- जुही चावला मेहता
रोज सकाळी हातात वर्तमानपत्र घेतल्यावर मुंबईचे हवामान कसे खालावत चालले आहे, हवेची गुणवत्ता कशी आणि किती बिघडली आहे, या आणि अशाच प्रकारच्या बातम्यांनी दिवसाची सुरुवात होत आहे. आता फटाके वाजवणार, त्यातून पुन्हा प्रदूषण होईल.
आपल्या आजूबाजूला बिघडलेल्या हवेचे करायचे काय, या प्रश्नाने आपणा सर्वांनाच अस्वस्थ केले आहे... आपण जे करतो आहोत त्याचे परिणाम आपल्याला आता जरी जाणवत नसले, तरी आपल्या मुलांना आणि भावी पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. याची जाणीव होणे गरजेचे आहे...
वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे।
पक्षीही सुस्वरे आळविती।।१।।
येणे सुखे रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष अंगी येत।।२।।
आकाश मंडप पृथिवी आसन।
रमे तेथें मन क्रीडा करू।।३।।
कथा कमंडलू देह उपचारा।
जाणिवतों वारा अवसरू।।४।।
संत तुकाराम महाराजांच्या वरील अभंगातली पहिली ओळ पर्यावरण रक्षणाचा खोल भावार्थ सांगणारी आहे. सतत घड्याळाच्या काट्यावर आपण धावतो आहोत, विकासाच्या नावाखाली निसर्गाची आपण पूर्णपणे वाट लावली आहे... आणि या सतत होणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार कोण, असा प्रश्न आपण एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारतो आहोत, नाही का?
मी आज मुद्दाम थोडासा विषय बदलून तुमच्याशी बोलणार आहे. कारणही तसेच आहे. रोज सकाळी हातात वर्तमानपत्र घेतल्यावर मुंबईचे हवामान कसे खालावत चालले आहे, हवेची गुणवत्ता कशी आणि किती बिघडली आहे,
एक्यूआय सुधारण्यासाठी महापालिका काय पर्याय वापरणार आहे किंवा किती बिल्डर्सना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे श्वसनाचे, सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ, या वातावरणाचा ज्येष्ठ नागरिकांना जास्त धोका, या आणि अशाच प्रकारच्या बातम्यांनी दिवसाची सुरुवात होत आहे.
साधारण महिन्याभरापूर्वी सकाळी उठून टेरेसवर गेले की निळाशार समुद्र दिसायचा; पण गेले काही दिवस त्या समुद्राने जणू प्रदूषणाची चादर पांघरली आहे की काय, असे जाणवते. योगा करायला गार्डनमध्ये बसले, तर ताजी हवा तर दूरच... धुरक्याने भरलेली हवा आजूबाजूला विळखा घालून बसलेली असते.
मला खात्री आहे, हा अनुभव तुम्हालासुद्धा येत असेलच. आपल्यापैकी प्रत्येकाला या धुळीचा त्रास होत आहे आणि आपण सोशल मीडियावर या येणाऱ्या बातम्या पोस्ट करतो आहोत. रोज सकाळी उठून घराबाहेर किती धुरके आहे याचे फोटो टाकतो आहोत; पण आपण स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी काय करतो आहोत, हा प्रश्न विचारतो का?
खरे म्हणाल, तर याचे उत्तर माझ्याकडेही नाही. म्हणूनच म्हटले तुमच्याशी बोलावे, तुम्हाला विचारावे, काय करता येईल? दिवाळी जवळ आली आहे, नाही नाही आलीच की... आता फटाके वाजवणार, त्यातून पुन्हा प्रदूषण होईल ते वेगळे. आज एका वर्तमानपत्रात प्रकाश प्रदूषणाविषयी वाचले. हे आणखी एक नवीन प्रकरण. त्याविषयी निवांत बोलू कधीतरी; पण आता या आपल्या आजूबाजूला बिघडलेल्या हवेचे करायचे काय?
दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ‘दिल्लीच्या वायुप्रदूषणाच्या बातम्या वाचणारे आपण स्वतः याला बळी पडलो आहोत. यावर उपाय म्हणून काय करता येऊ शकते, याविषयी तुम्हीदेखील विचार करत असाल; पण काही सोप्या गोष्टी करून आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी नक्कीच घेऊ शकतो.
तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगणार आहे, त्या साध्या, सोप्या आणि आपल्या घरात सहज उपलब्ध असतील, अशाच आहेत. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यावर खवखवणाऱ्या घशाला आराम मिळतो. आल्याचा चहा प्या किंवा जास्त खोकला झाला असेल, तर आल्याचा रस, मध आणि काळी मिरीसह घ्या.
खोकल्यावरील उपचारांमधला हा सर्वात प्रभावी उपाय आहे; पण आल्याचा चहा जास्त पिऊ नका, कारण त्यामुळे पोटदुखी किंवा छातीत जळजळ होऊ शकते. एका भांड्यात गरम पाण्यात निलगिरी तेलाचे काही थेंब टाका आणि वाफ घ्या, यानेही फायदा होतो. एक ग्लास पाणी उकळून त्यात पाच-सहा तुळशीची पाने, किसलेले आले आणि गुळ घालून चांगले उकळा आणि ते प्या. हा काढा रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी मदत करतो.
माझी योग शिकवणारी शिक्षिका मला नेहमीच सांगायची की, घरात एसी लावण्यापेक्षा झाडे लावावीत. एसी कृत्रिमरीत्या हवा थंड करतो, तर झाडे नैसर्गिकरीत्या ऑक्सिजन तयार करतात आणि घरातील वातावरण थंड ठेवण्यास मदत करतात. घरातले प्रदूषणदेखील कमी करायला मदत करतात. काही झाडे आपल्याला २४ तास ऑक्सिजन पुरवतात.
स्नेक प्लांट घराच्या आतील हवा शुद्धीकरण करण्यासाठी फायदेशीर ठरते. स्नेक प्लांट विषारी घटक अर्थात विषारी प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. हानिकारक विषारी पदार्थ शोषून ते काढून टाकण्याची क्षमता यामध्ये आहे.
अरेका पाम ही वनस्पती हवा शुद्ध करते आणि अनेक रोगांपासून बचाव करते. ते कार्बन मोनोऑक्साइडसारखे विषारी वायू काढून हवेतील आर्द्रता टिकवून ठेवते.
कोरफड (एलोवेरा) घरातील हवा शुद्ध करण्याचे काम करते. एवढेच नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. ते त्वचा आणि केसांसाठीही खूप चांगले आहे.
हिंदू धर्मात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. तुळशीला ‘क्वीन ऑफ हर्ब्स’देखील म्हणतात. सर्दी-पडसे हा खूपच साधा आजार आहे. पण तुळशीच्या मदतीने तुम्ही त्यावर उपचार करू शकता. तुळशीतील अॅंटीस्पास्मोडीक घटक सर्दी-पडशापासून मुक्तता मिळवून देतात.
आपल्या सर्वांच्याच घरी मनी प्लांट आढळते. मनी प्लांटचे रोपटे कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन ऑक्सिजन सोडते आणि हवेतील प्रदूषणाची पातळी कमी करते.
कडुलिंबाच्या झाडाचे अनेक औषधी फायदे आहेत. याच्या आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी असते, कारण ते प्रदूषणरोधक आहे. घरी जरी कडुलिंबाचे झाड लावता आले नाही, तरी आपल्या घराच्या जवळपास नक्की लावा.
ही सगळीच झाडे आपल्या सर्वांना परिचित आहेत. ही झाड तुम्ही तुमच्या घरी किंवा घराबाहेर लावू शकता. मला असे मनापासून वाटते की निसर्गाला मदत करण्याचा, त्याला प्रेम आणि आदर देण्याचा हा एक मार्ग आहे आणि त्या बदल्यात निसर्ग तुम्हाला ऑक्सिजन देतो, तुम्हाला निरोगी जीवन जगायला मदत करतो. यासाठी एसी लावून अतिरिक्त प्रदूषण करायची गरज नाही.
या काही टिप्स आहेत, ज्या मी वाचल्या आहेत, माझ्या मित्रपरिवारांकडून ऐकल्या आहेत. त्या कदाचित तुम्हालाही माहिती असतील. आणखी काही खास टिप्स तुमच्याकडे असतील, तर त्या मला जरूर कळवा.
मी तुम्हाला नेहमीच सांगत आले आहे, आपण जे करतो आहोत त्याचे परिणाम आपल्याला आता जरी जाणवत नसले, तरी त्याचे गंभीर परिणाम आपल्या मुलांना आणि भावी पिढीला भोगावे लागणार आहेत. आपल्या पूर्वजांनी आपल्याला एक निरोगी वातावरण दिले होते; पण आपण मात्र विकासाच्या नावाखाली आपल्या मुलांसाठी प्रदूषणाचा महापूर तयार करतो आहोत.
आता जे काही सुरू आहे, जे काही वातावरणात-हवामानात बदल होताना दिसत आहेत, जाणवत आहेत, त्याला आपणच जबाबदार आहोत आणि हीच योग्य वेळ आहे काहीतरी बदल घडवून आणण्याची.
एका माणसाला १०० झाडे लावणे शक्य होणार नाही; पण त्यासाठी जर १०० माणसे एकत्र आली आणि त्या प्रत्येकाने एक झाड लावले, तर हे सहज शक्य आहे. सहज सुचले म्हणून मी झाडाचे उदाहरण दिले. खरे सांगायचे तर या प्रदूषणाशी लढण्यासाठी मी एकटी काही करू शकत नाही. त्यासाठी तुम्ही सगळे जर एकत्र माझ्यासोबत आलात, तर आपण नक्कीच काहीतरी बदल घडवून आणू शकतो... तुम्हाला काय वाटते?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.