- विवेक देबरॉय, saptrang@esakal.com
विश्वामित्र हे जनक राजाकडं गेले होते, इथपर्यंतचा कथाभाग आपण मागील लेखामध्ये पाहिला. विश्वामित्रांबरोबर राम आणि लक्ष्मणही होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना राम आणि जनकाकडील धनुष्याची कथा माहिती आहे. पण, मी वाल्मीकी रामायणात जशी कथा सांगितली आहे, ती इथं सांगतो यामध्ये पूर्वी माहिती नसलेले वर्णन कदाचित वाचायला मिळेल.
राजा जनक म्हणाला, ‘‘माझ्याकडं असलेलं धनुष्य आणि ते इथं का ठेवलं आहे, ती कथा आधी ऐका. देवव्रत नावाचा प्रसिद्ध राजा होता. निमीच्या वंशातला तो सोळावा होता. (निमी हा जनकाचा पूर्वज होता. त्यानेच विदेह किंवा मिथिलेत राज्याची स्थापना केली.) शिवशंकरानं देवव्रतावर विश्वास ठेवत त्याच्याकडं आपलं धनुष्य सांभाळण्यास दिले.
पूर्वी, दक्षाच्या यज्ञात विध्वंस करताना उग्ररूप धारण केलेल्या रुद्रानं अत्यंत संतापाने आपलं धनुष्य उंचावून आव्हान दिलं होतं, ‘‘देवांनो ! मला या यज्ञाचा हविर्भाग मिळण्याची अपेक्षा होती, पण तुम्ही माझा विचारच केला नाही. त्यामुळे मी माझ्या या सामर्थ्यशाली धनुष्याचा वापर करून तुमची मस्तकं धडावेगळी करतो.’
शिवाचा राग जेव्हा शांत झाला, तेव्हा त्यानं हे अप्रतिम धनुष्य आमच्या पूर्वजांकडं विश्वासाने सोपविलं. नंतर एकदा मी माझ्या शेतात नांगरणी आणि शुद्धी करत असताना मातीत घुसलेला नांगराचा फाळ वर येत असताना त्याबरोबर भूमीतून जी बाहेर आली, तिला आता सगळे सीता म्हणून ओळखतात. (नांगराच्या फाळामुळे जमिनीवर पडलेला चर असा ‘सीता’ या शब्दाचा अर्थ आहे.) ती जमिनीतून वर आली असल्याने माझी कन्या म्हणूनच तिचं पालनपोषण झालं आहे.
कोणाच्याही गर्भातून तिचा जन्म झालेला नाही आणि म्हणूनच ही युवती वीर्यशुल्का आहे.’’ आपल्याला वाटतं, की सीतेसाठी स्वयंवर झाले होते. खरं तर तसं नाही. स्वयंवर हा असा सोहळा असतो जिथं युवती स्वत: (स्वयम्) उपस्थित इच्छुकांमधून तिच्यासाठी पतीची (वर) निवड करते. वीर्यशुल्का ही असा प्रकार असतो ज्यामध्ये जो इच्छुक वर सर्वाधिक शौर्य (वीर्य) दाखवेल, त्याला युवती सोपविली जाते. शुल्क म्हणजे मूल्य.
जनक पुढे म्हणाला, ‘‘जमिनीतून वर आल्याने ही माझी मुलगी म्हणूनच वाढली आहे. तिचे पाणीग्रहण करण्यासाठी अनेक राजे आले. मात्र, आलेल्या कोणत्याही राजाला मी माझ्या कन्येचा हात सोपविलेला नाही. मी वीर्यशुल्का पद्धतीनेच कन्यादान करणार आहे. त्यामुळेच सर्व राजे येथे जमा झाले. हे सर्व जण आपल्या शौर्याचे प्रदर्शन करण्यासाठी मिथिलेत आले. धनुष्य उचलून दाखविण्यातच त्यांचे शौर्य तपासले जाईल. अर्थात, त्यांच्यापैकी कोणीही अद्यापपर्यंत धनुष्य हलवू अथवा उचलू शकलेले नाही.’
राजा पुढं म्हणाला, ‘‘ हे महर्षि ! या सर्व योद्ध्यांच्या अंगात फारच थोडं शौर्य असल्याचं मला समजलं आहे. त्यामुळंच मी त्या सर्वांनाच नकार दिला आहे. यामुळे सर्वच राजे संतापलेले असून त्यांच्या शौर्यावर शंका उपस्थित केली असल्याने त्यांनी मिथिलेला वेढा दिला. आपल्याला कमी लेखले गेल्याचे त्यांना वाटले. त्यामुळेच संतापाच्या भरात त्यांनी मिथिलेला वेठीस धरले.
या गोष्टीला संपूर्ण एक वर्ष उलटून गेल्यानंतर अडचणी येण्यास सुरुवात झाली. धान्यसाठा आटत चालला. याच कारणामुळे मी अत्यंत व्यथित झालो आणि माझ्या पुण्याच्या जोरावर अनेक देवांना मी प्रसन्न केले. माझ्यावर संतुष्ट झालेल्या देवांनी मला चार प्रकारचे सैन्यबळ दिले.
त्यांच्या मदतीने मी त्या दुष्ट बुद्धीने वागणाऱ्या भित्र्या राजांना, ज्यांनी माझ्या शौर्यावर संशय घेतला होता, मारून टाकले आणि चहूदिशांना त्यांच्या मंत्र्यांसह पळवून लावले. मी ते अत्यंत तेजस्वी धनुष्य रामाला आणि लक्ष्मणालाही दाखवतो. हे ऋषिवर! रामाने त्या धनुष्यावर प्रत्यंचा चढविली, तर अयोनिज असलेली माझी कन्या सीता मी या दशरथपुत्राला सोपवेन.’
रामाला ते धनुष्य दाखविण्यास विश्वामित्रांनी राजाला सांगितलं. हे ऐकताच जनक राजानं आपल्या मंत्र्यांना ते अत्तरगंधित आणि फुलांनी सजविलेले दैवी धनुष्य आणण्याची सूचना मंत्र्यांना दिली. राजाज्ञेनंतर मंत्र्यांनी नगरीमध्ये प्रवेश केला आणि धनुष्य घेऊन ते परत आले. पाच हजार धष्टपुष्ट आणि पुण्यवान पुरुषांनी आठ चाके असलेल्या पेटीत असलेले ते धनुष्य कसेबसे राजासमोर आणले.
धातूच्या पेटीत ठेवलेले ते धनुष्य आणल्यानंतर मंत्र्यांनी राजाला तशी वर्दी दिली. राजा म्हणाले, ‘हे ब्रह्मन् ! हेच ते सर्वोत्तम धनुष्य आहे. आमच्या पूर्वजांपासून याला पुजलं जात आहे. अत्यंत शूरवीर राजांनाही हे धनुष्य हाती घेऊन लक्ष्यवेध करता आलेला नाही. अनेक देव, असुर, राक्षस, गंधर्व, यक्ष, किन्नर किंवा अवाढव्य नागांनाही ते शक्य झालेले नाही. तर मग एखाद्या पुरुषाला हे धनुष्य उचलणं, त्याला प्रत्यंचा लावणं, बाण चढविणं आणि लक्ष्यभेद करणं कसे शक्य होणार आहे?’ विश्वामित्र राघवाकडे पाहून म्हणाले, ‘राम ! पुत्रा, धनुष्य उचल.’
महर्षिंचे हे शब्द ऐकल्यानंतर रामाने धनुष्य ज्यामध्ये ठेवले आहे, ती धातूची पेटी उघडली. त्याने धनुष्याकडे पाहिले आणि म्हणाला, ‘‘हे ब्रह्मन् ! या सर्वोत्तम धनुष्याला माझ्या हातांनी स्पर्श करण्याची माझी इच्छा आहे. हे धनुष्य उचलण्याचा आणि लक्ष्यवेध घेण्याचा मला प्रयत्न करायचा आहे.’’ राजा आणि ऋषींनी अनुज्ञा दिली.
ऋषींची आज्ञा मिळताच, रामानं अत्यंत सहजपणानं धनुष्याच्या मध्यावर पकड घट्ट करत ते उंचावलं. हजारो डोळे रामावर खिळले असताना या रघुवंशी राजपुत्रानं धनुष्याला अत्यंत सहजपणे प्रत्यंचा लावली. त्या शूरवीरानं एक टणत्कार केला आणि नेम साधला. त्याबरोबर धनुष्याचे मधूनच दोन तुकडे झाले. वादळाचा प्रचंड गडगडाट व्हावा, तसा मोठा आवाज झाला. पर्वतांनाही हादरवून सोडणारा प्रलयकारी भूकंप झाल्यासारखे सर्वांना वाटलं.
जनक म्हणाला, ‘हे परमेश्वरा ! मी दशरथपुत्राचे शौर्य माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. सीतेला जर दाशरथी पती म्हणून राम प्राप्त झाला, तर माझी कन्या जनकवंशाचं नाव उजळवून टाकेल. ती वीर्यशुल्का म्हणूनच दिली जावी, अशी मी प्रतिज्ञा केली होती.
तुमची परवानगी असेल तर माझ्या मंत्र्यांना रथात बसून अयोध्येला जाऊ दे. दशरथाला सुमधुर शब्दांनी प्रसन्न करून त्याला इकडे घेऊन येऊ दे. माझ्या मंत्र्यांना दशरथाला सर्व काही सांगू दे, वीर्यशुल्काच्या पद्धतीनं झालेल्या या प्रकाराचीही माहिती त्याला समजू दे.’
विष्णूच्या अवतारानं शिवाचं धनुष्य मोडलं, याची नोंद घ्या.
(लेखक हे पुराणे आणि वेद तसेच भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
(अनुवाद : सारंग खानापूरकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.