प्लास्टिक नष्ट करणार कधी?

जिथं पाण्याला जायची वाट हवी तिथं प्लास्टिक जाऊन बसलंय. कचरा उचलणाऱ्या यंत्रणा कचरा टाकणाऱ्यांच्या तुलनेत चिमूटभर आहेत.
Plastic
Plasticsakal
Updated on

- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com

यंदा पाऊसकाळ चांगला आहे. बऱ्याच वर्षांनंतर मृगाचा पाऊस वेळेवर पडलाय. गावकडं पावसाचं पाणी वाट मिळेल तिकडं पळत राहतं. उघड्या नद्या पाण्याला सामावून घेतात पण शहरात मात्र पावसाच्या पाण्याची लोकांनी पूर्णपणानं अगदी नाकेबंदी करून टाकलेली आहे. आभाळातून पडणाऱ्या पाण्याला माहीत नसतं जमिनीवर माणसं कशी राहतात.

जिथं पाण्याला जायची वाट हवी तिथं प्लास्टिक जाऊन बसलंय. कचरा उचलणाऱ्या यंत्रणा कचरा टाकणाऱ्यांच्या तुलनेत चिमूटभर आहेत. त्यात वाऱ्यामुळं एका जागेवरचा कचरा उडत उडत वाटेल तिकडे जाऊन पडतो. शहरातून वाहत जाणाऱ्या वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या नद्यांचं रूपांतर आता गटारीत झालं आहे. त्यातही सांडपाणी कमी आणि प्लास्टिकच जास्त झालंय.

मुंबईच्या गटारातून पाणी कमी आणि कचरा व प्लास्टिकच जास्त वाहत आहे. त्यातला कचरा काढणारे किती आणि त्यात कचरा टाकणारे किती आहेत याचा विचार केला, की मुंबईची तुंबई का होतं याचं उत्तर मिळते. मुंबईत माती शोधून सापडत नाही. पण इथल्या गटारी गुटख्याच्या पुड्या, पाण्याच्या बाटल्या, कॅरीबॅग आणि इतर तत्सम टाकाऊ पदार्थांनीच तुंबतात. ही घाण करणारे आपणच आहोत आणि अशी परिस्थिती झाल्यावर शिव्या घालणारेही आपणच आहोत.

पाणी तुंबण्याची इतरही अनेक कारणं आहेत हे मला माहीत आहे पण त्यापैकी गटारी तुंबणं हेही एक महत्त्वाचं आहेच. कोण म्हणतंय, गटार घाण असते. उलट आपली घाण वाहून नेणारे ते स्वच्छतेचे सर्वांत मोठं साधन आहे. घाण तर माणूस आहे पण बिचाऱ्या गटारी बदनाम होतात. शहरात जेवढी तुमची घरं आणि दुकानं जेवढी महत्त्वाची आहेत तेवढ्याच महत्त्वाच्या गटारी आहेत. हिवाळा आणि उन्हाळ्यात त्यात कोंबत राहायचं आणि पावसाळ्यात मग बोंबलत राहायचं, असं कसं चालेल.

खरंतर प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिल्यावर जेव्हा आपण ती बाटली बेदरकारपणे रस्त्यावर फेकून देत असतो, तेव्हाच मुंबईची तुंबई करण्यास आपला हातभार लागलेला असतो. या पाण्याच्या आणि शीतपेयाच्या प्लास्टिक बाटल्या एकदिवस माणसाला पाण्यात बुडवून मारतील. वर्षभर खाल्लेली चॉकलेट्स आणि चिप्सची रिकामी पाकिटं कुठं टाकली? रिकाम्या पाण्याच्या बाटल्या कुठे फेकल्या? शीतपेयांच्या हिरव्या, लाल, तांबड्या बाटल्या कुठं सोडल्या?

आज गटार तुंबून पाणी रस्त्यावर साचलं की लगेच प्रशासनाला दोष द्यायला आपण रिकामे होतो पण जेवढी जबाबदारी त्यांची आहे, तेवढीच आपलीही असते हे विसरून जातो. घाण साफ करणारे मूठभर आणि घाण करणारे लाखभर असतील तर मग कशी बरं स्वछता होईल. जागेअभावी तुम्ही खड्ड्यात घरे बांधणार, नदीपात्रात अतिक्रमण करून टॉवर उभारणार आणि पूर आल्यावर व्यवस्थेला दोष देणार.

या दहा-बारा वर्षांत मॉलची संख्या दसपट वाढली आहे. पॅकेजिंगच्या क्रेझने चरणसीमा ओलांडली आहे. डोळ्याला दिसेल ती गोष्ट प्लास्टिकमध्ये गुंडाळली जात आहे. घराघरातले डस्टबिन प्लास्टिकने भरून जात आहेत. दूध प्लास्टिकमध्ये, पाणी प्लास्टिकमध्ये, बिस्कीट पुडे प्लास्टिकमध्यये, भाज्या प्लास्टिकमध्ये, चहा प्लास्टिकमध्ये, जेवण प्लास्टिकमध्ये, सजावटीसाठी वापरली जाणारे फुले प्लास्टिकमध्ये, कपडे प्लास्टिकमध्ये आणि सगळी ऑनलाइन शॉपिंग प्लास्टिकमध्येच या सगळ्या वस्तू तुम्ही खाल्ल्या किंवा वापरल्या पण यांना तुमच्या उंबऱ्यापर्यंत वाहून आणलेल्या प्लास्टिकचं तुम्ही नंतर काय केलं ? तर...

या प्रश्नाचं सर्वांचं एकमेव उत्तर येईल की ‘टाकून दिलं.’

जंगलात माणसांपेक्षा जास्त संख्येत प्राणी आणि पक्षी राहतात पण तरीही करोडो वर्षांपासून ते जंगल स्वछ आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना खाण्यासाठी लागणारं अन्न तिथंच उपलब्ध आहे. माणूस प्रगत झाला आणि त्यानं झाडं तोडून तिथं काँक्रिटची जंगलं उभारली.

शहरातील गगनचुंबी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना खाण्याचं साहित्य गावाकडून कंपनीत आणि कंपनीतून दुकानात आणि मग दुकानातून त्यांच्या फ्लॅटमध्ये येण्याच्या प्रक्रियेत प्लास्टिकनं पॅकिंगच्या माध्यमातून मुख्य भूमिका बजावली पण ही सोय करताना माणूस त्या प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावायला विसरला आणि सवयीनं स्वतःच त्या पिशवीत गुंडाळला गेलाय. आता त्याला या पिशवीतून बाहेर काढणं अवघड होऊन बसलंय.

एका सर्व्हेनुसार एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला आपला भारत देश दिवसाला २६ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती करतोय. यापैकी फक्त आठ टक्के प्लास्टिक रिसायकल केले जाते बाकी ९२ टक्के प्लास्टिक तसंच पर्यावरणात पडून राहते.

मुंबई ही जरी महाराष्ट्राची राजधानी असली, तरी ती सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणारी देशाची राजधानी आहे कारण एकट्या मुंबईत दर दिवशी सहा हजार ते नऊ हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो. ही आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, की पुढील १०-१५ वर्षांत जर सरकारनं प्लास्टिकवर काही नियंत्रण नाही ठेवलं तर नागरी वास्तव्य धोक्यात येऊ शकते.

प्लास्टिक पॅकिंग वापरून अब्जावधी रुपयांचा नफा कमावणाऱ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनामुळं पर्यावरणात फेकलं गेलेलं प्लास्टिक रिसायकल करण्यासाठी किंवा ते उचलण्यासाठी किती पैसे खर्च करतात? महानगरपालिका विकासकामांच्या किती टक्के पैसे स्वच्छतेवर खर्च करते? प्रत्यक्ष नालेसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या किती? आणि त्यात घाण टाकणाऱ्या नागरिकांची संख्या किती? भविष्यकाळात प्रशासन आणि नागरिक या दोघांनी जबाबदारीनं वागून प्लास्टिकच्या संकटावर मात करणं ही काळाची गरज आहे, अन्यथा सर्वनाश अटळ आहे.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.