अपराधी भावनांतून मुक्ती

स्त्रियांच्या मनावर समाजाचा व कुटुंबाचा दबाव असतो. त्याच्या परिणामामुळे बऱ्याच स्त्रियांच्या मनात प्रत्येक बाबतीत अपराधीपणाची भावना दडलेली असते.
Womens
Womenssakal
Updated on

आजच्या काळातील तरुणींवर नेहमी टीका होते, की त्या विचार न करता निर्णय घेतात. मला असे वाटत नाही. वेगवेगळी मते पडली तर प्रत्येक स्त्री आपले काहीतरी चुकले आहे काय, अशा कल्पनेने अस्वस्थ असते. अपराधी असा किंवा नसा, मनावर त्याचे ओझे असतेच. अशा ओझ्यातून मुक्त होता येणे म्हणजे खऱ्या अर्थाने मानसिक स्वातंत्र्याची सुरुवात असते. स्त्रीशक्ती अपराधी भावनेचे ओझे काढून टाकते तेव्हा परिवर्तनाचे चक्र फिरू लागते.

स्त्रियांच्या मनावर समाजाचा व कुटुंबाचा दबाव असतो. त्याच्या परिणामामुळे बऱ्याच स्त्रियांच्या मनात प्रत्येक बाबतीत अपराधीपणाची भावना दडलेली असते. मग ती दहा-बारा वर्षांची मुलगी असो की पस्तीस-चाळिशीची स्त्री असो. मी जे केले ते बरोबर की चूक, नक्की काय करायला हवे होते, या परिस्थितीत दुसऱ्या स्त्रीने काय केले असते, इत्यादी अनेक प्रश्‍न तिला कायम पडलेले असतात. अशी पूर्वीच्या काळात तरी परिस्थिती होती.

आजच्या काळात तरुण मुलींवर नेहमी अशी टीका होते, की त्या विचार न करता निर्णय घेतात. मला असे वाटत नाही. एक जुने गाणे आहे, ‘अपराध माझा असा काय झाला?’ कुठल्याही गोष्टीमध्ये वादविवाद होवो, मग तो घरातील असो की बाहेरचा... घरात किंवा बाहेर अशी वेगवेगळी मते पडली तर प्रत्येक स्त्री आपले काहीतरी चुकले आहे काय, या कल्पनेने अस्वस्थ असते. त्यातच जर ती भावनाप्रधान असेल तर तिला अधिकच प्रश्‍न पडत असतात. त्याचप्रमाणे दिसणे, त्यावरून ऐकावे लागणारे टोमणे, शेरेबाजी अशा बऱ्याच गोष्टींच्या गुंत्यात स्त्री अडकलेली असते.

महिलांची अशा सामाजिक परिस्थितीत आत्मविश्‍वासाच्या दिशेने वाटचाल सुरू होते, तेव्हा त्यातील पहिले पाऊल म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून जगाकडे आणि स्वतःकडे बघणे हे असते आणि दुसरे पाऊल असते, ते मनातील अपराधी भावना काढून टाकायचे. अपराधी असा किंवा नसा, मनावर त्याचे ओझे असतेच. या ओझ्यातून मुक्त होता येणे ही खऱ्या अर्थाने मानसिक स्वातंत्र्याची सुरुवात असते, याची जाणीव आम्हाला स्त्रियांच्या मनोगतातून झाली.

दर आठवड्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारे स्त्रियांना बोलते करीत होतो. किंबहुना, स्वतःला आलेले अनुभव, स्वतःचे विचार, त्यांना त्या परिस्थितीत काय करावेसे वाटते, याबाबत स्त्रियांनी मोकळेपणाने व्यक्त व्हावे, असा आमचा प्रयत्न असे. व्यक्त व्हायला अवकाश हे माध्यम असते; पण व्यक्त व्हावे कुठे, असा मोठा प्रश्‍न असतो.

घरात बोलावे तर कुणी ऐकून घेणारे असतेच असे नाही. मैत्रिणीशी हितगुज करता येते; पण लग्नानंतर जेव्हा घर बदलते तेव्हा ते करण्यासाठी कुणी असतेच अशातलाही भाग नाही. काही ठिकाणी जावा किंवा आसपासच्या महिला यांच्याशी मैत्री होते; पण ती तात्पुरती आणि गरजेपुरती असते. आजच्या मुली अधिक भाग्यवान आहेत. त्यांच्यासाठी मैत्रीच्या अधिक संधी आहेत.

महिलांबरोबर पुरुषांचीसुद्धा मैत्री होऊ शकते हादेखील विचार हळूहळू रुजत चाललेला आहे. आजही समाजातील मध्यम वर्गातल्या किंवा सामान्य स्त्रियांची परिस्थिती पाहिली तर घरामध्ये लग्नानंतर मैत्रिणी आल्या तर तिचे फारसे कौतुक होत नाही. ‘तू आणि तुझ्या मैत्रिणी’ असे बोलून साधारणपणे तिला हिणवले जाते. काही वेळेला या मैत्रिणी आल्यावरसुद्धा त्यांच्याशी तिच्याविरोधात चर्चा केली जाते.

वेगवेगळ्या कार्यक्रमांत आम्ही निगोसिएशन स्किल म्हणजे संवादकौशल्य याचे अनेक धडे दिले. त्यासाठी अनेक प्रकारचे खेळ तयार केले होते. हे खेळ वेगवेगळ्या सहभागी पद्धतीच्या प्रशिक्षण पद्धतीतून आलेले होते. ते नुसते खेळ नव्हते, तर स्त्रीचे अंतरंग उलगडण्याचे साधन होते.

त्यांच्या मनात खोलवर असणाऱ्या गोष्टी, त्यावरची गटचर्चा, त्या चर्चेमधील मते आणि मग त्या मत-मतांतराचा अर्थ, अशा बऱ्याच गोष्टींतून न बोलणारी स्त्री मुद्द्याला धरून बोलायला लागायची. त्या मुद्द्यामधून एका अर्थाने स्त्रीच्या आत्मविश्‍वासाची, स्त्रीच्या जगण्याच्या संघर्षामधील खरे उत्तर सापडण्याची सुरुवात झालेली असायची. आम्ही कथा आणि कवितांचा उपयोग केला आणि त्याच्यात एक होती शांताबाईंची गोष्ट.

ही शांताबाई म्हणजे अलीकडच्या गाण्यातली नव्हे; तर त्या नावाची एक स्त्री असते. तिची कथा थोडक्यात सांगायची झाल्यास, ती कामावरून घरी जायला निघते. तिची बस चुकते. बस चुकल्यानंतर ती एका ट्रकचालकाकडे लिफ्ट मागते. लिफ्ट घेतल्यानंतर थोड्या वेळाने अंधारामध्ये तो ट्रक घेऊन जातो आणि तिच्यावर बलात्कार होतो. नंतर तिला कुठेतरी रस्त्यात नेऊन टाकतो. सुदैवाने ती जास्त जखमी झालेली नसते.

ती तशीच रडत-पडत घरी पोहोचते. घरी पोहोचल्यानंतर तिला काय करावे, असा प्रश्‍न पडतो. तिचा नवरा तिच्यावर प्रेम करत असतो; पण त्याला जर हे सांगितले तर त्याची काय प्रतिक्रिया होईल, हा विचार तिला भंडावून सोडतो. आता शांताबाई महिला संघटनेला विचारते, की मी आता काय करू शकते? त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येतात. बऱ्याच जणींना वाटायचे, की पतीला तिने सांगायला पाहिजे, तर बऱ्याच जणी म्हणायच्या, की पोलिसांत तक्रार करायला हवी.

काही जणी म्हणायच्या, जर का आपण मानतो की तिच्यावर अत्याचार झाला आहे आणि मग तिची चूक नसताना तिला आत्महत्या करावी, असे का वाटते? अशी काहींची प्रतिक्रिया असायची. अशा वेगवेगळ्या चर्चेतून वेगवेगळी उत्तरे यायची. स्त्रिया मोठ्या प्रमाणात निष्कर्ष काढायच्या की तिने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली नसेल तर ती नोंदवली पाहिजे. पतीला बलात्कार झाल्याचे कळल्यावर त्याची काय प्रतिक्रिया होईल, याच्यावरसुद्धा चर्चा व्हायची.

काही वेळा ही शांताबाई एकटी राहणारी स्त्री, काही वेळेला मुले मोठी असणारी मध्यम वयाची महिला असे. तिच्यावर असा अत्याचार झाल्यानंतर तिने त्यातून मार्ग काढून कसा आत्मविश्वास मिळवला, याचे कधी उदाहरण असे, तर कधी केस स्टडी. कल्पना केलेली असायची, की १५ वर्षांच्या मुलीने अशा स्थितीत काय करायचे? अशा विविध कथांतून अशी घटना झाल्यावर समाजाची काय प्रतिक्रिया असेल आणि त्यातून तिने आत्मविश्‍वास कसा मिळवायचा? या विषयाकडे आम्ही जात असू. अशा प्रकारच्या गोष्टींबरोबरच स्त्रियांचे समूह काम करायला लागतात, तेव्हा एका अर्थाने सामाजिक बदलाचे गतिशास्त्र बदलते.

पीडित महिलांबद्दल प्रेम तयार होते, महिलांत मैत्री होते; पण कधी वादाचे स्वरूप येते. ते वैचारिक वाद असतात. अशा मोठ्या समूहासोबत कामांना गटबाजीचे स्वरूप तयार होते. त्या वेळेला तुझे काम चांगले का, माझे काम चांगले याच्याबद्दल थोडीशी वादावादी होते. आम्ही अशा वेळी विचार व कार्याशी बांधिलकी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कामाची रचना करायचो. त्यासाठी नेहमीच कामाची अदलाबदल करणे हा एक मार्ग उपयोगी वाटला.

त्याचबरोबर आम्ही एक मैत्रिणी म्हणूनसुद्धा खेळ खेळायचो. ज्याच्यामध्ये अगदी अनोळखी बायकांना अर्धा तास गप्पा मारण्यासाठी दिलेला असायचा आणि त्यामध्ये समजा एखाद्या परिषदेला १०० बायका आल्या असतील तर त्यांचे दोन-दोनचे ग्रुप अचानक करायचो. साधारणपणे बायका बसताना जवळजवळ चिकटून बसतात. एकाच गावातून आलेली बाई असते ती स्वतःच्या बरोबरच्या महिलेची पाठ सोडत नाही, इतरांत मिसळत नाही.

अगदी निरक्षर महिला असतील तर अशा वेळी आम्ही गट बनवायला रंगांचा उपयोग करायचो. विविध रंगांचे बायकांचे अचानक ग्रुप करायचे. पिवळ्या रंगाच्या साड्या घातलेल्या बायका आणि लाल रंगाच्या साड्यांतील महिला हा एक मार्ग वापरायचा. त्यांना दोन-तीन प्रश्‍न द्यायचो. तुम्हाला काय खटकते?

तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीचा आनंद होतो? असे साधे प्रश्‍न असायचे. अर्ध्या तासात एकमेकींच्या बोलण्यामध्ये त्या बायकांची चांगली मैत्री होऊन जायची. दोन-तीन वर्षे संघटनेत आलेल्या बायकांमध्ये सुंदर असा सेतू किंवा नेटवर्कदेखील तयार होत असे.

काही वेळानंतर असे परस्पर नेटवर्क सुंदर होते की त्यातून वेगळ्या कामाचे स्वरूप चांगले उभे राहते. परित्यक्ता मुली म्हणजे ज्या एकल महिला आहेत त्यांचे गट करून त्यांच्यासाठी स्त्री आधार केंद्राने निवासी प्रशिक्षण केंद्रे चालवली होती. त्या मुलींनी नंतर असे ठरवले, की स्वयंरोजगारातून तीन-चार मुली तालुक्याच्या ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहायला लागल्या. आज ही गोष्ट विशेष नाही.

१९९० मध्ये विशेष वाटले होते. मोठ्या शहरांत नसून छोट्या-छोट्या म्हणजे नारायणगाव, जुन्नर, राजगुरूनगर या ठिकाणी महिला एकत्र खोल्या घेऊन राहायला लागल्या. मग कोणी नर्स झाली, कोणी अंगणवाडी सेविका झाली... त्यामधून त्यांची वेगळ्या प्रकारची विशेष, छान निकोप मैत्री आणि कुटुंब तयार झाले.

एखादा पक्षी जाळ्यात अडकला असेल तर तो निघू शकत नाही; परंतु सगळे पक्षी मिळून एकत्र येऊन त्यांनी पंख फडफडवले की जाळ्यामधून सुटका होते. त्याप्रमाणेच सगळ्या स्त्रिया आपल्या मनावरचा दबाव आणि त्यातून आपल्या मनावर येणारे ओझे यातून मुक्त व्हायचा विचार करायला लागतात, तेव्हा आपोआप सर्वांमध्ये एक सामूहिक शक्ती संचारते, जिला आपण स्त्रीशक्ती म्हणू शकतो.

ही स्त्रीशक्ती अपराधी भावनेचे ओझे काढून टाकते तेव्हा परिवर्तनाचे चक्र फिरू लागते. बलात्कारपीडित महिलांना असे बोलते करणाऱ्या महिलांच्या स्व-मदत गटातून अनेक महिलांनी न्याय तर मिळवलाच, पण त्यातील काहीजणी आज नेतृत्वही करत आहेत.

neeilamgorhe@gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com