वेस्ट इंडीज आणि माझं काय नातं आहे ते क्रिकेट देवाला माहीत. दरवेळी इथे दौऱ्यावर वार्तांकन करायला आले, की शेवटच्या टप्प्यात अगदी नको नको होतं. कॅरेबियन बेटांवर काम म्हणल्यावर अंगावर काटा येतो. मनात ठरवून टाकतो की हा दौरा शेवटचा. मग काय होते परत जेव्हा भारतीय संघाचा किंवा आयसीसीच्या स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर होतो, तेव्हा मन उचल खाते.
वेस्ट इंडीज मला खुणावायला लागतं. इथल्या हवेत असलेले क्रिकेट, अफलातून निसर्ग आणि अत्यंत गोड माणसं मला आठवतात आणि दौऱ्यावर जायची तयारी सुरू होते. दौऱ्यावर आलो की इथला समुद्र लांबच्या प्रवासाचा थकवा काढून टाकतो.
वेस्ट इंडीज क्रिकेटचे माजी खेळाडू भेटल्यावर प्रचंड आनंद मिळतो. आणि जेव्हा अंतर्गत प्रवास करत काम करायची वेळ येते, तेव्हा ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्याचा विचार करता हा दौरा अगदी नक्की शेवटचा, असे मी परत एकदा स्वत:ला बजावतो.
कॅरेबियन बेटातील एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण म्हणजे अँटीगा. मी गमतीने नेहमी म्हणतो, की या बेटावर इंग्लंडप्रमाणेच लोकशाही आहे आणि राजेशाहीपण आहे. कारण साधे आहे, अँटीगाचा कारभार लोकशाही तत्त्वांनी चालला असला, तरी सर व्हिवियन रिचर्डस् अँटीगा देशाचे अनभिषिक्त राजे आहेत. त्यांना क्रिकेट सम्राट म्हटले तरी काही वावगे होणार नाही.
इथल्या मोटर कारच्या नंबर प्लेटवर नंबराबरोबर लँड ऑफ सन अँड सँड लिहिलेले दिसते. या देशात इंग्लंडच्या राणीनं ‘सर’ उपाधी प्रदान केलेले चार भन्नाट खेळाडू त आहेत... सुदृढ आहेत. सर व्हिव्हियन रिचर्डस्, सर अॅण्डी रॉबर्टस्, सर कर्टली एम्ब्रोस आणि सर रिची रिचर्डसन. भारतीय संघाचा एकच सामना अँटीगाला होता म्हणून फक्त दीड दिवस इथे राहायला मिळाले.
नशीब असे जोरावर होते, की चारपैकी तीन ‘सर’ चार तासांच्या अवधीत भेटले. सचिन तेंडुलकरने दिलेली खास भेट सर व्हिवना देता आली. कर्टली एम्ब्रोस यांना निवांत गप्पा मारत भेटता आले आणि जाताना पुणेरी भेटवस्तू म्हणून चितळेंचा चिवडा आणि सुहानाचे मसाले देता आले आणि अॅण्डी रॉबर्टस् सरांसोबत चक्क रात्रीचे जेवण करता आले.
रॉबर्टस् आणि एम्ब्रोस नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत फलंदाजांचे नव्हे तर गोलंदाजांचे राज्य चालू होते म्हणून बेहद्द खूश होते. दरवेळी टी-२० सामन्यात पाटा विकेट आणि गोलंदाजांची धुलाई असे का दिसावे... कधीतरी मदत करणार्या विकेटवर गोलंदाज फलंदाजांचा प्रश्न विचारतात ते बघायला जास्त मजा येते.
मोठ्या धावफलकाचे सामने बघताना कंटाळा येता आणि अटीतटीचे कमी धावसंख्येचा सामने बघताना धमाल येते. मला असेच क्रिकेट आवडते ज्यात बॅट आणि बॉलचे युद्ध बघायला मिळते, अॅण्डी रॉबर्टस् आणि कर्टली एम्ब्रोस म्हणाले.
सर रिचर्डस् वेस्ट इंडीज संघाच्या खेळावर नाराज होते. एक काळ असा होता, की विंडीजच्या तरुण खेळाडूंना क्रिकेटमधून पुरेशी आमदनी होत नाही म्हणून ते मेहनत करत नव्हते. आता टी-२० क्रिकेटच्या जमान्यात चांगले क्रिकेट खेळू शकणार्या प्रत्येकाला भरपूर सामने खेळायला मिळतात आणि चांगलेच पैसे मिळतात. मग कष्ट करायला, खेळात सुधारणा करायला आणि विंडीज क्रिकेटसाठी तन-मन-धन लावून खेळायला काय अडचण आहे, मला सांगा, सर व्हिव पोटतिडकीनं म्हणाले.
बार्बाडोस म्हणजे विंडीज क्रिकेटचा आत्मा समजला जातो. फ्रँक वॉरेल, इव्हर्टन विक्स्, क्लाइड वॉलकॉट या ३ डब्ल्यूज् पासून ते गॉर्डन ग्रिनीज, डेसमंड हेन्स, वेसली हॉल, चार्ली ग्रिफिथ, माल्कम मार्शल आणि जोएल गार्नर सोबत क्रिकेटचे मेरुमणी सर गारफील्ड सोबर्स बार्बाडोसचे. वर नमूद केलेल्या संघाला जगातील कोणताही संघ पराभूत करू शकेल का मला सांगा. शक्यच नाही. आता परिस्थिती वेगळी आहे.
अवघ्या एकेचाळीसव्या वर्षी कॅन्सरच्या आजारानं देवाघरी गेलेल्या माल्कम मार्शल यांच्या चिरनिद्रेच्या जागी कोणी फिरकत नाही. युनिव्हर्सिटी ऑफ थ्री डब्ल्यूज ला गेल्यावर फ्रँक वॉरेलच्या समाधी स्थळावरची जळमटं बघून काळीज तुटते. त्यांनी मांडून ठेवलेले दोन मोठे विचार ताम्रपटाच्या रूपाने इथे दिसायचे ते उचकटून कोणीतरी काढून नेलेले बघून प्रचंड खंत वाटली. वाईट या गोष्टीचं वाटलं की कोणाचेच हा वारसा जपण्याकडे लक्ष नाही.
जेव्हा विंडीज क्रिकेटचे असे हाल का होत आहेत, असे विचारता वेगळीच कहाणी समजली. सेंट ल्युसियासारख्या निसर्गसुंदर बेटावर १५ ते १९ वर्षांखालच्या गटात अत्यंत गुणवान खेळाडू असल्याचे रेक्स परेरा सारखे जुने जाणते क्रिकेट पत्रकार सांगतात. मग ही मुले पुढे का येत नाहीत, असा प्रश्न विचारता ते म्हणाले, होत काय की १५ ते १९ वर्षांखालच्या गटात खेळताना ही मुले मस्त चमक दाखवतात.
जरा मोठे झाले की क्रिकेटमधून अर्थाजन योग्य प्रकारे होईल का... आपल्याला कुटुंबाची जबाबदारी क्रिकेट खेळून पेलता येईल का हा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकतो. मग ही मुले क्रिकेट खेळणे कमी करून काही ना काही काम करून पैसे कमावून कुटुंबाची गरज बघू लागतात. म्हणून सेंट ल्युसिया वयोगटातील क्रिकेट स्पर्धा जिंकते आणि नंतर खूप मागे पडते, रेक्स परेरांनी अगदी डोळ्यात पाणी आणून कहाणी सांगितली.
भारताच्या इंग्लंड समोरच्या उपांत्य सामन्याच्या आदल्या दिवशी गयानाचे पंतप्रधान मार्क फिलिप्स यांनी सुनील गावसकरांचा सत्कार केला. सुनील गावसकरांवर विंडीजचे लोक किती प्रेम अजूनही करतात हे त्या वेळी स्पष्ट दिसून आले. काहीही बदलले नाही रे इथे, माणसे, घरे, परिस्थिती ५० वर्षांपूर्वी जशी होती तशीच आहे, सत्कारानंतर भारावलेले सुनील गावसकर म्हणाले. अगदी खरे आहे.
क्रिकेट सामन्यांच्या वेळी टीव्ही प्रक्षेपणात कॅरेबियन बेटांवरचे दृश्य खूप सुंदर दिसते. प्रत्यक्षात निसर्ग खरंच अफलातून आहे. पण इथली परिस्थिती आहे तशीच आहे. ना इथे दळणवळणाची चांगली साधने आहेत ना मोठे रस्ते. ना प्रवास करायला भरपूर विमानांचे पर्याय, ना अर्थकारणाला बळकटी येईल असे कामधंदे.
हातात कन्फर्म केलेले विमानाचे तिकीट असले तरी ते विमान कधीही रद्द होते. फोन, इंटरनेट सुविधा कधीही चालतात, कधीपण बंद पडतात. प्रवास असो वा राहणे, खाणे असो वा फिरणे प्रत्येकाला भरमसाठ पैसे मोजावे लागतात. परिणामी कॅरेबियन बेटांवर यावेसे वाटते आणि जास्त काळ इथे काम करताना अगदी नाकी नऊ येतात.
क्रिकेट वार्तांकनासाठी भरपूर प्रवास केला आहे. असे करताना माझी एक अंधश्रद्धा आहे, की मी कोणत्याही देशाचे पैसे संपूर्णपणे खर्च करून टाकत नाही. खोलवर मला असे वाटते की थोडे का होईना त्या त्या देशाचे पैसे ठेवले की तो देश मला परत नक्की बोलावेल. या वेळी टी-२० वर्ल्डकपच्या वार्तांकनाच्या निमित्ताने मला कॅरेबियन बेटांवर आलो. खूप काम आणि खूप मज्जा केली.
एक नक्की आहे, या वेळी इथला प्रवास करताना, काम करताना आलेल्या प्रचंड अडचणींनी निराश झालो. दौरा संपताना आणि हा लेख मांडताना परत इथे यावे का नाही समजत नाहीये. कॅरेबियन बेटांचा निरोप घेताना मनात विचार येतोय, की या बेटांवरचे पैसे मी थोडे ठेवू का नको? खरंच मी द्विधा मन:स्थितीत सापडलो आहे हो. काय करू समजत नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.