मगरमिठी चुकीच्या शीतपेयांची

अलीकडील काही वर्षांत घराघरात फ्रिज आला आणि त्या फ्रिजमध्ये ही साखरयुक्त कार्बोनेटेड शीतपेयं आली.
Sugary carbonated cold drinks
Sugary carbonated cold drinkssakal
Updated on

- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com

घरात कोणी पाहुणा रावळा आला की त्याला ‘गार-गरम, काय घेणार आपण ?’ असं विचारणं ही रीत आहे. यातल्या गरममध्ये चहा आणि कॉफीचा पर्याय असतो पण गार या प्रकारात मात्र लिंबू सरबत, ताक, कैरीचं पन्हे, मठ्ठा या सगळ्यांना मागं सारत चुकीच्या शीतपेयांनी अर्थात बाटलीमधून किंवा टेट्रापॅक अथवा अन्य प्रकारातून येणाऱ्या कृत्रिम पद्धतीच्या शीतपेयांनी म्हणजेच या साखरयुक्त कार्बोनेटेड शीतपेयांनी अतिक्रमण केलंय.

अलीकडील काही वर्षांत घराघरात फ्रिज आला आणि त्या फ्रिजमध्ये ही साखरयुक्त कार्बोनेटेड शीतपेयं आली. लाल, तांबड्या, भगव्या, हिरव्या बाटल्यांनी फ्रिज सगळा भरून गेला. घरात कोणी पाहुणेरावळे, मित्रमंडळी आली की फ्रिजमधून बाटली काढून लगेच ग्लासात टाकून देणं सोपं झाल्यानं ही कोकसंस्कृती बळावली.

दारू पिणाऱ्या माणसाला आपल्या समाजात चांगल्या नजरेनं पाहिलं जात नाही तरीही प्रमाणात दारू पिण्याचे अनेक फायदे सांगितले जाऊ शकतात पण या साखरयुक्त कार्बोनेटेड शीतपेयांचे मात्र तोटेच तोटे असतानाही हे लाल, तांबडं विष बाजारात खुलेआम उपलब्ध आहे.

कृत्रिमरीत्या बनवलेलं साखरयुक्त कार्बोनेटेड शीतपेय पिण्यानं लठ्ठपणा, टाइप दोन मधुमेह, वजन वाढणे, फॅटी यकृत रोग, हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो हे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. असे असतानाही केवळ जाहिरातींच्या जोरावर साखरयुक्त कार्बोनेटेड शीतपेय तयार करणाऱ्या कंपन्या हे विष आपल्या लेकरांपर्यंत पद्धतशीर पोहोचवत आहेत.

तुम्ही सहज घराबाहेर पडा, गल्लीतल्या कोणत्याही दुकानात जा. तिथे या लाल, तांबड्या रंगाच्या बाटल्या दर्शनीय भागात ठेवलेल्या दिसतील. आकर्षक रंग, फ्रुट फ्लेवर, कार्बनडायऑक्साइड, साखर आणि कॅफेनचा वापर करून बनवलेली ही पेयं शरीरास हानी पोहोचवू शकतात, असे खुद्द कंपन्यांनीच त्या बाटल्यांच्या लेबलवर छापलं असताना युवावर्ग मात्र मोठ्या ऐटीत त्या बाटल्या रिकाम्या करताना दिसतोय.

देशातील सर्वच शाळा, महाविद्यालयांबाहेर यांनी विळखा घातलाय. शहरात तर रस्त्यानं चालताना पावलागणिक साखरयुक्त कार्बोनेटेड शीतपेयाच्या रिकाम्या बाटल्या दिसत आहेत. नदी, नाले, गटारी अशा बाटल्यांनी तुंबल्या आहेत. एका सर्व्हेनुसार भारतात वर्षाकाठी ६०० कोटी लिटर साखरयुक्त कार्बोनेटेड शीतपेयं पिली जातात. म्हणजे वर्षभरात करोडो प्लास्टिक बाटल्या पर्यावरणात फेकल्या जातात. यावरूनच आजच्या धसुडीची दाहकता आपल्या लक्षात येईल.

कोणे एके काळी घरात लोण्याच्या माठाजवळ बसून लोणी खातानाचा श्रीकृष्णाचा फोटो असायचा, आता साखरयुक्त कार्बोनेटेड शीतपेय हातात घेतलेल्या अभिनेत्यांचा फोटो भिंतींवर असतो. जे अभिनेते दूध आणि फळांचा रस पिऊन स्वतःची शरीरयष्टी कमावतात, तेच फक्त पैशांसाठी या असल्या शीतपेयांची जाहिराती करतात.

शाळकरी मुले अशा जाहिरातींना पटकन बळी पडून या चुकीच्या शीतपेयांच्या मायाजाळात फसतात. उन्हाळा सुरू झाला रे झाला म्हटलं की ते घसा कोरडा पडून मग तोंडाला बाटली लावून गटागटा साखरयुक्त कार्बोनेटेड शीतपेय पितानाच्या जाहिराती टीव्हीवर सुरू होतात. या असल्या फालतू जाहिरातीतून देशाची युवा पिढी नासवण्याचे काम होतंय.

हे रम्मी खेळायला लावणारे, गुटखा खायला लावणारे आणि साखरयुक्त कार्बोनेटेड शीतपेय प्यायला लावणारे तथाकथित सेलिब्रिटी स्वतः मात्र डॉक्टरच्या सल्ल्याने आहार घेतात आणि तीनशे रुपये लिटरवाले दूध पितात. गेल्या वर्षी एका पत्रकार परिषदेत जी कृती रोनाल्डोने केली तशी आपल्या देशातील खेळाडू किंवा सेलिब्रिटी करू शकतील का?

एकीकडे साखरयुक्त कार्बोनेटेड शीतपेय तयार करणाऱ्या कंपन्या, कुठलंही आवश्यक पोषक घटक नसणारं, जीवनसत्त्वं नसणारं, खनिजं किंवा फायबर नसणारी उत्पादन विकून भारतात अब्जो रुपयांचा व्यवसाय करत आहेत तर दुसरीकडे मात्र आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड पौष्टिक असणाऱ्या दुधाची सोय करणारा दूध उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे. आपल्या लहानपणी घरागणिक गोठा असायचा आता ती जागा पार्किंगनं घेतली.

गावखेड्यातल्या गाई-म्हशींची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असताना दुधाची गरज मात्र वाढत चालली. सध्या आपण जे दूध म्हणून पितोय ते खरंच गाय किंवा म्हशीचं आहे की केमिकलच्या कारखान्यातून आलंय हे समजणं कठीण झालंय. काही वर्षांपूर्वी दुधात पाण्याची भेसळ व्हायची पण आता पाण्यात केमिकल टाकून दूधच तयार केलं जातंय, हे भयानक वास्तव आहे.

टीव्हीवर जाहिरातींच्या माध्यमातून करोडो रुपये खर्चून योजनांची माहिती देणाऱ्या सरकारनं “साखरयुक्त कार्बोनेटेड शीतपेय पिण्यानं वजन वाढतं, हृदयाचं स्वास्थ्य बिघडतं, मधुमेहाचा धोका वाढतो,' अशी एखादं दुसरी जाहिरात दिवसातून पन्नास वेळा दाखवायला हवी. देश म्हणजे एक कुटुंब आहे.

त्यात बाहेरचे येऊन आपल्या लेकरांना काय सांगतात यापेक्षा कुटुंब म्हणून आपण घरात त्यांना काय सांगतो किंवा शिकवतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण बहुराष्ट्रीय कंपन्यांना खोटारड्या जाहिराती दाखवण्यापासून रोखू शकत नाही पण वैज्ञानिक सत्य सांगणाऱ्या जाहिराती तरी दाखवू शकतोच की. पण एवढी इच्छाशक्ती कोणते सरकार दाखवेल?

युवकांचा देश म्हणून जगात मार्केटिंग करणाऱ्यांनी त्याच युवाशक्तीच्या आरोग्याबाबतही तितकंच जागृत राहायला हवं. अन्यथा लठ्ठपणा, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, दमा अशा आजारानं स्वतःच्या शरीरावरची सत्ता गमावलेले तरुण आपल्या देशाला महासत्ता करण्यासाठी किती योगदान देतील?

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.