तरुणाईच्या जीवन संघर्षाचे प्रतिनिधित्व करणारे आत्मकथन : ऑल इज वेल

All is well book
All is well booksakal media
Updated on

नव्वद - दोन हजारचे दशक, त्या दशकातले एकूणच वातावरण, यांचा परिणाम घेऊन आपल्या उमेदीच्या काळात प्रवेश करणारी तरुणाई, काहीसा धूसर असा मराठवाडी भविष्यकाळ सोबतीला घेऊन आपल्या कौशल्यांना पैलू पाडण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करणारी ही त्याकाळातली तरुणाई. सर्वच अर्थाने उणिवांच्या एका प्रस्तरावर अतिशय दुर्गम अशा ग्रामीण भागातून आपलं भविष्य घडवण्यासाठी शहरांचा आसरा घेणारी ही तरुणाई. खेड्यातला लाजरेबुजरेपणा घेऊन शहरातल्या काहीशा बेदरकार जीवनात रुळू पाहणारी ही तरुणाई.

या शहरांमधल्या सार्‍या नवख्या आणि तितक्याच महागड्या जीवनपद्धतीत राहून आपलं भविष्य घडवण्यासाठीचा संघर्ष करणारी ही तरुणाई. शिक्षण आणि ज्ञानसंवर्धनाच्या बाबतीत कमकुवत असलेल्या ग्रामीण शिक्षणव्यवस्थेचा हात सोडून एका नव्या आणि आव्हानात्मक स्वरूपाच्या शिक्षणव्यवस्थेच्या हातात आपला हात देताना काहीशी गांगरून गेलेली ही तरुणाई. तारुण्याचा उंबरठा ओलांडून आलेल्या आणि निसर्गसुलभ अशा तारुण्यभावनांशी डील करताना गोंधळात पडणारी ही तरुणाई. एकीकडे तारुण्यसुलभ स्त्रीभावनांविषयीच्या प्रेमजाणिवांना धुमारे फुटताना आणि त्याचवेळी आपल्या करीयरविषयीच्या यशाच्या दडपणांच्या वाढणार्‍या ओझ्याखाली दबताना होणार्‍या कुचंबना पेलणारी ही तरुणाई. शेतकरी बापाच्या अर्थशास्त्रावर ताण न येऊ देता जीवघेण्या शैक्षणिक स्पर्धेत नाबाद राहण्यासाठी एकवेळची मेस बंद करून पोटाला पीळ देणारी ही तरुणाई.

अशा तरुणाईचे प्रतिनिधी म्हणून पत्रकार मित्र संदीप काळे लिहिते झाले आहेत. ते खरेच या काळातील तरुणाईचे प्रतिनिधी बनले आहेत. त्यांचे नुकतेच सकाळ प्रकाशनच्या वतीने प्रकाशित झालेले ऑल इज वेल हे आत्मकथनात्मक पुस्तक या काळातल्या तरुणाईच्या जगण्याच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करणारे आहे, असे नक्की म्हणता येईल! खरे तर आत्मकथन हा जीवनाच्या हा जीवनाच्या उत्तरार्धात लिहिल्या जाणारा वाङमयप्रकार आहे, असे मानले जाते. ते काहीअंशी खरेही आहे. आपल्याकडे लिहिली गेलेली आत्मकथनं ही अधिकांशाने उतारवयातच लिहिली गेली आहेत.

या सर्व आत्मकथनांमध्ये एकप्रकारे अथ पासून इथ पर्यंतचा जीवनप्रवास जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर मांडलेला असतो. यात जगताना जे काही राहून गेलेले आहे, ते जगण्यासाठीची सोय जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर नसते. अशावेळी जे जगायचे राहून गेले आहे त्याची खंत मानत ठेऊनच जगाचा निरोप घेण्याची वेळ अशा लेखकावर येऊ शकते. या दृष्टीने संदीप काळे यांचे हे आत्मकथन अधिक आश्वासक वाटते. जन्मापासून ते आजपर्यंत जे आयुष्य आपण जगलो आहोत, त्यात राहिलेल्या उणिवांना भरून काढण्यासाठी पुढच्या आयुष्यात आपणाला संधी मिळू शकतात. या अर्थाने हे आत्मकथन एक सिंहावलोकन ठरते.

संदीप काळे हे माझे समकालीन मित्र आहेत. त्यांच्या वाट्याला आलेलं जगणं माझ्याही वाट्याला आलेलं आहे. संदर्भ वेगळे असतील पण संघर्ष मात्र सारखाच आहे. यामुळे हे आत्मकथन वाचताना अनेकदा मला हे सारं माझंच जगणं आणि म्हणनं आहे, असं वाटत राहिलं आहे. खेड्यातून शहरात शिकायला जाणं, तिथल्या वातावरणाशी आणि आर्थिक स्थितीशी जुळवून घेणं, शिक्षणातल्या कमतरता पुर्‍या करताना होणारी तारांबळ भोगणं, स्वतःचा लाजरेबुजरेपणा सोडून बेधडक आयुष्याला स्वीकारणं ह्या सार्‍या संदीपने यात नोंदवलेल्या आठवणी मला माझ्याच वाटल्या, यात नवल नाही. कारण त्या काळातल्या सगळ्याच तरुणाईला त्या नक्की आपल्याच वाटणार्‍या आहेत.

भोसी सारख्या छोट्या गावापासून सुरू झालेला आणि आज सकाळ सारख्या प्रतिष्ठित माध्यमामध्ये पोहचेपर्यंतचा हा सगळा संघर्ष शांत आणि कसलाही अभिनिवेश न आणता मांडलेला या आत्मकथनात दिसून येतो. आठवणी, प्रसंग, त्यावरच्या लेखकाच्या टिप्पण्या, सहवासात आलेली माणसं या सार्‍यांचा एक शब्दपट अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत संदीपने इथे उभा केला आहे. बालपणीच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षणातला त्याच्या वाट्याला आलेला संघर्ष, त्यातून त्याचे घडत गेलेले व्यक्तिमत्व, त्याचा होत गेलेला विकास त्याचे लोभस दर्शन या पुस्तकाच्या सुरुवातीला आढळते.

पुढे पुस्तकाचे केंद्रस्थान ठरू शकणारा संदीपचा महाविद्यालयीन शिक्षणातला संघर्ष येतो. तो मात्र आजच्या तरुणाईला नक्कीच प्रेरणा देणारा आणि नव्या वाटाही सुचवणारा आहे, असे म्हणता येते. त्यापुढे त्याच्या करीयरची सुरुवात, पत्रकारीताक्षेत्रातल्या संघर्षाची कथा पत्रकारीतेच्या करीयरमध्ये नुकत्याच आलेल्यांना दिशादर्शन घडवणारा आहे. एकूण या आत्मकथनामध्ये येणारा संघर्ष हा थकवणारा नसून तो कार्यरत ठेवणारा नि प्रेरित करणारा आहे.

संदीपच्या लेखनाचा सपाटा आणि आवाका हा खूपच मोठा आहे. त्याच्या लेखनाची गतीही कालसुसंगत म्हणावी अशीच आहे. त्याचे व्यक्तिमत्व जेवढे लोभस आहे तेवढेच ते बेधडकही आहे. त्याचे आजचे उंची व निवांत जीवनमान हे एका वेगळ्याच कार्यमग्न गतीने व्यापलेले असल्याचे मला जाणवले आहे. त्यामुळे त्याचा अनेकदा हेवाही वाटला आहे. संदीपची लेखननिष्ठा ही उपेक्षितांच्या वेदनांना, संघर्षांना वाचा देणारी आहे. हे त्याच्या अनेक पुस्तकांवरून आपल्या लक्षात येते. जवळपास बेचाळीस पुस्तकांच्या लेखनानंतर त्याला स्वतःबद्दल काहीतरी सांगावेसे वाटले आहे. हे ही महत्वाचेच आहे.

ऑल इज वेल हे आत्मकथनात्मक पुस्तक सर्वार्थाने संदीपच्या आजपर्यंतच्या जीवनसंघर्षाचे प्रतिबिंब आहेच. त्याचप्रमाणे ते त्याच्या समकालीन तरुणाईच्या जीवनसंघर्षाचे प्रतिनिधित्व करणारेही आहे. ही नोंद इथे मला प्रकर्षाने करावीशी वाटते. संदीपच्या या जीवनसंघर्षाला सलाम करतानाच मला त्याच्या भावी लेखनासाठी शुभेच्छाही द्याव्याश्या वाटतात.

पुस्तकाचे नाव : ऑल इज वेल (आत्मकथन)

लेखकाचे नाव : संदीप रामराव काळे

प्रकाशन : सकाळ प्रकाशन, पुणे

किंमत : २४० रु.

पुस्तक परिचय : डॉ. बाळू ना. दुगडूमवार

' महानंदायन', धनगरगल्ली, मु. पो. कुंटूर,

ता. नायगाव, जि. नांदेड - ४३१७०१,

भ्र. भाष्य : ९७६७१८९३९२

ई-मेल : maruti.dug@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.