स्त्रियांबाबत दुजाभाव आजही काही ठिकाणी पाहायला मिळतो. थोडक्यात सांगायचं, तर जी गोष्ट स्त्रीबद्दल चुकीची आहे ती पुरुषांबाबतही असायला हवी; परंतु तसं होत नाही. मूल झालं नाही तर त्याची जबाबदारी किंवा दूषणं स्त्रीवरच टाकली जातात. समाजात आजही असे प्रकार घडताना दिसतात. म्हणूनच आम्ही सत्यशोधक महिला परिषद सुरू केल्या. त्यातून महिलांसमोर विविध मुद्दे मांडले गेले.
19 समाजातील अनेक प्रथा आपण सवयीच्या म्हणून स्वीकारत असतो, तर बरेचसे सणवार हे सांस्कृतिक उत्सवासोबत त्या वेळी करावयाच्या रीतिरिवाजांशी जोडले गेलेले आहेत. अनेक स्त्रीवादी मंडळी किंवा नेते यांनी समाजातील महिलेच्या स्थानाचं जे विश्लेषण केलं त्यामध्ये सातत्याने अनेक बाबींद्वारे तिचं स्थान समाजात बांधलं गेलं, असं मानतात.
त्याच्यात ते स्त्रीचं स्थान आहे, ती बंधन आणणारी व्यवस्था आहे आणि त्यात पूर्ण व्यवस्थेला ते विरोध करतात, असं नाही; परंतु त्या व्यवस्थेतील काही विषमता असलेल्या गोष्टींना त्यांचा विरोध असतो. त्यातही विशेषतः अंधश्रद्धेतून स्त्रियांना शिकू दिलं जात नाही, अशा प्रथांवर चिंतन होतं किंवा मुलगा-मुलगी कसे जन्मतात, त्यांच्यावरील जबाबदाऱ्यांचे विषय असोत इत्यादी अनेक कारणं स्त्री अत्याचारासाठी निमित्तमात्र ठरलेली आहेत.
स्त्रियांबाबत जो दुजाभाव आहे, त्याच्या कारणांमध्येच त्याचं मूळ आहे का? या प्रश्नाचा आपण विचार करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं, की जगातल्या सर्व देशांमध्ये ‘आई’ या नावाला प्रत्येक भाषेत नाव असलं तरीसुद्धा बऱ्याच वेळा तिच्याच नावाने शिवराळ भाषा वापरली जाते. एखाद्या माणसाला अधिकाधिक अपमानित करायचं असेल, तर त्याच्या आईच्या चरित्रावर बोललं तर त्याच्यामधून तो खच्ची होतो, असा त्यामागचा विचार दिसतो.
दुसरीकडे पतीपासून वेगळी राहणारी स्त्री किंवा वेगवेगळ्या प्रकारे पूर्ण स्त्रीच्या व्याख्या केलेल्या आहेत. अशा भूमिका बदलण्यासाठी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य सर्वांना ज्ञात आहे; परंतु महात्मा फुले समग्र वाङ्मयाची पानं अन् पानं आम्ही सर्वांनी वाचून काढली. काही वेळा तर सामूहिक वाचनदेखील केलं.
त्यामध्ये सत्यशोधक समाजाचा विचार मांडणारं साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यात अनेक श्लोकही समाविष्ट आहेत. त्या श्लोकांमध्ये संत तुकाराम महाराज जशा पद्धतीने एका रोखठोक भाषेत बोलतात-लिहितात तशा पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. सती गेलेली स्त्री असते; पण सता म्हणून पतीने स्वतःचं आयुष्य समर्पित केलेलं आपल्याला कधी दिसत नाही. तसंच सवत दिसते; पण सवत्या स्वीकारार्ह नाही.
म्हणजे थोडक्यात सांगायचं, तर जी गोष्ट स्त्रीबद्दल चुकीची आहे ती पुरुषांबाबतही चुकीचीच असली पाहिजे; परंतु तसं समाजात होत नाही. मूल झालं नाही तर त्याची जबाबदारी किंवा दूषणं सगळी स्त्रीवरच टाकली जातात. तिला टाकून दिलं जातं. समाजात आजही हा प्रकार घडताना दिसतो. मूल नाही ना म्हणून दुसरं लग्न केल्याची संवेदनाहीन कबुलीही दिली जाते.
त्या पार्श्वभूमीवर १९८९, १९९० आणि १९९१ मध्ये सलग तीन वर्षं महात्मा जोतिबा फुले यांची स्मृती शताब्दी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव त्या काळामध्ये करण्याचं ठरवलं. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक महिला परिषदा झालेल्याही असतील; परंतु त्या काळामध्ये आम्ही २५ सत्यशोधक महिला परिषदा घेतल्या.
त्यामधून स्त्रियांसमोर सत्यशोधक समाजाचे विचार त्याचबरोबर स्त्री-पुरुष समानता, बालविवाहाला नकार, परित्यक्ता स्त्रियांचं पुनर्वसन आणि त्यांच्या मुलांचे अधिकार, त्याचबरोबर शेतकरी-शेतमजूर स्त्रियांना न्याय, रोजगार मेळावा इत्यादी प्रकारचे विविध मुद्दे त्या त्या भागांनुसार त्या परिषदांमध्ये मांडले गेले.
सत्यशोधक महिला परिषदांची तीन वैशिष्ट्यं होती. पहिलं म्हणजे, त्या भागातले स्थानिक कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी असो किंवा कोणत्या पक्षाचे आमदार-खासदार असो; त्या सर्वांना आमंत्रित करत होतो. जे कार्यक्रमाला यायला ‘हो’ म्हणतील त्यांची नावं प्रकाशित करून त्यांना बोलण्यासाठी महिलांच्या व्यासपीठावर निमंत्रित करायचो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे, आमची परिषद दोन दिवसांची असायची.
त्यापैकी पहिला अर्धा दिवस उद्घाटनामध्ये महात्मा फुले यांचे विचार, परिषदेचे उद्दिष्ट, परिषदेची भूमिका आणि महत्त्वाचे म्हणजे चर्चेमधून आणि भेटींमधून दिसलेले त्या भागातील महत्त्वाचे स्थानिक प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडत होतो. या परिषदेच्या पहिल्या सत्रानंतर दुपारच्या सत्रात गटचर्चा होत होत्या. वेगवेगळ्या भागांमधून आलेल्या स्त्रियांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर पूर्वतयारीच्या घटकांमध्ये नोंद केलेली असायची.
त्यात पाणी, सामाजिक प्रश्न आणि योजनांबद्दल सहकार्य मिळतं का? पोलिस ठाण्यात वा बँकांमध्ये गेल्यावर येणारे अनुभव, गावात काही अंधश्रद्धा आहेत का? रोजगार काही मिळतो का? काय अडचणी जाणवतात, अशा प्रश्नांवर स्थानिक परिस्थितीनुसार रूपरेषा ठरवली जात होती. या गटचर्चांमध्ये ७०० ते ८०० महिलांची उपस्थिती असल्यामुळे २० जणींचा एक गट केला जात होता.
प्रत्येक गटामधून साधारण १५ ते २० विषय काढले जात असायचे. दुपारच्या वेळी या प्रश्नांवर चर्चेसाठी साधारण एक ते दीड तास दिला जात होता. जेणेकरून गावपातळीवर महिलांना त्यांच्या हक्काची सनद तयार करण्यासाठी मदत होईल. महिलांच्या गटचर्चेतून येणाऱ्या विषयांचे तक्ते केले जात होते. त्यामध्ये एकमेकींनी केलेल्या चर्चेतून तयार केलेली प्रश्नावली असायची. प्रत्येक गटचर्चेसाठी एक सूत्रसंचालक नेमला जात होता.
त्याखेरीज अहवाललेखन करणारी एक व्यक्ती, गटामध्ये चर्चा भरकटणार नाही हे तपासण्यासाठीचा निरीक्षक, इतकेच नव्हे; तर गटातील चर्चा कुठे अडली असेल तर ती कशा प्रकारे पुढे नेता येईल, हे बघणारे तीन-चार निरीक्षकदेखील नेमलेले असायचे. पंधरा-वीस गटांत विविध प्रश्नांवर बोलायचे आणि त्याचा सारांश काढून एका मोठ्या तक्त्यावर लिहायचा.
शेवटी सर्व तक्त्यांवरील मजकूर एका प्रदर्शनाच्या स्वरूपात सविस्तर मांडला जात होता. त्यामुळे मांडलेल्या प्रश्नांचं चांगल्या पद्धतीने अवलोकन करणं शक्य होत होतं. तसंच आपण कुठे आहोत, आपले प्रश्न काय आहेत, याचं अवलोकन करून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना निवेदनं दिली जात होती.
दुपारच्या वेळात गटचर्चा झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा माहितीपर व्याख्यानं होत होती; तर संध्याकाळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमातून महिलांची पथनाट्यं, स्थानिक लोकगीतं, काही वेळेला चित्रपटांवर चर्चा, एखादी नाट्यछटा असा कार्यक्रम होत असे. अशा प्रकारे सत्यशोधक महिला परिषदांच्या माध्यमातून विविध प्रश्नांचा पाठपुरावा तालुका तसेच जिल्हा स्तरावर केला जात असे.
त्यातूनच महिलांच्या हक्काची सनद तयार झाली असून त्याला अंतिम स्वरूप आलं आहे. त्यामुळे सत्यशोधक महिला परिषदा या फक्त महिला परिषदा नसून महिलांची हक्काची सनद तयार करण्यासाठीची एक मोठा महामार्ग आहे. त्यातूनच भविष्यातील महिलांविषयक धोरण तयार करण्यासाठीची नवी दिशा सापडली.
neeilamgorhe@ gmail.com
(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.