Air Pollution
Air Pollutionsakal

हवा दीन...!

वर्षभरात आपण अनेक दिन साजरे करतो. त्याचा आनंद घेतो. असाच एक अनोखा ‘जागतिक हवा दिन’ दरवर्षी १५ जूनला साजरा होतो.
Published on

वर्षभरात आपण अनेक दिन साजरे करतो. त्याचा आनंद घेतो. असाच एक अनोखा ‘जागतिक हवा दिन’ दरवर्षी १५ जूनला साजरा होतो. हवा असेल तर जीवन आहे... पण आजकालची ‘हवा’ ही सातत्याने बदलत आहे. खरे म्हणजे, आता सर्वच अर्थाने हवा खराब झाली आहे. पहिला पाऊस पडला की मृद्‍गंध येतो. हवा सुगंधी होते. आताशा माती मेल्याने असा मृद्‍गंध येत नाही. हवेतून रोग बरसतो आहे. खरेच हवा ‘दीन’ झाली आहे...

आजकाल फारच ‘दीनवाणे’ दिवस आलेले आहेत. कशाकशाचे दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरे केले जातात, कळतच नाही. परवा घरी लसणाचा घमघमाट होता. सगळे पदार्थ कसे लसणाचे. लसणाची इतकी ‘भेंडी’ करता येते, हे मला त्या दिवशी कळले. ‘आता लसूण खाल्लं पाहिजे; कारण हार्ट पक्कं होतं’ असे वडील सांगायचे. आईला अजिबातच लसूण, कांदा चालायचे नाही. वडिलांना लसणाशिवाय जमायचे नाही.

तरीही त्या दोघांचे कसे काय जमले अन् ते तब्बल सत्तर वर्षांचा संसार करून एका-एकाने परलोकी गेले... म्हणजे मरणानेच त्यांना वेगळे केले. गंमत म्हणजे, दोघेही दीर्घायुषी होते. त्यांना साधा अ‍ॅसिडिटीचाही त्रास कधी झाला नाही. हार्टचा तर अजिबातच नाही. आईने लसूण न खाता अन् वडिलांनी लसूण खात खात आयुष्य घालविले... पण आईला कधीही हार्टचा त्रास झाला नाही अन् लसूण खाऊन वडिलांनाही नाही; पण हार्ट पक्के होते, लसूण खात जा, असे सांगणारे वडील आईपेक्षा हळवे होते...

तर प्रश्न त्यांचा नाही. आज माझे घर इतके लसूणमय का झाले, तेच कळत नव्हते. विचारल्यावर बायकोने असा चेहरा केला की हा माणूस इतका कसा ‘हे’ आहे. आता बायकोच्या या ‘हे’ मध्ये सगळेच येते. यावेळी हा माणूस इतका कसा अपडेट नसतो? असा प्रश्न होता. मी जनरल नॉलेजच्या बाबत बुळा आहे, असे मान्य केल्यावर तिने सांगितले, की आज ‘जागतिक लसूण डे’ आहे.

आता आमच्या वऱ्हाडीत, ‘आता का खासीन लस्सन?’ असे चेष्टेने विचारतात कडकी आलेल्या माणसाला. अशा लसणाचाही जागतिक पातळीवर ‘डे’ पाळला जातो, हे ज्ञान आल्यावर मला आश्चर्य वाटले. विश्वासही वाटला, की एक दिवस जागतिक पातळीवर ‘पेठकर्स डे’ नक्कीच पाळला जाऊ शकतो...

मात्र मला जागतिक घडामोडी माहिती नसतात म्हणून बायकोसमोर माझी हवा टाईट झाली... अरे हो, ‘हवा टाईट होणे’ या वा‍क्प्रचाराने मला हैराण केले. ‘हवा टाईट होणे’चा नेमका अर्थ काय, असा प्रश्न पडला. ही पुन्हा विचारेल की, हवा टाईट होणे, हा वाक्प्रचार कसा सुरू झाला माहिती आहे का? अन् माझे जागतिक पातळीवरचे अज्ञान पुन्हा उघडे पडेल. अशा वेळी माहिती, ज्ञान एकाच ठिकाणी भेटते, ते म्हणजे गुगल! मी मग पटकन् गुगल सर्च केले.

हातात स्मार्ट फोन असल्याने माणूस खूपच स्मार्ट झाला आहे. मी मोबाईलवरच लगेच सर्च मारले. हवा टाईट अर्थ, असे टाकले. आता गुगल प्रत्येक शब्द घेऊ सर्च देतो. त्याने अर्थ म्हणजे पृथ्वी म्हणून काय काय संदर्भ दिले. ‘हवा’ या शब्दाचेही अनेक अर्थ दिले. अगदी ‘हवा’ नावाच्या हॉटेलपासून काय काय... त्यात आले की दरवर्षी १५ जूनला ‘जागतिक हवा दिन’ असतो. लगेच ते मी बायकोला सांगून तिच्यासमोर माझी हवा करून घेतली.

ती लगेच म्हणाली, ‘‘हवा दिन असतोच १५ जूनला, कारण हे पर्यावरणाचे दिवस असतात. ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन असतो, म्हणून मग त्यानंतरच्या दिवसांत पर्यावरणाच्या संदर्भात जे जे काय असेल त्याचे दिवस असतात,’’ असे सांगून बायकोने माझी हवाच काढून घेतली. मी विचार केला, की आपण उगाच खूप हुशारी दाखवल्याची आपल्या डोक्यात हवा भरून घेतली होती. मात्र, मला हा दिवस तसा हवा हवासा वाटला.

घरात तर सगळा लसूण भरला असल्याने अन् तो मला माझ्या आईसारखाच चालत नसल्याने मनात विचार आला, की आता मी काय हवा खाऊन राहू काय? बरे बायकोसमोर हे सांगता येत नव्हते, की मला लसूण इतका चालत नाही. तिच्यासमोर इतके ठाम बोलताना माझ्या तोंडून घाबरल्याने शब्दांच्या ऐवजी हवाच बाहेर पडायची नेहमी. तेवढ्यात ती मला म्हणाली, ‘हा लसणाचा उपमा केला आहे, हवा की नको?’ मी आपला हवा खाऊ का, या विचारात असताना अचानक हवा वेगळ्या उपमेने माझ्यासमोर आली होती.

मी आपल्याच विचारात असल्याने म्हणालो, ‘हवा तर हवीच ना जगायला.’ ‘उपमा हवा, तो पुल्लिंगी आहे. उपमा हवी, कसे होणार?’ असे ती फणकाऱ्याने म्हणाली. एवढा मोठा लेखक आणि याला साधे उपम्याचे लिंग नाही कळत, असा तिचा आविर्भाव होता. तसे ती पुटपुटलीही. त्यातही मला बरे वाटले, की चला किमान ही आपल्याला मोठा लेखक समजते. मी म्हणालो, ‘‘हो, आहेच माझी लेखक म्हणून हवा मराठी जगात...’

‘हवेत राहू नका... तुम्ही खूप लिहिता अन् तुमच्या लेखनाच्या वाऱ्यालाही कुणी उभे राहत नाही त्या अर्थाने मी तुम्हाला मोठा लेखक म्हणाले...’ तेव्हा मात्र माझ्या फुग्यातली हवाच निघून गेली. मला वाटले, की आतावर हवेतच रेघोट्या ओढत होतो लेखनाच्या नावाने. मग मी तिला म्हणालो, ‘मी जरा बाहेर मोकळ्या हवेत जाऊन येतो. घरात एकदम ढाब्यावर असावी तशी हवा आहे.’

ती म्हणाली, ‘बाहेर नाही अन् कुठेच नाही, मोकळी हवा नाहीच. मोकळ्या हवेतील हवा केव्हाच निघून गेली आहे,’ असे म्हणत ती आत गेली. माझा असा पाणउतारा केल्यावर ती हवेतच असते नेहमी. एक मात्र नक्की की मोकळी हवा राहिलेली नाही, हे तिचे खरे आहे. सर्वार्थाने हवा मोकळी नाही. आता पाहा ना, देशात आताच सार्वत्रिक निवडणूक झाली.

त्यात अनेक उमेदवारांना आणि राजकीय पक्षांनाही ‘यंदा तुमचीच हवा आहे’ असे माध्यमे सांगत होती. काही काही नेत्यांना हवा तसा, हवा तेवढा वेळ देत होती माध्यमे. काहींची मात्र हवा खूपच खराब होती. काही जण नक्कीच निवडून येतील, असे वाटत असताना अखेरच्या दोन दिवसांत हवा पालटली म्हणतात अन् ते पडले. राजकीय असो की साधी हवा, केव्हाही फिरते.

बड्या नेत्यांच्या भाषणांनी हवा गरम केली होती. त्यात कार्यकर्ते अन् सामान्य नागरिक उगाच इतके वैर करून बसले आपसात की त्यांच्यातून हवाही जात नाही आता. त्यांच्यात आयुष्यभरासाठी हवा गरम झाली. कुणी कुणाला विचारत होते, ‘तुहा नेता का हौव्वा हाय का?’ कधी काळी गळ्यात गळे घालून फिरणारे आता राजकारणाच्या हवेमुळे एकमेकांना वाऱ्यालाही उभे करीनासे झाले आहेत.

दिल्लीत मात्र वेगळीच हवा आहे सध्याए. हे सरकार फार दिवस टिकणार नाही, अशी हवा आहे. मात्र असेही म्हणतात की, हवेला आणि सत्ताधाऱ्यांना मुठीत धरून ठेवता येत नाही. देशात अशी चर्चा सुरू असताना आपले पंतप्रधान हवाईमार्गे जी परिषदेला पोहोचलेदखील...

आता काय, की अशा परिषदांमध्ये हवेवर चर्चा होतेच. हवा इतकी महत्त्वाची आहे. विकसित देश आणि विकसनशील देश यांच्यात हवा खराब करण्यावरून नेहमीच वाद होतात. आता हवा प्रदूषित झाल्याने ग्लोबल वॉर्मिंग वाढले आहे. जगाचीच हवा तापू लागली आहे. म्हणून ऋतूंचे हवामान खराब झाले आहे. पाऊस कधीही पडतो अन् हवा तेव्हा मात्र पडत नाही. अरबी समुद्रावरून मॉन्सूनची हवा योग्य दिशेला वळत नाही.

समुद्रावरचे तापमान वाढल्याने हवा गरम होते अन् मग एक पोकळी निर्माण होते. पाऊस लांबतो म्हणतात, अशाने. आता पाऊस लांबला की पेरण्या लांबतात. मग सोसाट्याचा वारा येतो. वादळ होते हवेचे. पाऊस कोसळू लागतो. शेतकरी मग हवामान ठीक आहे, हे पाहून पेरण्या करतात.

पेरण्या झाल्या की, यंदा पीक चांगलेच येणार अन् आपण सगळे कर्ज फेडून टाकणार, असे हवेत इमले बांधतात. हंगाम सरत असताना अशीच हवा असते की, यंदा पिकांना भाव चांगला असणार आहे. शेतकरी हवेत असतात. भाव जाहीर होतात तेव्हा मात्र हवेने हवेला हवा तेवढा प्रतिसाद दिला नाही, असे त्यांना वाटते.

हवा खराब झाली आहे, असे आपणच म्हणतो; वर्तमानात असे नाही. आपले वडील, वडिलांचे वडील अन् त्यांचेही वडील हेच म्हणायचे, ‘हवा खराब झाली आहे आता. आपणच जबाबदार आहोत त्याला. झाडे आपणच तोडली. आपणच सिमेंटची जंगले उभी केली. पक्ष्यांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी? असा प्रश्न कवी ग्रेस यांच्याशिवाय कुणालाच पडला नाही. बरे, त्यांना पडला आणि तो त्यांनी विचारला तेव्हा आम्ही बेगुमानपणे त्यांच्या प्रश्नाची हवाही घेतली नाही.

त्यामुळे मग हवा खराब झाली. पर्यावरणाचा ऱ्हास झाला. आम्ही जमीनही नासवली. मारून टाकली. जमीन जिवंत असणे म्हणजे काय, हे माहिती आहे? जमीन म्हणजे माती जिवंत असणे म्हणजे एक चमचा मातीत किमान एक लाख जिवाणू असणे. आम्ही रासायनिक शेती केली. रासायनिक खते टाकली. आम्हाला अन्न-धान्याचे जास्त उत्पन्न हवे होते. त्यात जमीन मेली. आता एक चमचा मातीत जिवाणूंची संख्या दहा हजारांच्याही खाली आली आहे.

म्हणजे माती मेली. माती जिवंत असली म्हणजे पहिला पाऊस पडला की मृद्‍गंध येतो. हवा सुगंधी होते. आताशा माती मेली असल्याने पहिल्या पावसात मृद्‍गंध येत नाही. हे सगळे हवा खराब झाली, आम्ही केली म्हणून झाले. मग रोगराईदेखील पसरते. खोकला, सर्दी, ताप, मलेरिया होतो. मग आम्ही म्हणतो, आजकाल घरोघरी एक पेशंट आहे, हे व्हायरल आहे. म्हणजे हवेतून रोग बरसतो आहे. हवा खराब झालेली आहे.

आजकाल तर सोशल मीडियावर काय काय व्हायरल होत असल्याने समाजात व्हायरस पसरू लागला आहे. तिथलीही हवा खराब झालेली आहे. कारखान्यांच्या चिमण्यांमधील धूर, वाहनांचा धूर, वीजनिर्मितीसाठी कोळसा जाळला यातो, त्याचा धूर... हरियाणा, पंजाबमध्ये खरिपाचा हंगाम आटोपला की रब्बीसाठी पीक कापले की उर्वरित तण जाळले जाते आणि त्या धुरामुळे दिल्लीची हवा धोकादायक प्रमाणात खराब होते.

दिल्ली हे देशातले सर्वाधिक प्रदूषित हवेचे महानगर आहे. चंद्रपूरचाही क्रमांक हवा प्रदूषणाच्या बाबत पहिल्या पाचात लागतो. मुंबईदेखील मागे नाही. आम्ही मात्र स्वच्छ हवा आहे, म्हणत हवेत बुडबुडे सोडत असतो. रासायनिक शेतीतील विषाक्त अन्नामुळे पोटात नुसती हवाच निर्माण झालेली असते. बरे, नुसती हवा खाऊन काही पोट भरत नाही म्हणून हे विषाक्त अन्न खावेच लागते...

मी असा विचार करत असताना बायको पुन्हा समोर येऊन उभी राहिली. कटेवर हात अन् समचरण जुळविले होते तिने. ती नजरेनेच काही विचारत होती. मला वाटले, माझ्या मोकळ्या हवेत बाहेर जाण्यासंदर्भातच ती विचारत आहे की, अजूनही असेच बसले आहेत पायात ‘वात’ भरल्यासारखे... मी आपल्याच विचारात गुंतलो असल्याने स्वत:शीच बडबडलो, ‘विषाक्त अन्न खावेच लागणार...’ तिने लसणाच्या उपम्याच्या तशाच पडलेल्या डीशकडे पाहिले अन् रागाने म्हणाली, ‘नाही खायचा आता हा उपमा. उपमाच नाही, तुम्हाला आज काहीच खायला मिळणार नाही...’ असे म्हणत ती जायला लागली. मी अजीजीने म्हणालो, ‘अगऽऽ खातो ना मी उपमा... तुझ्या हातच्या उपम्याला खरेच उपमा नाही.’

ती म्हणाली, ‘आता तारीफ करून मला हवा देऊ नका, चला हटा, हवा येऊ द्या!’

ते तिचे रूप पाहून हवामहल बांधायला निघालेलो मी हवालदिल झालो. माझी हवा दीन झालेली होती...

pethkar.shyamrao@gmail.com

(लेखक प्रसिद्ध नाटककार आणि कथाकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()