हवामान बदल दूर राहिला नसून, तो आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत.
- डॉ. प्राक्तन वडनेरकर
पृथ्वीवर हजारो वर्षांपासून हवामान आणि पर्यावरण यांचा निसर्गनियमांप्रमाणे समतोल राखला जात होता; परंतु औद्योगिक क्रांती आणि एकूणच माणसाच्या विकासासाठी खूप झाडे आपण तोडायला सुरुवात केली. लोकसंख्या वाढली, प्रदूषण वाढले आणि शहरे सुजायला लागली.
त्या विकासाच्या घोडदौडीत निसर्गाचा समतोल मात्र माणसाने बिघडवला. आता त्याचेच परिणाम तापमानात वाढ, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपाने आपण पाहत आणि अनुभवत आहोत.
हिवाळ्यात लावावा लागणारा कूलर-एअर कंडिशन, अवकाळी येणारा पाऊस, ४०-४५ डिग्रीपर्यंत जाणारे तापमान हे काही आपल्याला नवीन नाही. आता हवामान बदल दूर राहिला नसून, तो आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत.
कॅनडामध्ये आलेली उष्णतेची लाट, सौदी अरेबियामध्ये आलेला पूर, ऑस्ट्रेलियात लागणारे वणवे हेदेखील त्याचाच भाग आहे. जगासमोर असलेलं हवामान बदल हे सर्वात मोठं आव्हान असून, त्याचा परिणाम समाजातील सर्व स्तरांवर दिसून येत आहे.
अनेक संशोधक वाढणारे तापमान, वितळणारी हिमशिखरं-हिमनद्या, सतत येणारी वादळं, पूर, दुष्काळ आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ याचा संबंध हरितवायू उत्सर्जनाशी लावतात. त्याचा परिणाम आपल्याला कमी-जास्त प्रमाणात जगाच्या सगळ्या कोपऱ्यात, भारतात आणि महाराष्ट्रातही दिसून येतो. या वातावरण बदलाचा तुमच्या-माझ्यावर आणि महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
आज कार्बनडायॉक्साइड (CO2), मिथेन, ओझोन आणि पाण्याची वाफ हे हवेत नसते, तर आपली पृथ्वी ही ३० डिग्रीनी आजपेक्षा थंड असती. म्हणजेच काय तर पृथ्वीवरील तापमान नियंत्रित ठेवण्यात या वायूंचा मोठा वाटा आहे.
एकूण वातावरणातील या वायूंच्या प्रमाणातील बदलाचा पृथ्वीवरील तापमानावर परिणाम होतो. आयपीसीसी (इन्टरगव्हर्मेंटल पॅनेल ऑन क्लॅमेट चेंज)च्या रिपोर्टनुसार १८८०-२०१२ या काळात पृथ्वीचे तापमान ०.८५ डिग्रीनी वाढले, जे मुख्यतः कार्बनडायॉक्साइडसारख्या हरितगृह वायूंच्या अतिउत्सर्जनामुळे झाले, असे अभ्यासक मानतात.
बर्फात अडकलेल्या हवेच्या अभ्यासावरून चार लाख वर्षांपूर्वीपर्यंत हवेत कार्बनडायॉक्साइडचे प्रमाण किती असावे, याचा अंदाज बांधता येतो. त्यानुसार हे कार्बनडायॉक्साइडचे प्रमाण हिमयुगानंतर १८०-२८० पीपीएम इतके होते, जे आज ४०० पीपीएम एवढे वाढले आहे.
मागील १५० वर्षांत जीवाश्म तेल (Fossil fuel), वृक्षतोड आणि जमिनीवरील वापराच्या बदलामुळे हवेतील कार्बनडायॉक्साइडचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले आहे. या कार्बनडायॉक्साइडमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे.
त्यामुळे पाण्याची वाफ जास्त होऊन हवेत बाष्पाचे प्रमाणही वाढत आहे. त्याचा एकूण परिणाम म्हणजे पृथ्वीवरून उत्सर्जित होणारी ऊर्जा वातावरणात अडकते. यासाठी कारणीभूत ठरतात हवेतील वाढलेले बाष्प आणि कार्बनडायॉक्साइड.
त्याचबरोबर वाढलेल्या तापमानामुळे ध्रुवीय आणि हिमालयातील बर्फ वितळण्यास काही दशकांपासून सुरुवात झाली आहे. २० हजार वर्षांपूर्वी पृथ्वी जेव्हा हिमयुगातून बाहेर आली, तेव्हा प्रत्येक हजार वर्षांमागे १ डिग्री सेल्सिअस तापमान वाढीचे प्रमाण होते, पण मागील १२० वर्षांच्या आतच जगाचे तापमान १ डिग्री सेल्सिअसने वाढले आहे.
भारताचा विचार करता हे सरासरी तापमान १९०१-२०१० या ११० वर्षांच्या काळात ०.६ डिग्रीने वाढले आहे. दिसताना हा आकडा जरी छोटा दिसत असला, तरी तो हवामानाची व्यवस्था बिघडवण्यासाठी पुरेसा आहे.
भविष्यातील हवामान बदलाचा अंदाज बांधण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे हवामान मॉडेल्स वापरले जातात. २१व्या शतकाच्या शेवटपर्यंत भारताचे सरासरी तापमान हे २-४ डिग्रीने वाढेल, असा जवळपास सगळेच मॉडेल अंदाज वर्तवतात. याचे परिणाम नक्कीच व्यापक आणि विनाशकारी आहेत, हे आपण अनुभवत आहोतच.
भारत हा अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा हरितगृह वायू उत्सर्जित करणारा देश आहे. लोकसंख्येची घनता जास्त असल्याने हवामान बदलाचे परिणाम विशेषतः आपल्या देशात गंभीर आहेत. देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात उष्णतेच्या लाटेची वारंवारता आणि तीव्रता वाढली आहे.
उदाहरणार्थ, २०१६मध्ये, भारताने पश्चिमेकडील राजस्थान राज्यात ५१ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद केली. अशा उष्णतेच्या लाटांचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. २०००-२००४ आणि २०१७-२०२१ या वर्षांमध्ये उष्माघाताने होणाऱ्या मृत्यू दरामध्ये ५५% वाढ झाली आहे. २०२२ मध्ये जवळपास ९० लोकांनी भारतामध्ये आपले प्राण या तापमानवाढीने गमावले.
या हवामान बदलाचा परिणाम पावसावरतीही झालेला दिसतो. एकूण भारतात सरासरी पावसामध्ये जरी फारसे बदल दिसत नसले, तरी क्षेत्रीय भागामध्ये हे विशेष दिसून येतात. मध्य भारतात अतिवृष्टीचे दिवस (म्हणजेच प्रतिदिवस १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस) यात पन्नास टक्क्यांची वाढ झाली आहे.
याविरुद्ध मागील ५० वर्षांत केरळमधील पावसाचे प्रमाण हे कमी झाले असून, कमी अधिक प्रमाणात छत्तीसगढमध्ये असाच बदल दिसून येत आहे. ही सगळी उदाहरणे दाखवतात की, भारतात पुराबरोबर दुष्काळ येण्याचे प्रमाणही वाढले आहे.
त्याचबरोबर प्रशांत महासागरातील पाण्याचा म्हणजेच ‘अल निनो’ आणि ‘ला निनो’चाही परिणाम भारतातील पावसावर म्हणजेच मान्सूनवर होतो. त्याचबरोबर हवेतील एरोसोल्सचा परिणामही पडणाऱ्या पावसावर होतो. औष्णिक विद्युतनिर्मिती करत असताना सल्फर डायॉक्सिडचे एरोसोल्स हवेमध्ये मिसळतात आणि हवेचे तापमान कमी करतात, त्याचा परिणाम पाऊस कमी होण्यात होतो.
बदलत्या हवामानामुळे मान्सूनचा अंदाज बांधणे अधिक अवघड झाले आहे. ज्यामुळे शेती, ऊर्जा आणि पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होत आहेत. भारतातातील शेती अजूनही मान्सूनवर अवलंबून आहे. मागील काही वर्षांपासून असे दिसून आले आहे की, अति पाऊस काही दिवसात पडल्यानंतर, पाऊस दडी मारतो. त्यामुळे जरी मध्य भारतात येणाऱ्या पुरामध्ये वाढ झाली असली, तरीपण एकूण सरासरी पावसाचे प्रमाण मात्र कमी झाले आहे.
महाराष्ट्रातील हवामानाचा मागील काही दशकांचा अभ्यास करता हे लक्षात येते की, जून ते सप्टेंबर या वेळात एकूण महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसात बदल झाला नसून, एकदा पाऊस पडून गेला की नंतर पाऊस न पडण्याच्या कालावधीत बदल झाला आहे. जूनमध्ये काही पावसाच्या तुरळक सरी येऊन गेल्यानंतर जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पाऊस रजा घेतो.
हे मागील दशकापासून तुम्हीही अनुभवले असेल. वातावरणामुळे गरम झालेली हवा जास्त बाष्प शोषून घेते आणि ते धरून ठेवते. त्यामुळे खूप काळ पाऊस होत नाही; पण जेव्हा पाऊस होतो तेव्हा ते बाष्प पाऊस होऊन एका ठिकाणी अतिवृष्टी होते, तर दुसऱ्या ठिकाणी दुष्काळ.
महाराष्ट्राला अरबी समुद्राचा ७२० किलोमीटरचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. आयपीसीसीच्या रिपोर्टनुसार ग्लोबल वॉर्मिंगमुळे तयार झालेली ९०% उष्णता समुद्रात शोषून घेतली जाते. समुद्रावरील गरम वातावरणामुळे कमी दाबाचे प्रदेश तयार होतात आणि वादळे निर्माण होतात.
शक्यतो ही वादळे अरबी समुद्रात पावसाळ्याआधी मे ते जून आणि मान्सून झाल्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात तयार होतात. दोन दशकापूर्वी अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान बंगालच्या उपसागराच्या मानाने कमी असल्याने, तेवढी वादळे अरबी समुद्रात निर्माण होत नसत.
१८८१ ते २००० दरम्यान बंगालच्या उपसागरात ३०८; तर अरबी समुद्रात ४८ वादळे निर्माण झाली. सरासरी अरबी समुद्रात एक वादळ प्रतिवर्ष व्हायचे; परंतु २०१८ मध्ये एकाच वर्षात अरबी समुद्रात तीन वादळे निर्माण झाली. २०१९ मध्ये हा आकडा वाढून पाच झाला. हे फक्त वादळे निर्माण होण्याची संख्येपुरते मर्यादित नसून त्या वादळांची तीव्रतादेखील वाढली आहे. अशाच २०२१ मध्ये आलेल्या तौक्ते नावाच्या तीव्र वादळाने महाराष्ट्रात १२ लोकांचे जीव गेले.
समुद्रातील पाण्याच्या तापमान वाढीचा परिणाम मान्सूनच्या सर्क्युलेशनवर झाला असून त्यामुळे हवामानाचा समतोल बिघडत आहे. २०१४ मध्ये केल्या गेलेल्या अभ्यासात असे लक्षात आले की एकूण अरबी समुद्राच्या तापमानात ०.७ डिग्रीने वाढ झाली आहे. हे जमिनीवर वाढलेल्या हरितवायूंच्या उत्सर्जनामुळे होत आहे, यात शंका नाही. त्यामुळेच महाराष्ट्राचा पश्चिम किनारा जास्त धोक्यात आला आहे आणि महाराष्ट्रातील वातावरणावर परिणाम होत आहे.
हवामान बदलाच्या समस्येचे निराकरण हे एकट्यादुकट्याचे काम राहिलेले नाही. त्यासाठी सर्व क्षेत्राकडून सामूहिक कृती आवश्यक आहे. या हवामान बदलापासून होणारे नुकसान कमी करायचे असल्यास कार्बन डायऑक्सिडच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर हरितगृह वायूंच्या उत्सर्जनातही कमालीची घट आणावी लागेल, तर कुठे आपण हे तापमानवाढीपासूनचे होणारे नुकसान कमी करू शकू. आता हा क्रिकेटमधली कसोटी सामना राहिला नसून, तो टी-२०चा झाला आहे.
मित्रांनो, हा निसर्ग आपल्या सर्वांची माउली आहे. माउलीची सेवा कराल, तर २८ युगे भगवंतदेखील विटेवर उभा राहतो, असं म्हणतात. निसर्गरूपी माउली वाट बघत आहे, चला तर मग तिची सेवा करूयात... झाडे लावूया, संवर्धन करूयात, प्रदूषण कमी करूयात, महाराष्ट्राला, देशाला आणि जगाला कार्बन न्यूट्रल करूयात.
(लेखक आस्ट्रेलियात पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.