हवे महिला दिनाचे आत्मभान

गेली काही वर्षे आम्ही सातत्याने अनेक दिवस वेगवेगळ्या प्रकारांनी महिलांशी जोडून घेण्यासाठी, त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी खास दिवस साजरे करत गेलो.
world womens day
world womens daysakal
Updated on

८ मार्च रोजी जागतिक महिला दिन पूर्वी थोड्याफार प्रमाणात साजरा होत होता. त्याला अधिक व्यापक रूप १९७५ नंतर मिळाले. आमचे स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेची स्थापनाही ८ मार्चलाच झाली. स्त्रियांना व्यक्त होऊ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा हा दिवस. तो कुठल्याही एका व्यक्तीचा नाही, तर सामूहिक स्त्रीशक्तीचा आहे.

गेली काही वर्षे आम्ही सातत्याने अनेक दिवस वेगवेगळ्या प्रकारांनी महिलांशी जोडून घेण्यासाठी, त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी खास दिवस साजरे करत गेलो. खरे तर या दिवसांना साजरा करणे हा शब्द काही तेवढा योग्य नाही; परंतु प्रत्यक्षात स्त्रियांना एकत्र जमण्याची, विचारमंथन करण्याची संधी म्हणून ते आवश्यकच असते. बऱ्याच वेळा महिला धार्मिक कार्यक्रमात एकत्र येणे हे स्वाभाविक असते; परंतु तेथे धर्म, श्रद्धा, आस्था यावर भर असायचा.

मुख्यतः महिला मंडळांचे कार्यक्रम ठराविकच दिवशीच साजरे होत होते. ८ मार्च हा जागतिक महिला दिन पूर्वी थोड्याफार प्रमाणात साजरा होत होता. त्याला अधिक व्यापक रूप १९७५ नंतर मिळाले. १९७५ चे महत्त्व यासाठी आहे की, त्यामध्ये स्त्रियांच्या अधिकाराचे दशक म्हणून ते साजरे करण्यात आले. आमच्या संघटनेची सुरुवातच मुळी १९८० च्या सुमाराला झालेली होती. १९७५ चे पहिले संमेलन होते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची चार महिला संमेलने झाली.

हे संमेलन १९७५ मध्ये मेक्सिको, १९८० मध्ये कोपेनहेगन, १९८५ मध्ये नैरोबी, १९९५ मध्ये बीजिंग, २००० मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात आणि २०२० मध्ये न्यूयॉर्क अशा प्रकारची जागतिक महिला संमेलने झाली. या प्रत्येक महिला संमेलनात व्हायचे काय, तर त्यामध्ये काही मुद्दे स्त्रियांच्या चळवळीनंतर ज्याचे निष्कर्ष आलेले होते किंवा ज्या यशोगाथा होत्या त्यांना अधिक मूर्त रूप देऊन त्याचे रूपांतर आदर्श कार्यपद्धतीमध्ये केले जात होते.

आमचे स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेची स्थापना ८ मार्चला झाली. तो जागतिक महिला दिन माझ्या आजही लक्षात आहे. त्या वेळेला आम्ही, आमच्या मैत्रिणी आणि स्त्रियांच्या चळवळीच्या सहकारी विद्याताई बाळ यांना आवर्जून निमंत्रित केलेले होते. त्याच्यानंतर नेमके बादल सरकार हे पुण्यात आले होते. पुण्यामध्ये समर नखाते, अजय झणकर अशा सगळ्यांचा मिळून एक पथनाट्याचा ग्रुप होता.

त्या गटाला आम्ही पथनाट्य करण्यासाठी निमंत्रित केले होते; पण तो सरप्राईज आयटम किंवा तो एक आश्‍चर्यचकित करणारा म्हणून कार्यक्रम होता. तो आम्ही जाहीर केला नव्हता. नुसताच एक सांस्कृतिक कार्यक्रम, असे म्हटलेले होते. आमच्या कार्यक्रमाबद्दल लोकांना औत्सुक्य होते, की नक्की या महिला बैठकीतून काय करणार आहेत? कारण स्त्रियांची अशी बैठक तिथल्या शिरीष विद्यानिकेतन, मातंग वस्ती या ठिकाणी कधी झालीच नव्हती.

जो हॉल आम्हाला मिळाला होता त्यामध्ये साधारण दीडशे महिलाच बसू शकत होत्या. तळागाळातील सर्वसामान्य आणि मध्यमवर्ग महिला यांनी तो भरून गेला होता. त्याची आम्ही बरेच दिवस तयारी करत होतो. १९८१च्या महिला दिनी क्रांतिकारी महिला संघटनेची आम्ही स्थापना केली.

तेव्हापासून ८ मार्च महिला दिनाला अनेक परिषदा, कार्यक्रम झाले. विशेष म्हणजे माझी मुलगी मुक्ता ही माझ्या आईच्या कडेवर बसून त्या कार्यक्रमाला आली होती. माझे वडील कार्यक्रमाला आले होते. त्या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी बोलावले होते. काही कारणांमुळे ते कामात अडकले आणि कार्यक्रम संपल्यावर आले.

त्यांची अपेक्षा होती, की अध्यक्षीय भाषणानंतर त्यांनी भाषण करावे; पण ते काय आम्हाला योग्य वाटले नाही. कामाची पद्धत म्हणून जी व्यक्ती येते त्यांनी फार तर शुभेच्छा देणे हे नंतर आपण समजू शकतो; परंतु अध्यक्षांनंतर येऊन लोकप्रतिनिधींनी भाषण करणे ते काही तेवढे योग्य वाटत नव्हते. परिणामी त्याची थोडी चर्चा झाली. महिलांना उशीर झाला होता म्हणून नाईलाजाने तसे करावे लागले.

आम्ही क्रांतिकारी महिला संघटनेचे उद्दिष्ट, त्याचबरोबर कार्यकारिणी अशी सगळी जाहीर केली. नंतर पथनाट्य सादर झाले आणि नंतर लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी खूप प्रश्‍न विचारले. त्या पथनाट्यामध्ये या महिला कशासाठी जमलेल्या आहेत? त्यांना वेळ नाही म्हणून? त्यांनी लष्करच्या भाकऱ्या भाजायच्या आहेत म्हणून? थोडक्यात स्त्रिया सामाजिक कामासाठी एकत्र येतात, त्या वेळेला त्याला प्रतिष्ठा नसते.

ज्या आलेल्या बायका होत्या त्यात मंडळापेक्षा ती महिला संघटना होती. महिला संघटना म्हणून काम करत असताना स्थानिक गाव पातळीवरचे, लोकसभेतील, विधानसभेतील त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या महापालिकांमधली जी निर्णयप्रक्रिया असते ती महिलांना समजावी, हा त्याचा हेतू होता. महिला मतदारांची जागृती वाढावी, हा संघटनेचा हेतू होता. स्त्रियांचे स्थान निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्या म्हणून, उमेदवार म्हणून अधिक प्रभावी व्हावे, हा भाग होता.

या सगळ्याचे जे सूत्र होते ते म्हणजे आपल्या घरात, गावात आणि निवडणुकांमध्ये महिलांचा निर्णयप्रक्रियेत सहभाग वाढावा हा त्याचा हेतू होता. त्याच्यानंतर बरेच ८ मार्च झाले. वेगवेगळ्या थीमवर, वेगवेगळ्या भूमिकांवर ८ मार्च करण्यामध्ये आला. शांतता, समानता, विकास आणि मैत्री ही भूमिका बीजिंगच्या विश्‍व महिला संमेलनामध्ये होती. आमच्या संघटनेचे जे ब्रीदवाक्य आहे, त्यामध्ये ‘समतेसाठी निरंतर कृती’ असे वाक्य आहे. म्हणजे समाजातल्या सर्व प्रकारच्या समतांसाठी निरंतर कृती.

आमच्या काही कार्यक्रमांना तत्कालीन मुख्यमंत्री येऊन गेले. काही वेळेला मंत्रिमहोदय येऊन गेले. अनेक कामगार चळवळीतील पुढाऱ्यांनी त्याच्यात भाग घेतला. मविमच्या अध्यक्षा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या ८ मार्चला येऊन गेल्या होत्या. एका अर्थाने ८ मार्चचा ‘महिला दिन’ एकच दिवस साजरा करायचा नसतो. ३६५ दिवस आपण जे करतो त्याचं प्रतीक म्हणून आम्ही तो साजरा करत असतो.

या वर्षीच्या महिला दिनानिमित्तचे औचित्य आहे, की ‘महिलांमध्ये गुंतवणूक करा आणि प्रगतीला वेग द्या.’ या वर्षीच्या मोहिमेचे सूत्र आहे, ‘महिलांच्या समावेशाला प्राधान्य द्या.’ आम्ही अनेक वेळा पाहिलं, की बैठकांमध्ये किंवा महत्त्वाच्या कार्यक्रमात स्त्रियांना डावलले जाते. त्या दृष्टीने आम्ही स्त्रियांना वाटाघाटी करणे, संवाद, संभाषण कौशल्ये शिकवली.

तेथील काही सूत्रे अशी आहेत, की वेळेवर पोहचणे, विचार करून जाणे... त्या ठिकाणी आपल्याला काय बोलायचे आहे, तेथे गेल्यावर समोरची माणसे काय बोलतात ते ऐका आणि त्याच्यानुसार प्रतिक्रिया द्यावी, बोलावे. आपल्याला जे बोलायचे आहे, ते बोलायचं असते; परंतु सर्व कार्यक्रमाचा संदर्भ काय आहे, कशासाठी कार्यक्रम घेतलेला आहे, कशासाठी आपल्याला बोलावलेले आहे, त्या ठिकाणी आपण फक्त प्रतिनिधी म्हणून चाललेलो आहोत का, त्या ठिकाणी आपल्याला काही बोलायची संधी आहे का, हे विषय विचारात घेऊन त्यानुसार आपण बोलावे आणि चर्चा करावी.

अशा कार्यक्रमात शेजारी जे बसलेले आपले सहकारी असतात, ते अनोळखी असले तरी त्यांच्याशी स्मितहास्य ठेवावे. थोडेफार एखादे वाक्य त्यांच्याशी कार्यक्रमानंतर बोलावे. त्यामधूनही आपले बरेच चांगल्या अर्थाने नेटवर्क तयार होते. त्यातूनही आपल्याला खूप फायदा मिळतो. ८ मार्चच्या संदर्भातील बैठकीला मी दिल्लीला गेले होते. शेजारी बसलेल्या ज्या महिला प्रतिनिधी होत्या त्या उच्चविद्याभूषित आणि अधिकारी वाटत होत्या.

मी त्यांना विचारले, आपण कोण आहात? त्यांनी सांगितले, की माझे नाव नीलम कपूर आहे. मी म्हटले, आपण काय करता? तर, मी भारताच्या दूरदर्शनची प्रमुख आहे, असे त्यांनी सांगितले. आमची इतकी दोस्ती झाली की, काही दिवसांतच दूरदर्शनवरून बरेचसे स्त्री आधार केंद्राचे कार्यक्रम त्यांनी प्रसारित केले.

आम्हाला सगळ्या ठिकाणी समन्वय ठेवणे, सुसंवाद ठेवणे, गेलेल्या लोकांशी-प्रत्येकाशी ओळख करून देणे, त्यांनी व्हिजिटिंग कार्ड दिल्यावर आपणही स्वतःचे कार्ड देणे, आपली स्वतःची ओळख सांगणे व खूप लांबलचक बोलत न बसणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला तेथे सांभाळायला लागतात. थोडक्यात ८ मार्च म्हणजे जगासोबत संवाद साधण्याचा, बोलण्याचा, आपल्या भावभावना व्यक्त करण्याचा, आपल्या मागण्या मांडण्याचा हा दिवस आहे.

त्याचबरोबर आपल्याला कशामध्ये यश मिळालं, त्या यशोगाथांचे संवर्धन करायचासुद्धा हा दिवस आहे. त्यामुळे मी असे म्हणेन की, ८ मार्च महिला दिन म्हणजे स्त्रियांना व्यक्त करून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा दिवस आहे. तो फक्त एक दिवस नाही, तो संपूर्ण वर्षाला कष्टकरी, सामान्य, मध्यमवर्गीय महिलांचा एकत्रित असा हुंकार आहे. तो कुठल्याही एका व्यक्तीचा दिवस नाही, सामूहिक स्त्रीशक्तीचा आहे हे फार महत्त्वाचे!

neeilamgorhe@ gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.