसुरींचा प्रभाव, बदलती कौटुंबिक मूल्यं, जागतिकीकरण याचबरोबर जात, धर्म आणि पंथाइतकंच लिंग या सगळ्या बाबतीतलं आमच्या पिढीचं वेगळं आकलन साहित्यात दिसावं, असावं म्हणून असलेली आमची धडपड वेगळी आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास आणि संसाधनांची मर्यादित उपलब्धी, तापमानातील वेगाने होणारे बदल या सगळ्याच गोष्टींमुळे आजचे आम्ही चिंतेत होतो. एकीकडे सण, उत्सव, समारंभ आणि सोहळे या सगळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च होणारा पैसा आणि दुसरीकडे रस्तोरस्ती सर्वदूर पसरलेलं दारिद्र्य या दोघांतला विरोधाभास आमच्यातल्या प्रत्येकाला बोचणारा होता. मणिपूरचा लेखक मित्र मनोगत व्यक्त करताना ‘मी सुरक्षित नाही’ इतकं म्हणून थांबला तेव्हा प्रत्येकाच्या काळजात काही तरी जोरदार हललं होतं.

तरुणांचा देश असणाऱ्या देशात या वर्षाचा युवा पुरस्कार प्राप्त करणारे लेखक आताच्या युवा पिढीचं प्रतिनिधित्व करतायत, असं मानलं तर अन्न, वस्त्र, निवारा, उत्तम पर्यावरण, लेखक असलो तरी खिसा कायम गरम राहील, अशी शाश्वती देणारी कायमस्वरूपी नोकरी आणि आपलं म्हणणं मोकळेपणाने लिखाणाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचं स्वातंत्र्य इतक्या बेसिक गोष्टी आम्हाला हव्या होत्या.

देव आणि दानव यांनी समुद्र मंथन केलं तसंच ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ गटातल्या ध्रुवीकरणातून लेखक जन्माला आले. आम्ही त्यांच्यातीलच एक असलो तरी आम्हाला फक्त तेवढ्यापुरतचं मर्यादित राहायचं नाही, ही जोरकस इच्छा आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे. जात, धर्म, पंथ, लिंग हे काहीही असलं तरी प्रत्येकाच्या शरीरातल्या रक्ताचा रंग लाल आहे आणि म्हणून आपण सगळे एक आहोत. रक्ताची ही अशी ओळख देशातल्या युवांना अभिप्रेत आहे.

माणुसकी हा एकच धर्म मानणं आणि माणसात देव पाहणं हे इतकं आम्हाला कळतंय. समाजमाध्यमं वा निरनिराळ्या आर्थिक-सामाजिक स्तरात नानाविध करणांनी निर्माण होणारी तेढ वा प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं ध्रुवीकरणही आम्हाला मान्य नाही. उलट ते मिटवून समतेच्या वाटेने जाणं आणि अन्याय होईल तिथे एल्गार करणं, हे आमचं ध्येय आहे.

vishakhavishwanath११@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.