गेल्या सहा भागांमध्ये आपण लैंगिकता म्हणजे काय, लैंगिकता सुदृढ होण्यासाठी लैंगिकता संस्कार या सगळ्यांवर विवेचन केले. या स्तंभाचे नाव आहे प्रणयानुभूती. प्रणय म्हणजे काय आणि खऱ्या अर्थाने प्रणयानुभूतीकडे वळण्यापूर्वी प्रेम म्हणजे काय याचा ऊहापोह करणे आवश्यक आहे.
मानवाला आपल्यावर कुणी प्रेम करावं आणि आपणही कुणावर तरी प्रेम करावं ही नैसर्गिक भावना असते. ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणतात की, प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. यातील साहित्याचा भाग सोडला. तर प्रत्येकाचे प्रेम हे वेगवेगळेच असते. त्यासाठी आपण वैज्ञानिकदृष्ट्या प्रेम ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करू. प्रेम ही मूलभूत मानवी भावना आहे. त्याचे कोडे पूर्णपणे सुटले असेही आपण म्हणू शकत नाही. पण, तरीही काही प्रश्न आपणास पडतात की, लोक प्रेमात का पडतात, काही व्यक्ती खूप जास्तच का आवडतात, अनेकदा प्रेमाची भावना अतिशय तीव्र असते तर बऱ्याचदा ती लवकरही विरून जाते, असे का होते?
तर एका मानसशास्त्रज्ञाने प्रेमाचे तीन मूलभूत घटक आहेत असे सांगितले आहे. त्यापैकी प्रेमाचा पहिला घटक म्हणजे अटॅचमेंट त्यास मराठीत ओढ असेही म्हणू शकतो. ही ओढ शारीरिक-मानसिक-भावनिक असते. त्या व्यक्तीशी बोलणे, त्या व्यक्तीचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. शिवाय त्या व्यक्तीशी बोलल्यावर मनाला छान वाटते. प्रेमाचा दुसरा घटक म्हणजे केअरिंग म्हणजे काळजी. समोरच्या व्यक्तीबद्दल, त्याच्या आवडीनिवडीबद्दल आपण जागरूक होतो. त्याला काय वाटते, त्याच्या गरजा काय आणि त्या गरजांची पूर्तता करणे म्हणजे केअरिंग होय. प्रेमाचा तिसरा घटक म्हणजे इंटिमसी. त्यास लैंगिक जवळीक असे म्हणू शकतो. म्हणजे आपण त्या व्यक्तीशी आपले लैंगिक विचार आणि इच्छा बोलून दाखवतो आणि त्यांच्या पूर्ततेची अपेक्षाही व्यक्त करतो.
वर चर्चा केलेल्या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्त्री-पुरुषांमध्ये प्रेम आहे, असे म्हणू शकतो. तसे प्रेम हे वेगवेगळ्या नात्यांमध्ये असतेच. बाकी नात्यांमध्ये इंटिमसी(जवळीकता) सोडली तर प्रेम हे असतेच.
एखादी व्यक्ती आपल्याला आवडते की तिच्यावर आपले प्रेम आहे, यातील फरक समजून घ्यायला हवा. एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडते तेव्हा आपल्याला तिचे आपल्या भवताली असणे आवडते, त्याने आपल्यासोबत वेळ घालवला पाहिजे असे वाटते. पण, प्रेम ही किंबहुना त्याहूनही अधिक खोल भावना असते व त्यामध्ये शारीरिक जवळीकीची पण तीव्र इच्छा असते.
आता प्रेम हे दोन प्रकारचे असते. पहिले पॅशनेट लव्ह म्हणजे उत्कट प्रेम आणि दुसरे म्हणजे कंपॅशनेट लव्ह त्यास आपण संवेदनशील अथवा विवेकी प्रेम असेही म्हणू शकतो.
पॅशनेट लव्ह असते, ते आपणास फार चांगले वाटते. म्हणजे जीव द्यायला आणि घ्यायला तयार असतो. मात्र, असे नसते...! जे पॅशनेट लव्ह आहे, त्यामध्ये सगळ्या भावना तीव्र असतात. लैंगिक आकर्षणदेखील तीव्र असते आणि ती व्यक्ती आपल्याला मिळेल की नाही, याची चिंताही तीव्र असते. शिवाय आपल्याला जे वाटते तेच समोरच्या व्यक्तीला वाटावे याचा आग्रहदेखील असतो. त्यामुळे ती व्यक्ती आपल्याला मिळाली नाही तर त्याचा हिंसेतही उद्रेक होतो. प्रेमसंबंधांमध्ये जेव्हा कुठलीही हिंसा आपल्या बघण्यात आली तर तेथे पॅशनेट प्रेम असते.
याउलट कंपॅशनेट प्रेम म्हणजे संवेदनशील अथवा विवेकी. यात दोघांच्याही पॅशन आणि उत्कटता एकत्र आल्या असतात. दोघांना परस्परांबद्दल आदर असतो, आकर्षण तर असतेच पण सोबत विश्वासही निर्माण होतो आणि परस्परांबद्दलचा अर्थबोध (म्युच्युअल अंडरस्टॅन्डिंग) झालेला असतो. यामध्ये भावना तीव्र नसते पण संयमी असते.
प्रेमामध्ये सुरक्षा आणि स्थैर्य दोन्ही हवे असते. उत्कट प्रेमात या सुरक्षा आणि स्थैर्याचा अभाव असतो. भविष्याचा सारासार विचारही नसतो. मात्र, कंपॅशनेट अथवा विवेकी प्रेमाचा पायाच सुरक्षा आणि स्थैर्य होय.
प्रेमाची आणखी एक थेअरी एका मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे. तो म्हणतो की, प्रेमाचे तीन घटक आहेत, इंटिमसी म्हणजे जवळीकता, दुसरं म्हणजे पॅशन त्यास उत्कटता म्हणतात हे आपण वर बघितलेच. आणि तिसरं म्हणजे कमिटमेंट. त्यास बांधीलकी अथवा वचनबद्धता असे म्हणू. आपण इंटिमसी आणि पॅशनबद्दल जाणून घेतले. यातील तिसरी बाब म्हणजे वचनबद्धता. एखाद्या नात्यात राहताना आणि कुणावर प्रेम असताना वचनबद्धता अत्यावश्यक असते. खरं तर प्रेम हे वचनबद्धतेच्या कसोटीवरच तपासल्या जाते. या तीनपैकी किमान दोन बाबी असल्या तर ते प्रेम असते. मात्र, मला वाटते की, प्रेमात वचनबद्धता ही असालाच हवी.
याचमुळे नवीन पिढीतील प्रेमी लोकांना आपले प्रेम हे वरील कसोटींवर तपासून बघायला हवे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.