अमली पदार्थांचं भीषण आव्हान

ईशान्य भारतामधून एलिना शिक्षणासाठी महाराष्ट्रात आली. मुंबईमध्ये तिनं महाविद्यालयीन शिक्षण सुरू केलं. सुरुवातीला तिची शैक्षणिक कामगिरी नेत्रदीपक होती.
mephedrone
mephedronesakal
Updated on

ईशान्य भारतामधून एलिना शिक्षणासाठी महाराष्ट्रात आली. मुंबईमध्ये तिनं महाविद्यालयीन शिक्षण सुरू केलं. सुरुवातीला तिची शैक्षणिक कामगिरी नेत्रदीपक होती. येणाऱ्या प्रत्येक परीक्षेत अव्वल असायची. त्यातून तिच्या भोवताली मित्र-मैत्रिणींचा गराडा वाढला. त्यात ती रमत गेली. मायानगरीत पार्ट्यांमध्ये ती हळूहळू स्वतःला हरवत गेली.

सिगरेटपासून सुरू झालेला प्रवास ड्रग्जपर्यंत कसा झाला हे तिचं तिलाही कळलं नाही... ही चुणचुणीत मुलगी बघता-बघता नशेच्या आहारी गेली... एक निवृत्त पोलिस अधिकारी अमली पदार्थाच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणीची करुण कथा पोटतिडकीनं सांगत होते. त्यांच्या चेहऱ्यावर हतबलता स्पष्ट दिसत होती. पण, माझ्या डोळ्यासमोर झीनत अमान उभी राहत होती.

जवळपास ५३ वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेला ‘हरे राम हरे कृष्ण’ चित्रपट आठवतोय का? बरं, त्यातील ‘दम मारो दम…’ हे गाणं तरी ऐकलं, पाहिलं असेलच ना! त्यात अभिनेत्री झीनत अमान यांनी अमली पदार्थाच्या नशेत गुंगल्या तरुणीची भूमिका साकारली आहे. त्या वेळी साता समुद्रापार कुठेतरी दिसणारं हे चित्र आता आपल्या शहरात अधिक लख्खपणे दिसू लागलंय.

वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पब्जमधून अशा ‘झीनत अमान’ आपल्याला सहजपणानं दिसतात. मुंबई, दिल्ली अशा महानगरांमध्ये आतापर्यंत अमली पदार्थांचे साठे सापडल्याच्या बातम्या झळकत होत्या. पण, आता पुण्यात हे होतंय, खरं तर पुण्यातूनच अमली पदार्थाचं उत्पादन होतंय. येथून ते देशाच्या वेगवेगळ्या भागात वितरित होत असल्याचं आता उघड झालं आहे.

महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या देशातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या भयंकर व्यसनांच्या विळख्यात सापडत आहे. नशेसाठी देशात पूर्वांपार गांजा किंवा अफू घेतला जात होता. त्यात नशा आणणारे नैसर्गिक घटक होते. त्यांचाही कालांतरानं आरोग्यावर दुष्परिणाम होतोच, पण सध्याच्या अमली पदार्थामधल्या रासायनिक औषधांमुळं तो लगेच दिसतो.

ते चांगलं का वाईट, याचे फाटे न फोडता नशा करण्यासाठी नव्यानं येणारे अमली पदार्थ रासायनिक आहेत. त्याचा दूरगामी परिणाम तरुणांच्या आरोग्यावर होतो. त्यातून देश घडविणारी तरुणाई नशेच्या गुंगीत राहते आहे, हा धोका सर्वाधिक आहे.

या दृष्टीनं देशोधडीला लावणारे हे अमली पदार्थ नेमके काय आहेत, त्याचे धोके कोणते, याची माहिती प्रत्येक तरुणाला असलीच पाहिजे. त्यातून त्याला सावध करणे, हा या लेखाचा मुख्य उद्देश आहे. कारण, ‘हम सब की परवाह करे क्यूँ...’ असे म्हणण्यापूर्वी एकदा आई-वडील, बहीण-भाऊ यांचा चेहरा डोळ्यासमोर आणण्याची ही वेळ आहे.

मेफेड्रोन काय आहे?

मेफेड्रोन हे एक सिंथेटिक ड्रग्ज आहे. म्हणजे वेगवेगळ्या रासायनिक संयुगातून हा अमली पदार्थ तयार केला जातो. त्याचं रासायनिक नाव ‘फोर-मेथाईलमेथकॅथिनोन ’ आहे. नशा आणण्यासाठी याचा सर्रास वापर होतो. स्फटिकाच्या स्वरूपात बहुतांश वेळा तो उपलब्ध केला जातो. तो इंजेक्शनद्वारे किंवा नाकातून ओढून घेतला जाते.

काही वेळा कॅप्सुलच्या स्वरूपात त्याचे वितरण होते. त्याला ‘म्याव म्याव’, ‘बबल’, ‘एम-कॅट’, व्हाइट मॅजिक’ किंवा ‘एमडी’ असे सांकेतिक भाषेत बोलले जाते. मॅफेड्रोन हे एम्फेटामाइन आणि कॅथिनोन वर्गातील कृत्रिम उत्तेजक औषध आहे.

मेफेड्रोन उत्पादनासाठी कमीत कमी रसायनं लागतात. ते अत्यंत छोट्या पातळीवरही प्रयोगशाळेच्या ग्लासामध्ये तयार केलं जाऊ शकतं, तसंच त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येतं. त्यासाठी अत्यंत साधी आणि सोपी रासायनिक प्रक्रिया करावी लागते. याचा उत्पादन खर्चही अत्यल्प असतो. त्यामुळं इतर सिंथेटिक ड्रग्जच्या तुलनेत मेफेड्रोन सहज उपलब्ध होतं. याच्या उत्पादनासाठी औषधनिर्माण कंपन्यांमध्ये सहजतेनं उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचा वापर केला जातो.

कंपन्यांमध्ये ज्या पद्धतीने रासायनिक औषधनिर्मिती होते, त्याच पद्धतीने मेफोड्रोनचं उत्पादन घेतलं जातं. यासाठी फार मोठी जागा लागत नाही. अगदी काही शे-चौरस फुटांच्या जागेत याचं मुबलक उत्पादन घेतलं जाऊ शकतं. वेगवेगळ्या सिंथेटिक अमली पदार्थांमध्ये सध्या सर्वाधिक विक्री मेफेड्रोनची सुरू आहे. मुंबई, कोल्हापूर आणि पुणे या शहरांमध्ये सापडत असलेल्या अमली पदार्थांमध्ये ५० ते ६० टक्के प्रमाण एकट्या मेफेड्रोनचं आहे.

मिथेकोलॉन अशा रासायनिक औषधांमध्ये सर्वांत जास्त विक्री मेफेड्रोनची होत आहे. याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे याचा कच्चा माल सहज उपलब्ध होतो. त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. ‘म्याव-म्याव’ म्हणून विक्री होणाऱ्या या पदार्थाचं आकर्षण तरुण पिढीत मोठ्या प्रमाणात आहे. त्याची मागणी वाढल्यानं उत्पादन देखील वाढलंय.

उत्तेजना ते उतरती कळा

मेफेड्रोनमुळं उत्साह आणि उत्तेजना वाढते. शरीर ताजंतवानं झाल्यासारखा भास होतो. त्यातून सौम्य लैंगिक उत्तेजनाही मिळते. त्यामुळं तरुण या अमली पदार्थांकडं सहज आकर्षित होतात. हे औषध शरीरात कसं घेतात, त्यानुसार त्याचा परिणाम टिकण्याचा कालावधी बदलतो. हा एक अत्यंत घातक अमली पदार्थ आहे.

कारण, याच्यामुळं शरीर क्षणाक्षणाला खंगत जातं. घटकाभरासाठी मिळणाऱ्या उत्तेजनेमुळं तरुणांच्या शरीराला उतरती कळा लागते. याची सवय झाल्यानं माणूस या औषधाशिवाय राहू शकत नाही. त्याचं शरीर फक्त हाडाचा सापळा राहाते. अखेर यातच त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

पुण्यात का वाढलं उत्पादन?

पुण्याच्या परिसरात औद्योगिक कारखाने आहेत. त्यापैकी काही रासायनिक कंपन्या बंद पडल्या आहेत, तर काही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाहीत. अशा कंपन्यांच्या उपकरणांचा वापर करून मेफेड्रोन उत्पादित करण्यात आलं. आपल्या कंपनीत तयार केलेला माल नेमका कोणता आहे, याची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा नसल्यानं कंपनीचा मालकही उत्पादनाबाबत अनभिज्ञ असतो.

त्याचा व्यवहार प्रति किलो उत्पादनानुसार ठरलेला असतो. त्यामुळं बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या उत्पादनाच्या नावाखाली परवानगी घेऊन अमली पदार्थ उत्पादन सर्रास केलं जातं. त्यासाठी कच्चा माल आणून उत्पादित माल वितरणाची व्यवस्था निर्माण केली. पुण्याहून देशात सर्वत्र दळण-वळण चांगलं असल्यानं याचं वितरण सहजतेनं करता येतं. त्यामुळं शहर परिसरात मेफेड्रोनचं उत्पादन वाढल्याचं दिसतं.

उत्पादित केलेला मेफेड्रोन काही वेळा कॅल्सुलच्या स्वरूपात वितरित केला जातो. साधारणतः वर्ष दोन हजारपर्यंत जगभरात मेफड्रोन विक्रीसाठी उपलब्ध होते. मात्र, २००८ पर्यंत या अमली पदार्थानं परदेशांमध्ये विशेषतः युरोप आणि इस्रायलमध्ये त्याचं रौद्र रूप दाखविण्यास सुरुवात केली होती. पुढील अवघ्या चार वर्षांमध्ये जगभरातील बहुतांश देशांनी याच्या उत्पादनावर बंदी घातली. त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात बदल केला.

एका पाठोपाठ एक देश मेफेड्रोनवर बंदी घालत होते. मात्र, २०१० पर्यंत भारतानं या विरोधात कोणतेही ठोस पाऊल टाकलं नव्हतं. या दरम्यान, देशात मेफेड्रोनची विक्री बेसुमार सुरू होती. मात्र, त्याला रोखणारा कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळं देशातील महानगरांमध्ये याची मागणी सातत्याने वाढत होती. कारवाई करताना मर्यादा पडल्याचं पोलिसांना स्पष्ट जाणवत होते. त्यानंतर सरकारी पातळीवर हालचाली होऊन नऊ वर्षांपूर्वी (२०१५) मेफेड्रोनचा अमली पदार्थ म्हणून समावेश झाला.

रोखण्यात महाराष्ट्राचं योगदान

मेफेड्रोनचा ‘नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस’ (एनडीपीएस) कायद्यात समावेश करण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे. राज्यातील वेगवेगळ्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळांमधून मेफेड्रोनचं निदान होऊ लागलं. त्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असल्याचं ठळकपणे पुढं दिसत होतं. या बाबत केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करून मेफेड्रोनचा ‘एनडीपीएस’ कायद्यात समावेश करण्यात आला. अमली पदार्थ किंवा सायोट्रॉफिक पदार्थांवर नियंत्रणासाठी ‘एनडीपीएस’ कायदा तयार केला.

‘डिझायनर ड्रग्ज’

अमली पदार्थ कायद्यामध्ये मेफेड्रोनचा समावेश केल्याने यातील गुन्हेगारांना अटक करणं, त्यांच्यावर खटला भरणं आणि त्यांना कठोर शिक्षा करणं शक्य झालं. पण, वेगवेगळ्या रसायनांचं मिश्रण करून नवीन अमली पदार्थ तयार केले जातात. त्याला ‘डिझायनर ड्रग्ज’ असे म्हणतात.

हे सिंथेटिक ड्रग्ज ‘एनडीपीएस’ कायद्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे प्रयोगशाळेत संबंधित पदार्थ अमली असल्याचं सिद्ध झाल्यानंतरही आरोपींना शिक्षा होत नाही. त्यातून एखादा अमली पदार्थ तयार केल्यानंतर पुढचा नवीन पदार्थाचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू करतात.

देशासमोरचा धोका

अमली पदार्थांच्या तस्करीला वेगवेगळे कंगोरे आहेत. आत्ता जेवढी माहिती पोलिस तपासातून पुढे येत आहे, ती फक्त हिमनगाचा पाण्याच्या वरचा भाग आहे. याच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या विभागानं एकत्रित तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. देशातील तरुण पिढी व्यसनाधीन करणं, हा दीर्घकालीन राष्ट्रविघातक नियोजनाचा एक भाग असू शकतो.

त्यामुळं दहशतवाद, सायबर गुन्हे आणि नार्कोटिक्स या बाबी वेगवेगळ्या आहेत, असं म्हणता येणार नाही. नार्कोटिक्स, सायबर गुन्हे यातून मिळणारे पैसे देशाच्या विरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एकत्रित तपास यंत्रणा उभारण्याची ही वेळ आहे.

यासाठी तपास यंत्रणांमधील अधिकाऱ्यांनी अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजे. या प्रत्येक घटकांनी केवळ पाठीला पाठ लावून नाही, तर खांद्याला खांदे लावून समन्वयानं एक विचारानं तपास करणे आवश्यक असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.