चोपन्न देशांचं आश्चर्य

जगातील सर्वांत जुन्या मानवी पाऊलखुणा, जगातील सर्वांत जुनी मानवी संस्कृती आणि वसाहत, भारताच्या क्षेत्रफळापेक्षा लाभलेलं मोठं जंगल, जगातील सर्वांत लांब नदी,
जगातील सर्वांत जुनी मानवी संस्कृती
जगातील सर्वांत जुनी मानवी संस्कृतीsakal
Updated on

जगातील सर्वांत जुन्या मानवी पाऊलखुणा, जगातील सर्वांत जुनी मानवी संस्कृती आणि वसाहत, भारताच्या क्षेत्रफळापेक्षा लाभलेलं मोठं जंगल, जगातील सर्वांत लांब नदी, अफाट मोठे धबधबे, जगातील अत्यंत दुर्मीळ जैवविविधता, हजारो वर्षांपासून इथे राहत असलेल्या आणि स्वतःचं वैविध्य टिकवून ठेवलेल्या हजारो जमाती, टोळ्या आणि त्यांच्या दोन हजारपेक्षा जास्त असलेल्या बोलीभाषा. तब्बल ५४ देशांनी बनलेला हा आहे आफ्रिका खंड. प्रसिद्ध लेखक जॉन हेमिंग्वेने म्हटलंय, ‘‘ मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आश्चर्य म्हणजे आफ्रिका आहे.’’

सुरुवात नक्की कुठून करावी, इतक्या साऱ्या गोष्टी आफ्रिकेमध्ये बघण्यासारख्या आहेत. इजिप्तचे पिरॅमिड आणि नाईल नदी, अल्जेरिया आणि ट्युनिशियामधील रोमन शहरांचे अवशेष, मोरोक्कोमधील कासाब्लांका, मारक्केश ही हजार वर्षांचा इतिहास लाभलेली जुनी शहरं, केनियामधील जंगल सफारी, आफ्रिकेतील सर्वांत उंच असलेला

टांझानियामधला किलीमांजारो पर्वत, इथिओपियामधील दनाकील डिप्रेशन आणि ओमो खोरे, झिम्बाब्वेमधील जगातील सर्वांत उंच व्हिक्टोरिया धबधबा, जगातील सर्वांत जुनी व्यापारी राजधानी झांझिबार, दक्षिण आफ्रिकेतील झुलू जमाती आणि जगप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानं, सेशेलस् आणि मॉरिशियसमधील सुंदर समुद्रकिनारे... अशा शेकडो गोष्टी सांगता येतील, ज्या आफ्रिकेमध्ये आवर्जून बघण्यासारख्या आहेत आणि हा अनुभव आफ्रिकेबाहेर जगात कुठंही घेता येणार नाही.

आफ्रिकेला पर्यटनासाठी निघण्याअगोदर चांगली पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. शक्यतो आफ्रिकेसाठी दोन-तीन देशांचा प्लॅन एकत्र करावा, म्हणजे आफ्रिकेची एक बाजू पूर्ण करता येईल. गंमत म्हणजे आफ्रिकेतल्या आफ्रिकेत फ्लाइटचं जाळं फारसं चांगलं नाही; परंतु आफ्रिकेतल्या कोणत्याही भागात जाण्यासाठी युरोप किंवा मध्य आशियामधून बऱ्यापैकी चांगली व्यवस्था आहे.

उदाहरणार्थ - इजिप्त करायचं झाल्यास जॉर्डनसोबत इजिप्त किंवा दुबईसोबत इजिप्त करता येऊ शकतं, कारण इथून विमानप्रवास तुलनेने बराच स्वस्त आहे. तुम्ही जर युरोप फिरत असाल आणि स्पेनला जाणार असाल, तर स्पेनच्या जिब्राल्टरपासून मोरोक्कोच्या टॅन्जीयरपर्यंत बोटीमार्गे फक्त अर्ध्या तासात पोहोचता येतं. शेजारी असलेले अल्जेरिया आणि ट्युनिशिया हे देशसुद्धा या दौऱ्यात पूर्ण होऊ शकतात.

इटली आणि ग्रीसमधूनसुद्धा उत्तर आफ्रिकेतील देशांना स्वस्त फ्लाइट्स आहेत. भारतातूनसुद्धा फक्त केनिया, टांझानिया, इथिओपिया या देशांना थेट कनेक्टिव्हिटी आहे. आफ्रिकेमध्ये विमानप्रवास करणाऱ्या लोकांची संख्या फारच कमी असल्यामुळे मोठ्या मोठ्या एअरलाइन्स कमी आहेत आणि या उलट कमी प्रवासी क्षमता असलेली विमानं असलेल्या लहान विमान कंपन्या बऱ्याच आहेत,

ज्या ऑनलाइन पद्धतीने काम करत नाहीत आणि गुगलवर सापडतसुद्धा नाहीत. सेशेलस, मादागास्कर आणि मॉरिशियस ही बेटं जवळपास असल्यामुळे एकाच वेळी करता येणं शक्य आहे. पूर्व आफ्रिकन देशांमध्ये इथिओपिया, केनिया, टांझानिया, झांझिबार, रवांडा या देशांचा समावेश होतो. आफ्रिका बघण्याची सुरुवात बरेच पर्यटक इजिप्त, केनिया किंवा या इतर पूर्व आफ्रिकन देशांपासून करतात.

भारतीय पासपोर्टधारकांसाठी मॉरिशियस, ट्युनिशिया, झिम्बाब्वे, सेशेलस या देशांमध्ये जाण्यासाठी आगाऊ व्हिसा काढायची गरज नाही. ऑन अरायव्हल व्हिसा इथे उपलब्ध आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी युगांडा, रवांडा आणि केनिया यांचा एकत्रित असा ईस्ट आफ्रिकन व्हिसा उपलब्ध आहे. ई-व्हिसा असल्याने यासाठी ऑनलाइन अप्लाय करता येतं.

अगदी नुकतंच म्हणजे २०२३ सालात मोरक्को आणि इजिप्त या देशांनी भारतासाठी ई-व्हिसा सुरू केला आहे. पूर्वी यासाठी अनेक अटी-शर्ती होत्या, त्याही आता काढून टाकण्यात आलेल्या आहेत. पूर्व आफ्रिकन देशांमध्ये जाण्यासाठी काही आरोग्यविषयक काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे.

या देशांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुमच्याकडे पिवळा ताप आणि पोलिओ यांची लस घेतल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. या लशी फक्त सरकारी रुग्णालयात उपलब्ध असतात आणि भारत सरकारच्या वतीने याचं प्रमाणपत्र देण्यात येतं. उदाहरणार्थ - मुंबईमध्ये जेजे रुग्णालय, तर पुण्यामध्ये ससून रुग्णालय इथे पिवळ्या तापाची लस उपलब्ध आहे, तर पोलिओची लस कोणत्याही जिल्हा किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध असते.

या पूर्वतयारीसोबतच आता काही खबरदारीसुद्धा घेणं गरजेचं आहे. यामध्ये कोणाला घाबरवण्याचा मुळीच हेतू नसून, योग्य खबरदारी जर घेतली, तर अतिशय चांगले अनुभव पदरात पाडून प्रवास अविस्मरणीय होऊ शकतो याची खात्री असते. आधी सांगितल्याप्रमाणे काही देशांची आर्थिक किंवा राजकीय परिस्थिती ही अस्थिर आहे, त्याचा परिणाम तिथल्या स्थानिक चलनावर मोठ्या प्रमाणात होत असतो, त्यामुळे फॉरेक्स कार्ड आणि अमेरिकन डॉलर्सच्या स्वरूपात भारतातून चलन नेणं सर्वांत सोईस्कर आहे.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथिओपिया, केनिया, झिम्बाब्वे, नायजेरिया या देशांमध्ये एकट्याने फिरणं आणि रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणं टाळावं. सोमालिया, मध्य आफ्रिका, मालीसह सहारा वाळवंट क्षेत्रातील देश यादवी युद्ध व दहशतवादाचा प्रभाव असल्याने पूर्णपणे वगळून टाकावेत. काँगो देश एबोला विषाणूने प्रभावित असल्याने तो भागसुद्धा टाळावा. अगदी सुरुवातीलाच आफ्रिकन देशांचा सर्वांगसुंदर अनुभव घ्यायचा असेल तर मी इजिप्त,

मोरोक्को, ट्युनिशिया आणि टांझानिया हे देश सुचवेन. हे देश पर्यटकांसाठी पूर्णपणे सेफ आहेत. सुरुवात म्हणून भारतातून दुबई किंवा शारजामार्गे कैरोसाठी फ्लाइट्स आहेत. अलेक्झांड्रिया, कैरो, लक्झर, आस्वान अशी दहा दिवसांची इजिप्त ट्रीप तुम्ही प्लान करू शकता; किंवा नैरोबी, मोंबासा, अरूषा (किलीमांजारो), दार ए सलाम, झांझिबार अशी केनिया, टांझानियाची १०-१२ दिवसांची ट्रीप प्लान करू शकता. या देशांमध्ये पोचल्यावर त्या त्या देशातील स्थानिक टूर ऑपरेटरला सोबत घेऊन तुम्ही अगदी वाजवी किमतीमध्ये स्वतःच्या सहलीचं स्वतःच चांगलं नियोजन करू शकता.

आशिया, अमेरिका आणि युरोप खंडांच्या तुलनेत आफ्रिकेतील वाहतूक व्यवस्था अतिशय बाल्यावस्थेत आहे, अशी परिस्थिती आहे. टूर कंपनीची गाडी किंवा वैयक्तिक भाड्याने घेतलेली कार या साधनांवरच बहुतांश वेळा प्रवासासाठी अवलंबून राहावं लागतं. बहुतांश आफ्रिकेत जवळच्या प्रवासाचं साधन हे खासगी शेअरिंग मिनीव्हॅन आहे. स्थानिक लोक ज्याप्रमाणे प्रवास करतात, तसं जर प्रवास करायचा ठरवला, तर भारतापेक्षाही स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत. उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये जसं की इजिप्त, मोरोक्को इथे आधुनिक पद्धतीच्या रेल्वेची उपलब्धता असून, प्रवासासाठी उत्तम साधन म्हणून याच्याकडे पाहता येईल.

कुपोषण, रोगराई, गृहयुद्ध, बेरोजगारी, गरिबी या समस्यांवर मात करण्यासाठी आणि आफ्रिकेच्या सर्वांगीण विकासासाठी आफ्रिकन युनियनची २००२ मध्ये स्थापना झाली. गेल्या ५-६ वर्षांत घाना, नायजेरिया, इथिओपिया, रवांडा, केनिया या देशांचा प्रचंड आर्थिक विकास झाल्याने पर्यायाने आफ्रिकेची स्थिती वेगाने सुधारत आहे. नव्याने विमान वाहतूक, रेल्वे आणि रस्त्यांचं जाळं निर्माण होत असून, या मध्यामातून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना येथील देशांकडून राबविण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या काळात आफ्रिकेलासुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने संधी द्यायला हवी.

अनेक वर्षांपासून सुरू असलेली यादवी युद्धं, प्रचंड स्थानिक अस्थिरता, कित्येक देशांवर असलेलं लष्करी हुकूमशहांचं किंवा टोळ्यांचं राज्य, कायदा आणि प्रशासन अस्तित्वात नसणं, आफ्रिकेतील देशांपर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी मोठी कसरत, त्यामुळे बहुतांश आफ्रिका खंड पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिला. आता परिस्थिती सुधारत आहे. अनेक देश युद्धाच्या खाईतून बाहेर येत आहेत, जनजीवन स्थिरस्थावर होतंय, तसंच पर्यटनाच्या दृष्टीने अनेक देशांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे आफ्रिका आता आपल्या मस्ट व्हिजिट लिस्टमध्ये असायलाच हवं.

(लेखक अनेक ठिकाणी भटकंती करत असतात, मात्र साहसी पर्यटनावर त्यांचा भर असतो.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.