‘वेब’च्या कोपऱ्यातून
सुदर्शन चव्हाण
chavan.sudarshan@gmail.com
भारताच्या कानाकोपऱ्यात निर्माण होणारे, फारशी चर्चा नसणारे; पण सहजी उपलब्ध असणारे सिनेमे अन् वेब मालिकांवर प्रकाश टाकणारं ‘वेबच्या कोपऱ्यातून’ पाक्षिक सदर आजपासून सुरू करत आहोत. चित्रपट अभ्यासक सुदर्शन चव्हाण या सदरातून भारतातील विविध भाषांमध्ये, वेगवेगळ्या विषयांवर होणारं धमाल काम तुमच्या समोर आणणार आहेत.
आपल्याच मराठीत निर्माण झालेली; पण फारशी चर्चा न झालेली एक वेब मालिका म्हणजे ‘लंपन.’ नुकतीच ‘सोनी लिव्ह’वर ती दाखल झाली.
लहान मुलांना वाचायला, बघायला देण्यासारखं काय आहे; असा प्रश्न सतत विचारला जातो. किमान ओरड असते, असंही म्हणू शकतो; पण त्याच वेळेला या विषयाबद्दल तितकंच औदासीन्यही आहे. आजच्या पिढीत येता येता हा प्रश्न अजूनच मोठा झाला आहे; कारण ‘वेब’च्या जंजाळात सगळेच सगळं काही पाहू शकतात. सगळे तेच मिम्स आणि तेच रील्स पाहतात. आई-वडिलांसोबत मुलंही टीव्हीवर त्याच दैनंदिन मालिका बघत आहेत. मग त्यांच्यासाठी अजून वेगळं निर्माण करण्याची गरज आहे का, असाही प्रश्न विचारला जातो; पण प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येकाला आवडणारं काही ना काही तयार होऊ शकण्याच्या काळात मुलांनीच काय चूक केली आहे की त्यांच्या भावविश्वाला जवळचं वाटेल, असं काही का निर्माण होऊ नये? त्यालाच योग्य उत्तर म्हणून समोर येते निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित आणि चिन्मय केळकर लिखित ‘लंपन’ वेब मालिका.
प्रकाश नारायण संत यांची ‘लंपन’ या मुलाबद्दलची चार पुस्तकांची शृंखला कुमार साहित्यात मराठीतली एक मैलाचा दगड समजली जाते. ते कुमार साहित्य आहे का? की मोठ्या माणसांना लहानपण आठवायला लावणारी कलाकृती आहे? असाही एक स्वीकार्य??
प्रश्न विचारला जातो; पण त्यापलीकडे जात ते लिखाण महत्त्वाचं आहे हे मात्र सर्व जण एकमताने मान्य करतील.
‘लंपन’ ही महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एका गावात आजी-आजोबांसोबत राहणाऱ्या मुलाची गोष्ट. त्याचं गाव उठून दिसेल, असं वेगळं नाही. त्याची परिस्थिती, त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनाही तितक्याच अतिसामान्य आहेत; पण त्याच वेळेला हा लहान मुलगा त्याकडे कसं बघतो त्याने संपूर्ण गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. लंपनची बाल निरीक्षणं, ती तितक्याच वेगळ्या (मॅड) शब्दात मांडण्याची त्याची हातोटी ही त्या पुस्तकांची वैशिष्ट्यं. हाच बाज मालिकेत आणताना त्याला थेट प्रेक्षकांशी संवाद साधताना दाखवणं ही उत्तम क्लृप्ती निर्मात्यांनी इथे वापरली आहे. म्हणजे प्रत्यक्ष घटनेइतकीच त्या लहान मुलाची त्याबद्दलची निरीक्षणं, त्याची मतं यात त्या लिखाणाची सगळी मजा लपली आहे. मालिकेत लंपन जेव्हा प्रेक्षकांशी बोलतो तेव्हा तो जो विचार करतोय तो थेट प्रेक्षकांपर्यंत तर पोहोचतोच; पण समोरच्या पात्रांना कळत नाही; ही मजा मालिकेतही छान उतरली आहे. (फ्लिबॅग येण्याआधी दहा वर्षांपूर्वी या साधनाचा वापर इतक्या सढळ हाताने केला जायचा का, हा प्रश्न त्यानिमित्ताने पडला.)
लहान किंवा वाढत्या वयात येणाऱ्या; पण न कळणाऱ्या अनेक भावना ही मालिका एक एक करत छान हाताळत जाते. आई-वडिलांपासून वेगळं आजी-आजोबांकडे राहताना लंपनला त्यांची लागणारी ओढ. गाव बदलल्यानंतर त्याच्या बालमनात येणारे विचार. हा एक मुख्य धागा तर इथे राहतोच; पण त्याच वेळेस त्याचं सतत हरवलेलं असणं, त्याच्या जगात घडणाऱ्या भूताखेतांच्या गोष्टी. मित्रांबद्दलची समज वाढत जाणं आणि मोठं होत असताना विरुद्ध लिंगी व्यक्तीसोबतचं आपसूक तयार होणारं नातं अशा अनेक गोष्टी मालिकेच्या सात भागांत येत जातात.
लंपनच्या लेखनाचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यातील भूगोल आणि भाषा. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कथानक. त्यामुळे शेजारच्या लहान पोराने आज आपल्यात जेवण करून जावं तसे वाक्यात सहज कानडी शब्द डोकावून जातात. (अगदी कसलंही वैर न घेता) आणि कानडीमिश्रित मराठीचा हेल तर आहेच. आपल्याकडे मराठीत कोकणाचा उदो उदो झालेला असताना हा बदल आणखी चांगला वाटतो. या वेगळ्या भाषेचा गोडवा मालिकेत छान अनुभवता येतो.
‘लंपन’ पाहून तिशीच्या वरील बऱ्याच जणांना ‘मालगुडी डेज’ची आठवण आली आणि त्याची एकंदर दृश्यात्मकता पाहिल्यास इथे त्यांनी ते साम्य टाळलं आहे, असंही वाटत नाही. विशेष म्हणजे, त्याही मालिकेत स्वामी स्वतःशी बोलायचा, मनात विचार करायचा हा भाग खूप महत्त्वाचा होता आणि लंपनचं कॅमेऱ्यामध्ये बघून बोलणं त्याची आठवण करून देतं. फक्त स्वामीमध्ये त्याच्या मित्रांची तयार होणारी पात्रं लंपनमध्ये होत नाहीत; पण अशा तुलनेची गरजही नाही. कारण लंपन स्वामीपेक्षा अधिक मनस्वी आणि स्वतः हरवलेला मुलगा आहे. त्यामुळे ‘मालगुडी डेज’ची जी सामाजिक टिप्पणीही (स्वामी मित्रांच्या टोप्यांवरून त्यांचा आर्थिक वर्ग पाहतो, असा एक भाग आठवल्यास लक्षात येईल) ‘लंपन’मध्ये सापडणार नाही; पण ती त्याची कमतरता नव्हे. हरवलेल्या लंपनची मानसिक स्थिती आता काय आहे? त्याला सध्या कशाचा त्रास होतो आहे, हे इथे अधिक महत्त्वाचं आहे.
दुसरी एक जाणवलेली बाब म्हणजे अलीकडे ‘पंचायत’, ‘ये है मेरी फॅमिली’ किंवा ‘पेट पुराण’ या हलक्या-फुलक्या तुल्य मालिकांच्या भागांची रचना बघितली, तर प्रत्येक भागात एक उपविषय आणि संपूर्ण मालिकेला जोडणारा एक विषय अशी रचना असते. ‘लंपन’ तशीच रचना मांडते, असं मात्र म्हणवत नाही. ती एक संपूर्ण सात भागांची कथा म्हणून आपल्यासमोर येते आणि पुस्तकाची रचना अनुसरण्याकडे अधिक लक्ष देते.
‘लंपन’चं सरप्राईज पॅकेज म्हणजे त्यातील गाणी. एखाद्या प्रसंगात अगदी सहज ती येऊन जातात. (विशेषतः साखळी या भागात) आणि वर ती काळ आणि वयसुसंगतही आहेत. राहुल देशपांडे यांचं पार्श्वसंगीतही उत्तम झालं आहे. त्यातला कानडी बाज, वाद्यं दक्षिणेचा छान अनुभव करवून देतात. फक्त काही प्रसंगांमध्ये पार्श्वसंगीताची कमतरता मला व्यक्तिशः जाणवली.
मिहीर गोडबोले आणि बच्चेमंडळीचा अभिनय अगदी सहज चांगला झाला आहे. गावातली इतर मुलेही खूप नैसर्गिक साथ देताना दिसली. गीतांजली कुलकर्णी या कसलेल्या आणि चंद्रकांत कुलकर्णी या अगदीच हंगामी अभिनेत्यांची जोडी जुळवण्याची कल्पना उत्तम कामी आली आहे. कादंबरी कदम हिला मात्र तिच्या उच्चारांसाठी आणि वाचिक अभिनयासाठी वेगळं बक्षीस दिलं पाहिजे, इतका तो सुंदर आहे. (याचा अनुभव मागे ‘थ्री ऑफ अस’मध्येही आला होता.)
मराठीतील कुठली कलाकृती पाहू शकतो, असं जेव्हा अमराठी मित्र विचारतात तेव्हा इथून पुढे त्यांना सांगायला ‘लंपन’ हे खासच नाव झालं आहे. सोनी लिव्हचंही विशेष कौतुक, कारण त्यांनी ‘पेट पुराण’, ‘शांतीत क्रांती’ अशा उत्तम मराठी वेब मालिका पुढे आणल्या आहेत. मराठी टेलिव्हिजन इतर भाषांसमोर तेवढंच ताठ मानेने उभं असताना मराठी सिनेमा आणि वेब मात्र थोडंसं बिचकताना दिसतं. ‘लंपन’ आणि यापुढीलही वेब मालिका मराठी माणसाच्या अशाच स्वशंकेवर उत्तर म्हणून पुढे आल्या तर उत्तमच आहे. मग आपलीच मराठी कलाकृती कोपऱ्यातली म्हणून विशेष उल्लेख करून बघायला लावावी लागणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.