गातील आकाराने सर्वात मोठ्या डायनासोरच्या सांगाड्याचे प्रदर्शन फ्रान्समध्ये भरत असून ते ऐतिहासिक ठरणार हे नक्की. आतापासूनच जगभरातील पर्यटकांना त्याचे वेध लागले आहेत. हे प्रदर्शन म्हणजे जीवाश्म क्षेत्रातील शोध हे आगामी काळात मोठे योगदान देण्यासाठी सज्ज असल्याचे द्योतक आहे. फ्रान्समधील या बहुचर्चित जीवाश्म प्रदर्शनातील लिलावासाठी काही महिन्यांपूर्वीच नोंदणी सुरू झाली आहे. त्यात सहभागी होण्याची दुर्मिळ संधी सर्वसामान्यांना ३ नोव्हेंबरपासून मिळणार आहे. त्यात सर्वाधिक चर्चा आहे ती ‘व्हल्केन’ या डायनासोरच्या जीवाश्माच्या विक्रीची.
‘व्हल्केन’ हा पृथ्वीवर वावर असलेल्या सर्वात महाकाय डायनासोरच्या प्रजातीचे अवशेष असल्याचा संशोधकांचा दावा आहे. अमेरिकेत त्याचे अवशेष आढळले असून त्याचा लिलाव फ्रान्समधील प्रदर्शनाच्या अंतिम टप्प्यात होणार आहे. डायनासोरच्या जीवाश्माच्या आतापर्यंतच्या लिलावाच्या आकड्यांचा विक्रम मोडीत निघेल, असे मानले जात आहे. फ्रान्समधील ऑक्शन हाऊस ‘कॉलिन डू बोकेज’ आणि ‘बार्बारोसा’ ही लिलाव प्रक्रिया हाताळणार आहे. जुलैपासूनच या लिलावाची चर्चा असून पूर्वनोंदणी बोली सुरू झाली आहे. या लिलावासाठी ठरवलेल्या मूळ किमतीच्या तिपटीपेक्षा अंदाजित बोली वाढून ती ११ ते २२ दशलक्ष डॉलरवर (१० ते २० दशलक्ष युरो) गेली आहे.