5 जून, 1984! भारतीय राजकारणाच्या इतिहासामधील एक धाडसी निर्णय याच दिवशी घेतला गेला होता.. त्या धाडसाची किंमतही देशाला मोजावी लागली होती; पण त्याच दिवसामुळे काही वर्षांनंतर पंजाबमधील दहशतवादाचं कंबरडं मोडण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आले.. जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा दहशतवाद मोडून काढण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाईचे आदेश दिले.. आजच्याच दिवशी, 35 वर्षांपूर्वी ही कारवाई सुरू झाली होती!
सुवर्ण मंदिर म्हणजे शिखांसाठीचे सर्वोच्च धार्मिक स्थळ! पंजाबमध्ये त्या कालावधीत फुटीरतावाद जोरात सुरू होता. स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी भिंद्रनवालेने दहशत निर्माण केली होती. पंजाबमधून हिंदू नागरिकांची हकालपट्टी करण्यासाठी भिंद्रनवालेने दहशतीचा मार्ग स्वीकारला. 1984 च्या एप्रिलमध्ये या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली होती.
त्याच कालवधीमध्ये गुप्तचर यंत्रणांचा एक अहवाल केंद्र सरकारपर्यंत पोचला. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारची चिंता कमालीची वाढली. भिंद्रनवालेने त्याच्या समर्थकांना हिंदू नागरिकांची सामूहिक कत्तल करण्याचे आदेश दिले होते. याचे संदेश गुप्तचर यंत्रणांनी पकडले होते. 5 जून रोजी हे हत्याकांड करण्याचा भिंद्रनवालेचा आदेश होता, असे सांगितले जाते. दरम्यानच्या काळात रोज जवळपास दहा-बारा नागरिकांच्या हत्या होऊ लागल्या होत्या. 2 जून रोजी 23 जणांची हत्या झाली होती.
यानंतर सरकारने कडक पाऊल उचलले. पंजाबमध्ये 3 जूनपासून 36 तासांसाठी संचारबंदी लागू झाली. भिंद्रनवाले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला. 4 आणि 5 जून रोजी सुरक्षा यंत्रणांनी सुवर्ण मंदिरातील भाविकांना बाहेर पडण्याच्या सूचना केल्या. भिंद्रनवालेच्या साथीदारांच्या आक्रमक हालचाली गुप्तचर यंत्रणांनी टिपल्या. त्यानंतर लष्कराने अधिक कुमक सुवर्ण मंदिरात धाडली. भिंद्रनवालेशी चर्चा करण्यासाठी एक अधिकारीही पाठविण्यात आला. त्याल शरणागती पत्करण्यासाठी सांगण्यात आले. पण त्या चर्चा अपयशी ठरल्या.
त्यानंतर पाच तारखेला सायंकाळी सात वाजता लष्कराने हल्ला सुरू केला. रात्री दहापर्यंत बहुतांश ठिकाणांवर लष्कराने ताबा मिळविला होता. जोरदार धुमश्चक्रीनंतर दहा जून रोजी दुपारी ही कारवाई संपली. यात नागरिक आणि दहशतवादी मिळून एकूण 493 जणांचा मृत्यू झाला. चार अधिकारी आणि 79 जवानही हुतात्मा झाले.
या कारवाईची मोठी किंमत देशाला मोजावी लागली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गोळ्या घालून हत्या झाली. पण या निर्णयामुळे खलिस्तान चळवळ थंडावली. या चळवळीच्या माध्यमातून पंजाब अस्थिर करण्याचा पाकिस्तानचा डाव होता. तो डाव निष्फळ ठरला. तसेच, पंजाबमधील दहशतवादी कारवायाही हळूहळू थंडावत गेल्या. ऑपरेशन ब्ल्यू स्टारमागे ब्रिटिश सरकारचाही हात असल्याचे आरोप झाले. किंबहुना, काही वर्षांपूर्वीच पुन्हा एकदा असे आरोप करण्यात आले होते. पण केंद्र सरकार आणि ब्रिटिश सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.